द नक्षल स्टोरी - भीषण वास्तवाचे भेदक चित्रण

21 Mar 2024 19:19:01
@अभिजित जोग 
 ’द केरळा स्टोरी’सारखा दर्जेदार आणि संवेदनशील चित्रपट देणार्‍या, निर्माता विपुल शाह, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा या प्रतिभावान टीमने दिलेला, भारताला भेडसावणार्‍या नक्षलवादाच्या भयावह प्रश्नावर तितकाच प्रभावी, मर्मभेदी आणि मुळापासून हादरवून टाकणारा चित्रपट म्हणजे ‘बस्तर द नक्सल स्टोरी’.
 
bastar
 
जागतिक वर्चस्वाच्या आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी दीर्घकालीन योजना आखून तिच्या पूर्ततेसाठी कार्यरत असलेल्या काही शक्ती अस्तित्वात आहेत. चर्च, मुस्लीम वर्चस्ववादी जिहादी गट, डाव्या विचारसरणीचे नेटवर्क आणि सर्व शक्तिमान, अतिश्रीमंत डीप स्टेट यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. या शक्तींच्या मार्गातला एक प्रमुख अडथळा म्हणजे भारत.
  
इतिहासकाळापासून जागतिक वर्चस्वाची स्वप्ने बघणार्‍या सगळ्या शक्तींना भारतात अपयशाला सामोरे जावे लागले. युरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रे जिथे जिथे गेली, त्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांमध्ये त्यांनी स्थानिक मूलनिवासी लोकांचा वंशविच्छेद केला आणि आपला धर्म आणि आपली भाषा त्यांच्यावर लादली. मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लामच्या प्रसारासाठी अरबस्तानातून बाहेर पडलेल्या इस्लामी जिहाद्यांनी पूर्वेला अफगाणिस्तान ते पश्चिमेला स्पेनपर्यंत विस्तीर्ण भूप्रदेशावर आपले राज्य प्रस्थापित केले आणि या संपूर्ण प्रदेशातील लोकांना इस्लाम धर्म आणि अरेबिक भाषा यांचा स्वीकार करायला भाग पाडले. पण ख्रिश्चन आणि मुस्लीम साम्राज्यवाद्यांना भारतावर मात्र आपले कायमस्वरूपी राज्य स्थापन करता आले नाही आणि भारतीयांचे धर्म आणि भाषा यांचा संपूर्ण विध्वंसही करता आला नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका येथे त्यांना स्थानिकांचे धर्म, भाषा, संस्कृती सगळंच नेहमीसाठी नष्ट करता आले, तसे भारतात ते करू शकले नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय संस्कृतीची आंतरिक शक्ती. म्हणूनच सुमेरियन, इजिप्शियन, मायन या प्राचीन संस्कृतींची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍या पाश्चात्त्य विद्वानांना भारतीय संस्कृतीचे मात्र अत्यंत नकारात्मक चित्रण करणे आवश्यक वाटते. भारतीय संस्कृतीदेखील इतर संस्कृतींप्रमाणे नष्ट होऊन संग्रहालयापुरती उरली असती, तर त्यांना तिची अडचण वाटली नसती.
 
आपला अपुरा राहिलेला अजेंडा पूर्ण करण्यासाठी भारताचे तुकडे करणे ही या शक्तींची आजही महत्त्वाकांक्षा आहे, जिच्या पूर्तीसाठी या सगळ्या शक्ती एक होऊन योजना राबवत आहेत. या योजनांचे सुसूत्रीकरण करून त्यांचा प्रभाव वाढावा याची जबाबदारी डाव्यांनी घेतली आहे, कारण भारताचे तुकडे करणे हे डाव्यांचे नेहमीच अधिकृत धोरण राहिले आहे. भारत स्वतंत्र झाला, त्या वेळी ’भारत हे एक कृत्रिम प्रजासत्ताक असून त्याचे 14 तुकडे करण्यात आलेच पाहिजेत’ अशी आग्रही भूमिका कम्युनिस्टांनी जाहीरपणे मांडली होती. त्याप्रमाणे त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला पाठिंबा दिला होता, तसेच खलिस्तानच्या मागणीलाही त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो.
 


bastar movie review 
 
भारतातील विलक्षण वैविध्याचा लाभ घेऊन वेगवेगळ्या गटांमध्ये जास्तीत जास्त फूट पडणे आणि त्यांच्यातील वैरभाव आणि संघर्ष सतत भडकता ठेवून त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेणे, हीच योजना या शक्तींनी नेहमी राबविली आहे. याची सुरुवात केली ब्रिटिशांनी. आर्यांच्या आक्रमणाचा खोटा सिद्धान्त आपल्यावर इतिहास म्हणून लादत त्यांनी भारतात उत्तर वि. दक्षिण, संस्कृत वि. तामिळ, उच्चवर्णीय वि. बहुजन समाज असे अनेक नवे संघर्षबिंदू निर्माण केले. या फूटपाड्या संकल्पना आजही आपल्या देशात थैमान घालत आहेत. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाआधी ’द्रविड वंश’ ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. द्रविड हा शब्द दक्षिण भारतासाठी वापरला जाणारा भौगोलिक शब्द होता. तसेच ’आर्य’ हा शब्दही काही गुणविशेष असलेल्या लोकांसाठी वापरला जात होता. पण आर्य आणि द्रविड हे दोन वेगळे वंश आहेत असा खोटा सिद्धान्त मांडून ब्रिटिशांनी भारतात फुटीची बीजे रोवली.
 
 
 
’आदिवासी’ हा असाच एक शब्द, जो भारतात ब्रिटिशांच्या आगमनाआधी अस्तित्वातच नव्हता. जंगलात राहणार्‍या लोकांना आपल्या परंपरेत वनजाती किंवा वनवासी म्हटले जात असे. श्रीरामाला आपल्या वनवासात भेटलेले सुग्रीव, हनुमान वगैरे लोक म्हणजे हे वनवासीच, जे आपल्या समाजाचाच एक घटक होते. पण युरोपीयांनी अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात जाऊन तिथल्या मूलनिवासी लोकांच्या कत्तली आणि वंशविच्छेद केला, तीच संकल्पना भारतावर लादून त्यांनी पश्चिमेकडून आलेल्या गौरवर्णीय आर्यांनी येथील वनवासी लोकांच्या कत्तली केल्या असा खोटा इतिहास रचला आणि ’इथे आधीपासूनच अस्तित्वात असलेले’ याअर्थी ’आदिवासी’ हा शब्द रूढ केला. आदिवासींना हिंदू धर्मापासून तोडून वेगळे केले, तर त्यांचे ख्रिस्तीकरण करणे सोपे होईल या हेतूने त्यांनी आदिवासींचा धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे अशी कल्पना रुजवली. 1871 साली पहिली जनगणना झाली, तेव्हा ती करणार्‍या अधिकार्‍यांनी असा स्पष्ट अहवाल दिला होता की आदिवासींच्या धार्मिक चालीरीती हिंदूंप्रमाणेच असून त्यात काहीही फरक आढळत नाही. त्यामुळे त्यांचा धर्म ’हिंदू’ हाच नोंदवायला हवा. पण त्यांना आदेश देण्यात आला की आदिवासींचा धर्म वेगळा असल्याची नोंद करण्यात यावी. दर दहा वर्षांनी येणार्‍या पुढील दोन-तीन जनगणनांमध्ये अशीच नोंद करण्यात आली, ज्यानंतर हा पायंडाच पडून गेला. अशा रीतीने त्याआधी वेगळे अस्तित्व नसलेला ’आदिवासी’ हा एक वेगळा गट निर्माण करण्यात आला.
 

bastar movie review 
 
स्वातंत्र्यानंतर भारतात जास्तीत जास्त फूट पाडून आपला स्वार्थ साधून घेण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी ख्रिश्चन मिशनर्‍यांनी डाव्यांशी हातमिळवणी करून आदिवासींवर लक्ष केंद्रित केले आहे. दक्षिण अमेरिकेत कम्युनिझमकडे आकर्षित झालेल्या ख्रिश्चन मिशनर्‍यांचा एक गट ’लिबरेशन थिऑलॉजिस्ट’ या नावाने ओळखला जाऊ लागला. डाव्यांची हिंसक शक्ती आणि चर्चची आर्थिक शक्ती एक झाल्यामुळे यांच्या कारवाया खूपच परिणामकारक असतात. या गटाचे भारतातील सदस्य आदिवासी भागात होणार्‍या नक्षलवादी/माओवादी कारवायांमध्ये अग्रभागी असतात. कोरेगाव भीमा खटल्यात अटक झाली असता रुग्णालयात उपचार घेताना मृत्युमुखी पडलेला स्टॅन स्वामी हा असाच एक लिबरेशन थिऑलॉजिस्ट होता. ’पशुपती ते तिरुपती’ या रेड कॉरिडॉर या नावाने ओळखल्या जाणार्‍या जंगलांच्या पट्ट्यात हिंसा आणि अराजक यांचे थैमान घालून आदिवासींसाठी स्वतंत्र देशाची मागणी करायची आणि भारताचा आणखी एक तुकडा पाडायचा, अशी या पाशवी शक्तींची योजना आहे. त्याशिवाय ’दक्षिणेकडील पाच राज्यांनी वेगळे व्हावे’ अशी भाषा द्रमुक आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी सुरू केलीच आहे. भारत हा देश नाही तर युनियन ऑफ स्टेट्स आहे, असे राहुल गांधी पुनःपुन्हा म्हणतात, त्याकडे म्हणूनच दुर्लक्ष करता येत नाही.
 
 
’आदिवासींच्या भल्यासाठी शस्त्र हाती घेतलेले ध्येयवादी तरुण’ असे नक्षलवाद्यांचे वर्णन करत त्यांना ’गांधीयन्स विथ अ गन’ अशी उपाधी देणार्‍या अरुंधती रॉय या एका मोठ्या कारस्थानाचा घटक आहेत आणि उघड उघड फसवणूक करत आहेत, हे लक्षात घ्यावे लागते. नक्षलवादी हे ’गरिबांचे कैवारी असलेले ध्येयवादी तरुण’ नसून सुरक्षा दलांपेक्षाही अत्याधुनिक शस्त्रे बाळगणारे, प्रचंड आर्थिक शक्तीचे पाठबळ असणारे, हिंसेच्या मार्गाने भारताचे तुकडे करण्यासाठी कार्यरत असलेले विकृत अराजकवादी आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. या हिंसाचारात बळी गेलेल्या सर्वसामान्य लोकांची आणि सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांच्या संख्येपेक्षाही किती तरी अधिक आहे, या वास्तवातून या समस्येच्या भीषण स्वरूपाची कल्पना येते. मार्क्सिस्ट, मुल्ला, मिशनरी यांच्या युतीतून तयार झालेल्या या हिंसक कारवायांमागे उभी आहे जॉर्ज सोरोससारख्या धनाढ्यांमार्फत प्रचंड अर्थसाह्य पुरवणारी अतिश्रीमंत ’डीप स्टेट’; या पैशाच्या पाठबळावर त्यांनी कामाला लावलेली ल्युट्येन्स मीडिया आणि एकमेकांचे हितसंबंध जपत विधिनिषेधशून्य कारवाया करणार्‍या उच्चभ्रू मेकॉलेपुत्रांचे नोकरशाही, न्यायव्यवस्था, विद्यापीठे यात कार्यरत असलेले जाळे. हे समजून घेतले की भारतासमोरचे आव्हान किती कठीण आहे, याची कल्पना येते.
 
 
मार्क्सिस्ट, मुल्ला, मिशनरी, मीडिया, मेकॉलेपुत्र या पंचमक्कारांना तोंड देत मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत ही अकराळविकराळ समस्या खूपच आटोक्यात आणली आहे; पण त्यासाठी किती आघाड्यांवर संघर्ष करावा लागला, सुरक्षा दलांना आपले सर्वस्व कसे पणाला लावावे लागले, याची कहाणी म्हणजे ’बस्तर द नक्षल स्टोरी’ हा चित्रपट. या चित्रपटाविषयी बोलण्याआधी या समस्येचे सगळे पदर उघडून पाहिल्याशिवाय त्याचे आकलन आणि रसग्रहण करणे शक्य नसल्यामुळे आपण ही चर्चा केली. आता थोडे या चित्रपटाविषयी.
 
 
’द केरळा स्टोरी’सारखा दर्जेदार आणि संवेदनशील चित्रपट देणार्‍या, निर्माता विपुल शाह, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा या प्रतिभावान टीमने दिलेला, भारताला भेडसावणार्‍या नक्षलवादाच्या भयावह प्रश्नावर तितकाच प्रभावी, मर्मभेदी आणि मुळापासून हादरवून टाकणारा चित्रपट म्हणजे ‘बस्तर द नक्सल स्टोरी’.
 

bastar movie review 
 
या चित्रपटातील घटना वास्तवावर आधारित असल्या, तरी त्या काल्पनिक आहेत, असे सुरुवातीला जाहीर केलेले असले, तरी यातील प्रत्येक घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. केवळ भारताचा तिरंगा फडकवला म्हणून आदिवासींच्या शरीराचे बत्तीस तुकडे खरेच करण्यात आले आहेत. सलवा जुडूमचा संस्थापक महेंद्र कर्मा (चित्रपटातले नाव राजेंद्र कर्मा) याची निर्घृण हत्या केल्यानंतर, गोळ्यांनी चाळणी झालेल्या त्याच्या देहाभोवती फेर धरून नक्षलवाद्यांनी खरेच नाच केला आहे. नक्षल्यांनी सीआरपीएफच्या 73 जवानांची हत्या केल्यानंतर जेएनयूमधील डाव्यांनी व गौतम नवलाखासारख्या अर्बन नक्षल्सनी खरेच आनंद साजरा केला आहे. नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी देशभक्त पोलीस अधिकार्‍यांनी आपले सर्वस्व खरेच पणाला लावले आहे. आपल्या मुलांनी या अंधकारात हरवून न जाता शिकून प्रगती करावी यासाठी बस्तरमधील मातांची खरोखरच तगमग झाली आहे. म्हणून तर हा चित्रपट बस्तरमधील मातांना समर्पित करण्यात आला आहे.
 
 
चित्रपटांमधील अतिरेकी हिंसा बघून कोडगे बनलेल्या प्रेक्षकांनाही या चित्रपटातील हिंसा हादरवून टाकते. कारण या हिंसेमागे, मानवी सभ्यतेचा संपूर्ण विध्वंस करणे हेच उद्दिष्ट असलेले एक विकृत, सैतानवादी तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच, एखाद्या विशिष्ट प्रसंगात भावनातिरेकातून घडणार्‍या हिंसेपेक्षाही, हिंसेचे आकर्षक तत्त्वज्ञान बनवून थंड डोक्याने, सत्कृत्याचा मुलामा देऊन केलेली हिंसा अधिक अस्वस्थ करते.
 
 
जंगलात हिंसा आणि रक्तपात यांचे थैमान घालणार्‍या टोळ्यांमागे उभ्या असलेल्या अर्बन नक्षल्सच्या संतापजनक कारवायांचे अत्यंत प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत करणे, त्यांच्याभोवती नैतिकतेचे खोटे वलय उभे करणे, लोकशाहीने दिलेल्या सर्व आयुधांचा वापर लोकशाहीचा विध्वंस हेच ध्येय असलेल्या नक्षलवाद्यांसाठी करणे अशी सगळी कृत्ये ही मंडळी किती साळसूदपणे करतात, हे बघण्यासारखे आहे. ’तोडो भारत’ या ध्येयासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या अतिश्रीमंत ’डीप स्टेट’, जिहादी गट, वोक इकोसिस्टीम यांच्या कारवायांचे सुसूत्रीकरण करून, नक्षलवादाचे संरक्षण आणि प्रसार कसा केला जातो हे पाहून डोके भणभणायला लागते. ‘जबतक दीमक की तरह सिस्टीम में घुसकर इसे खोखला नहीं बनाओगे, इसे तोड नहीं पाओगे’ हे या चित्रपटातले वाक्य ’डाव्या वाळवी’च्या कार्यपद्धतीवर भेदक प्रकाश टाकणारे आहे.
 
 
हे सगळे ’गरीब बिचार्‍या’ आदिवासींसाठी सुरू असल्याचा कितीही आव आणला, तरी आदिवासींचे आयुष्य सुसह्य व्हावे, त्यांची प्रगती व्हावी यासाठी करण्यात येणारे रस्ते, शाळा यांसारख्या सुधारणा होऊ नयेत आणि आदिवासी सतत आपल्या दहशतीखाली राहावेत असेच प्रयत्न नक्षलवादी करतात. कारण ’आदिवासींचे भले’ हे त्यांचे उद्दिष्ट नव्हे, तर ’हिंसा आणि विध्वंस’ हेच असते. हे वास्तवदेखील हा चित्रपट बघताना प्रकर्षाने जाणवते.
 
 
अदा शर्मा, इंदिरा तिवारी आणि विजय कृष्णा हे आपल्या भूमिका अक्षरश: जगले आहेत. आपल्या बेगडी प्रतिमा जपत भूमिकेच्या कडेकडेने वावरणार्‍या बॉलीवूड स्टार्सच्या तुलनेत, त्यांच्या अभिनयातली इंटेन्सिटी व सच्चेपणा खूपच उठून दिसतो.
 
 
तुमची राजकीय वा सामाजिक मते काहीही असोत, भारतीय लोकशाही आणि प्रजासत्ताक यांचा विध्वंस करण्यासाठी, भारताचे तुकडे करण्यासाठी फॅनॅटिक होऊन हिंसेचे थैमान घालणार्‍या नक्षलवाद्यांचा आणि आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या त्यांच्या शहरी सहकार्‍यांचा चेहरा ओळखण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.
Powered By Sangraha 9.0