मानखुर्द येथे विवेक एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेअंतर्गत ‘ए.पी.जे. अब्दुल कलाम अंधशाळा’ सुरू करून, प्रभा शिंदे या अंध आणि वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करीत आहेत. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या प्रभा यांना त्यांच्या कुटुंबीयांचा मानसिक व आर्थिक पाठिंबा आहेच. साथ हवी ती समाजातील सज्जनशक्तीने एकत्र येऊन अंधांच्या आयुष्यात दृष्टीचा किरण आणण्याची.
‘आम्हालाही तुम्ही भेट द्या, आम्हीही तुमच्या भेटीची वाट पाहतोय’ या वाक्याच्या कुतूहलाने त्या स्थानी भेट द्यायला गेलेले एक कुटुंब अस्वस्थ मनाने बाहेर पडले. तेथील अस्वच्छतेने आणि तेथील अंध मुलींच्या दयनीय अवस्थेने, आपण अंध मुलांसाठी भरीव काम करण्याची गरज आहे ही जाणीव सतावू लागली. ते कुटुंब म्हणजे मुंबईतील मानखुर्द प्रभागात राहणारे शिंदे कुटुंब. लहानपणीच समाजसेवेचे बाळकडू मिळालेल्या प्रभा शिंदे या आळंदीवरून घरी परतल्या, तरी तो विचार त्यांना काही स्वस्थ बसू देईना. तेव्हा त्यांची मुलगी अगदीच लहान होती, तिनेही आईच्या मागे धोशा लावला, “आई, त्या अंध मुलींना आपण घरी आणू या.” बालवयाला समजेल अशा भाषेत प्रभा म्हणाल्या, “अगं आपलं घर मोठं असलं तरी एवढ्या मुलींचा दैनंदिन आणि शैक्षणिक खर्च आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे.” त्यावर मुलीने आपली बचतपेेटी आणून प्रभा यांच्या समोर ठेवली. निरागस मुलीचे कौतुक करावे की आपण त्या अंध मुलींसाठी काही करू शकत नाही याने हतबल व्हावे, अशा द्विधा मन:स्थितीत असतानाच, पुढचा प्रश्न धडकला - “त्या मुलींना इथे आणायला मी काय करू शकते?” त्यावर प्रभा म्हणाल्या की, “तू पायलट झालीस की आपण त्या अंध मुलींना घेऊन येऊ.’‘
प्रभा पूर्वाश्रमी इंदोरमध्ये राहत होत्या. लग्न होऊन मुंबईत आल्यावर इथल्या सामाजिक परिस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होत्या. घरी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व होते. आपल्या शिक्षणाचा उपयोग दुसर्याच्या कल्याणासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी करावा, आपण समाजाचे देणे लागतो, ही आईची शिकवण प्रभा यांनी त्यांच्या आयुष्यात जोपासली. युनियन बँकेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले. परिपूर्ण क्षमता असूनदेखील मुलीच्या संगोपनासाठी दोघांपैकी एकच जण नोकरी करील आणि एक जण मुलीच्या संगोपनाकडे लक्ष देईल, असा उभयतांनी निर्णय घेतला. एअर इंडियासारख्या नामांकित कंपनीत उच्च पदावर असूनही पती मुलीच्या सांभाळासाठी नोकरी सोडण्यास तयार होते, मात्र प्रभा यांच्या मातृशक्तीने मुलीला आता आईची सर्वाधिक गरज आहे, त्यामुळे मीच थांबणे गरजेचे आहे असा निर्णय घेतला.
पती विवेक शिंदे यांनी प्रभा यांच्या निर्णयाचा आदर ठेवून तुझ्यात असलेल्या क्षमतांचा विकास कर, आपल्या प्रभागात असणार्या झोपडपट्टीतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तुझ्या शिक्षणाचा उपयोग कर अशी चर्चा केली. समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे जन्मजात कर्तव्य मानलेल्या प्रभा यांना आपले ध्येय गवसले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीला ‘मिकी माउस’ बालवाडीत मोफत शिक्षण देणे चालू केले. सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव असलेल्या प्रभा यांच्या कामामुळे त्यांना प्रतिष्ठित पोलीस अधिकार्यांनी बोलावून मोहल्ला कमिटीची सदस्य होण्याची विनंती केली. या सर्व कामात त्यांच्याकडे नंतर ‘महिला तक्रार निवारण केंद्रा’चे काम आले. अनेक महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या तडीस नेणे आणि समुपदेशन करणे असे काम केले. एका संस्थेच्या माध्यमातून आलेल्या निधीचे गरजू आणि निराधार महिलांमध्ये वितरण केले. रोटरी क्लबच्या साथीने अनेक गरजूंना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी मदत केली, रोजगार उपलब्ध करून दिले.
निम्नस्तरातील वस्त्यांमध्ये शिक्षणाचे आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य केले. वेळप्रसंगी जातीय तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांसमोर रणरागिणीसारख्या उभ्या ठाकल्या. अशा अनेक कामांमुळे 2007 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित होण्याचा बहुमान मिळाला.
समाजसेवेचे व्रत निरंतर चालू होतेच. मुलगी दीप्ती हळूहळू मोठी होत होती. दर वर्षी न चुकता आळंदीतील मुलींच्या त्या अंधशाळेला भेट देऊन त्यांना कपडे, शालेय वस्तू, खेळणी, त्यांच्याशी संवाद सुरूच होता. डोक्यातील ‘अंध मुलांची शाळा काढायचे’ हे चक्र सतत भुणभुणत होतेच. समाजसेवेसाठी सतत पायाला भिंगरी लावलेल्या प्रभा यांची तब्येत त्यांना स्थिर राहण्याची सूचना देतच होती. अशातच दीप्तीने पायलट होण्याची इच्छा व्यक्त केली आणि संपूर्ण जिद्दीने तिने तिचे स्वप्न पूर्ण केले.
एक दिवस महिलांच्या समस्या सोडवत बसल्या असताना अचानक दीप्ती समोर आली. महिला बाहेर गेल्यानंतर दीप्तीने त्यांच्या हातात 25 हजार रुपये ठेवले आणि म्हणाली, ‘’हा माझा पहिला पगार, मला वचन दिल्याप्रमाणे हे सर्व बंद करून तू आता अंध मुलांची शाळा सुरू करायची आहेस. ते आपले ध्येय आहे.” खरे होते, त्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. 2005 साली ’विवेक एज्युकेशन फाउंडेशन’ या नावाची संस्था स्थापन केली आणि त्याअंतर्गत ए.पी.जे. अब्दुल कलाम अंधशाळा सुरू केली.
अवघ्या दोन अंध मुलींपासून सुरू केलेल्या शाळेत आज 45 अंध मुले व निम्नस्तरातील 80 मुले शिकत आहेत. या सर्वांना संस्थेत मोफत शिक्षण दिले जाते. शाळेच्या सुरुवातीला छअइची मदत घेतली गेली. तिथल्या शिक्षिका आठवड्यातून दोन दिवस येऊन मुलांना शिकवत. तिथे जाऊन त्या आणि त्यांची सहकारी पूर्णिमा हिने ब्रेल लिपीचे प्रशिक्षण घेतले; मात्र त्यांच्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतला जात होता, हे लक्षात आल्यानंतर प्रभा यांनी स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. कामानिमित्त समाजाच्या तळागाळापर्यंत फिरल्यामुळे एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली, ती म्हणजे केवळ शिक्षण देऊन भागणार नाही, तर मुलांमध्ये संस्काराच्या बीजांची रुजवात करावी लागेल. त्या धर्तीवर मुलांना पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबच ब्रेल प्रशिक्षण, संगणक, संगीत, वक्तृत्व कौशल्य, नृत्य, नाटक, स्वयंपाक, क्रीडा, बाजारहाटीचे प्रात्यक्षिक, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. मुलांना संस्कारक्षम नागरिक घडविण्याकडे लक्ष दिले गेले. देव-देश-धर्म याची शिकवण दिली गेली.
त्या सांगतात, “ही शाळा चालविताना वेगळे आव्हान होते. कारण या मुलांच्या समस्या खूप वेगळ्या असतात. या मुलांची मानसिकता वेगळी असते. ते आत्मकेंद्री, हट्टी, शिवाय त्यांना कुणी आधार दिलेला आवडत नाही. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या मानसिकतेचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यात विश्वास निर्माण केला. इथे सुरुवातीला येणारी मुले खूप निराशाग्रस्त असतात. त्यामुळे त्यांचे प्रथम समुपदेशन केले जाते. माझे त्यांना हे सांगणे असते की, ‘तुम्ही निराधार नाहीत, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधार आहात, तुम्ही खूप सुंदर आहात, जगातील कोणतीच अशी गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही, तुम्ही सर्व काही करू शकता.’ यापूर्वी असा विश्वास त्यांना कुणी दिलेला नसल्यामुळे ते साशंक असतात. शाळेत त्यांच्या आत्मविकासासाठी समुपदेशन व ध्यानावर भर दिला जातो. आता शाळेतील अशी अनेक उदाहरणे मी देऊ शकते, ज्यांनी आपल्या आयुष्यात स्थैर्य प्राप्त केले आहे, यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.
एक अंध मुलगी संस्थेत पूर्णपणे निराश अवस्थेत आली होती. एका हॉस्टेलमध्ये तिच्यावर अतिप्रसंगही झाला होता, त्यामुळे अंध असण्याची चीड आणि हतबलतेने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हा प्रभा यांनी तिला सांगितले की “डोळस व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. अशा प्रसंगाने आपण खचून जाऊ नये. उभारी घेऊन नवीन क्षितिजांचा शोध घ्यायचा.” तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि आयुष्यात मीदेखील सामान्यांप्रमाणे जगू शकते हा विश्वास दृढ झाला. एक अंध मुलगा सहावीत असताना आला. त्याला त्याचे कुटुंबीय घरी ठेवायला तयार नव्हते. काही पालकांना अशा दिव्यांग मुलांचेे ओझे वाटते. पण त्यांना मी नेहमी सांगते की झाडाची सगळीच फळे एका चवीची नसतात, झाड कधी फळात दुजाभाव करीत नाही, आपण तर माणसे आहोत. मात्र माझ्या अनुभवावरून मी सांगते की या मुलांमध्ये एका अवयवाची कमतरता असली, तरी त्यांची आकलनक्षमता तीव्र असते आणि प्रबळ इच्छाशक्ती असते. सामान्य माणसांना ज्या गोष्टी शक्य होत नाहीत त्या गोष्टी ही मुले अगदी चपळाईने व सफाईने करतात.”
शाळेतील अनेक मुलांनी खेळात यश संपादन केले आहे. रुद्रला संगीताची आवड होती, त्याला सर्व साहित्य जमवून दिले. आता त्याचा स्वत:चा ऑर्केस्ट्रा आहे. बबिता नावाच्या मुलीला अभिनेत्री व्हायचे होते, तिला त्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन आता आगामी ‘दृष्टांत’ नावाच्या चित्रपटामध्ये ती भूमिका साकार करणार आहे. दक्षिण अफ्रिकेत नृत्यात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. या मुलांमध्ये भरपूर प्रतिभा आहे, फक्त त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. काही अंध मुलांची लग्नेही करून दिली. एक मुलगा प्रोफेसर आहे, तर मस्तीखोर समजला जाणारा एक मुलगा तायक्वांदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळला आहे.
14 एप्रिल रोजी बुद्धिबळ स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामागील कारण प्रभा शिंदे सांगतात, “एवढ्या वर्षांचा मुलांना शिकविण्याचा अनुभव आहे. या मुलांमध्ये असलेल्या क्षमताना आणि संधीचे सोने करण्याची तयारी मी जाणते. परंतु समाजाच्या स्पर्धेच्या युगात त्यांचा टिकाव लागण्यात ती कमी पडतात. समाजाच्या प्रवाहात त्यांना नोकरी मिळणे कठीण होते. या मुलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांत ही मुले कमी पडतात, म्हणून आगामी काळात केवळ अंध मुलांसाठी ‘स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र’ उभारण्याचे स्वप्न आहे.”
स्पर्धेच्या युगात सर्वसाधारण मनुष्याचा टिकाव लागताना कठीण अशा स्थितीत अंध मुलांचा टिकाव लागण्यासाठी तळमळीने धडपडणार्या प्रभा आणि त्याच्या कुटुंबाला मदतीच्या अनेक हातांची गरज आहे. संस्था स्थापनेपासून खर्चाची सर्व जबाबदारी शिंदे कुटुंबीयच घेत आहे. काही सज्जनशक्ती आपल्या परीने साहाय्य करतात. संस्थेचा व्याप पाहता ते साहाय्य नाममात्र आहे. त्यामुळेे समाजातील आपल्याच बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनेही काही पावले उचलावीत आणि सज्जनशक्तीने सढळ हाताने मदत करून अंधांच्या आयुष्यात प्रभाची आभा वाढवावी.