वसुंधरेला ‘संजीवनी’ देणारी संस्था

विवेक मराठी    09-Mar-2024   
Total Views |
 
thane
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर तालुके म्हणजे मुंबई शहरापासून जवळ असणारे वनवासी क्षेत्र. देशाच्या आर्थिक राजधानीला पाणीपुरवठा करणारे तलाव या क्षेत्रात आहेत. अमाप जलसंपदा असूनही स्थानिक जनजाती समाज मात्र तहानलेलाच राहिला. त्यांची ही व्यथा जाणवलेल्या आनंद भागवतकाकांनी तेथील तहानलेल्या वसुंधरेला संजीवनी देण्यासाठी आणि पर्यायाने स्थानिक जनजाती बांधवांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एक प्रचंड मोठी व्यवस्था उभी केली. त्यांनी स्थापलेल्या वसुंधरा संजीवनी मंडळाने गेल्या आठ वर्षांत केवळ पाण्याचीच गरज भागवली नाही, तर शिक्षण, संस्कार, रोजगार, आरोग्य या सर्व पातळ्यांवर स्थानिक समाजही स्वयंपूर्ण केला. मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ‘ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे.
 
‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ ही भा.रा. तांबेंच्या कवितेतील ओळ. ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड जिल्ह्यांतील स्थानिकांची काही वर्षांपूर्वी अगदी हीच स्थिती झाली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा, भातसा आणि वैतरणा हे तीन मोठे तलाव या भागात आहेत. त्यात या भागात सरासरी 2500 मि.मी. पाऊस पडतो. पण नियोजन नसल्याने येथील पावसाचे पाणी वाहून जात होते आणि तलावांचे पाणी मुंबईकडे येत होते. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा स्थानिक जनजाती व ग्रामीण समाज उरलेले आठ महिने पाण्यापासून वंचित हे येथील वास्तव झाले होते. हे मोठे तलावक्षेत्र असूनही स्थानिक महिलांना डोक्यावर हंडे घेऊन मैलोनमैल चालत गरजेपुरते पाणी आणावे लागे, तेदेखील हवे तेवढे मिळत नसे व त्यांच्या, मुलांच्या आरोग्यावर, शिक्षणावर व एकूणच कुटुंबस्वास्थ्यावर या सगळ्याचा परिणाम होऊ लागला. यावर काहीतरी सबळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली होती. ठाण्यातील आनंद भागवतकाकांना ही गरज जाणवली. त्यांच्या व समविचारी नागरिकांच्या माध्यमातून 2016 साली उभी राहिली ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ ही सेवाभावी संस्था. कंपनी अ‍ॅक्टच्या कलम 8खाली एप्रिल 2016मध्ये ही संस्था नोंदणीकृत झालेली आहे.
  
 
सामाजिक जाणिवेला व कर्तव्यभावनेला वयाचे बंधन नाही, हे जाणवते ते आज नव्वदीत असणार्‍या भागवतकाकांच्या धडपडीतून. आज त्यांच्या ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या संस्थेच्या प्रयत्नातून शहापूर व मुरबाडमध्ये सेहेचाळीस कोटी लीटर पाण्याचे साठे तयार झाले आहेत. पाणीवाले काका म्हणून विख्यात झालेले आनंद भागवत यांच्याकडून आम्ही या संस्थेच्या एकूण कार्याची व प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
 
 
vivek
 
मुळात संस्थेने हाच भूभाग आपल्या कामासाठी का निवडला, हे समजून घेणे आवश्यक आहे. कठोर दुष्काळी परिस्थितीला तोंड देणार्‍या या भागात वास्तविक अनेक महत्त्वाचे तलाव, बारा नद्या आणि दीडशे जलप्रवाह आहेत. पाचशेहून अधिक नैसर्गिक तलाव आणि पन्नासहून अधिक मानवनिर्मित तलाव आहेत. या मानवनिर्मित पाझर तलावांची क्षमता तीस कोटी लीटर पाणी साठू शकेल अशी आहे. पण मग, एवढे स्रोत असूनही या क्षेत्रात प्यायलाही पाणी नाही अशी स्थिती का बरे निर्माण व्हावी? कारण यातल्या अधिकांश तलावांमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ तयार झाला होता. अनेक वर्षांत त्यांच्या स्वच्छतेसाठी जराही काम करण्यात आले नाही. त्यामुळे ज्या तलावात एक कोटी लीटर पाणी साठायला पाहिजे, तिथे जेमतेम दहा लाख लीटर पाणीच साठू शकते, अशी अवस्था निर्माण झाली होती.
 
 
बिघडलेले पाणीप्रश्न आणि शोधलेली उत्तरे
 
या भागातील बिघडलेला भूगर्भजलस्तर हा येथील एक मोठा प्रश्न आहे. ‘बोअरवेल सबसिडी’च्या राजकारणामुळे बोअर खणून उपसा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेले. सुरुवातीला काही काळ बोअरवेलला चांगले पाणी येते. पण त्यातील पाणी संपले की तिथे पोकळी तयार होते. या पोकळ्या एक ते दीड कोटी लीटर पाण्याची साठवण होईल इतक्या क्षमतेच्या आहेत. आपल्याला समुद्र जवळ आहे, त्यामुळे आजूबाजूच्या भागातले खारे पाणी वाहत येत जमिनीखालच्या या जलविरहित पोकळीत भरले जाते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पिण्यायोग्य तसेच स्वयंपाकास, शेतीस उपयुक्त ठरेल असे गोडे पाणी मिळाल्यानंतर काही काळाने मात्र तेथे उपशाला खारे पाणी लागते, जे पिण्यायोग्यही नसते व शेती-स्वयंपाकासही चालणारे नसते. जमिनीतील पोकळीत समुद्राचे पाणी शिरल्याने मातीचा कसही बिघडतो. वास्तविक ऐंशी फुटांपेक्षा खोल बोअरवेल असू नयेत असा नियम आहे. पण या भागात काही ठिकाणी 150-200, क्वचित 800 फूट खोलवर गेलेल्याही बोअरवेल आहेत. या व अशा अनेक कारणांमुळे शहापूर व मुरबाड तालुक्यात पाण्याच्या समस्येने अत्यंत भयंकर रूप धारण केले होते.
 
thane 
 
2016 साली स्थापन झालेल्या वसुंधरा संजीवनी मंडळाने दोन स्तरांवर आपले काम सुरू केले - एक म्हणजे पाण्याच्या सद्यकालीन समस्येवर काम करणे आणि दुसरे पुढच्या पिढीपुढे उभ्या असणार्‍या समस्यांचे निराकरण करणे. दुहेरी व्हिजनने संस्थेचे काम सुरू झाले. एक चेक डॅम बांधला की पाण्याची साठवण होतेच, शेतीलाही पाणी मिळते, जमिनीत मुरल्याने ओलावा तयार होतोे. गेल्या आठ वर्षांत संस्थेच्या माध्यमातून असे एकूण 23 चेक डॅम म्हणजेच काँक्रीटचे बंधारे बांधण्यात आले. 47 तलाव गाळमुक्त करण्यात आले. एकूण 14 शेततळी तयार करण्यात आली. 21 ठिकाणी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यात आले. या सगळ्या उपक्रमांमुळे या भूभागात संस्थेला 45 लाख कोटी लीटर पाण्याचा संचय करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे संस्थेने तयार केलेल्या अनेक शेततळ्यांवर सौर ऊर्जा निर्मिती संच बसवण्यात आले आहेत. याद्वारे उत्पादित होणार्‍या सौर ऊर्जेच्या साहाय्यानेच शेतांना पाणीपुरवठा करण्यात येतो. म्हणजे पाणीबचतही होते आणि ऊर्जाबचतही.
  
 
वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून 2022मध्ये आणखी एक मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, तो म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात छपरावरील पावसाच्या पाण्याचा संचय व त्याचे जमिनीत पुनर्भरण. छतावर जमा होणारे पावसाचे पाणी पन्हळ लावून गोळा केले जाते. फिल्टर लावून त्याचे शुद्धीकरण केले जाते व बोअरवेलला जोडणी केलेल्या पाइपद्वारे ते जमिनीतील पोकळीत भरले जाते. याला इंग्लिशमध्ये ‘रिचार्जिंग ऑफ बोअरवेल’ म्हटले जाते. या पर्जन्यजल संचय व बोअरवेल पुनर्भरणामुळे खारे पाणी जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहेच, त्याचप्रमाणे बोअरवेल्सना अखंड पाणीही येते. त्यामुळे घरोघरी पाण्याचा पुरवठा होतो व अनेक गावे आज टँकरमुक्त झाली आहे. गावागावात आर्थिक-सामाजिक परिवर्तन घडून आले. स्थलांतरे रोखण्यास फार मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईमुळे शाळेचा पट अतिशय खालावला होता. विशेषत: मुलींचा पट अधिक रोडावला होता. याचे कारण घरातील मोठ्या स्त्रिया पाणी भरायला गेल्या की भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी या मुलींवर येत असे. त्यात शाळेतही पेयजल व स्वच्छतागृहासाठी पाणी अभावानेच असे. त्यामुळे धाकट्यांना सांभाळणे आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर विद्यार्थिनींची संख्या रोडावण्याचा प्रश्न प्रखर झाला. वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून गावे टँकरमुक्त झाली. त्यामुळे स्त्रियांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण संपली. आणि अनेक शाळांच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा संच बसवल्याने शाळेतला पाणीप्रश्न सुटला व शाळांचा हजेरीपट सुधारला.
 


vivek 
 
इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो तो वसुंधरा संस्थेच्या गुणग्राहकतेचा. आज संस्थेच्या संपर्कात उत्तमोत्तम स्थापत्य अभियंते, पर्यावरण अभियंते, जलविज्ञानतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, वित्तीय व्यवस्थापक, बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अशी अनेक अनुभवी माणसे आहेत. या प्रकल्पांकरिता या तज्ज्ञांची, कुशल अभियंत्यांची व संशोधकांची मदत घेतली जाते. शास्त्रशुद्ध अभ्यास करून अद्ययावत पद्धतीने या प्रकल्पांचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जाते. उदाहरणच द्यायचे तर, शाफ्ट तंत्रज्ञान वापरून शेती करता येऊ शकते, याचा अभिनव प्रयोग खेवारे गावात राबवण्यात आला. त्यासाठी बराच काळ संशोधन करण्यात आले. जलसंचयासाठी पाण्याची टाकी बांधण्याऐवजी एका उंच पाइपच्या आत विशिष्ट पद्धतीने रचना करून, सौर पंपाच्या माध्यमातून बल तयार करून त्यात पाणी भरले जाते व ते गुरुत्वाकर्षणाचा वापर करून लांबवरच्या शेतांना पुरवले जाते. जितके पाणी उंचावर जाते तितके लांबवर पुरवले जाते, या तत्त्वाचा यात वापर करण्यात आला आहे. काँक्रीटच्या टाकीच्या 1/3 खर्चामध्ये हा प्रकल्प उभा राहतो व पाणीपुरवठाही व्यवस्थित होतो. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सव्वाशे एकर जमिनीवर या तंत्रज्ञानाअंतर्गत शेती करण्यास सुरुवात झाली आहे. आता या प्रकल्पाचा दुसरा टप्पा निर्माणाधीन आहे. आज संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे पंधराशे एकर जमीन ओलिताखाली आली आहे.
 

vivek 
 
‘वसुंधरा’चे विविध उपक्रम व यशोगाथा
 
 
पेंढरी आणि वाघाची वाडी हे भाग येथील अतिटंचाईग्रस्त भाग होते. या भागात पाण्याची प्रखर टंचाई होती. त्याच्याच बरोबरीने शेतीचे तीव्र स्वरूपात घटलेले उत्पन्न, त्यामुळे दारिद्य्र, माता-बालकांचे कुपोषण, घटता आरोग्यस्तर, स्थलांतराचे वाढते प्रमाण, शाळाबाह्य मुलांचे वाढते प्रमाण असे अनेक प्रश्न उभे राहिले होते. या सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर होते, ते म्हणजे ‘पाणी’. संस्थेकडे तेव्हा पैसे नव्हते, पण कामे करायला माणसे होती. संस्थेने स्थानिकांना हाताशी घेतले. 28 दिवसांत 30 वनराई बंधारे बांधून घेतले. अत्यल्प वेळात एवढ्या मोठ्या संख्येने बंधारे बांधण्याचा एक विक्रम महाराष्ट्रात प्रस्थापित झाला. या बंधार्‍यांच्या बाजूने शेती करण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबरीने भाज्या-फळे पिकवण्यासही सुरुवात झाली. शेतकरी सधन झाला, दरडोई उत्पन्न वाढले. शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे अधिकच्या शेतमजुरांची गरज निर्माण झाली, स्वाभाविकच रोजगार वाढला. त्याचबरोबरीने आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा व फळांचा समावेश झाल्याने कुपोषणाचा टक्का घटत गेला. ग्रामीण अर्थकारण सुधारण्यास या सार्‍याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. पेंढरी पाडा गावाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या नावे दिला जाणारा दहा लाख रुपयांचा ‘सुंदर गाव’ पुरस्कारही मिळाला. संस्थेच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी कनकवीरा नदीतील पस्तीस हजार घ.मी. इतका गाळ काढण्यात आला. एक घ.मी.चा खड्डा म्हणजे एक हजार लीटर पाणी. 35 हजार गुणिले एक हजार इतके पाणी उपक्रमामुळे साठवता येऊ लागले. गलिच्छ डबक्यासारखी झालेली, परिसरातील एक महत्त्वाची नदी कनकवीरा वाहती झाली. कधीकाळी पाण्यापासून वंचित राहिलेल्या क्षेत्रात आज मुले आनंदाने पोहण्याचा आनंद घेत आहेत. परिसरात लोकांनी बागा लावल्या, भाजीपालाही लावला.
 
 
संस्थेच्या माध्यमातून जलसमृद्धीसाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांसह गावे स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध आयाम सुरू करण्यात आले आहेत. अनेक गावांमध्ये शेतीपूरक उद्योग सुरू करण्यास ग्रामस्थांना मदत करण्यात येते. शेळीपालनाच्या, गोपालनाच्या, मत्स्यपालनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीस चालना देण्यात येते. पशुपालनाच्या माध्यमातून गावाचा विकास कसा होतो, हे रोठे पाडा गावानेच सिद्ध करून दाखवले. रोठे पाडा हादेखील दुष्काळग्रस्त भाग. ग्रामस्थांना दीड-दोन किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागे. चेक डॅममुळे या गावात पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर पशुपालन व्यवसायानेही जोर धरला. गुरांसाठी चारापाणी उपलब्ध होऊ लागले, त्यामुळे दुग्धोत्पादन वाढले. आज अमूल डेरीसारख्या महत्त्वाच्या दुग्धव्यवसायाचे एक केंद्र तिथे उभे राहिले असून एका छोट्याशा गावात दररोज हजार ते 1200 लीटर दुधाचे संकलन होते. संस्थेच्या माध्यमातून 2016 ते 2022 या काळात सरकारच्या वनशेती प्रकल्पासाठी 32 हजार झाडे लावण्यात आली. यात जांभूळ, शेवगा या झाडांचा समावेश आहे. वसुंधरा संजीवनी नर्सरीच्या माध्यमातून सुमारे सात हजार झाडांचे बीजवाटप करण्यात आले. 6000 रोप वाटप करण्यात आले. वणवे लागू नयेत म्हणून गवत कापणारी यंत्रसामग्री एक-दोन गावांना देण्यात आली आहे व त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षणही ग्रामस्थांना देण्यात आले आहे. जांभूळवन नावाचा एक अभिनव उपक्रम संस्थेने नुकताच हाती घेतला आहे. एका गावात जांभळाची साडेतीनशे झाडे नुकतीच लावण्यात आली आहेत व ठिबक सिंचन पद्धतीने त्यांना पाणी देण्यात येत आहे. जांभूळ या फळाला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. जांभळाचे बाजारमूल्य पन्नास ते साठ रु. किलो इतके आहे. चार वर्षांनंतर जांभळाचे पीक येणे सुरू होते व ते अखेरपर्यंत फायदा मिळवून देते. जांभूळवनात मधमाश्या येतात, त्यामुळे उत्तम प्रतीचा मधही मिळतो. यासह शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की ज्या भागात जांभूळवन असते, त्या भागात शेतीही वीस टक्के नफा देते. कारण मधमाश्यांमुळे परागीभवन होते. या सर्व बाबींचा विचार करून अशीच अनेक जांभूळवने सुरू करण्याचा संस्थेचा विचार आहे.
 
 
किशोरी आणि किशोर विकास प्रकल्प
 
संस्थेचे काम ज्या भागात चालते, तो सगळा दुर्गम जनजातीबहुल भाग. येथील मुलींमध्ये, तरुणींमध्ये आत्मविश्वासाचा अत्यंत अभाव आहे, त्यांच्या आरोग्यविषयक, सामाजिक अशा काही समस्या आहेत. या महिलांनी शिकावे, सक्षमपणे समाजाचे नेतृत्व करावे, त्यांना जाणवणार्‍या समस्या दडवून ठेवू नयेत, तर जाणकारांना विशद कराव्यात, चर्चेने त्यावर तोडगा शोधावा यासाठी शहापूर आणि मुरबाडमध्ये संस्थेच्या वतीने किशोरी विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या किशोरी विकास प्रकल्पाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला. संस्थेशी संलग्न स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या (यांना ‘किशोरीताई’ म्हटले जाते) हा वर्ग घेतात. शहापूरमध्ये 40 व मुरबाडमध्ये 20 ठिकाणी किशोरी विकास प्रकल्प सुरू आहेत व त्यांना यशही मिळत आहे. जवळपास 2500 मुलींना या वर्गाच्या माध्यमातून प्रशिक्षणाचा लाभ मिळतो आहे. पुढील वर्षभरात किशोरी विकास प्रकल्पांचा आकडा 100पर्यंत नेण्याचा संस्थेचा मानस आहे व त्यावर कामही सुरू आहे. समाजात किशोरींना जशा काही समस्या असतात, तशाच किशोरवयीन मुलांनाही असतात. त्यांनाही अनेक प्रश्न पडतात व ते सोडवण्याची आवश्यकता असल्याचे काही शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून समजले. अशा किशोरवयीन मुलांसाठी ‘किशोर विकास प्रकल्प’ही संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याचे भागवतकाका सांगतात.
 

thane 
 
पाणीवाले भागवतकाका
 
 
ठाण्याचे रहिवासी आनंद भागवत हे वसुंधरा संजीवनी संस्थेचे संस्थापक. संस्थेच्या निर्मितीमागचे कारण आनंद भागवतकाकांनी सांगितले, ते अत्यंत अस्वस्थ करणारे होते. ते म्हणाले, “आम्ही विद्याभारतीच्या कामासाठी शहापूर मुरबाड तालुक्यात गाडीतून भ्रमण करत होतो. या भागात फिरत असताना डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या सात-आठ वर्षीय छकुल्यांपासून पासष्ट-सत्तर वयापर्यंतच्या अनेक महिला दिसल्या. ते दृश्य पाहून आम्ही थांबलो. आमच्यापैकी दोघांनी गाडीतून उतरून त्या भगिनींना काळजीपोटी काही प्रश्न विचारले. त्यांनी उत्तरे दिली, फोटो काढू दिले. त्यातील एका माउलीने सहज विचारले की “प्रश्न विचारले, माहिती घेतलीत, फोटो घेतलेत ते ठीक आहे. पण तुम्ही आमच्यासाठी काही करणार आहात का?” शांत झोपेतून कोणीतरी आपल्याला हलवून जागे करावे, असे मला झाले. कर्तव्यभावनेने पाणी भरायला जाणार्‍या माउलींचे चेहरे पुढचे काही दिवस डोळ्यासमोरून हलत नव्हते. आता आपणच काहीतरी करायला हवे, या भावनेने हे काम मी हाती घेतले आणि पुढे वसुंधरा संजीवनी मंडळाची स्थापना झाली. संस्थेला अनेक समविचारी येऊन मिळाले. या समविचारी सहकार्‍यांच्या व अनेक स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज संस्था अत्यंत समर्पितपणे आपले काम करीत आहे व गेल्या आठ वर्षांत शहापूर व मुरबाड तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना त्याचे लाभही मिळू लागले आहेत, हीच संस्थेसाठी समाधानाची बाब आहे.”
 
 
वसुंधरा संजीवनी मंडळ ही ‘ना नफा’ तत्त्वावर चालणारी संस्था आहे. सामाजिक कार्य करणारी कोणतीही संस्था ही जनाधारावरच चालत असते. समाजातील अनेक देणगीदारांच्या सहयोगातून व सीएसआरच्या माध्यमातून संस्थेचे कार्य सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या प्रसारमाध्यमांनी संस्थेच्या कार्याची दखल घेतली आहे. महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आजपर्यंतच्या अनेक लेखांमध्ये आणि दिल्ली दूरदर्शननेसुद्धा पाणीवाले काका असे संबोधत भागवतकाकांचा गौरव केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व’ म्हणत त्यांच्या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. ठाणे भूषण, दै. लोकसत्ता, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरी, नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघ, महाराष्ट्राचे मा. राज्यपाल आणि भारताचे जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या हस्ते असे विविध 28 पुरस्कार संस्थेस प्राप्त झाले आहेत. दुष्काळग्रस्त आणि दुर्लक्षित अशा शहापूर आणि मुरबाड तालुक्यांत पाणी आल्यानंतर आज तेथील जनजाती समाज शेती, शिक्षण, आरोग्य, संस्कार, रोजगार अशा अनेक बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागला आहे. त्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलवण्यात वसुंधरा संजीवनी मंडळाला यश आले आहे. हे हसू हा संस्थेसाठी खरा पुरस्कार आहे, असे मला वाटते.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.