नुकतीच नक्षलप्रभावित बस्तर-जगदालपूर लोकसभा मतदारसंघात नक्षलवाद्यांचा खातमा करण्यासाठी एक मोहीम पार पाडण्यात आली. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज यांनी असे सांगितले की, छत्तीसगड राज्यातील कांकेर येथील कारवाईत जे 29 नक्षलवादी ठार मारण्यात झाले ते सर्व लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठा हिंसाचार घडविण्याचे कारस्थान आखण्यात गुंतलेले होते.
आपल्याला आठवत असेलच की, साल 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात दांतेवाडा येथील भाजपा खासदार भीमा मांडवी आणि चार पोलीस कर्मचारी माओवाद्यांच्या निर्घृण हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून स्थापन झालेले सरकार उलथवून टाकण्याचाच चंग या माओवाद्यांनी बांधलेला असतो आणि त्याच हेतूच्या पूर्ततेसाठी हे लोक नाना तर्हेच्या हिंसक कारवाया करण्यात गुंतलेले असतात. आपण जेव्हा विकसित भारताचे आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहत असतो तेव्हा ते साकारण्यासाठी देशाची आंतरिक सुरक्षासुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. ती धोक्यात आणणार्या विषवल्लीचा समूळ नायनाट आवश्यक असतो. यासाठी कठोर राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. आपल्या प्राणांवर उदार होऊन नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करणार्या पोलीस दलाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज असते. त्या दृष्टीने छत्तीसगडमधील चित्र आश्वासक म्हणावे लागेल. मात्र एक उद्वेगजनक बाबसुद्धा समोर आली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बस्तरमध्ये बनावट चकमकी घडविल्या जात असल्याचे सांगून राज्याच्या भाजपा सरकारवर खरमरीत टीका केली आहे. कांकेर येथील चकमक खोटी नाही, हे मुख्यमंत्री विष्णुदेव यांनी सिद्ध करून दाखवावे अन्यथा माफी मागावी, असे खुले आव्हानच त्यांनी दिले आहे; परंतु मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री विजय शर्मा यांनी बघेल यांचा दावा साफ फेटाळून लावला आणि असे स्पष्ट केले की, बघेल यांना राष्ट्रहिताच्या बाबींतही केवळ राजकारणच दिसते. प्रत्येक मुद्द्यावर राजकारण करू नये आणि बघेल यांनीच ही चकमक कशी खोटी आहे ते सिद्ध करून दाखवावे अन्यथा सीआरपीएफ, बीएसएफ, डीआरजी आणि बस्तरच्या शूरवीरांची माफी मागावी.
एकीकडे राज्य सरकारची निंदा करीत असताना दुसर्या तोंडाने हेच भूपेश बघेल ’कांकेर मोहीम’ यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सुरक्षा बलाची प्रशंसा करताना दिसतात. ते म्हणतात की, ’हे सर्व अत्यंत शौर्याने माओवाद्यांशी लढले आहेत आणि त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. या 29 माओवाद्यांना ठार करणे खरोखरीच लक्षणीय गोष्ट आहे?’ बघेल यांच्या दुतोंडी भूमिकेबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी पुन्हा आपला मूळचाच राग आळवत सांगितले की, कांकेर येथे अलीकडील चकमक झाली ती मात्र बनावट होती. आम्ही थेट रमन सिंह यांच्या काळापासूनच्या अशा बनावट चकमकींची यादी देऊ शकतो. त्यांच्याच सुरात सूर मिसळून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनीही सरकारवर टीका करताना असे म्हटले आहे की, बस्तरच्या जंगलात जाताना कोणत्याच माताभगिनींना सुरक्षित वाटत नाही. येथील आदिवासी जमात भयभीत आणि चिंतित झालेली आहे. काँग्रेसचा गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा इतिहास पाहिला तर असे आढळेल की, बस्तरबाबत विश्वास, विकास आणि सुरक्षा हाच आमचा मूलमंत्र होता आणि त्याचमुळे नक्षली कारवायांत ऐंशी टक्के घट झालेली होती. एकूण बघेल केवळ आपल्याभोवतीच आरती ओवाळण्यात मग्न आहेत. त्याच वेळेस बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एका विश्वासाने ठामपणे सांगत आहेत की, येणारी दोन वर्षे म्हणजे माओवाद्यांच्या विरोधातील निर्णायक युद्धाची आहेत आणि त्या दृष्टीने ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे; पण काँग्रेसची माओवाद्यांनाच हुतात्मे ठरविण्यापर्यंत मजल गेली आहे.
प्रशासन आणि शासन हे सत्ता राबविण्याचे माध्यम असते. त्यांना निरंतर अस्तित्व असते. आज एका पक्षाचे सरकार असेल तर उद्या दुसर्या पक्षाचे सरकार असेल; पण प्रशासन आणि शासन यंत्रणा अशी सारखी बदलत नाही. उदाहरणच द्यायचे तर बस्तरचे सुंदरराज यांनी माओवाद्यांनी प्रभावित असलेल्या भागात अकरा वर्षे सेवा केली आहे. एका अर्थाने ते या भागात दीर्घकाळ सेवा बजावणारे आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे सुंदरराज यांना अशा विभागात कशा प्रकारे काम करावे लागते याचा चांगला अनुभव आहे; पण जेव्हा आपल्याकडे सांगण्यासारखे नसेल तेव्हा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, असा राजकारणी डावपेच असतो. हा घाणेरडा डावपेच बघेल वापरत आहेत. आपण उत्तम सत्ताधारी पक्ष म्हणून कार्य करू शकलो नाही, याची त्यांना खंत नाही. विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याची त्यांच्यावर जबाबदारी आली तर त्या जबाबदारीची जाणीव नाही. क्षुद्र राजकीय हेतूने देशाच्या आंतरिक सुरक्षेच्या विषयाला राजकीय दलदलीत ओढायचे हे सामाजिक पापच समजले पाहिजे. कदाचित बघेल यांचा अशा पाप-पुण्य संकल्पनांवर विश्वास नसेल; पण या देशातील जनतेचा विश्वास आपण गमावून चालणार नाही हेसुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही, हेच त्यांचे दुर्दैव आहे. आपल्याकडचे सांगण्यासारखे मुद्दे संपत चालले की दुसर्यावर बेफाम टीका करून जनतेचे लक्ष विचलित करायचे, या डावपेचाने अल्पकालीन यश कदाचित लाभू शकेल; पण ते देशासाठी व समाजासाठी त्याचबरोबर असे डावपेच आखणार्यासाठीही अंतिमतः घातक असते, हे बघेल यांच्यासारख्या राजकारण्यांच्या लक्षात येत नाही; पण यांचे शीर्षस्थ राजकारणीदेखील त्याच माळेचे मणी असल्यामुळे आपण त्यांच्याकडून जबाबदार राजकारणाची अपेक्षा करू शकत नाही. भाजपाचे नेते अमित शाह यांनी पालमपूर, हिमाचल प्रदेशातील एका भाषणात असे सांगितले होते, जो पक्ष काही ठाम तत्त्वांनुसार चालत नाही, त्याच्याकडे योग्य उद्दिष्ट असणे शक्य नाही आणि ज्या पक्षापुढे योग्य उद्दिष्ट नाही तो पक्ष राष्ट्रकल्याणाचे काम कधीच करू शकत नाही... आपली विचारधारा कोणती आहे याची स्पष्ट कल्पना असलेला व त्या विचारधारेचा अधिकाधिक प्रसार, मजबूत संघटन आणि नेत्यांचा सकारात्मक दृष्टिकोन हीच भाजपाची ताकद आहे. त्यामुळे केवळ एका पक्षाला सत्ताभ्रष्ट करणे, हेच काही दुसर्या पक्षाचे एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही; पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपासून राज्य पातळीवरील नेत्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे आपल्याला आज त्यांची वाटचाल अशीच उद्दिष्टहीनतेकडून उद्दिष्टहीनतेकडे चाललेली दिसते.