निवडणुकीच्या रणसंग्रामात आपले अमूल्य मत हेच जनतेच्या हातातील एकमेव शस्त्र आहे आणि ते ब्रह्मास्त्राप्रमाणे पाच वर्षांतून एकदाच वापरता येणारे असे आहे. ते विशादामुळे वापरलेच नाही किंवा भ्रामक प्रचाराला बळी पडून त्याची माती केली तर त्याचा दूरवरचा परिणाम भोगावा लागणार आहे. तेव्हा जनताजनार्दनाने वेळीच सावध व्हायला हवे. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान आणि तेही उचित विचार करून केल्यास मग आपल्या देशाला विश्वगुरू पदावर विराजमान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि येणारा भावी काळ हा उज्ज्वलच असेल! तेव्हा हे ‘गॅरंटी कार्ड’ प्रत्येकाने वापरलेच पाहिजे.
सध्या संपूर्ण देशभरात निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना इंडी आघाडीच्या नेतेमंडळींनी असे ठरवून टाकले आहे की, ही 2024 ची निवडणूक भारतातील शेवटची निवडणूक आहे आणि यात मोदी जर जिंकले तर मग देशात कधीच निवडणूक होणार नाही. आपण जर मागच्या निवडणुकांच्या वेळची प्रचारमोहीम पाहिली तर 2019 च्या निवडणुकांच्या वेळीसुद्धा या मंडळींनी हाच राग आळवला होता. जर या मंडळींचे म्हणणे खरे मानले तर ‘एक देश, एक निवडणूक’ याबाबतचा जो अहवाल राष्ट्रपतींकडे सोपविण्यात आला आहे तो कोणाच्या नजरेत धूळफेक करण्यासाठी? पण एकदा वास्तवाकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे ठरविले, की अशा सर्व प्रकारच्या भाकड कल्पना आपोआप सुचू शकतात, हे नक्की! आता या कल्पनांना भाकड का म्हणायचे? तर, इंडी आघाडीच्या मंडळींना जनतेची शुद्ध फसवणूक करून सत्तेवर यायचे डोहाळे लागले आहेत; पण ते कशाच्या बळावर सत्ता प्राप्त करू पाहत आहेत? लोकांना देण्यासाठी त्यांच्याकडे पोकळ घोषणांच्या फुग्यांवाचून काहीच नाही आणि ‘आपणच दुसर्यांच्या फुग्यांत कशी हवा भरली होती!’ असे सांगत ही मंडळी हिंडत आहेत. या मायावी मारिचांच्या भूलथापांना सुबुद्ध जनतेने आपण कदापि फसावयाचे नाही, असा पूर्ण निर्धार करायला हवा. आज या निर्धाराची गरज का आहे? तर, या प्रचाराच्या गदारोळात जेव्हा जनतेचा रथ दोन्ही आघाड्यांच्या रणसंग्रामाच्या मैदानावर मध्यभागी सापडतो तेव्हा त्यांनाही धनुर्धर अर्जुनाप्रमाणे व्यामोहाचा विंचू डसण्याचा आणि विशादाचा सर्प विळखा घालण्याचा धोका संभवतो.
महाराष्ट्राच्या संदर्भातील हे चित्र पुरेसे बोलके आहे. मागच्या निवडणुकांत एकच चिन्ह आणि एकच पक्षनाम घेऊन लढलेले रथी-महारथी आता वेगळ्या मशाली आणि तुतार्या घेऊन लढायला सज्ज झाले आहेत. अशा वेळी ‘कौरव कौन, पांडव कौन टेढा सवाल है! हर तरफ शकुनि का फैला मायाजाल है!!’ असे जनतेच्या मनात येऊ शकते; पण या मायाजालातून वेळीच सावध होऊन जनतेने बाहेर पडले पाहिजे अन्यथा कपाळी पुन्हा वनवास आल्यावाचून राहणार नाही.
आपण लोकशाहीचे संरक्षक आहोत, आपण संविधानाचे संरक्षक आहोत आणि पर्यायाने आपणच जनतेचे हितरक्षक आहोत, असा ‘न्याययात्रे’चा आव आणणारी ही मायावी मंडळी आहेत. जेव्हा मोदी निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतही निवडणुका पार पडल्यानंतर शंभर दिवसांत जो कार्यक्रम राबवायचा आहे त्याची तयारी करण्यासाठी प्रशासनाला कामाला लावत आहेत आणि 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न नव्हे ‘कृती आराखडा’ समोर ठेवत आहेत त्याच वेळी या भुरट्या मंडळींना मोदीविरोध या एकाच मोतीबिंदूने दोन्ही डोळ्यांस ग्रासून टाकले आहे. त्यामुळे जनहिताचा आणि विकसित भारताचा कोणताही कृती आराखडा या मंडळींकडे नसताना बेछूट आरोपांच्या भेंडोळ्या ही मंडळी बरसवण्यात मग्न झालेली आहेत. दैवदुर्विलास पाहा! आज खर्या सक्षम विरोधी पक्षाचाही या देशात अभाव निर्माण झालेला आहे. सत्तेवर येण्याचे दिवास्वप्न सोडा, पण सक्षम विरोधी पक्षाचे कर्तव्य बजावण्याचाही अधिकार या मंडळींनी गमावलेला आहे.
याचे कारण पाहायचे तर भाजप आणि अन्य पक्षांत मूलभूत फरक असा आहे की, या सर्व पक्षांनी हळूहळू आपली विचारधारा आणि वैचारिक दिशाच गमावलेली आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या वैचारिक भूमिकेचा गांभीर्याने विचार करीत नाहीत, ती आत्मसात करीत नाहीत, तिचे मनन करीत नाहीत आणि योग्य संदर्भासह आपले विचार पक्के करीत नाहीत तो पक्ष कृत्रिम यंत्राप्रमाणे बनून जातो आणि शेवटी मृतवत होतो. भाजप नेत्यांनीही विविध यात्रा काढल्या, प्रचारमोहिमा राबविल्या. वैचारिक सातत्य आणि सुस्पष्ट विचारधारा हीच भाजपची खरी ओळख आणि ताकद आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कार्यप्रेरणा देताना स्पष्टपणे सांगितले होते की, आपण निवडणुकीचे यंत्र नाही. तर राष्ट्राचा कायापालट करणे, येथील राजकारण व प्रशासन बदलणे, राष्ट्राची नवी ओळख निर्माण करणे आणि विश्वामध्ये भारताला पुन्हा एकदा गौरवपूर्ण उच्च स्थान प्राप्त करून देणे हेच आपले कार्य आहे! एक भव्यदिव्य आणि उदात्त रोड मॅप या नेत्यांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोरही आहे; पण केवळ ‘कॉपी’ म्हणजे नक्कल करण्याच्या उद्देशाने काढलेल्या यात्रांत ‘आत्मा’ हरवून गेलेला असतो. यांचे कर्ताधर्ता आणि हे पक्ष एखादी व्यक्ती, एखादा परिवार आणि एखादा जातिविशेष यांच्याच ताब्यात गेले आहेत. मग अशा पक्षांतील कार्यकर्ते विचारधारेशी कसे एकनिष्ठ राहू शकतील? त्यांच्या निष्ठा विशिष्ट व्यक्ती आणि कुटुंबाच्या पायाशी वाहिलेल्या आहेत.
हे सर्व महाभारतातील भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण या मंडळींप्रमाणे रथीमहारथींचा आव आणणारी मंडळी कुरुक्षेत्रावर गारद होण्याच्या हेतूनेच एकत्रित जमली आहेत. ‘आमचा पक्ष चोरला, आमचे निशाण चोरले, आमचा ‘बाप’ चोरला, आणखी एक ‘ठाकरे’ चोरणार!’ अशा प्रकारे जनतेच्या मनात काही अंशी सहानुभूतीचा आधार निर्माण करण्याचा डाव त्यांनी रचलेला आहे. या उन्हाळ्यात बारामतीकडे अवकाळी पाऊस पडेल, याचीही शक्यता वाटत नाही; पण त्यामुळे दोन्हीकडची मंडळी आपल्याशी नाते सांगणारी आहेत, असा अर्जुनाप्रमाणे घातक विचार जनतेने मनात आणता कामा नये. नात्यागोत्याच्या मोहात गुंतलेल्या अर्जुनाने शस्त्रत्याग केला होता. आताच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात आपले अमूल्य मत हेच जनतेच्या हातातील एकमेव शस्त्र आहे आणि ते ब्रह्मास्त्राप्रमाणे पाच वर्षांतून एकदाच वापरता येणारे असे आहे. ते विशादामुळे वापरलेच नाही किंवा भ्रामक प्रचाराला बळी पडून त्याची माती केली तर त्याचा दूरवरचा परिणाम भोगावा लागणार आहे. तेव्हा जनताजनार्दनाने वेळीच सावध व्हायला हवे. या निवडणुकीत शंभर टक्के मतदान आणि तेही उचित विचार करून केल्यास मग आपल्या देशाला विश्वगुरू पदावर विराजमान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि येणारा भावी काळ हा उज्ज्वलच असेल! तेव्हा हे ‘गॅरंटी कार्ड’ प्रत्येकाने वापरलेच पाहिजे.