बारामती तालुक्यातील तरडोली (तीर्थक्षेत्र मोरगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी संगीता भापकर यांनी नैसर्गिक परिस्थिती, ग्रामीण जीवनशैली, प्रयोगशीलता आणि आत्मविश्वास यांचा मेळ घालून ‘निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र’ उभारून शेतीला वेगळी दिशा दिली आहे. आज हे कृषी पर्यटन केंद्र अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
बारामती तालुक्याचा पश्चिम भाग हा तसा जिरायती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या ठिकाणच्या शेतीचा म्हणावा तितका विकास झाला नाही. कृषी पर्यटनातून रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे अनोखे क्षेत्र म्हणून पुढे येऊ शकते, हा विचार अल्पभूधारक शेतकरी व पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या संगीता भापकर यांनी आपल्या कुटुंबासमोर मांडला. पती हनुमंतराव भापकर व कुटुंबातील इतर सदस्यांनी या विचारास पाठिंबा दिला. जानेवारी 2018मध्ये तरडोली (तीर्थक्षेत्र मोरगाव) येथे निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली.
कृषी पर्यटन विकास संस्था व महाराष्ट्र कृषी पर्यटन विकास महामंडळ यांना हे शासनमान्य पर्यटन केंद्र जोडले गेले आहे.
पाच एकरावर कृषी पर्यटन केंद्र
निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र पाच एकरावर उभारण्यात आले आहे. त्यासाठी सुरुवातीला 25 लाखांचे भांडवल लागले. तत्पूर्वी 2008 साली शासनाच्या राष्ट्रीय फळबाग योजेनेतून शेतजमिनीत अर्ध्या एकरावर चिकू (जात - कालपती)ची लागवड करण्यात आली. त्यानंतर 100 ु 100 आकारचे शेततळे घेण्यात आले. कोरोना कालावधी वगळता गतवर्षी 25 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले, असे संगीता भापकर यांनी सांगितले.
पर्यटन केंद्रातील प्रमुख आकर्षण
प्रथम भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण करून, निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्रात येणार्या पर्यटकांचे स्वागत केले जाते. पर्यटकांच्या सेवेसाठी निसर्गाच्या सान्निध्यात ’वन डे पिकनिक’सह माफक दरात राहण्याची व जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे बोटिंग, रेन डान्स, जलतरण, धबधबा, झुलत्या पुलावरून सफर, ट्रॅक्टर सफर, बैलगाडी सफर, फोटोसेशन, चिल्ड्रन पार्क, साहसी क्रीडाप्रकार, झिप लाइन रोपवे, जंपिंंग, एमजीआर, झाडांवरचे पारंपरिक झोके अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. सेंद्रिय गांडूळ खत व व्हर्मिवॉश प्रकल्प भेट, सेंद्रिय शेतीची शिवार फेरी, झोपाळे, घसरगुंडी, सी-सॉ, डबलबार असे विविध उपक्रम आहेत. शिवाय येथे राहण्यासाठी येणारे पर्यटक हिवाळ्यात शेकोटीचा, तसेच हुर्डा पार्टीचाही आनंद घेतात. त्यामुळे येथे येणारा पर्यटक येथील नैसर्गिक वातावरणामध्ये समरस होऊन जातो.
चुलीवरीलच्या शुद्ध भोजनाची व्यवस्था
‘निसर्ग संगीत’मध्ये येणार्या पर्यटकांसाठी अस्सल महाराष्ट्रीय पद्धतीचे, चुलीवरील, शुद्ध शाकाहारी, सेंद्रिय भाजीपाल्यापासून तयार केलेले जेवण व न्याहारी दिली जाते. न्याहारीमध्ये हुरड्याच्या पिठाचे थालीपीठ येथील ’स्पेशल’ म्हणून ओळखले जाते. जेवणात चुलीवरील भाकरी, चपाती, मसाल्याचे वांगे, पिठले, मिरचीचा ठेचा, वरण, भात, मसाले भात, शिरा, शेवयांची खीर असा मेनू असतो.
कृषी उत्पादनांची निर्मिती
भापकर यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्राला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली आहे. या केंद्राद्वारे शेतातील ताजा भाजीपाला, अन्नधान्य, गांडूळ खत, व्हर्मिवॉश असे पर्यटकांना त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकर्यांनाही ‘निसर्ग संगीत’मध्ये शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पना राबविण्यासाठी पाठबळ मिळाले आहे. बारामतीच्या जिरायत भागातील अनेक शेतकरी या निमित्ताने निसर्ग संगीतशी जोडले गेले असून त्यांनाही शेती उत्पादित माल स्वत: विकण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. यातून स्थानिक उत्पादनाची जागेवरच विक्री होत आहे, शिवाय बाजारात मिळणारा भाव थेट शेतकर्यांना मिळतो व गावातील महिलांना आणि बेरोजगारांना रोजगार मिळू लागला आहे.
कृषी पर्यटन प्रकल्पात पर्यटकांच्या विविध सूचनांचा आदर करून त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून अनेक पर्यटक निसर्ग संगीत परिवाराचा घटक बनले आहेत. या अॅग्रो टूरिझम प्रकल्पामुळे कृषी व ग्रामीण संस्कृतीचे सहजतेने संवर्धन होत आहे.
संपर्क : संगीता हनुमंतराव भापकर
व्यवस्थापकीय संचालक, निसर्ग संगीत पर्यटन केंद्र,
तरडोली (तीर्थक्षेत्र मोरगाव), ता. बारामती जि.पुणे
भ्रमणध्वनी क्रमांक 9881098052