वैचारिक आणि बौद्धिक कुवतीत राहुल गांधींशी स्पर्धा असलेल्या उद्धव ठाकरे यांची वैचारिक दिवाळखोरी जनसंवाद यात्रेत उघड झाली आहे. ‘शेपूटघाल्या गृहमंत्री’ अशी अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करून त्यांनी मनातल्या भाजपाद्वेषाला वाट मोकळी करून दिली असली, तरी उद्धव यांचे राजकीय आकलन कोणत्या पातळीवरचे आहे, हे यातून दिसून येते.
गेल्या दहा वर्षांत केंद्रातली कामगिरी अनेक आघाड्यांवर उत्तम झालेली असताना आणि भारताच्या कौतुकास्पद प्रगतीची सगळ्या जगाने गांभीर्याने दखल घेतलेली असतानाही निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीपासून भाजपाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. अलीकडेच या पक्षानेे 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अशी निवडणूक यादी जाहीर करणारा भाजपा हा पहिला पक्ष नसला, तरी त्याआधी फक्त केरळमधल्या डाव्या सत्ताधारी आघाडीने आपल्या राज्यापुरती 20 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यातही ज्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी राहुल गांधी यांनी निवडणूक लढवली होती, तिथून भाकपाने आपला उमेदवार जाहीर करून ‘इंडिया’ आघाडीतला अंतर्विरोध उघडा पाडला. जे गाठोडे कसेबसे बांधले आहे, ते अशा अंतर्विरोधानेच निवडणुकीआधी खिळखिळे होते आहे. तरीही ना कोणी सावध आहे, ना तोंडावर ताबा ठेेवते आहे. याची दोन उदाहरणे म्हणजे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे.
काँग्रेसचे स्टार(?)प्रचारक राहुल गांधी यांना अलीकडेच निवडणूक आयोगाने, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘जाहीर वक्तव्ये करताना अधिक दक्षता घ्या, सावधगिरी बाळगा’ असा इशारा दिला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक प्रचार नियमावलीचे पालन करण्याची सूचना सर्व राजकीय पक्षांना, त्यांच्या स्टार प्रचारकांना आणि सेलिब्रिटी प्रचारकांना करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करणे हिताचे आहे हे कळण्याइतके शहाणपण राहूल यांच्याजवळ आहे का, याची शंका आहे. जेव्हा ठोस काही सांगण्यासारखे, लोकांचे मन आणि विचार बदलू शकतील असे मोलाचे काही केलेले नसते, तेव्हा प्रचारकाळात अपशब्द वापरत विरोधकांवर टीका करत सभेवर प्रभाव टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. तो अनेकदा बूमरँग होतो, तरी भाषा बदलण्याची सुबुद्धी होत नाही असे दिसल्यावर असा इशारा देण्याची वेळ येते. गेल्या वेळी ‘पनौती’ आणि ‘खिसेकापू’ अशी शेलकी विशेषणे वापरून पंतप्रधानांची संभावना केल्याबद्दल राहुल गांधी यांना नोटिस बजावण्यात आली होती. अजून त्यांचा न्याय यात्रा ज्वर उतरलेला नाही, पण निवडणुकीचे घोडामैदान जवळ आहे. तेव्हा आयोगाने दिलेल्या इशार्याचे ते पालन करतात का, हे पाहायचे.
त्यांची सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा अजून संपायचे नाव घेत नाही. वास्तविक हा प्रयोग इतका फसला आहे की लोकांच्या दृष्टीने यात्रा संपल्यातच जमा आहे. मजल-दरमजल करत आणि मध्येच केंब्रिज विश्वविद्यालयातील भाषणासाठी पाच दिवसांचा ब्रेक घेत, रटाळपणे चालू असलेल्या यात्रेचा मुक्काम सध्या गुजरातेत आहे. गतवर्षी केंब्रिज विश्वविद्यालयात भाषण करताना राहुल गांधी यांनी ‘मोदी देशाला बरबाद करत आहेत’ अशी मुक्ताफळे उधळली होती. या वेळी काय बोलले त्याची कल्पना नाही. गुजरातेत ‘मोदी की गॅरंटी’ची नक्कल करत, ‘काँग्रेसची गॅरंटी’ म्हणत गुजरातेतल्या युवकांना त्यांनी पाच आश्वासने दिली. ती वाचली की त्यांची, त्यांच्या पक्षाची व्हिजन किती तोकडी आहे हे अगदी कोणालाही समजेल. अशा गॅरंटीने काँग्रेसच्या पारड्यात मते पडतील असे समजणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
वैचारिक आणि बौद्धिक कुवतीत राहुल गांधींशी स्पर्धा असलेल्या उद्धव ठाकरे यांची वैचारिक दिवाळखोरी जनसंवाद यात्रेत उघड झाली आहे. ‘शेपूटघाल्या गृहमंत्री’ अशी अत्यंत खालच्या पातळीवरची टीका करून त्यांनी मनातल्या भाजपाद्वेषाला वाट मोकळी करून दिली असली, तरी उद्धव यांचे राजकीय आकलन कोणत्या पातळीवरचे आहे, हे यातून दिसून येते.
विरोधी पक्षातील नेत्यांच्या या हास्यास्पद वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर, मंत्री परिषदेच्या बैठकीत मंत्र्यांना प्रचारकार्यासंदर्भात मार्गदर्शन करताना पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ही बैठक जवळपास आठ तास चालली होती. ‘लोकांना भेटताना काळजी घ्या, विचारपूर्वक बोला, वादापासून आणि वादग्रस्त विधानांपासून दूर राहा, तसेच डीपफेकपासून सावध राहा’ असे मोदींनी या वेळी सांगितले. तसेच सरकारने जनहिताची आणि विकासाची जी कामे केली आहेत, त्याची माहिती लोकांना द्या असे ते पुढे म्हणाले. भूतकाळातल्या कामाचा लेखाजोखा मांडताना, तिसर्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांत करायच्या कामांविषयीचे डॉक्युमेंटही समोर मांडले. भाजपाचे भविष्यवेधी असणे हेच त्यातून अधोरेखित होते. तेच या पक्षाचे वेगळेपण आणि बलस्थानही.
सरकार म्हणून केलेल्या भरीव कामगिरीमुळे प्रचारकाळात लोकांना सांगण्यासारखे अनेक मुद्दे आपल्याजवळ आहेत, याची जाणीव पंतप्रधानांनी मंत्र्यांना करून दिली. जेव्हा लोकांना सरकारने केलेले काम दिसत असते, त्या कामाचे जनजीवनावर झालेले परिणाम दिसत असतात, तेव्हा सुज्ञ नागरिक विरोधकांची टीका अजिबात गांभीर्याने घेत नाहीत. मतदानाच्या माध्यमातून ते अशा वायफळ बोलणार्या विरोधकांना त्यांची जागा दाखवतात. तरीही त्यावर विसंबून न राहता भाजपा विचारपूर्वक निवडणुकीची तयारी करत आहे. आपल्या मंत्र्यांना, प्रचारकांना सावधगिरी बाळगण्याचे सल्लेही देत आहे. कारण निवडणूक ज्वर चढला की भल्याभल्यांना बोलण्याचे तारतम्य राहत नाही. ज्यांच्याकडे ते असते,त्यांना कोणत्या चेंडूवर टोला लगावायचा आणि कोणता सोडून द्यायचा हे नेमके कळते. शिवाय जेव्हा सांगण्यासारखे खूप काही असते, तेव्हा वायफळ बोलून वेळकाढूपणा करण्याची नौबतही त्यांच्यावर येत नाही. पण ज्यांच्याकडे मुदलातच काही सांगण्यासारखे नसते, त्यांची मात्र पंचाईत होते. त्यांच्यासाठी प्रचारसभा वा कोणतीही नावाखाली जमवलेली गर्दी म्हणजे फक्त आणि फक्त विरोधकांवर टीका करण्याची संधी एवढेच समीकरण असते. त्यातून आपला लाभ होतो आहे की हानी, याचेही भान राहत नाही.
अभ्यासाचा आधार असलेली चोख तयारी आणि सावधपण या भाजपाच्या वैशिष्ट्यांचे विरोधकांनी अनुकरण केले, तर निवडणुकीत विजय जरी मिळाला नाही, तरी किमान हसे होणार नाही. पण हे लक्षात कोण घेतो?