अर्कचित्र - अमोघ वझे
“म्या कशापाई गायप करीन आशक्याला? सांजच्याला दिसल्याला.. मस्त इस्तरीचे कपडे घालून चालल्याला टुकूटुकू मांडवाकडं.” पप्या आन् नान्या दोगंबी फुडं काई इच्यारनार, तेवड्यात संज्या बोल्ला, “भंडारा हाय नव्हं गनपतीच्या द्येवळाम्होरं.. जावा तिकडं. भगवा झब्बा घालून मिरवत आसन पहा!”
“मम्मे, येक ब्याड न्यूझ देऊ काय!?” पप्या दारातनंच आरडला. इविनिंगची प्रेयर कशीबशी संपवून सोनीमावशीनं क्यांडलचा ष्ट्यांड क्यांडलसकट पप्याला फेकून हानला.
“कळ्ळीय मला.. त्या वाटूळ्याच्या नानाला धरून आनून हाज्जीर कर माज्याम्होरं. जा. यवडं तरी कर..”
पप्या तरफडत नाना वाटूळ्याच्या घरला आला. दरूजा वाजव वाजव वाजिवला, तवा म्हत्तारीनं दरूजा किलकिला करत “नान्या कालधरनं घरात न्हाई. पुन्न्यांदा दरूजा वाजवचीला तर तंगडं मोडून हातात ठिविन.” आसा दमच भरला. येकाच्या आयवाजी दोन ब्याड न्यूझा हैत का काय, आसंच पप्याला वाटाया लागलं.
पप्यानं तडक गाडी काहाडली आन भाईच्या रिंगनापासून ‘रेश्मा भूर्जीपाव सेंटर’पातूर नान्याच्या समद्या आड्ड्यांवं झाडी मारली. “नान्या मारूतीच्या द्येवळात बसलाय हनुमान चालिसा म्हनत” आशी खबर चपटी मारून भूर्जी हानता हानता किरन्यानं पप्याला धिली. किरन्याच्या रूप्पाणं पप्याला द्येवमानूसच भ्येटला. पप्यानं तडक मारूतीच्या द्येवळाची घंटा वाजिवली. नान्यानं पप्या आल्याचं वळाखलं, कारन द्येवळाची घंटा चर्चच्या घंटेसारकी बडविनारा पप्याच हुता!
“मम्मीनं बलिवलंय.. चला बिगीनं.” पप्या करवादला.
“माला ठवकी हाय कश्यापायी बलिवलंय. येकडाव त्यो आशक्या हाताला लागुंद्येल. मग म्हनसाल तिकडं येतो.” नाना म्हन्ला आन् पप्याच्या गाडीवं जाऊन बसला.
पप्यानं गाडीला ष्टार्टर हानला आन् गाडी ‘आदर्श प्यालेस’ला घेटली. आशक्या तर भ्येटला न्हाई, पन तितं बाजूला लावलेल्या पत्र्यांच्या मागनं संज्या गांजा मारत जातानी दिसला. नान्यानं आवाज धिला, तसा त्वांड लपवून पळून जातानी खांबाला धडकून थांबला. नान्यानं गाडीवरनं संज्याच्या आंगावं उडी हानली.
“म्या कशापाई गायप करीन आशक्याला? सांजच्याला दिसल्याला.. मस्त इस्तरीचे कपडे घालून चालल्याला टुकूटुकू मांडवाकडं.” पप्या आन् नान्या दोगंबी फुडं काई इच्यारनार, तेवड्यात संज्या बोल्ला, “भंडारा हाय नव्हं गनपतीच्या द्येवळाम्होरं.. जावा तिकडं. भगवा झब्बा घालून मिरवत आसन पहा!”
कालंच सांजच्याला सुप्रीला काळ्या पिशवीतनं मटान न्येतानी पप्यानं पाह्यल्यालं. त्यामुळं गनपतीच्या द्येवळात सुप्री आन् तिचा बाप जानंच शक्य नवतं. मंग आशक्याला कुनी नादाला लावलं? याचा इच्यार करत पप्या आन् नान्या गनपतीच्या द्येवळाम्होरं आले. म्होट्टा मांडव घाटल्याला. आशक्या कुटं दिसतुय का बगता बगता आचानक दाढी त्येच्याम्होरं आला. नान्या आन् पप्या दचाकलेच.
“काय नान्या!? येतूस का? वाढाया रं.. भंडारा हाय. लै मानसं हैत जेवाया. येतूस का?” दाढीनं गुगली टाकला.
“आमचा आशक्या आलाय नव्हं मदतीला? त्येवडाच बास ए की.. का आमचीबी समदी खेचता हिकडं?”
“श्रींची इच्चा!” यवडंच बोलून पप्या आनि नान्याला घाम फोडून दाढी भटारखान्याच्या दिशेनं सटाकला.
घाम पुसत आसतानी नान्याच्या खांद्यावं येक हात पल्डा. नान्यानं म्हागं वळून पाह्यलं तं तेच्या प्यांटचं बक्कालच तुटलं. देव्याला तिथं पाहून दोघांचीबी टरकलीच. देव्या शांतपने बोल्ला, “नाना, यवड्या लवकर याल आसं नवतं वाटलं. आलाच आहात तं आशे भाईरनं दर्सन नका घेऊ. या, म्या तुम्माला नीट जवळंनं दर्सन करवतो!”
देव्याच्या म्हागनं नान्या आन् नान्याचा सदरा धरून पप्या गनपतीम्होरं हुबे जाले. देव्यानं जोरात घंटा वाजवली. नान्या आन् पप्याचे कान झिनझिनले. कशेबशे हात जोडून फुडं ग्येले तं तीर्थ प्रसाद वाटपाला भगवा सदरा आनी कपाळाला टिळा लावल्याला आशक्या हुबा दिसला. नान्यानं हात फुडं क्येला, तसं त्येनं तीर्थ वतलं. पप्या बावळटागत आशक्याला म्हन्ला, “मम्मीनं क्येक खाया बलिवलंय. चल बिगीनं!” त्यावं आशक्या म्हन्ला, “बरं वाटतंया हितं.. मानसांत आल्यागत वाटतंया. कुत्र्यानं न खाल्ल्यालं बिस्कूट खान्यापरीस ह्यो केळं घाटल्याला शिरा ग्वाड लागतुया!” शिर्याचा प्रसाद हातावं ठेवंत आशक्या म्हन्ला. पप्या काही बोलनार, यवड्यात म्हागनं भक्तांचा लोंढा आला आन् नान्या आनी पप्या रांगेतनं भाईर ढकलले ग्येले..
गाडीवं बसता बसता पप्यानं म्हागं वळून नान्याच्या कानाखाली जाळ काहाडला. नान्या यवडंच म्हन्ला हुता, “शिरा मलाबी ग्वाड लागला बरं का..!”