@क्षितिज टेक्सास गायकवाड 7499508522
काँग्रेसने व कम्युनिस्ट विचारवंतांनी जाणीवपूर्वक चळवळीच्या नावाखाली द्वेषपूर्ण हेतूने डॉ. बाबासाहेब शिकवण्याची व्यवस्था निर्माण केली, जेणेकरून अनुसूचित जातीजमातींमधला तरुण सतत आंदोलित राहिला पाहिजे आणि हिंदुद्वेष निर्माण होऊन मुख्य प्रवाहापासून लांब राहिला पाहिजे. याचाच परिणाम होऊन विनाकारण तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शत्रू मानू लागला. जनजागृतीच्या प्रवासादरम्यान या समाजातील अनेक लोकांशी संपर्क झाला, त्यांच्यामध्ये असलेले खोटे समज खोडून त्यांना सत्याची उकल करून देण्याचा प्रयत्न झाला. त्याचेच चांगले परिणाम म्हणजे मतदारांनी आपल्यातील विवेक जागृत करून महायुतीला विजयाचे शिलेदार ठरविले.
नुकतीच महाराष्ट्र राज्याची निवडणूक पार पडली व निकाल बघून आनंदाचा धक्का बसला.
काँग्रेस व सहयोगी पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान ज्या प्रकारचा खोटा प्रचार केला होता व त्यानंतर जे निकाल लागले, ते बघून भाजप, संघ परिवार व इतर हितचिंतकांनी कंबर कसून काम सुरू केले, त्यातला मी एक कार्यकर्ता.
माझा पहिला प्रवास हा 4 जुलै 2024 रोजी खानदेश येथे झाला. या पाच दिवसीय दौर्यात जळगाव व धुळे येथील अनेक समाजघटकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात विशेष करून वंचित व बौद्ध समाजातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक व सामान्य कार्यकर्ते यांचा समावेश होता. या प्रवासात मला लोकांमध्ये भाजपविषयी गैरसमज आणि रोष जाणवला. माझ्या परीने तो मी दूर करण्याचाही प्रयत्न केला. या दौर्यानंतर मला अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, त्यात पुणे, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर या ठिकाणांचा समावेश आहे.
अहिल्यानगर व डोंबिवलीचा प्रवास हा तर निवडणुकीच्या दरम्यान झाला व आश्चर्यकारकदृष्ट्या चार महिन्यांत लोकांच्या वागण्यातील फरक जाणवत होता. लोक भाजप व महायुतीला सकारात्मक नजरेतून पाहायला लागले होते. राहुरी तालुक्यातील पू. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी थांबलो असता एक वृद्ध बौद्ध गृहस्थ भेटले व माझ्या गळ्यातील भाजपचं उपरण बघून मला म्हणू लागले, चांगलं करताय. याच जनसंघाने 1954 च्या निवडणुकीत बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसने तर दोन निवडणुकांमध्येे बाबासाहेबांचा पराभव घडवला. राहुल गांधी आम्हाला वेडं समजतो का? वगैरे. दहा मिनिटांच्या संवादादरम्यान आजोबांनी काँग्रेसचे पार वाभाडे काढले. असेच मालेगाव येथे माझे व्याख्यान भारतीय विचार मंचाने आयोजित केले होते. हे व्याख्यान झाल्यावर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होता. यात नरेंद्र साळवे नावाचा बौद्ध तरुण माझ्यावर चिडला होता, कारण मी जे बाबासाहेबांबद्दल बोललो ते त्याने कधीच ऐकलं नव्हत. तो उभा राहून बोलायला लागला- तुम्ही संघाच्या लोकांना खूश करायला असं बोलताय वगैरे. मी त्या तरुणाला दाखले दिले व घरी जाऊन शांतपणे विचार करण्याची विनंती केली. आश्चर्य म्हणजे दोन दिवसांनी त्या तरुणाचा मला फोन आला व त्याने दिलगिरी व्यक्त केली आणि आज आमची चांगली ओळख आहे व फोनवर बोलणं होतं. मला अहिल्यानगरमध्ये असताना विचार भारतीचे रवींद्रजी मुळे यांना भेटण्याची संधी मिळाली व त्यांनी माझी मुलाखत घ्यायची ठरवली. ही पॉडकास्ट होऊन साधारण दहा दिवस झाले; पण ती झाल्यापासून अनेक जिल्ह्यांतील बौद्ध तरुणांच्या फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट आल्या, मेसेज आले व अनेकांनी माझा नंबर घेऊन फोन करून माझ्याशी चर्चा केली व मान्य केलं की, द्वेषपूर्ण हेतूने बाबासाहेब शिकवण्याचा प्रयत्न चळवळीच्या नावाखाली होतो. काँग्रेसने व कम्युनिस्ट विचारवंतांनी जाणीवपूर्वक अशी व्यवस्था निर्माण केली, की अनुसूचित जातीजमातींमधला तरुण सतत आंदोलित राहिला पाहिजे आणि हिंदुद्वेष निर्माण होऊन मुख्य प्रवाहापासून लांब राहिला पाहिजे. या सगळ्यातून हा तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विनाकारण शत्रू
मानायला लागला. मला विरोध करणार्यांचे तीन मुद्दे सर्वसाधारणपणे दिसले - 1) ‘मनुस्मृती’ 2) ‘बाबासाहेबांची क्रांती आणि प्रतिक्रांती’ व ‘रिडल्स इन हिंदुइझम’ ही पुस्तके. 3) संघ हा ब्राह्मणवादी असल्याचा गैरसमज. यातील ‘मनुस्मृती’ याबद्दल मी त्यांना सांगतो की, हा कालबाह्य मुद्दा असून भारतीय जनता पक्षाने हा देश संविधान म्हणजे ‘भीम’स्मृतीच्या आधारानेच चालेल, असे नेहमीच स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. आम्ही सर्व संविधानाचा सन्मान करतो. दुसरा मुद्दा येतो तो ‘बाबासाहेबांची क्रांती आणि प्रतिक्रांती’ व ‘रिडल्स इन हिंदुइझम’ ही पुस्तके. त्याला माझं उत्तर असतं की, ही पुस्तके बाबासाहेब त्यांच्या हयातीत पूर्ण करू शकले नाहीत. ती अपूर्ण आहेत व म्हणे बाबासाहेबांनाच त्यातील अनेक गोष्टी बदलायच्या होत्या; पण त्याआधीच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. नंतर 1987 साली काँग्रेसने खोडसाळपणे ती प्रकाशित केली व त्याआधी स्वतः नेमलेल्या संपादकाकडून त्याची चिरफाड करून ते प्रकाशित केले. बरं हे पुस्तक जरी मान्य केलं तरी हा मार्ग व धम्म हा तुमच्या वैयक्तिक आचरणासाठी असून बाबासाहेबांची कोणत्याही मार्गाने समाजात कलह व्हावा, ही इच्छा कधीच नव्हती. हे बाबासाहेबांनी अनेक भाषणांमध्ये सांगितले आहे की, धर्मपरिवर्तन जरी केलं तरी या मातीतलाच धर्म निवडेन, कारण मला अस्पृश्यांना हिंदू संस्कृतीच्या कक्षेबाहेर घेऊन जायचे नाही. मी मुसलमान किंवा ख्रिश्चन झालो तर माझे लोक अराष्ट्रीय बनतील. तिसरा मुद्दा असतो संघ ब्राह्मणवादी आहे. त्याला माझं उत्तर असतं की, संघाने बाबासाहेबांना आहे तसं मान्य केलंय. 1954 सालच्या पोटनिवडणुकीत तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी खास दत्तोपंत ठेंगडी यांना बाबासाहेबांकडे पाठवून बाबासाहेबांना मतं मिळतील याची काळजी घेण्यास सांगितले. त्या निवडणुकीत नेहरूंपासून ते तथाकथित बौद्ध म्हणवून घेणारे काँग्रेस नेते बाळकृष्ण वासनिक हे बाबासाहेबांना हरवण्यासाठी अक्षरशः झटले. निवडणूक आयोगाला हाताशी धरून बाबासाहेबांची 15000 मते बाद केली व त्यांचा पराभव हा फक्त 8000 मतांनी झाला. यात अनेक ब्राह्मण बाबासाहेबांबरोबर होते व केवळ जातीयवादी काँग्रेसी ब्राह्मण हे त्यांच्या विरोधात होते. मग संघ ब्राह्मणवादी कसा? हे सोडा, आजचा अनुभव घेतला तर पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्यासारखे संघाचे स्वयंसेवक आहेत ज्यांच्यामुळे हजारो-लाखो अनुसूचित जातीजमातींच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडले. कुणाला खोटं वाटत असेल तर त्यांच्या चिंचवड येथील गुरुकुलात जाऊन बघावं. अक्षरशः आईसारखी माया ते त्या अनाथ वंचित मुलांवर करतात. त्यात बौद्ध, पारधी, आदिवासी अशी अनेक समाजांची लेकरं आहेत. हे सर्व ऐकल्यावर ज्यांच्या मनात द्वेष नाही व जे बुद्धांचे अनुकरण करतात त्यांना विषय समजतो, असा माझा प्रवासादरम्यानचा अनुभव आहे. अजून खूप काम करण्याची गरज आहे; पण या निवडणुकीच्या निकालांवरून बौद्ध समाजाचे डोळे उघडायला लागले आहेत असं दिसतंय.
असो. ही निवडणूक महायुतीने जिंकण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या मतदाराला लोकसभेच्या निवडणुकीत गाफील राहण्याची चूक समजणं. 64,000 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी चार महिने महाराष्ट्र पिंजून काढणं, हजारो कीर्तनकारांनी जनजागरण करणे, अनेक वंचित समाजांतील भाजपप्रेमींनी राहुल गांधींचा खरा चेहरा लोकांसमोर आणून त्यांना उघडं पाडणं आणि अर्थातच देवेंद्रजींसारखं चारित्र्यसंपन्न नेतृत्व भाजपला लाभणं हे दुधात साखरेसारखं झालं.
महाविकास आघाडीने निकाल लागल्यापासून ईव्हीएमचे रडगाणे चालू केले. मूर्खांच्या नंदनवनात वावरून एका जिल्ह्यात एक सभा घेऊन त्यांना वाटत होतं, लोक पुन्हा मूर्ख बनतील. त्यात संजय राऊत, उद्धव ठाकरे व सुषमा अंधारे हे वाचाळवीर होतेच. ज्ञानेश महारावसारख्या बी ग्रेड लोकांनी जेव्हा स्वामी समर्थांविषयी विष ओकलं तेव्हाच महाआघाडीची लाखो मतं गेली. त्यात मग राहुलबाबांकडून संविधानाच्या कोर्या पुस्तिकांचे वाटप होणं, आघाडीच्या सर्वच नेत्यांची बेताल वक्तव्ये, मौलानांचे फतवे या सगळ्यातून महाआघाडीला फटका बसणार हे कळतच होतं. यातील मविआच्या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे फक्त सोशल मीडियावर देवेंद्रजींना ट्रोल करत होते, जमिनीवर काय चाललंय याची कल्पनादेखील त्यांना नव्हती; पण या सगळ्या गोष्टींचे आत्मपरीक्षण न करता नेहमीप्रमाणे ईव्हीएमला दोष देऊन गांधी, पवार व ठाकरे गँगने आपण किती बौद्धिक दिवाळखोर आहोत हेच दाखवून दिले आहे.