@सिद्धाराम भै. पाटील 8806555588
गेल्या दोन-अडीच वर्षांत महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये दरी उत्पन्न होईल आणि ती वाढेल, यासाठी विविध घटकांनी सातत्याने प्रयत्न केले. विधानसभा निवडणुका घोषित होण्याआधीपासूनच हे पद्धतशीरपणे सुरू होते; पण हिंदू समाज एकसंध राहिला. विघटित करण्याचे डाव हिंदू समाजाने उधळून टाकले. हे घडले कसे, याचा वेध घेण्याचा प्रयत्न.
महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात या वेळी हिंदुहिताची ‘अधिक स्पष्ट’ भूमिका घेतली. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्व सोडून दिले. दरम्यान, रामगिरी महाराज यांच्या तथाकथित वादग्रस्त वक्तव्याबाबत मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या, रस्त्यावर उतरल्या. ‘सर तन से जुदा’च्या घोषणा दिल्या. राज्यात दहशतीचे वातावरण तयार झाले. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे आले. त्यांनी ठाम भूमिका घेतली. रामगिरी महाराजांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले. ही सामान्य घटना नव्हती. एकनाथ शिंदे यांनी कृतीतून बाळासाहेब ठाकरे यांचा मार्ग अनुसरला. अजित पवारप्रणीत राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदुत्वाचा राग आळवला नाही; पण जिहादी प्रवृत्तीची पाठराखणही केली नाही.
निवडणूक काळातील टीव्ही आणि वृत्तपत्रांतील महायुतीच्या जाहिराती अधिक प्रभावी आणि थेट होत्या. मागील अडीच वर्षांतील लोकाभिमुख कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचण्याची गती अभूतपूर्व राहिली. योजना प्रत्यक्षात आल्याचा लोकांचा अनुभव महत्त्वाचा ठरला. तुलनेने, महाविकास आघाडीच्या जाहिराती प्रतिक्रियात्मक होत्या.
खुद्द मविआची भूमिका गोंधळलेली होती. एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेला विरोध आणि त्याच वेळी ‘आमचे सरकार आले तर दरमहा तीन हजार रुपये देऊ’ अशी घोषणा. यातून मविआच्या विश्वासार्हतेला तडा गेला. ‘लाडकी बहीण’ योजनेची मविआने धास्ती घेतली व त्यावर तारतम्य सोडून टीका केली. बदलापूरसारख्या संवेदनशील घटनेला ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका करण्याची संधी म्हणून पाहिली. सामान्य माणसावर याचा उलटा परिणाम झाला.
हिंदूंना एक होण्यास भाग पाडलेल्या ठळक बाबी...
* मे 2024 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना सत्तेतून घालवण्यासाठी मुस्लीम मतांची अभूतपूर्व एकजूट झाल्याचे मतदानांतून स्पष्ट झाले. हिंदू समाज खडबडून जागा झाला. हिंदू मन अस्वस्थ झाले. साधू-संत, हिंदू संस्था-संघटना सक्रिय झाल्या. आपापल्या स्तरावर मर्यादा पाळून हिंदू ऐक्याचे आवाहन करत प्रबोधन करू लागले. हे काम निवडणूक प्रचाराआधी पाच महिन्यांपासून सुरू होते.
* कोणत्याही संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याशी थेट न जोडलेला सामान्य माणूस हा सर्वाधिक सक्रिय राहिला. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टा, ट्विटर आदी समाजमाध्यमांतून तो व्यक्त होत राहिला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना असोत, की वक्फ बोर्डाने देशाच्या संसद भवनावर दावा करण्यापर्यंत केलेली अरेरावी, या घटनांनी समाजाला हिंदू म्हणून अस्वस्थ केले. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या तरुणींचा क्रूर शेवट झाल्याच्या बातम्यांनी समाजमन हलवून सोडले.
इतके होऊनही मविआतील पक्षांनी संसदेत वक्फ बोर्डाची बाजू घेतली. नखे झडलेली उबाठा सेना मौन राहिली. ‘लव्ह जिहाद’च्या हृदय पिळवटून टाकणार्या घटनांवरही ब्र काढले नाही. झालेच तर जिहादी मानसिकतेचा बचाव केला.
* मराठा आरक्षणाच्या नावाने मनोज जरांगे यांनी केलेली आंदोलने आणि त्यांची भूमिका लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी परिणाम करणारी ठरली. जरांगे यांची धरसोड आणि शरद पवारधार्जिणी भूमिका मराठा समाजातील तरुणांना रुचली नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुण हे समाजमाध्यमातून जरांगे यांच्याविरोधात उघड-उघड लिहू आणि बोलू लागल्याचे गेल्या चार-पाच महिन्यांत दिसले. लोकसभा निवडणुकीपूर्वी जरांगे यांच्या विरोधात ब्र उच्चारणेही शक्य नव्हते. वातावरण संवेदनशील बनवले गेले होते. भल्याभल्या प्रिंट व टीव्ही माध्यमांनी जरांगे यांची चिकित्सा करण्याचे धाडस दाखवले नाही. अंतरवाली सराटी येथील घटनेत पोलिसांची न्याय्य बाजू मांडण्यासाठी पुरेसा आधार असूनही माध्यमांनी पोलिसांनाच खलनायक ठरवण्यात धन्यता मानली; पण गेल्या चार-पाच महिन्यांत वातावरण वेगाने बदलले. समाजमाध्यमांत जरांगे यांच्या भूमिकेची चिरफाड, ही एक सामान्य बाब बनली. जरांगे यांचे समर्थक बनलेला तरुणाईतील मोठा वर्ग त्यांच्यापासून दूर गेल्याचे विधानसभा निवडणुकीआधी दिसून आले.
* मौलाना सज्जाद नोमानी यांच्याशी मनोज जरांगे यांनी केलेली हातमिळवणी ही मविआच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा ठरली. क्रूरकर्मा औरंगजेब याचे उठता-बसता उदात्तीकरण करणारे मौलाना म्हणून नोमानी यांची ओळख आहे. जिहादी मानसिकता खच्चून भरलेल्या नोमानी यांच्यासोबत जरांगे हे हातमिळवणी करतात, ही बाब अतिशय गंभीर होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धास्थानी मानणार्या महाराष्ट्रातील जनतेला हिंदू म्हणून एक होण्यास या घटनेने भाग पाडले. जरांगे यांच्या मागे असलेला मोठा वर्ग दुखावला गेला. हे कमी होते म्हणून की काय, मौलाना नोमानी यांनी मविआतील पक्षांना दिलेल्या मागण्यांचे पत्र प्रसिद्ध झाले. ‘शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे आपले सिपेसालार आहेत आणि मुस्लिमांनी ‘व्होट जिहाद’ करण्याची हीच वेळ आहे. आमचे लक्ष्य महाराष्ट्र नसून दिल्ली आहे’, अशा आशयाचा नोमानी यांचा व्हिडीओही चव्हाट्यावर आला.
* छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागवणार्या वास्तू म्हणजे महाराष्ट्रातील गड आणि किल्ले होत. दुर्दैवाने, अनेक गड आणि किल्ले ‘लॅण्ड जिहाद’ला बळी पडत आहेत. गडांवरील प्रार्थनास्थळ, मदरसे आणि दर्ग्यांची अतिक्रमणे हटवणे दूर, उलट त्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भूमिका मविआतील नेत्यांची राहिली आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने प्रतापगडावरील अफझल खानाचे उदात्तीकरण करणारे अतिक्रमण दूर केले आहे. कोल्हापूरजवळील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांत ऐरणीवर आला. या मुद्द्यावर त्या भागातील मविआ नेत्यांची भूमिका बोटचेपी राहिली. उलट अतिक्रमण हटवण्याची मागणी करणार्यांची बदनामी करण्याचा घाट घातला गेला. सोलापुरात वक्फबाधित घरांचा मुद्दा ऐरणीवर आला. सिद्धेश्वर मंदिरासमोर रस्त्यावर दावा करत चार वर्षे अडवणूक झाल्याचे सोलापूरकरांनी पाहिले. पश्चिम महाराष्ट्रातून मविआ हद्दपार होण्यात काही प्रमाणात अशा घटना कारणीभूत ठरल्या.
* हिंदू एकसंध झाला तर आपण सत्तेत येणार नाही, हे ध्यानात घेत तो विखुरलेला राहावा यासाठी मविआतील पक्षांनी ठरवून प्रयत्न केले. जातीआधारित जनगणना, संविधानाची प्रत फडकावत संविधान आणि आरक्षण धोक्यात असल्याचे सांगण्यात आले. हिंदूंना जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न झाला. मुस्लीम, मराठा, दलित अशा समीकरणांची मांडणी झाली. लोकसभेच्या वेळी या अपप्रचाराला बळी पडलेला समाज आता सावध झाला होता.
* हिंदू समाजासमोरील जिहादी आव्हाने आणि मविआसमर्थित घटकांकडून हिंदूंना जातीपातींमध्ये वाटून टाकण्याचे मनसुबे, या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा फारच प्रभावी ठरला. विरोधी पक्ष अक्षरश: यावर तुटून पडले. महायुतीतील अजित पवार यांनी ही घोषणा महाराष्ट्रात लागू नसल्याचे सांगितले; पण दबक्या आवाजात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा दिली. ज्यांना योगींची घोषणा देण्यात संकोच होत होता त्यांना त्याच अर्थाची मोदींची घोषणा भावली. जो संदेश मोठ्या सभांतूनही देणे कठीण झाले असते, तो या तीन-पाच शब्दांतून देणे सहज शक्य झाले. ‘एक है तो सेफ है’ या घोषणेने हिंदूंना एकजीव करण्याचे काम केले. म्हणूनच निकालानंतरच्या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा राष्ट्रमंत्र बनल्याचे सांगितले.
4 सन 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्रीपदावरील देवेंद्र फडणवीस आणि सन 2019 नंतरचे फडणवीस यांच्या हिंदुत्वसंबंधी कार्यशैलीत मोठा सकारात्मक बदल जाणवतो आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरचा भर गडद होताना दिसत आहे. ‘व्होट जिहाद’चा त्यांनी लावून धरलेला मुद्दा असो की संभाजीनगर, अहिल्यानगर नामकरण, यातून हे दिसले आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, वक्फ बोर्डची अरेरावी, गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे यांना पायबंद बसेल, हा विश्वासही राज्यातील मतदारांनी विक्रमी मतदानातून दाखवला आहे.
* शेवटचा मुद्दा म्हणजे, सरकारने विरोधकांच्या तुलनेत कितीही चांगले कार्य केले तरी निवडणूक हे युद्ध समजूनच उतरावे लागते. यात हयगय केली, बेसावध राहिले तर 2024च्या लोकसभेप्रमाणे काही पडझड होऊ शकते, काही बुरूज ढासळू शकतात, याची प्रचीती आलेला मतदार सजग झाला, हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. आव्हानाला प्रतिक्रिया देण्याच्या भावनेतून जातीपातींत विभागलेला हिंदू मोठ्या प्रमाणात एकवटला हेच सत्य आहे; पण प्रतिक्रियेचे आयुष्य अल्प असते.
प्रतिक्रिया नेहमीच कामी येते असे नाही. त्यामुळे हिंदू समाजाने प्रतिसाद देण्यासाठी नित्य सिद्ध होणे आवश्यक आहे. प्रतिसाद विचारपूर्वक दिला जातो. त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. विविध स्तरांवर संघटित समाज हेच सर्व प्रकारच्या आव्हानांवर उत्तर आहे. हा विचार विराट हिंदू समाजात रुजवणे हेच येत्या काळातील आव्हान आहे. यासाठी आवश्यक ऊर्जा हिंदू विचारांत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, डॉ. के. ब. हेडगेवार यांच्या जीवनचरित्रात ही चिरंतन ऊर्जा आहे.