बिकट वाटेवरून निघालेल्या त्या दोघी

01 Mar 2024 12:13:16
@9422382621
रत्नागिरीत नजीकच्या काळात केवळ महिलांनी चालवलेलं सुसज्ज गॅरेज दिसलं, तर आश्चर्य वाटायला नको. कारण त्या दृष्टीने अक्षता नानरकर आणि पायल वालम या दोघी तरुणी पावलं टाकत आहेत. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या योजनेचा फायदा त्यांना झाला आहे. महिलांशी सुसंगत नाही असं वाटणारं डिझेल मेकॅनिकचं काम आज त्या दोघी अ‍ॅप्रेंटिस म्हणून करत आहेत, पण त्यांच्या डोक्यात उद्या स्वत:चं सर्व सुविधांनी सुसज्ज असं गॅरेज आकारत आहे.
 
GAIREJ
 
 
अक्षता नानरकर (मेर्वी, ता. रत्नागिरी) आणि पायल वालम (आंबेशेत, रत्नागिरी) या दोघी 21-22 वर्षांच्या तरुणी सध्या रत्नागिरीजवळच्या एमआयडीसीमध्ये एका गॅरेजमध्ये डिझेल मेकॅनिक म्हणून काम करत आहेत. मेकॅनिकचं काम, त्यातही डिझेल इंजीनचं काम हे महिलांशी सुसंगत समजलं जात नाही. महिला कंडक्टर झाल्या, एसटीच्या चालकही झाल्या, पण मेकॅनिक म्हणून आणि त्यातही ट्रक आणि बससारख्या अवजड वाहनांच्या अवजड इंजिनांची दुरुस्ती करण्याचं काम त्या दोघी सध्या तरी अ‍ॅप्रेंटिस म्हणून करत आहेत. रत्नागिरीच्या आयटीआयमध्ये या दोघींची मैत्री जमली आणि पुढचं संपूर्ण आयुष्य आपण एकमेकींच्या मदतीने आणि साह्याने पुढे न्यायचं आहे, असा या दोघींनी निर्धार केला आहे. सर्व सोयींनी सुसज्ज असं गॅरेज काढायचं त्यांनी ठरवलं आहे.
 
 
दोघींचं स्वप्न मोठं असलं, तरी दोघीही धनवान घराण्यात जन्माला आलेल्या नाहीत, तर अगदी सामान्य कुटुंबातल्या आहेत. अक्षताचे आई-वडील मोलमजुरी करतात, तर भाऊ एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये नोकरी करतो. रत्नागिरीजवळच्या आंबेशेत गावात राहणार्‍या पायल वालमचीही कौटुंबिक स्थिती वेगळी नाही. तिचेही आईवडील मोलमजुरीवरच गुजराण करतात. तिची मोठी बहीण रत्नागिरीत औषधांच्या दुकानात काम करून आईवडिलांना हातभार लावते.
 

GAIREJ 
 
अक्षताला लहानपणापासूनच वाहनांचं आणि त्यातही अवजड वाहनांचं वेड आहे. मुलींना आवडणार्‍या खेळण्यांपेक्षा तिला ट्रक, डंपर, बुलडोझर अशीच खेळणी आवडत असत. त्यातूनच तिच्या मनातलं या वाहनांबद्दलचं कुतूहल जागं झालं. घरात दुचाकीशिवाय अन्य कोणतंही वाहन नव्हतं. पण त्या वाहनापासूनच कुतूहलाला सुरुवात झाली. लहानपणी कोणीतरी खेळण्यासाठी मोटारी, ट्रक वगैरे आणून देत असत. पण ते रिमोटवरचे असत. प्रत्यक्षातल्या मोठ्या गाड्यांना रिमोट नसतात. त्या गाड्या माणसं चालवत असतात. ती वाहनं कशी चालतात, मोठ्या गाड्यांचं इंजीन कसं असतं, याविषयी नेहमीच उत्सुकता वाटायची. कळत नव्हतं त्या वयात असतानाच तिने या वाहनांच्या बाबतीतच आपण काहीतरी करायचं, असं ठरवून टाकलं. प्राथमिक शिक्षण मूळ गावात तर माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजचं शिक्षण तिने श्री क्षेत्र पावस इथल्या पावस विद्यामंदिरमध्ये घेतलं. अकरावी-बारावीसाठी तिने वाणिज्य शाखा निवडली होती. बारावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं, असा प्रश्न निर्माण झाला.
 
त्याच दरम्यान कोरोनाचा कालखंड सुरू झाला होता. काहीतरी वेगळं करायचं ठरवणार्‍या अक्षताने व्यवसायाचं प्रशिक्षण घेण्यामध्येसुद्धा वेगळेपण टिपलं. औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या नियमित कोर्सपेक्षा वेगळा कोर्स तिने निवडला. नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग ही केंद्र सरकारी संस्था आहे. व्यावसायिक प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांचं नियमन करण्यासाठी ती 1956 साली स्थापन करण्यात आली होती. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या सहकार्याने तरुणांना व्यावसायिक शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि देशभरात दर्जेदार कारागीर तयार करण्यासाठी ही संस्था कार्य करते. विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवते. देशभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं जातं. रत्नागिरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या संस्थेचे अभ्यासक्रम चालवले जातात. डिझेल मेकॅनिक हा त्यातलाच एक अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमाची माहिती मिळताच घरातलं वातावरण आणि तांत्रिक किंवा विज्ञान शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही अक्षताने तिथे प्रयत्न सुरू केले. प्रवेश परीक्षा दिली आणि तिला प्रवेश मिळालाही. कोरोनाच्या पहिल्या कालखंडाचा पहिला बहर ओसरला होता. शाळा-महाविद्यालयांचं कामकाज नुकतेच सुरू झालं होतं. त्यातच आयटीआयचाही समावेश होता. त्या वेळी प्रवेश घेतलेल्या 60पैकी डिझेल मेकॅनिक या ट्रेडचं प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण घेणार्‍या तिघीच होत्या. त्यापैकी अक्षता नानरकर आणि पायल वालम या दोघींची मैत्री तिथेच झाली आणि आता ती एकदम घट्ट झाली आहे. विशेष म्हणजे पायलसुद्धा विज्ञान अभ्यासक्रमाशी संबंधित नव्हती. तिचं प्राथमिक शिक्षण आंबेशेत गावात झालं, तर त्यानंतर तिने रत्नागिरीतल्या फाटक प्रशालेतून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. अकरावी-बारावीसाठी तिने कला शाखा निवडली होती. दोघा मैत्रिणींपैकी एक वाणिज्य शाखेची तर दुसरी कला शाखेची, तरीही या दोघींनी विज्ञानाचं क्षेत्र मानल्या गेलेल्या डिझेल मेकॅनिकच्या तंत्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि चांगलीच प्रगती साधली. त्या दोघींनाही दहावीच्या गुणांवरच प्रवेश मिळाला. आयटीआयच्या प्रचलित अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा आणि केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या उपक्रमातून निर्माण झालेल्या अभ्यासक्रमाचा लाभ त्यांना झाला.
GAIREJ 
या दोघींपैकी अक्षताने डिझेल मेकॅनिक ट्रेडसाठी प्रवेश घेतला, तेव्हा तिच्या आई-वडिलांचा आणि भावाचाही तिला पूर्णपणे पाठिंबा होता, मात्र अनेक नातेवाइकांनी तिला नाउमेद करायचा प्रयत्न केला. या क्षेत्रात मुली कधी असतात का, हे काम तुला जमणार आहे का, मुलींनी असली कामं करायची असतात का, लग्न झाल्यानंतर तू काय करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करून तिला डिझेल मेकॅनिकच्या अभ्यासक्रमापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला, पण अक्षता बधली नाही. पायललाही तिच्या नातलगांकडून तोच अनुभव आला. पण दोघींनीही वर्षभराचं प्रशिक्षण पूर्ण केलं.
 
 
अर्थातच त्यांच्या प्रशिक्षणाच्या काळात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असायची तेवढीच यंत्रसामग्री होती. ती जुनीच होती. एक मोठा ट्रक होता. त्यातून ट्रकच्या वेगवेगळ्या सुट्या भागांची माहिती मिळाली. पण फारसं प्रॅक्टिकल झालं नव्हतं. त्यामुळे कुठल्यातरी गॅरेजमध्ये उमेदवारी करणं आवश्यक होतं. मग अक्षता आणि पायल या दोघी पुण्यात गेल्या. पण तिथे त्यांची पार निराशा झाली. कारण पुण्यात ज्या गॅरेजमध्ये त्या गेल्या होत्या, तिथे या दोघी मुलींना केवळ देखरेख करण्याचं काम देण्यात आलं. साइटवर उभं राहायचं काम त्यांना देण्यात आलं. इंजीनशी संबंधित असलेलं मुख्य काम त्यांना देण्यात आलंच नाही. तिथलं सगळं वातावरण पाहता पुढेही तसं काम मिळण्याची शक्यता वाटत नव्हती. कोणती तरी नोकरी मिळवायची, एवढंच त्यांचं उद्दिष्ट नव्हतं. त्यांना आपण प्रशिक्षण घेतलेल्या क्षेत्रात खरोखरीच काहीतरी काम करायचं होतं. शिवाय पुण्यात राहण्याची व्यवस्था करणंही कठीण होतं. त्यामुळे त्या दोघींनी पुन्हा गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. काही महिने त्यांनी रत्नागिरीतल्या अनेक गॅरेजना भेट दिली. प्रशिक्षणासाठी उमेदवारी देण्याची विनंती केली, पण कुणीही त्यांना काम दिलं नाही. चारचाकी वाहनांच्या गॅरेजमध्येही संपर्क साधला. पण मुली म्हटल्यावर सर्वांनीच नकार दिला. दुचाकीच्या एका गॅरेजमध्ये त्यांनी काही महिने काम केलं. त्या काळात दुचाकीच्या जनरल चेकअपचं काम त्या शिकल्या. दुरुस्तीची बहुतेक सगळी कामं त्या करू शकतात. पण त्यांचं मुख्य उद्दिष्ट डिझेल इंजीनचं काम करण्याचं होतं, ट्रक, ट्रॅक्टर, बस अशा वाहनांच्या दुरुस्तीचं काम त्यांना हवं होतं. म्हणून त्यांनी गॅरेजची भटकंती सुरूच ठेवली. अखेर रत्नागिरीतल्या मिरजोळे एमआयडीसीमधल्या झाकीर (मुल्ला) ऑटोमोबाइल्स या गॅरेजमध्ये त्यांना हवी तशी संधी मिळाली. गॅरेजच्या मालकांनी त्यांना काम करण्याची संधी दिली.
 
 
GAIREJ
 
कामाची सुरुवात झाली ती ग्रीसिंगच्या कामाने. टायरच्या आत हॉफ असतो. टायर काढून त्यात ग्रीस भरलं जातं. तिथले पार्ट काढून ग्रीसिंग करावं लागतं. थोड्याच दिवसांत त्या दोघी या कामात इतक्या तरबेज झाल्या की, ग्रीसिंग तर याच दोघींकडे काम सोपवा, असं गॅरेजच्या मालकानेच इतर मेकॅनिकना सांगून टाकलं. गॅरेजमधले इतर पुरुष सहकारीही त्यांना चांगलं सहकार्य करतात. माहिती देतात. गेलं वर्षभर त्या दोघी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. या काळात त्यांनी डिझेलच्या इंजीनशी संबंधित असलेली अनेक मोठी वाहनं हाताळली. लायनर, व्हील अलाइनमेंट, क्लच, ब्रेक, गिअर, जॉइंटची विविध कामं करून अनेक वाहनं दुरुस्त करून दिली. त्यांच्या स्वच्छ आणि सुंदर कामाचं चीज झाल्यासारखं त्यांना वाटलं. आता जेवढे दिवस शक्य असेल तेवढे दिवस तिथे त्या दोघी काम करणार आहेत. एखादा ग्राहक ट्रकच्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आला तर या दोघींकडे दुरुस्तीचं काम मालक सोपवतात. त्यामुळे ट्रकचा मालक शंकित होतो. पण या दोघीच ते काम करतील अशी खात्री मालक या दोघींच्या वतीने त्या ट्रक चालकाला देतात. साहजिकच हा विश्वास त्या दोघी सार्थ ठरवतात. त्यांनी पुरेसं कौशल्य प्राप्त केलं आहे, याचीच ही पावती आहे.
 
 
आजचं युग स्पर्धेचं युग आहे. त्यात आपल्याला टिकायचं असेल, तर काही तरी वेगळं करावं लागणार आहे, याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. हात काळे होतात, गाड्यांच्या खाली जावं लागतं, म्हणून अनेक तरुणसुद्धा या कामाकडे वळत नाहीत. पण फार ताकद न लावता डोकं वापरून एखादं काम कसं करावं, सोप्या पद्धतीने कसं करावं, याचं कौशल्यही त्यांनी आत्मसात केलं आहे. नव्या बीएस सिक्स प्रकारच्या वाहनांमध्ये कोणते बदल आहेत, याच्या नोंदीही त्या ठेवत असतात. नव्या गाड्यांना सेन्सर असतात. ते काम इलेक्ट्रिशियन बघतात. स्कॅनर लावून दोष पाहिला जातो. बीएस सिक्सच्या वाहनांचा अभ्यासही त्या करतात. त्यावर लक्ष ठेवतात. बीएस सिक्सची वाहनं अजून नवीन आहेत. ती सध्या केवळ ग्रीसिंगसाठी येतात. बाकीची कामं कारखान्यातच होत असतात. पण कालांतराने त्या गाड्याही दुरुस्तीसाठी येणारच आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला आहे. डिझेल मेकॅनिक म्हणून काम करत असताना आता डिझेलच्या गाड्या सीएनजीमध्ये परिवर्तित होत आहेत, त्याचाही अभ्यास त्या दोघींनी चालू ठेवला आहे. सीएनजीचं इंजीन आणि डिझेल इंजीन यात नेमका कोणता फरक आहे, त्यासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत, कोणतं तंत्रज्ञान त्यासाठी उपयोगात आणलं गेलं आहे, याचाही अभ्यास त्या करत आहेत. आता त्या ज्या गॅरेजमध्ये काम करतात, त्या ठिकाणी त्यांना चांगलंच प्रोत्साहन मिळत आहे. मालकांचा तर त्यांच्यावर वरदहस्त आहे. त्यांची कामाची पद्धत आणि अभ्यासू वृत्ती पाहून मालकांनी तर त्यांना सांगितलं आहे की, तुम्ही तुमचं गॅरेज काढणार असाल, तर मी तुम्हाला सर्व मदत करीन, एवढा विश्वास त्यांनी संपादन केला आहे. याच पाठिंब्यावर आपलं स्वप्न साकार होण्याची दोघींनाही खात्री आहे.
 
GAIREJ 
 
प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्यात भविष्याचाही विचार आहे. अ‍ॅप्रेंटिसशिपनंतर कोणत्यातरी गॅरेजमध्ये कामगार म्हणून काम करण्यापेक्षा त्यांना स्वत:चं गॅरेज उभं करायचं आहे, पण ते उभारताना एका ठरावीक प्रकारचं गॅरेज त्यांच्या डोक्यात नाही. कोणतीही नादुरुस्त गाडी आपल्या गॅरेजमध्ये आली, तर तिच्या टायर्सचं काम असो, इलेक्ट्रिकचं काम असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं काम असो, ते एकाच ठिकाणी आपल्याच गॅरेजमध्ये झालं पाहिजे, अशी त्यांची कल्पना आहे. त्यासाठी मोटारीशी संबंधित असलेल्या इलेक्ट्रिशिअनसारख्या विविध दुरुस्तीच्या कामांचं प्रशिक्षणही त्या वेगवेगळ्या गॅरेजमध्ये घेणार आहेत.
 
 
दोघी मुली असल्यामुळे त्यांच्या विवाहाचा विषय पुढे येऊ शकतो. त्याचाही विचार त्या दोघींनी करून ठेवला आहे. विवाहाचं एखादं स्थळ आलं तर आम्ही बजावून सांगणार की आम्ही गॅरेजचं काम करतो आहोत, हेच काम पुढेही सुरू ठेवणार आहोत. आम्ही दोघी मिळून ते गॅरेज चालवणार आहोत. ते पसंत असेल, तरच त्या स्थळाशी विवाह करण्याचा आमचा निर्धार आहे.
 
 
महिला सक्षमीकरणाबाबत नेहमीच बोललं जातं, पण अक्षता नारकर आणि पायल वालम या रत्नागिरीतल्या दोघी तरुणी म्हणजे महिला मुळातच सक्षम असतात, त्यांनी स्वत: निर्धार केला तर आपल्या उद्दिष्टापर्यंत त्या पोहोचू शकतात, याचंच त्या उदाहरण आहे. दोघींचं स्वत:चं गॅरेज उभारायचं स्वप्न त्या लवकरच साकारतील यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0