@माधवी नानल 9869484299
सोमवार, 22 जानेवारी 2024. अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन पाहिले. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम अक्षरश: डोळ्यात साठवला. रामलल्लांची सुंदर, देखणी मूर्ती पाहून आनंदाला उधाण आले. संपूर्ण देशवासीयच नाही, तर जगभरातील जन-जन उत्स्फूर्तपणे या आनंदोत्सवात सामील झाले होते. देशातील दिग्गज गायक मंडळी ‘रघुपति राघव राजाराम’, संत तुलसीदास रचित ‘श्रीरामचंद्र कृपालू भज मन’, ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’ या पदांचे त्या प्रसंगी प्रत्यक्ष गायन करीत होते. त्याला अनेक भारतीय वाद्यांनी साथसंगत केली होती. हे सर्व ऐकत व पाहत असताना गायनाचार्य पलुसकर यांची फार प्रकर्षाने आठवण झाली. कारण या पदांच्या स्वररचना मूलत: विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या आहेत आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून याचे गायन होत आहे. याला आज शंभर वर्षे झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांनीसुद्धा हीच तुलसीदासांची भजने गायली आहेत. त्यांच्या स्वररचनेत थोडा बदल केला असून ही गेल्या काही दशकांपूर्वीची असून सध्या त्याच स्वररचना बहुतेक नवीन पिढीला माहीत आहेत. पण पलुसकर यांच्या चालीही तितक्याच अप्रतिम व जुन्या मंडळींच्या परिचयाच्या व ओठावर आहेत, म्हणूनच त्याचे पहिले श्रेय पलुसकर यांना जाते.
राम, रामनाम, श्रीराम जयराम जय जय राम हे शब्द अनेकांचे जीवन समृद्ध करीत असतात. आमच्या संगीत क्षेत्रात त्याचे प्रत्यंतर आले. संगीतोद्धारक गायनाचार्य पलुसकर रामभक्त होते. त्यांच्या कार्यात ज्या ज्या अडचणी आल्या, त्या त्या वेळी रामनाम आणि रामायण प्रवचन यांनी त्यांना आर्थिक आणि आत्मिक बळ दिले. यामुळे असे घडले की संगीतकलेला चांगले दिवस आले, मानसन्मान मिळू लागला व व्यवसाय करण्याच्या दृष्टीने त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. उत्तम प्रकारे संगीत शिक्षण देणारी संगीत विद्यालये सुरू झाली. ‘राम’ या वचनातच एवढी ताकद आहे की त्याच्या सततच्या उच्चाराने साहस, उत्साह, उमेद वाढून हातून अगदी योग्य काम त्यांच्याकडून जणू करून घेतले जाते.
गायनाचार्य विष्णू दिगंबर पलुसकर संगीत क्षेत्रात क्रांतिकारक, संगीतसूर्य, स्वरतपस्वी या विशेषणांनी नावाजले गेले. संगीतकलेची साधना करताना अतिशय हालअपेष्टा सोसलेला हा गवई. एकीकडे इंग्रजांचा छळवाद, तर दुसरीकडे हलाखीची सांस्कृतिक परिस्थिती. कलेला आणि कलाकाराला मानसन्मान तर नाहीच, पण आश्रित म्हणून जगणे नशिबी होते. हे सर्व असह्य झाले होते. देवाच्या दारात, राजदरबारात कलेचा सन्मान होत होता, मात्र कलाकाराच्या वाट्याला मानहानी पाचवीला पूजली होती.
त्याबरोबरच संस्कृत अध्ययन परंपरा खुंटल्यामुळे जुने संगीत ग्रंथ कळत नव्हते. शास्त्रविषयक अभ्यास, चिंतन, संशोधन होतच नव्हते. मुसलमान गवयांचा दबदबा वाढला होता. बंदिशींची मोडतोड झाली होती. रागस्वरूपेही बदलत होती. एकूणच संगीताची दयनीय अवस्था झाली होती. गायनाचार्य पलुसकर हे सर्व मुळापासूनच बदलण्याचा चंग बांधून कामाला लागले होते. मुळात ते धार्मिक वृत्तीचे आणि दत्तभक्त व रामभक्तही होेते. त्यांनी संगीतकलेचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा अभ्यास केला. प्रामाणिकपणा, जिद्द, कष्ट घेण्याची तयारी, शास्त्राचे ज्ञान आणि शिस्त स्वत:मध्ये बाणवून तसे शिष्य तयार केले. यासाठी त्यांनी संगीत विद्यालयांची स्वतंत्रपणे स्थापना करून नियमित शाळा जशी चालते, त्या धर्तीवर विद्यालयाचा दिनक्रम तयार करून शिष्य नुसते तयार केले नाहीत, तर घडवले. गरीब घरातील चांगला आवाज असणार्या मुलांसाठी गुरुकुल उभारले.
हे सर्व करत असताना मनस्ताप, ताण येतच असे. येणारा शीण घालवण्यासाठी ते सतत ‘रामनाम’ घेत असत. मन:स्वास्थ्यासाठी ‘रामनाम’ हे उत्तम औषध मानत असत. त्यातूनच त्यांचे ‘रामायणा’वर प्रेम जडले. मग त्यावर प्रवचने देण्याचा परिपाठ सुरू झाला. हे प्रेम कसे जडले, त्याचा एक किस्सा सांगितला जातो, तो असा - त्यांनी इ.स. 1901 साली लाहोर येथे पहिले संगीत विद्यालय सुरू केले. धर्मावर आणि परमेश्वरावर पंडितजींची अढळ श्रद्धा होती. लाहोर येथेच इ.स. 1902 साली लाला निरंजनदास यांनी एका रेशमी वस्त्रात गुंडाळलेली ‘तुलसी रामायणा’ची प्रत भेट म्हणून दिली. त्याबरोबर एक सल्लाही दिला की “जन्माचे सार्थक करायचे असल्यास रामायण गा.” त्यानंतर ते रामायण वाचू लागले. पारायण व गायनही करू लागले. हीच पंडितजींच्या रामायणभक्तीची, रामभक्तीची मोठी सुरुवात झाली. त्यामुळे संगीतकार्यासाठी आवश्यक असलेली हिंदी भाषा त्यांना चांगली समजू लागली. रामायणातील प्रासादिक रामकथेत ते अधिकाधिक रमू लागले.
इ.स. 1908 साली मुंबईत गांधर्व महाविद्यालयाची दुसरी शाखा सुरू झाली. एक स्वतंत्र इमारत, सर्व सोयींनी युक्त व आकारानेही मोठी घेतली. यासाठी कर्ज घेतले होते. विद्यार्थिसंख्या वाढली व पुढे पुढे सर्व खर्चही वाढले. पंडितजींच्या स्वत:च्या मैफलीतून होणारे उत्पन्न कमी पडू लागले. मनावरचा ताण वाढू लागला. त्याच वेळी रामायणावर संगीतमय प्रवचन करू लागले होते आणि ते लोकांना आवडूही लागले होते. त्यात त्यांना आर्थिक लाभ होत असे. मग त्यांनी त्यांच्या बर्याचशा कामांच्या व्यापात प्रवचनांना स्वतंत्र वेळ द्यायला सुरुवात केली.
कोणतेही सोंग आणता येते, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. स्वाभिमानी स्वभाव असल्याने पैशासाठी कोणासमोर हात पसरणे त्यांना मंजूर नव्हते. स्वत:च्या ज्ञानावर विश्वास होता. इ.स. 1910नंतर त्यांनी जाहीररित्या रामायण प्रवचनास सुरुवात केली. सोबत विद्यार्थिवर्गाला सामील करून सुंदर, सुरेल गायनासह रामायण प्रवचन केल्याने ते प्रभावी होऊ लागले. प्रवचनांना अलोट गर्दी व्हायला लागली. हे लक्षात येताच त्यांनी रामायणावर जोर धरला. पुढे ते यात अधिक लीन होऊ लागले.
पंडितजींचे देशभर खूप दौरे चालूच होते. या दौर्यांमधून अनेक विद्यार्थी सामील होत. साधारण 1910-12च्या सुमारास लाहोर येथील सनातन धर्मपरिषदेच्या महोत्सवात रामायणावर प्रवचने केली. त्यात निरनिराळ्या रागांतील व तालांतील चौपाया, बरोबर साथीला हार्मोनियम किंवा ऑर्गन, व्हॉयलीन, दिलरुबा, तबला इत्यादी वाद्ये व बाल आवाजात उत्तम तर्हेने गाणारी मुले हे मोठे आकर्षण झाले होते. पंडितजी स्वत: तल्लीन होऊन रामायण सांगत. ‘राम वनवास’ यांसारख्या दु:खद प्रसंगांचे वर्णन चालले असता श्रोत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत. हजारोंच्या संख्येने श्रोतेही जमत. रामायणाची ही लोकप्रियता पाहून पंडितजींनी आपल्या दौर्यात एक नवा उपक्रम सुरू केला. कोणत्याही गावी गेले की प्रथम पहिले पाच/सात दिवस रामायण प्रवचन करायचे. ही प्रवचने विनाशुल्क असल्याने समाजाच्या सर्व स्तरांतील लोक आकर्षिले जात. थिएटर असो वा सभागृह, ते रामायणाच्या वेळी गच्च भरून जाई. पंडितजींचा वक्तशीरपणा हळूहळू लोकांच्या लक्षात आल्यावर लोक जागा धरून ठेवण्यासाठी ठरलेल्या वेळेच्या आधीच येऊन बसत.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या प्रवचनांतून ते त्यांच्या कार्याविषयीची माहिती, संगीतप्रसारासाठीचे प्रयत्न समजावून त्यानंतर रामधून स्वत: गात. नंतर श्रोत्यांना गावयास सांगत. या गायनाची एक गंमतच होती. सर्व श्रोत्यांनी पाच मिनिटे गायल्यावर मग फक्त पुरुष गात आणि नंतर फक्त स्त्रिया गात. खूप जल्लोशात आणि भक्तिमय वातावरणात रामधून गाऊन घेतली जात असे. यातून त्यांच्या विद्यालयाच्या कार्याला सक्रिय मदत करण्याची विनंती करीत. तसेच श्रोतेही उत्स्फूर्तपणे सहकार्य देत. इमारत फंडासाठी मदतपेट्या फिरवल्या जात. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असे. बर्यापैकी धन जमा झाल्यावर संगीत विद्यालयांची संख्या वाढू लागली. रामायण प्रवचनातून जमा झालेल्या पुंजीचा वापर विद्यालयाचा वाढलेला खर्च आणि कर्जाऊ रक्कम परतफेड भागवणे ही मोठी जबाबदारी होती.
मुंबईतील व्याप वाढल्यावर स्वत:ची इमारत असायला हवी, म्हणून 1915 साली नवीन प्लॉट घेऊन, आलिशान इमारत बांधून उद्घाटन केले. पण पुन्हा फंड्सचा प्रश्न होताच. कर्ज ही बाब किती मनस्ताप देणारी आहे, याच्या जाणिवेने पुन्हा दौर्यांनी आणि रामायण प्रवचनांनी जोर धरला. इतरांनी यावर काही वेगळे मार्ग सुचवले, तर ते त्यांना पसंत पडत नसत. अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट व मेहनत घेणे हेच त्यांना गरजेचे वाटत असे.
याच वर्षी श्रीक्षेत्र नरसिंहवाडीस रामायण प्रवचन आणि कीर्तन सप्ताह केला होता. या वेळी देवस्थानकडून देणगी म्हणून देवस्थानसाठी ज्या छाट्या (कफनी) वापरल्या जातात, त्यातील एक कफनी पुजार्यांच्या एकमताने प्रसाद म्हणून पंडितजींना दिली होती, सोबत एक कुबडीसुद्धा प्रसाद म्हणून देण्यात आल्याचा पुरावा मिळतो. पुढे रामायण प्रवचनाच्या वेळी पंडितजी हीच छाटी घालत असत आणि कुबडी मांडीवर ठेवीत.
संगीत क्रांतीविषयीची अनेक कामे करता करता रामायण प्रवचन अशी दिनचर्याच होऊन गेली. जे कार्य पूर्वी जाहीर भाषणे व जलसे याद्वारा करीत, ते कार्य त्यांनी आता रामायणाद्वारे करण्यास सुरुवात केली. पुढे पुढे ते रामायणात खूपच रमले. मन, शरीर सर्व रामायणात गुंतले होते. रामायणात ते इतके रमले की जनता त्यांना गायकापेक्षा सत्पुरुष म्हणूनच अधिक ओळखू लागली. इ.स. 1917-18नंतर कामाचा व्याप इतका वाढला की स्वत:च्या मेहनतीस पुरेसा वेळ मिळेनासा झाला. तरीही दिवसातून तीन-चार तास स्वरसाधना करीत होते. मेहनत चुकवत नसत. निरनिराळ्या रागांतील चिजा गाऊन मेहनत करताना मध्ये मध्ये ‘राम राम राम’ हे शब्द घेऊन रियाज करीत. यामुळे गायन तयारीचे होत असे. शृंगाररसापेक्षा भक्तिरसाकडे त्यांचा अधिक कल होता. भजने ते फार सुंदर व प्रभावी रितीने गात. अनेक भजनांना (संतरचनांना) बंदिशीचे रूप देऊन रागदारीत त्यांचे ख्याल आजपर्यंत गायले जात आहेत.
पंडितजी देशभक्त होते. महात्मा गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. दोघांनी परस्परांना आपापल्या कार्यात फार मोलाची मदत केलेली आहे. पंडितजींचा देशाभिमान, वंदे मातरम्वरील प्रेम, विद्वत्ता, भजन-गायन यांच्या प्रेमातच गांधीजी होते. साबरमती आश्रमात सुरू झालेला प्रार्थनेचा सिलसिला व शिस्त यावी यासाठी खरे तर पंडितजींना त्यांनी गळ घातली होती. पण कामाच्या व्यापामुळे त्यांनी नकार दिला. मात्र काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम् आणि रामधून गायला गांधीजी आवर्जून बोलावत असत. त्याच वेळी रामदास स्वामी रचित रामधून याची स्वररचना करून स्वत: पंडितजी प्रवचनात गात असत. तीच रामधून महात्मा गांधींजींना खूप आवडली व तीच स्वररचना आश्रमात सकाळ/संध्याकाळ प्रार्थनेत म्हटली जाऊ लागली. तुलसीदास, सूरदास, मीराबाई, कबीर, नानक, तसेच मराठीतील एकनाथ, नामदेव इत्यादी संतांच्या पदांना सुंदर सुंदर रागदारीत आणि सोप्या तालात आकर्षक चाली लावल्या व त्या सर्व साबरमती आश्रमासह भारतभर गायल्या जाऊ लागल्या.
पंडितजींचे डोळे अधू होते, म्हणून संपूर्ण रामायण मोठ्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहून काढले होते. त्यातील प्रत्येक अक्षर अडीच ते तीन इंचापर्यंत मोठे होते. एका पानावर चार ते सहा ओळी लिहिल्या जात. हे काम विद्यार्थ्यांनी केले होतेे. यातील सर्वाधिक लेखन पं. शंकरराव व्यास यांनी केले. ते जिथे जातील तिथे त्यांच्याबरोबर हे रामायण असे. ही रामायणाची अजस्र पोथी रेल्वे प्रवासात पंडितजींच्याच डब्यात ठेवण्यात येई.
मुंबईतील नवीन इमारतीतील हॉलमध्ये चतुर्मास्यात रामायणाचे प्रवचन केले व त्यात इमारत फंडासाठी चांगली प्राप्ती झाली. हळूहळू सर्व कार्य नेटाने चालू होते. इ.स. 1918 साली रामनवमी उत्सव प्रसंगी ‘श्री रामनाम आधार संगीत मंडळ’ या नावाने संस्था स्थापन केली. याचा मुख्य उद्देश धार्मिक स्वरूपाचा होता - कीर्तने, पुराणे, प्रवचने करून धर्मजागृती करणे.
एकदा एक सुंदर आणि भव्य गणपतीची मूर्ती पंडितजींना आवडली. विद्यालयाच्या तिसर्या मजल्यावर तिची प्रतिष्ठापना करायचे ठरवले. जड मूर्ती तीन मजले चढवणे अवघडच होते. मात्र “बोलो श्रीरामचंद्रकी जय” असा पुकारा करीत करीत दोन-चार, दोन-चार पायर्या चढवत चढवत दोन तासांनी योग्य जागेवर ती पोहोचली.
पुढे पुढे तर निरनिराळ्या प्रसिद्ध व जागृत देवस्थानास भेट देऊन तिथेे रामायण प्रवचने करणे हा त्यांचा स्थायिभावच बनला होता.
इ.स. 1921 साली अहमदाबाद येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात हजारो प्रतिनिधींनी गर्दी केली. ही गर्दी काही केल्या शांत होईना. त्यांना शांत कसे करावे असा प्रश्न गांधीजींना पडला. तेवढ्यात पंडितजी आपल्या शिष्यांसह महात्माजींच्या मोटारीवर चढून मोठ्या पहाडी आवाजात ‘बोलो राजा रामचंद्र की जय’ म्हणून पुकारा केला. लोकांनी त्याला प्रतिसाद दिला व लगेच ‘रघुपती राघव राजाराम’ ही रामधून म्हणण्यास सुरुवात केली. लगेच शांतता झाली आणि अधिवेशन सुरू झाले.
नाशिक मुक्काम वाढला
पंडितजींचे बारावे पुत्ररत्न दत्तात्रय याच्या जन्मानंतर सप्तशृंगीची यात्रा आटोपून ते नाशिकमधील पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शनासाठी गेले. हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी इ.स. 1921मध्ये राम मंदिरातच चार महिने रामायण प्रवचने केली. या प्रवचनांना अलोट गर्दी व्हायची. त्यामुळे नाशिक रामनामाने दुमदुमून गेले. घरोघरी रामधून ऐकू येऊ लागली. लहान मुले खेळताना रामधून गाऊन खेळू लागली. विशेष म्हणजे नाशकास येणारे भाविक, भक्त, यात्रेकरूही प्रवचनास हजर राहू लागले.
या वेळी प्रवचनाच्या वेळी नरसिंहवाडीस प्रसाद म्हणून मिळालेली कफनी घालूनच प्रवचन करीत असल्याचा पुरावा मिळतो. तिथे काढलेल्या मिरवणुकीतही कफनीसह ते सहभागी झाले होते. यानंतर गंमत म्हणजे ते वापरत असलेले उंची कपडे, रेशमी उपरणी, जरीचे फेटे यांच्यापासून कफन्या बनवल्या गेल्या व ते मग निरनिराळ्या रंगाच्या कफन्या वापरू लागले. विशेष म्हणजे मग कायमस्वरूपी कफनीच्या पेहरावाचा अखेरपर्यंत स्वीकार केला.
या वेळेपर्यंत पंडितजींना नाशिक खूप आवडू लागले. भक्तगणही वाढले. पुढे राम मंदिराच्या मालकीची एक जागा पंडितजींना 99 वर्षांच्या कराराने वार्षिक रु. 125/-प्रमाणे देण्यात आली. तिथे इ.स. 1922 साली ‘रामनाम आधाराश्रम’ स्थापन करून मुंबईप्रमाणेच सर्व सुविधांनी युक्त खोल्या, एक सभामंडप व छोटे राम मंदिर बांधले. यांनतर पंडितजींचे वास्तव्य नाशकातच राहिले.
हो-नाही करता करता शेवटी इ.स. 1924 साली मुंबईच्या गांधर्व महाविद्यालयाच्या इमारतीचा - जे पंडितजींचे सुंदर, सुरेल वास्तव व स्वप्न होते, त्याचा अखेर लिलाव झाला. तेथील सर्व सामान, वाद्ये नाशिकला स्थलांतरित केली आणि मुंबईशी संबंध संपला. विशेष आनंदाची घटना नंतर अशी घडली की 4 मार्च 1924 रोजी नाशिकची संस्था नोंदणीकृत झाली.
एवढे सर्व होऊनही पंडितजी शांत होते. ‘राम’ त्यांना ताकद, बळ देत होते. त्यांची जिद्द मोठीच. हरणे त्यांना माहीत नव्हते. सतत ‘रामनाम’ रटत रटत धाडसाने कामे रेटत होते. पुन्हा त्यांचे पहिल्यासारख्या उत्साहाने दौरे व जलसे सुरू झाले. अनेक संतरचनांना चाली लावून त्याचे गायन, प्रसार, प्रचार भारतभर करीत होते. ‘श्रीरामचंद्र कृपालू भज मन’, ‘जानकीनाथ सहाय करे’, ‘रघुवर तुमको मेरी लाज’ ही तुलसीदासांची, तर ‘मेरे तो गिरिधर गोपाल’, ‘पायोजी मैने रामरतन धन पायो’, ‘ठुमक चलत रामचंद्र’ या व अशा अनेक पदांना रागदारीत चाली लावून सर्वत्र सर्वांच्या तोंडी घालण्याचा व गायनाचा अक्षरश: विक्रम केला. त्यांचे पुत्र डी.व्ही. पलुसकर यांच्या आवाजात एचएमव्हीने या सर्व पदांच्या ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केल्या होत्या व त्यांची विक्रमी विक्री झाली होती. आज कोणीही या चालींमध्ये बदल करून फ्युजन करण्याचे धाडस करीत नाहीत. 22 जानेवारीच्या दिवशी पूर्ण पूजासोहळा होईपर्यंत यांचेच गायन केले गेले व भारतीय वाद्यांनी त्याला साथसंगत केली. हा खूप मोठा सन्मान आहे, याचा आम्हा पलुसकर पठडीतल्या संगीतार्थींना खूप अभिमान वाटला.
इ.स. 1924नंतर पंडितजी पुढे दर वर्षी मोठा दौरा काढून रामायण प्रवचन करीत. आज प्रवासाच्या सर्व सुखसोयींनी युक्त अशा काळात त्यांच्या दौर्याची कल्पना करताना आश्चर्य वाटते की खरोखर दौरा करण्यासाठी ताकद, सुरेल गळा, तजेलदार बुद्धी खरेच श्रीरामचंद्रच देत असावेत. आपण ओझरती त्यांच्या दौर्यासंदर्भात नजर टाकू या, म्हणजे त्यांच्या कष्टाची आणि ऊर्जेची कल्पना येईल.
इ.स. 1926 कराची.
इ.स. 1927 गया, अयोध्या, फैजाबाद, प्रयाग, चित्रकूट, या श्रीराम देवतेचा संबंध असलेल्या स्थानांना भेट देऊन झाशी, ग्वाल्हेर मार्गे नाशिक.
इ.स. 1928 ब्रह्मदेश, सिलोन, धनुष्कोडी, रामेश्वर, तंजावर, मद्रास करून नाशिक.
इ.स. 1929 कानपूर, प्रयागराज करून नेपाळ, कलकत्ता.
त्याच साली डिसेंबरमध्ये भरूच, अहमदाबादमार्गे लाहोर, बनारस, अमृतसर, पुन्हा लाहोर, हिमाचल प्रदेशमधील कांगडा.
असे हे प्रवास बघून त्यांचा कामाचा दांडगा उरकही लक्षात येतो. या सर्व ठिकाणी रामायणाची पालखीतून मिरवणूक, प्रवचने, जलसे होत होते. पंडितजी आपल्या संगीतोद्धाराच्या कार्यास ‘नारदाचे मिशन’ म्हणत असत. ब्रह्मदेशात जाताना बोटीच्या कप्तानाने व अधिकार्यांनी आग्रह करून बोटीतच जलसा केला होता. ब्रह्मदेशात उतरल्यावर तेथील मराठी, हिंदी स्थायिक लोकांच्या आग्रहास्तव एका गुरुद्वारात रामायण प्रवचन झाले होते, त्याबरोबच रामधूनही लोकप्रिय केली. मंडाले येथेही बरीच प्रवचने झाली. येथे तर एक गंमतीशीर प्रसंग घडला - एका श्रीमंत गृहस्थांच्या घरी मुलीचा विवाह होता. पण धार्मिक विधींसाठी कोणी ब्राह्मण मिळेना. तेव्हा त्यांनी पंडितजींनाच विनंती केली की आपण ब्राह्मण आहात, सत्पुरुष आहात, तेव्हा आपणच पौरोहित्य करावे. पंडितजींनी उत्तर दिले की “मी ब्राह्मण असलो, तरी वैदिक नसल्यामुळे लग्नसमारंभाचे मंत्र मला येत नाहीत.” परंतु ती श्रीमंत व्यक्ती ऐकायलाच तयार नाही. शेवटी पंडितजींनी रामायणातील विवाह पाठ म्हटला व विवाह समारंभ पार पाडला.
ब्रह्मदेशातून पुढे सिलोनला अकरा दिवस राहून मिशन संदर्भात इंग्लिशमधून व्याख्याने दिली. काही जलसे झाले. सिलोन रेडिओने त्यांचे प्रसारण केल्याचा उल्लेख मिळतो.
नेपाळमध्ये गेले असता तिथेही रामायण प्रवचने खूप गाजली.
तुलसीदास भूमिकेसाठी प्रस्ताव
नेपाळच्या प्रवासानंतर नाशिकला परतल्यावर प्रा. बी.आर. देवधर यांनी एक प्रस्ताव आणला. इ.स. 1930च्या सुमारास बोलपटांना सुरुवात होऊन, युरोपमधून चित्रपटासाठीची बरीचशी ध्वनिचित्रमुद्रण यंत्रे आली होती व आपल्याकडे काम सुरू झाले होते. त्या वेळी चांगल्या विषयाच्या कथानकाच्या शोधात दिग्दर्शक मंडळी अभ्यास करीत असत, ज्यामुळे बोलपट चांगला चालेल, लोकप्रिय होईल आणि उत्पन्नही चांगले मिळेल. यावर विचार चालू असता देवधर यांनी एका दिग्दर्शकांना संत तुलसीदास हा विषय सुचवला आणि तुलसीदास यांच्या चरित्रावर बोलपट काढल्यास तो चांगला लोकप्रिय होईल आणि तुलसीदासांची भूमिका स्वत: पंडितजी करतील, असेही सुचवले.
दिग्दर्शक मंडळींनी देवधरांना लगेच नाशिकला जाऊन बोलणी करून तसे ठरवायला सांगितले. देवधर नाशिकला पोहोचले व पंडितजींबरोबर गप्पांच्या ओघात बोलपट, तुलसीदास कथानक आणि त्यातील तुलसीदासांची भूमिका तुम्ही स्वत: करावी अशी सर्व माहिती दिली. त्या निमित्ताने एखादी ग्रामोफोन रेकॉर्ड निघेल हेही सांगितले. “तुलसीदास रामायणात आपण इतके एकजीव झाला आहात की तुमच्याकडून ही भूमिका खूप छान होऊ शकेल. आपल्या गोड आवाजात रामायण गाऊ शकाल. दुसरी कोणतीही व्यक्ती ही भूमिका तशी करू शकणार नाही. तसेच चांगले मानधनही मिळेल. तुलसीदासांच्या नावाने पहिला बोलपट निघत आहे. तुम्ही काम केल्यास देशातील कानाकोपर्यात याचा प्रसार होईल.”
हे ऐकून पंडितजींना समाधान वाटले व त्यांनी ही भूमिका करण्यास होकार दिला. पण दुर्दैव असे की काही अडचणींमुळे चित्रीकरण लांबणीवर पडले. त्याच दरम्यान पंडितजी पुन्हा नेपाळ दौर्यावर गेले व तिथे आजारी पडले. परत नाशिक, मिरज असा तब्येतीच्या उपचारासाठी प्रवास झाला. 20 ऑगस्ट रोजी ‘तुलसीदास जयंती’ दिनी रामनामाचा जप केला व 21 ऑगस्ट 1931 रोजी वयाच्या 59व्या वर्षी आजारपणामुळे व आयुष्यात प्रदीर्घ काळ घेतलेल्या अफाट मेहनतीमुळे त्यांचे मिरज येथे देहावसान झाले. बोलपट अखेर होऊच शकला नाही.
त्यांची स्वररचना असलेली संत रामदासस्वामी रचित ‘रामधून’ आज ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या नात्याने सर्व विश्वाची प्रार्थना झाली आहे.