अर्कचित्र - अमोघ वझे
‘तुम्माला हज्जारदा सांगिटल्यालं भावजींला येक फोण लावा.. मोबाईलला ब्यालन्स न्हाई आसं कारन दिऊण टाळलं.. बरं भावजींचा मोबाईल येत हुता त्यो बी उच्यालला न्हात.. सेवटी चुलत आसलं तरी घरानं येकच ए.. या मुश्किल वख्ताला त्यांला मदतीला घेटलं आस्तं तर निदान घरच्या उखाळ्या पाखाळ्या तरी निगल्या नस्त्या..! पन येक काम धड करंल तर शपत.. निस्त्या याला श्या दे त्येला गद्दार म्हन, याला बाप चोरला म्हन त्येला पक्ष चोरला म्हन..! दोन टायमाचं गिंळायचं आनी गुच्चूप झोपून जायाचं..!!’ आद्याच्या बापावं रश्मिआक्काणं यवडं फायरींग क्येलं.. ते एकून रागरंग बगून आपल्यावं शेकाया नगं म्हनून मागल्या दारानं आद्या दिनूकं आनी फुडल्या दाराणं संज्या आद्याची बातमी तपसायला भाईर सटाकला.
संज्या बार मळंत मळंत रश्मिआक्काच्या घरात शिराया आनि सैपाकघरात पातेलं जमिनीवं आदळाया येकच टाइम झाल्ता. दचकून संज्याणं आत डोकावून पाह्यालं तं आद्याचा बाप घाबरूण भित्ताडाला ट्येकून हुबा र्हायल्याला आन् आद्या मागल्या दारात निम्मा आत आनि निम्मा भाईर आसा पळून जायाच्या तय्यारीत थांबल्याला. रश्मिआक्काचं टेंपर पुन्यांदा कशावरनं तरी सरकल्यालं. संज्याबी आत जावं का न्हाई, या इच्यारात आसतानीच आतून येक केरसुनी आली आनि आद्याच्या बापाच्या छाताडावं बसली. आदीच घामाघूम झाल्याला आद्याचा बाप आता आजूनच धापा टाकाया लागला. त्यामागेमाग रश्मिआक्का सैपाकघारातून झूप्कनी भाईर आली आनि तिच्या खुर्चीत धाप्पकनी बसली. तिनं आद्याला हाळी घाटली तसा आद्याबी घाबरंत तिच्या फुड्यात यून हुबा र्हायला. आद्याच्या बापाला आजूनबी कळंना, का रश्मिआक्का आज कशावरणं येवडी कावली. सेवटी रश्मिआक्काच आद्याला म्हन्ली, “तुज्या बापाला बातमी कळ्ळी नसनारच ए.. सांग त्येला..!” आद्याचा बाप आनि संज्या दोगंबी आद्याकं बघाया लागले. आद्यानं रश्मिआक्काला जरावेळेआदी सांगिटल्याली बातमी पुन्ना सांगाया घेटली.. “म्या दिनूच्या घरणं येत हुतो तवा चौकात येक भारीतली गाडी यून थांबली. येवडी भारी गाडी आपल्या गावात कुनाची आली म्हनून म्या बगाया ग्येलो तं गाडीतनं मागच्या साइटनं देव्या आन् फुडच्या साइटनं राजू चुलता उतारले. चुलता गाडीत म्हागं बसल्याल्या मानसाशी पार कंबरंत वाकू वाकू हात जोडू जोडू काय तरी बोलंत हुता. मंग त्या गाडीतल्या मानसानं काच वर घेटली आनि गाडी धुराळा उडवंत निगून ग्येली. गाडी गेल्यावं देव्याणं राजू चुलत्याच्या खांद्यावं हात टाकला आनि दोगं मैतर आसल्यानानी उसाच्या गुर्हाळात घुसले..!”
ष्टोरी सांगून झाल्यावं आद्याणं चस्मा काडून घाम पुसला. रश्मिआक्का धुसफुसत आद्याच्या बापाकं पाहून म्हन्ली, “शिरतंय का काई टक्कुर्यात..? कोन कुनाला सामील हुतंय, कोन कुनाला येकटं पाडतंय काई थांग लागतूया का..!? का निस्त नडगीपात्तूर पायघोळ झब्बा घालायाचा आनि हात पसरून घानेरडी ज्योक मारत भाश्नं द्यायाची यवडंच बास ए आपल्याला..!?” आद्याच्या बापाणं फुडं आल्याले दोन पिवळे दात आनि कोरडे पल्ड्याल्या व्हटांवरणं निस्ती जीभ फिरवली. ढापनाच्या दोन्नी बाजूंनी घामाच्या धारा झब्ब्यावं पल्ड्या. रश्मिआक्का धुसफुसत पुन्ना बोलाया लागली... “तुम्माला हज्जारदा सांगिटल्यालं भावजींला येक फोण लावा. मोबाइलला ब्यालन्स न्हाई आसं कारन दिऊण टाळलं. बरं भावजींचा मोबाइल येत हुता त्यो बी उच्यालला न्हात. काय तं म्हनं सायलेंटला हुता. वाजल्यावा ध्येनातंच आला न्हाई. सेवटी चुलत आसलं तरी घरानं येकच ए.. या मुश्कील वख्ताला त्यांला मदतीला घेटलं आस्तं तर निदान घरच्या उखाळ्यापाखाळ्या तरी निगल्या नस्त्या..! पन येक काम धड करंल तर शपत. निस्त्या याला श्या दे, त्येला गद्दार म्हन, याला बाप चोरला म्हन, त्येला पक्ष चोरला म्हन..! दोन टायमाचं गिळायचं आनि गुच्चूप झोपून जायाचं..!!” आद्याच्या बापावं रश्मिआक्काणं यवडं फायरिग क्येलं की त्यो स्वास घ्येयाचंच इसरला. रश्मिआक्काचा एकून रागरंग बगून आपल्यावं शेकाया नगं म्हनून मागल्या दारानं आद्या दिनूकं आनि फुडल्या दाराणं संज्या आद्याची बातमी तपसायला भाईर सटाकला.
हुंगत हुंगत संज्या बरूब्बर ‘धी गावटी चानक्य मल्टिफर्फझ ष्टेडेम’च्या येका कापर्यात आसल्याल्या म्हाराजांच्या पुतळ्याम्हागं जाऊण पोहोचला. तितं देव्या, दाढी, दाद्या आनि राजू चुलता गप्पा हानीत बसल्याले. दाद्या म्हनत हुता “न्येते तुम्मी हिकडं आले लै ब्येस क्येलं. आता तालुका पंचायतीला जरा काही दिस थंड घ्या. पुन्ना हायेच ग्रामपंचायतीला हमरीतुमरी..! त्येवडा आपली आवाज येकदा काडून दाकवा की. लै ब्येस काडता बगा..!” राजू चुलता जरा लाजल्यागत जाला.. “आवं आत्ता कुटं पावने..!? जरा त्यांला स्वास तं घिऊं द्याल का न्हाई..?” दाढी राजू चुलत्याच्या सुटकेला आला. तीच संधी साधून राजू चुलत्याणं “म्या यू का..? माज्या रोजच्या शिणीमाचा टाईम जाला..!? रोज येक तरी टाकतोच आपन..!” आसं बोलूण कल्टी हानली. त्यो गेल्या गेल्या दाद्या देव्याला म्हन्ला, “ओ यांला कशापायी घेटलं आपल्याकडं..!? उगा वाटेकरी वाडवायची कामं..!” “धिलं काहीच न्हाई वो. उलंट घेटलीया. शांतता!” देव्याच्या सूचक वाक्यावं दाढीणं देव्याला टाळी धिली. दाद्याला थोडं लेट पन थेट समाजलं आन् त्यो बी हासन्यात सामील जाला. म्हाराजांच्या पुतळ्यामागचा संज्या त्ये आयकूण निस्त घाम पुसंत र्हायला..!