विचारधारांचा संघर्ष

23 Mar 2024 12:46:55


bjp
काँग्रेस आणि भाजपा यांचा संघर्ष केवळ राज्यसत्तेसाठी नाही. पंतप्रधानपदासाठी नाही. हा दोन विचारधारांतील संघर्ष आहे. 2024च्या निवडणुकीत हा संघर्ष अधिक टोकदार होईल. या संघर्षात काँग्रेसची विचारधारा जिंकली तर सनातन भारतीय राष्ट्राचे नुकसान होईल आणि कॅथोलिक सोनिया गांधी यांच्या प्रभावाची पुनरावृत्ती होईल. जर मोदी यांची भारतीय विचारधारा जिंकली, तर भारतमाता विश्वगुरुपदावर आरूढ होईल. समर्थ, सशक्त भारत उभा राहील. समर्थ भारतासाठी मतदारांनी मतदान करताना योग्य पर्याय निवडावा, ही अपेक्षा.
राहुल गांधी यांनी दोन यात्रा काढल्या. पहिल्या यात्रेचे नाव होते ’भारत जोडो यात्रा’ आणि दुसर्‍या यात्रेचे नाव होते ‘भारत जोडो न्याय यात्रा’. मुंबईच्या शिवाजी पार्कवर या दुसर्‍या यात्रेचा समारोप झाला. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचा चेहरा आहेत. काँग्रेस पक्षाची एक विचारसरणी आहे, त्या विचारसरणीचा ते चेहरा आहेत. राहुल गांधींच्या यात्रेचे तीन हेतू होते -
 
काँग्रेसची विचारसरणी पुन्हा प्रस्थापित करणे.
 
केंद्रात काँग्रेसचे शासन आणणे.
 
स्वत: पंतप्रधान होणे.
 
या तिन्ही गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. पंतप्रधानपदाची स्वप्ने बघून पंतप्रधान होता येत नाही, त्यासाठी जनसमर्थन लागते. जनसमर्थन मिळण्यासाठी जनतेत मिसळावे लागते, जनतेच्या आशा-आकांक्षा समजून घ्याव्या लागतात. या दोन यात्रा काढून राहुल गांधी यांनी तसा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबरचे अन्य प्रादेशिक नेते आपापल्या जहागिरीत खूश आहेत. राहुल गांधींना पाठिंबा देण्यात त्यांचे कसलेच राजकीय नुकसान नाही. हे प्रादेशिक पक्ष कोणत्याही विचारधारेवर उभे नाहीत. लोकानुरंजन करण्यात आणि लोकांना भ्रमित करण्यात ते तरबेज आहेत.
 
काँग्रेसची विचारधारा कोणती आहे? या विचारधारेचे स्तंभ असे आहेत -
 
सेक्युलॅरिझम
 
समाजवाद
 
उदारमतवाद
 
अलिप्ततावाद
 
काँग्रेसचे मानणे असे आहे की, आपल्याला नवीन भारत घडवायचा आहे, ज्याची पायाभरणी पं. नेहरूंनी केली आहे. हा नवीन भारत हिंदू भारत असणार नाही. तो इस्लाम, ख्रिश्चानिटी आणि हिंदू धर्मातील उपपंथ यांच्या संमिश्र संस्कृतीचा असेल. बहुसंख्याकवाद येथे चालणार नाही. राज्याने हिंदू श्रद्धांची कोणतीही प्रतीके स्वीकारता कामा नयेत. मुसलमान आणि ख्रिश्चन अल्पसंख्य असल्यामुळे त्यांना संरक्षण दिले पाहिजे (हिंदूंपासून) आणि त्यांना सवलती दिल्या पाहिजेत. पाकिस्तानशी शत्रुत्व करता कामा नये. 370 कलम हटविणे चूक आहे. ’दी गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ या माझ्या पुस्तकात या विचारसरणीचा विस्तृत परिचय दिला आहे.
 
 
भाजपाची विचारसरणी काँग्रेस विचारसरणीच्या संपूर्ण विरोधात आहे. भाजपाचे मानणे असे आहे की, हे सनातन राष्ट्र आहे. या राष्ट्राची सनातन संस्कृती आहे, या राष्ट्राची अस्मिता आहे, या राष्ट्राची वेगळी जीवनमूल्ये आहेत. राम आणि कृष्ण हे या राष्ट्रीय जीवनाचे आदर्श आहेत. मुस्लीम आणि ख्रिश्चन राजवटी परकीय होत्या. त्या राजवटींच्या खाणाखुणा पुसून टाकल्या पाहिजेत आणि भारतमातेला विश्वगुरुपदावर आरूढ केले पाहिजे. राहुल गांधी ज्याप्रमाणे काँग्रेस विचारधारेचा चेहरा आहेत, त्याप्रमाणे नरेंद्र मोदी भाजपा विचारधारेचा चेहरा आहेत.
 

bjp 
 
काँग्रेस आणि भाजपा यांचा संघर्ष केवळ राज्यसत्तेसाठी नाही. पंतप्रधानपदासाठी नाही. हा दोन विचारधारांतील संघर्ष आहे. 2024च्या निवडणुकीत हा संघर्ष टोकदार झालेला आहे. या संघर्षात काँग्रेसची विचारधारा जिंकली तर सनातन भारतीय राष्ट्राचे नुकसान होईल आणि कॅथोलिक सोनिया गांधी यांचा प्रभाव जसा 2004 ते 2014 पर्यंत राहिला, त्याची पुनरावृत्ती होईल. जर मोदी यांची भारतीय विचारधारा जिंकली, तर भारतमाता विश्वगुरुपदावर आरूढ होईल. समर्थ, सशक्त भारत उभा राहील.
 
 
शिवाजी पार्कच्या सभेत राहुल गांधी यांचे भाषण झाले. काँग्रेस विचारधारेच्या संदर्भातील त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे, त्यातील परिच्छेद असा आहे - “आपल्याला वाटते की, आपण एका राजकीय पक्षाविरोधात लढत आहोत. मात्र ही लढाई केवळ एका पक्षाशी नाही. आम्ही नरेंद्र मोदी या व्यक्तीविरोधात नाही. आमचा लढा भाजपा किंवा एका व्यक्तीविरोधात नाही, कारण एका व्यक्तीचा चेहरा पुढे करून हे सर्व सुरू आहे. आम्ही या व्यक्तीच्या पाठी उभ्या असलेल्या शक्तीविरोधात लढत आहोत.”
 
 
 
योगायोग कसा असतो बघा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपाची मातृसंस्था आहे. या संघाची प्रतिनिधी सभेची बैठक नागपूर येथे नुकतीच पार पडली. पत्रकारांना निवेदन देताना सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे म्हणाले, “श्रीरामजन्मभूमीवर झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे परकीय राजवटीच्या आणि संघर्षाच्या काळात गमावलेला आत्मविश्वास आणि आत्मविस्मरणाच्या अभावातून समाज बाहेर पडत आहे. हिंदुत्वाच्या भावनेने ओतप्रोत झालेला संपूर्ण समाज स्वत:ला जाणून घेण्यास आणि त्याच्या आधारावर जगण्यासाठी सज्ज होत आहे. प्रभू श्रीरामाचे जीवन आपल्याला सामाजिक जबाबदार्‍यांशी बांधील राहून समाजासाठी आणि राष्ट्रासाठी त्याग करण्याची प्रेरणा देते. त्यांची शासनप्रणाली जगाच्या इतिहासात ‘रामराज्य’ या नावाने प्रस्थापित झाली, ज्यांचे आदर्श सार्वत्रिक आणि शाश्वत आहेत. जीवनमूल्यांचा र्‍हास, मानवी संवेदनांचा र्‍हास, विस्तारवादामुळे वाढती हिंसा आणि क्रूरता इत्यादी आव्हानांना तोंड देण्यासाठी रामराज्याची संकल्पना आजही संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.”
 
 
दत्तात्रय होसबळे हे राजकीय पक्षाचे नेते नाहीत. संघाची विचारधारा काय आहे, हे त्यांनी मांडले. नरेंद्र मोदी हे या विचारधारेतील राजनेते आहेत. अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण करून आपण कोण आहोत हे त्यांनी जगाला दाखवून दिले. संघर्ष हा या दोन विचारप्रवृत्तींत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही संघर्षाच्या भूमिकेत नसतो. पं. नेहरू यांना पूर्ण सहकार्य करण्याचे पत्र श्रीगुरुजींनी लिहिले होते; परंतु पं. नेहरूंनी ते अव्हेरले. त्यांचा पणतू राहुल गांधी हेच काम करीत आहे.
 
आपल्यासमोरचा प्रश्न काँग्रेस विचारधारेला जीवदान द्यायचे की संपूर्णपणे नाकारायचे? काँग्रेस विचारधारेत काही सकारात्मक विषय आहेत, ते विषय असे -
 
 
राज्याचा कोणताही उपासना धर्म असता कामा नये.
 
सर्व उपासना पंथांना राज्याने समान वागणूक दिली पाहिजे.
 
भारत बहुविविधता असलेला देश आहे. या बहुविविधतेचे जतन झाले पाहिजे.
 
समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळाला पाहिजे.
 
जागतिक राजकारणात कोणत्याही महासत्तेच्या गोटात आपण सहभागी होता कामा नये.
 
या विषयाशी भारतीय राष्ट्रविचारांचा संघर्ष नाही. प्रश्न येतो तो, या विचाराधारांच्या अधिष्ठानांशी. सेक्युलॅरिझम, समाजवाद, उदारमतवाद, अलिप्ततावाद हे या सर्व विचारांचे किंवा जीवनमूल्यांचे अधिष्ठान असू शकत नाहीत. हे सर्व शब्द सेमेटिक विचारधारेचे शब्द आहेत. सेमेटिक विचारधारा भयंकर असहिष्णू असते. मी म्हणतो तेच खरे, बाकी सर्व घातक... अशी सेमेटिक विचारधारा असते.
 
 
नेहरू-काँग्रेसने ही मनोवृत्ती निर्माण केली. महात्मा गांधी-काँग्रेस ही वेगळी काँग्रेस आहे आणि नेहरू-सोनिया-गांधी काँग्रेस ही वेगळी काँग्रेस आहे. तिचा संघर्ष भारतीय आत्म्याशी आहे. भारताचा आत्मा भारताच्या धर्मविचारात आहे. व्यास, वाल्मीकी, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरू नानक ते विवेकानंद अशी त्याची फार महान परंपरा आहे. आधुनिक काळात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा अशी ही परंपरा आहे. नेहरू-सोनिया-गांधी काँग्रेसला ही परंपरा नको आहे. नवीन सेमेटिक परंपरा त्यांनी सुरू केली.
 
 
या परंपरेला खिंडार पाडण्याचे काम रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाने केले. हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून नेहरू- सोनिया-गांधी काँग्रेसने जिवाचे रान केले. सर्वोच्च न्यायालयात रामाचे अस्तित्वही नाकारले. अस्तित्व नाकारण्यासाठी वकिलांची फौज उभी केली. हे सर्व प्रयत्न विफल झाले. सनातन भारताचा विजय झाला. जन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर उभे राहिले. 22 जानेवारीला त्याचे लोकार्पण झाले आणि सर्व देश राममय झाला. नेहरू-सोनिया-गांधी काँग्रेसचा संघर्ष म्हणजे राहुल गांधींचा संघर्ष या राममय भारताशी आहे.
 
 
राहुल गांधी यांच्या मदतीला देशातील अनेक राजकीय पक्ष उभे राहिलेले आहेत. हे सर्व प्रादेशिक पक्ष आहेत. यापैकी कोणत्याही पक्षाकडे राष्ट्रउभारणीची कोणतीही विचारधारा नाही. महाराष्ट्रातील शरदराव पवारांचे उदाहरण घेऊ या. त्यांना बारामती सुरक्षित हवी. कन्या सुप्रियाचे भवितव्य सुरक्षित हवे. मराठा वर्चस्वाचे राजकारण हवे. मराठ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करायची असेल तर ब्राह्मणांना शिव्या घालणे आवश्यक आहे. सत्तेसाठी मुसलमानांना कुरवाळणेे आवश्यक आहे आणि एवढे सगळे करून पवार घराण्याची जहागीरदारी किंवा वतनदारी मजबूत करणे एवढाच त्यांचा ध्येयवाद आहे. त्यांचा राष्ट्रीय ध्येयवाद कोणता? त्यांचा आंतरराष्ट्रीय ध्येयवाद कोणता? सर्व भारताला जोडेल असा त्यांचा कार्यक्रम कोणता? आपण त्याबाबतीत पूर्ण अज्ञानी आहोत. हीच गोष्ट लालूप्रसाद यांना लागू होते. सत्तेचा वापर करून गुंड पोसायाचे, तिजोरी रिकामी करायची, बायको-मुलगा-मुलगी यांचे भवितव्य सुरक्षित करायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचे.
 
 
अरविंद केजरीवाल स्वत:ला भारतातील महापंडित समजतात. ज्ञानसागर समजतात. मोदींविरुद्ध तुच्छेतेने बोलतात. लोकांना फुकट खायला घालून आणि फुकट सवलती देऊन पौरुषहीन करणे हे त्यांचे राजकारण आहे. काँग्रेसबरोबर ज्या सगळ्या शक्ती उभ्या आहेत, त्या सर्व राममयविरोधी भारताच्या शक्ती आहेत. त्या प्रत्येकाला काही ना काही तरी जनसमर्थन आहे. ही त्यांची शक्ती आहे.
 
 
रामशक्तीपुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते जनप्रबोधन करण्याचे. मतदारांना हे समजावून सांगावे लागेल की, नको त्या माणसाला शक्ती दिली असता त्याचे फार वाईट परिणाम होतील. लोेकांनी हे परिणाम दीर्घकाळ भोगले आहेत. यांना शक्ती दिली, तर 2008 साली मुंबईवर पाकिस्तानी इस्लामी दहशतवाद्यांचा हल्ला झाला. त्यात अजमल कसाब पकडला गेला. असे असंख्य अजमल कसाब भविष्यात उभे राहतील.
 
ते कसे, हे पुढील अंकात वाचू या.
Powered By Sangraha 9.0