रामजन्मभूमी संघर्षाचा धांडोळा

11 Mar 2024 15:20:53
'Tryst with Ayodhya : Decolonisation of India'
 
रामजन्मभूमी संघर्षाचा हजारो वर्षांचा इतिहास संक्षिप्त रूपाने वाचायचा असेल तर 'Tryst with Ayodhya : Decolonisation of India' ’ हे बलबीर पुुंज यांचे इंग्लिशमधील पुस्तक वाचावे. या संदर्भातील असंख्य पुराव्यांनी हे पुस्तक गच्च भरलेले आहे. हे पुरावे तथाकथित डाव्यांना खोडून काढणे अतिशय अवघड आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे स्वतंत्र, सार्वभौम, सनातन भारताच्या उत्थानाचे मंदिर आहे, या विषयावरदेखील बलबीर पुंज यांनी आपल्या पुस्तकात विस्तृत प्रकाश टाकलेला आहे. रामजन्मभूमी चळवळीत सहभागी झालेल्या आणि त्या चळवळीशी मानसिकदृष्ट्या जोडलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावे.
 
 
'Tryst with Ayodhya : Decolonisation of India' हे बलबीर पुुंज यांचे इंग्लिशमधील पुस्तक आहे. पुस्तकाचे लेखक बलबीर पुंज हे राज्यसभेचे खासदार होते. हिंदी आणि इंग्लिश भाषांतील वर्तमानपत्रांतून सातत्याने त्यांचे लेखन प्रकाशित होत असते. एका वाक्यात त्यांचे वैशिष्ट्य सांगायचे तर ते राष्ट्रीय विचारधारेचे पत्रकार आहेत. त्यामुळे सेक्युलॅरिस्ट, तथाकथित पुरोगामी, तथाकथित उदारमतवादी जी विषयसूची चालवितात, त्या विषयसूचीतील विसंगती, अंतर्विरोध, राष्ट्रासंबंधी असलेली हीनत्वाची भावना याविषयी ते अत्यंत कठोर भाषेत प्रहार करतात. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि मृदुभाषी हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. या लेखात जानेवारी 2024 साली प्रकाशित झालेेल्या 'Tryst with Ayodhya : Decolonisation of India' या पुस्तकाचा परिचय करून द्यायचा आहे.
 
 
पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना रामजन्मभूमी संघर्षाचा हजारो वर्षांचा इतिहास संक्षिप्त रूपाने वाचायचा असेल तर हे पुस्तक त्यांची गरज भागवेल. पुस्तकाचे दुसरे वैशिष्ट्य असे की, आपला मुद्दा मांडताना बलबीर पुंज यांनी अतिशय मेहनत करून ढीगभर पुरावे गोळा केले आहेत. त्यातील अनेक पुरावे हे वाचकांचे डोळे विस्फारणारे ठरतील इतके गंभीर आहेत. बलबीर पुंज यांचे त्या बाबतीत अभिनंदन केले पाहिजे. पुस्तकाचे तिसरे वैशिष्ट्य इंग्लिश भाषा अत्यंत सरळ आणि सोपी आहे. ज्यांना इंग्लिश वाचण्याची सवय आहे, त्यांना हे पुस्तक वाचण्यास फार अडचणी पडतील असे नाही. चौथे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक एका आंदोलनाची वैचारिक भूमिका मांडणारे असले, तरी त्यात वैचारिक जडता नाही. वैचारिकतेचे आकलन सहज होत जाते. आणि पाचवे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, वसाहतवादी मानसिकतेविरुद्ध बलबीर पुंज यांनी हातात तलवार घेऊनच हल्ले केलेले आहेत. हे अत्यंत जबरदस्त आहे.
 
•
पुस्तक


'Tryst with Ayodhya : Decolonisation of India'

पुस्तकाचे नाव - 'Tryst with Ayodhya : Decolonisation of India'
• लेखक - बलबीर पुंज
• प्रकाशक - किताबवाले, नवी दिल्ली
• पृष्ठसंख्या - 436 • किंमत - 699 रु.
 
 
ही वसाहतवादी मानसिकता काय असते? हे पुस्तक वाचून आपल्याला उत्तम प्रकारे समजले. इंग्लिश शब्द ‘कलोनिअल माइंडसेट’ हा आहे. या शब्दाचा संबंध येतो इस्लामी आक्रमणाशी, ब्रिटिश आक्रमणाशी आणि मार्क्सिस्ट विचारधारेच्या वैचारिक आक्रमणाशी. या मानसिकतेत जगणारे विचारवंत, राज्यकर्ते भारत एक राष्ट्र मानत नाहीत. तो अनेक राष्ट्रांचा समूह आहे, असे मानतात. रामायण आणि महाभारत काल्पनिक कथा आहेत, असे ते म्हणतात. नवीन भारताची जडणघडण भारताचा इतिहास विसरून आणि भारताचा सांस्कृतिक वारसा बाजूला ठेवून करावी लागेल. आपल्याला बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ आणि इहवादी बनावे लागेल. सेक्युलॅरिझम, समाजवाद, उदारमतवाद या मार्गाने जावे लागेल. याविरोधात जे बोलतात, काम करतात, आंदोलने करतात अशी सर्व मंडळी मागासलेली आहेत, भारताला मध्ययुगात घेऊन जाणारी आहेत, त्यांच्यामुळे भारताचा विनाश घडून येईल, असे हे लोक सांगत असतात. त्यांची भाषा कशी आहे, केव्हा कोण काय बोलला, याचे असंख्य पुरावे या पुस्तकात पानोपानी विखुरलेले आहेत.
 
 
या पुस्तकातील याची एक-दोन उदाहरणे येथे देतो. 23 डिसेंबर 1949 रोजी जन्मस्थानावर उभे असलेल्या बाबरी ढाचाच्या मध्यवर्ती घुमटाखाली रामलल्लाची मूर्ती प्रकट झाली. वसाहतवादवादी मानसिकतेचे विद्वान म्हणतात, ‘प्रकट झाली हे खोटे आहे, ती कोणीतरी आणून टाकली.’ पहार्‍यावर असणारा शिपाई मुसलमान आहे. त्याचे नाव आहे अब्दुल बरकत. त्याने न्यायाधीशांपुढे जो जबाब दिला तो असा आहे, ‘त्या रात्री पहारा करीत असताना बाबरी मशिदीच्या त्या घुमटाखाली त्याने दिव्य प्रकाश पाहिला. हळूहळू तो प्रकाश सोनेरी होत गेला आणि त्या प्रकाशात त्याने देवसदृश मुलाची प्रतिमा पाहिली, जी त्याने यापूर्वी कधी पाहिली नव्हती. ते दृश्य पाहिल्यानंतर तो संमोहित झाला आणि जेव्हा तो जागृतावस्थेत आला, तेव्हा त्याने पाहिले की, मशिदीला लावलेले टाळे तुटून खाली पडले आहे. हजारो हिंदू गर्भगृहात आलेले आहेत आणि ते पूजा करत आहेत.’ सेक्युलर गँगला अब्दुल बरकत नावाचे वावडे नसावे. हे नाव जर हनुमंत सिंग चौधरी असते, तर गोष्ट वेगळी!
 
 
जन्मस्थानावर रामलल्लाची मूर्ती प्रकट झाली हे पंडित नेहरू यांच्या सेक्युलर डोक्यात काही बसेना. त्यांनी उत्तर प्रदेशचे तेव्हाचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना आदेश दिला की, लवकरात लवकर ती मूर्ती बाबरी मशिदीतून (आपला शब्द ढाचा) हलवून टाकावी. बलवीर पुंज यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या अयोध्या पुस्तकातील एक अवतरण दिले आहे. नरसिंह राव म्हणतात, ‘मौलाना हुसेन अहमत मदानी, मौलाना अब्दुल आझाद, मौलाना हिफजुर रेहमान, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भेटले. त्यांचे म्हणणे ऐकून नेहरूंनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बाबरी ढाच्यातून मूर्ती तत्काळ हटविण्याचा आदेश दिला.’
 
 
या आदेशाचे काय झाले? गोविंद वल्लभ पंत यांनी तो आदेश काही मानला नाही. अयोध्येचे कलेक्टर के.के नायर यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. सनदी नोकरांच्या संदर्भात असे म्हटले जाते की, त्यांची मानसिकता ‘बॉस इज ऑलवेज राइट’ अशी असते. नायर त्याला अपवाद निघाले. भारताचे वैशिष्ट्य कसे आहे बघा! नायर केरळचे, घटना अयोध्येची, पण राम हा असा विषय आहे, जो भाषेच्या आणि प्रांताच्या सीमा ओलांडून पुढे जातो. जो सनदी नोकर सत्ताधार्‍यांचे ऐकत नाही, त्यांचे हाल केले जातात. तसे नायर यांचे भरपूर हाल झाले. प्रल्हादाच्या निष्ठेने त्यांनी ते सहन केले आणि नरसिंहरूप जनताजनार्दनाने नायर पतिपत्नींना दोन-तीनदा निवडून लोकसभेत पाठवून दिले. नायर यांची तपशीलवार कथा पुस्तकात वाचण्यासारखी आहे.
 
 
रामजन्मभूमीचा विषय असो की सोमनाथ-अयोध्या-मथुरेचा विषय असो, हा संघर्षाचा विषय मुसलमान आणि हिंदू असा नाही, संघर्षाचा विषय हिंदू विरुद्ध हिंदू असा आहे. वसाहतवादी मानसिकतेतील विद्वान आणि राज्यकर्ते आपल्या वक्तव्यातून आणि कृतीतून भोळ्या मुसलमानांची माथी भडकविण्याचे काम करतात. याचे अनेक दाखले पुस्तकात वाचायला मिळतील. या सर्वांचे गॉडफादर नेहरू यांच्याबद्दल बलबीर पुंज अतिशय कठोर भाषेत लिहितात -
 
 
‘गुजरातमधील सोमनाथ मंदिर आणि उत्तर प्रदेशातील रामजन्मभूमीतील तीर्थक्षेत्र यांच्या पुनर्निमाणाचा प्रश्न निर्माण झाला असता, संघर्ष हा वसाहतवादी मानसिकता जी मुस्लीम आणि ब्रिटिश विध्वंसक आणि लुटारूंविषयी सहानुभूती बाळगते, ती आणि उर्वरित देश यांच्यात होतो लुटारूंचे नेतृत्व पंडित नेहरू यांनी केले. परंपरागत काँग्रेसमधील स्वातंत्र्ययोद्धे आणि नेते ज्यांना अखिल भारतीय मान्यता होती, ते उर्वरित भारतात समाविष्ट झाले. सोमनाथ आणि अयोध्या यांचा एकत्रित विचार केला असता नेहरूंचा पडदाफाश होतो. उदारमतवादी नेत्याच्या बुरख्याआड बदला घेणारा माणूस उघडा पडतो. असा माणूस जो आपल्या मुळापासून उखडला गेलेला, बौद्धिकदृष्ट्या अप्रामाणिक आणि संधिसाधू असा माणूस समोर येतो. माझे हे म्हणणे अनेकांना तिखट वाटेल, परंतु वस्तुस्थितीचे त्याला भरपूर आधार आहेत. नेहरूंचा व्यवहार हादेखील एक आधार आहे, यावर भाष्य न केलेले बरे!
 
 
आतापर्यंत कदाचित अत्यल्प लोकांच्या वाचनात आलेला महात्मा गांधी यांच्या 5 फेब्रुवारी 1925 रोजीच्या ‘यंग इंडिया’ यातील एक लेख बलबीर पुंज यांनी प्रकरण 9मध्ये पृष्ठ क्रमांक 164वर दिलेला आहे. लेख थोडा मोठा आहे, म्हणून इथे त्याचा सारांश बघू या.
 
लेखाची सुरुवात गांधीजी अशी करतात - ते म्हणतात की, माझ्या मित्राने मला काही प्रश्न विचारले ते असे होते. मुसलमानांचा विषय आला की तुम्ही झुकायला सांगता, आणि कोर्टाचा आश्रय करायला सांगतात. तुमच्या म्हणण्याचे काय परिणाम होतात, हे तुम्ही जाणता का? मनुष्यस्वभावाचा विचार तुम्ही करता का? आणि पुढचा प्रश्न असा आहे, ‘आमच्या अनुमतीशिवाय आमच्या जमिनीवर जर मशीद उभी करण्यात आली तर, आम्ही काय करायचे? अपप्रवृत्तीचे काही लोक आम्ही त्यांना देणे नसलेल्या रकमेची मागणी करतात, दावा लावतात, तेव्हा आम्ही काय करायचे? मला काही माहीत नाही, असे उत्तर देऊ नका किंवा आम्हाला गोंधळात टाकणारा फतवा काढू नका. या फतव्याचा आम्ही अनादर केला तर, तुम्ही आम्हाला दोष देऊ नका.’ महात्मा गांधींनी दुसर्‍याच्या मालकीच्या जमिनीवरील मशीद या प्रश्नाला दिलेले उत्तर असे आहे.
 
 
गांधीजी म्हणतात, ‘माझ्या मित्राच्या प्रश्नाविषयी मी सहानुभूूत आहे. मनुष्यस्वभावाच्या मर्यादांची मला जाणीव आहे. कारण मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. आता मुख्य प्रश्नाकडे येऊ या.
 
 
दुसर्‍याच्या मालकीच्या जमिनीवर मशीद बांधली असता तिचे काय करायचे? याचे उत्तर सोपे आहे. जर, ‘अ’च्या मालकीची जमीन असेल तर, आणि त्यावर दुसरा कोणीतरी येऊन काही बांधकाम करू लागला तर, मग ती मशीदही का असेना, अशा वेळी ‘अ’ याला पहिली संधी मिळाली असताना ती वास्तू खाली पाडून टाकण्याचा अधिकार प्राप्त होतो. मशिदीचा आकार दिला म्हणजे कुठलीही वास्तू मशीद होत नाही. वास्तूला मशिदीचे रूप येण्यासाठी ती पवित्र करावी लागते. दुसर्‍याच्या परवानगीशिवाय त्याच्या जागेवर बांधलेली वास्तू हा दरोडा आहे आणि दरोड्याचे पवित्रीकरण करता येत नाही.’
 
 
6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवकांनी जन्मस्थानावरील तथाकथित बाबरी मशीद जमीनदोस्त केली. म्हणजे काय केले? तर, बलवीर पुंज यांचे म्हणणे असे आहे की, महात्मा गांधीजींचा आदेश अमलात आणला. गांधीजींच्या नावाने बादलीभर अश्रू ढाळणार्‍यांना गांधी किती समजले आणि त्यांनी किती वाचले? असा प्रश्न निर्माण होतो. मुस्लीम तुष्टीकरण करता करता राष्ट्रपित्यालाही विसरणारी ही अवलाद आहे, जिला वसाहतवादी मानसिकतेची अवलाद असे म्हणतात.
 
 6 डिसेंबर 1992 रोजी जी घटना घडली, ती देशाचा इतिहास नव्याने लिहिणारी घटना आहे
 6 डिसेंबर 1992 रोजी जी घटना घडली, ती देशाचा इतिहास नव्याने लिहिणारी घटना आहे. तिचे आकलन ‘कलोनिअल माइंडसेट’वाल्यांना तेव्हाही झालेले नाही, आताही झालेले नाही आणि जीवनाच्या अंतिम यात्रेपर्यंत होण्याची शक्यता नाही. जागतिक कीर्तीचे इतिहासकार अरनॉल्ड टॉयन्बी यांचे दिल्लीत एक भाषण झाले होते आणि ते नेहरूंच्या उपस्थितीत झाले होते. या भाषणात त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की, स्वतंत्र भारतात इस्लामी आक्रमणांची स्मारके का उभी आहेत, ती का हटविली गेली नाहीत? त्यांनी उदाहरण दिले की, पोलंडवर रशियाने कब्जा मिळविला आणि पोलंडची राजधानी वॉर्सा येथे कॅथॉलिक चर्च पाडून ऑर्थोडॉक्स चर्च बांधले. कॅथॉलिक चर्चचे स्थापत्य वेगळे असते, ऑर्थोडॉक्स चर्चचे स्थापत्य वेगळे असते. पोलंडने स्वतंत्र होताच रशियन ऑर्थोडॉक्स चर्च जमीनदोस्त केले. आमच्या देशात रशियाची निशाणी नको, ही त्यांची भावना होती. अरनॉल्ड टॉयन्बीच्या भाषणाचा नेहरूंवर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही.
 
  6 डिसेंबरला मुख्य नेते मातोश्रीत बसून होते. बाबरी ढाचा जमीनदोस्त होण्याचे सर्व श्रेय तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना जाते.
 
बाबरी ढाचा पाडण्याचे श्रेय शिवसेनेचे आहे, असे कालच्या शिवसेनेचे प्रमुख बोलत असतात. सगळ्या जगाला माहीत आहे की, रामजन्मभूमी आंदोलनात एकही शिवसैनिक नव्हता. शिवसेनेचे नेते नव्हते. 6 डिसेंबरला मुख्य नेते मातोश्रीत बसून होते. बाबरी ढाचा जमीनदोस्त होण्याचे सर्व श्रेय तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना जाते. त्यांनी पोलीस दलाला सक्त आज्ञा दिल्या होत्या की, अजिबात गोळीबार करायचा नाही. जे होईल ते बघत राहायचे. काय होणार आहे, हे कल्याण सिंगांना माहीत होते.
 
  
कल्याण सिंग यांचे म्हणणे बलबीर पुंज यांनी पुस्तकात दिलेले आहे, ते असे - ‘बाबरी ढाचा कोसळण्याची जबाबदारी मी घेतो. कारसेवकांना दूर करण्यासाठी गोळीबार केला गेला नाही, याचा दोष कोणत्याही पोलीस अधिकार्‍याला देता येणार नाही. तुम्ही फाइल्समध्ये लेखी ऑर्डर पाहू शकता, त्यात म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत गोळीबार करता कामा नये.’ आज कल्याण सिंग हयात नाहीत. इतिहासात 6 डिसेंबरच्या क्रांतीचे सेनापती अशी त्यांची नोंद केली जाईल. त्यांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम.
 
 
बलबीर पुंज यांचे हे पुस्तक अशा प्रकारे असंख्य पुराव्यांनी गच्च भरलेले आहे. हे पुरावे तथाकथित डाव्यांना खोडून काढणे अतिशय अवघड आहे. प्रत्येक पुस्तकाचा जन्मकाळ फार महत्त्वाचा असतो. हे पुस्तक अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी प्रकाशित झाले, याला फार महत्त्व आहे. स्वतंत्र, सार्वभौम, सनातन भारताच्या उत्थानाचे हे मंदिर आहे, या विषयावरदेखील बलबीर पुंज यांनी आपल्या पुस्तकात विस्तृत प्रकाश टाकलेला आहे.
 
 
रामजन्मभूमी चळवळीत सहभागी झालेल्या आणि त्या चळवळीशी मानसिकदृष्ट्या जोडलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावे.
Powered By Sangraha 9.0