शेख मुजीब उर्-रहमान

विवेक मराठी    07-Dec-2024   
Total Views |
 
 
Bangladesh violence
 
शेख मुजीब उर्-रहमान हे बांगलादेशचे पहिले पंतप्रधान. मुजीब आपल्या तरुणपणी मुस्लीम लीगचे कट्टर समर्थक होते. बांगलादेश निर्मितीत ज्या देशाने त्यांची बाजू घेतली, त्यांना साहाय्य केले, निर्वासितांचा लोंढा स्वीकारला, युद्ध केले त्या भारतापासून मुजीबांनी कालांतराने फारकत घेण्यास सुरुवात करून ज्या देशाने त्यांना व त्यांच्या प्रांताला अन्यायी वागणूक दिली; अत्याचार, लुटालूट, शिरकाण केले त्या पाकिस्तानशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. बांगलादेशच्या नवनिर्मित राज्यघटनेत ’समाजवाद व संप्रदाय निरपेक्षता’ शब्दांचा समावेश करणार्‍या मुजीबांनी  'Organisation of Islamic Conference'चे सभासदत्व स्वीकारले ह्याची नोंद घेणे आवश्यक आहे.
 
प्रा. अबुल बरकत
 
बांगलादेश स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या स्थितीत फार काही फरक पडला नाही. हिंदूंचा छळ सुरूच राहिला. बांगलादेशातील राजकीय अभ्यासक प्रा. अली रियाझ 'God Willing: The Politics of Islamism in Bangladesh' या त्यांच्या पुस्तकात असा निष्कर्ष काढतात की, गेल्या 25 वर्षांत बांगलादेशातून 53 लक्ष हिंदूंनी पलायन केले आहे. ढाका विद्यापीठातील प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्रा. अबुल बरकत ह्यांनी 'Political economy of reforming agriculture-land-water bodies in Bangladesh' ह्या पुस्तकात असा निष्कर्ष काढला आहे की, ’30 वर्षांनंतर बांगलादेशात हिंदू शिल्लक राहणार नाहीत... 1964 ते 2013 मध्ये धार्मिक छळ व भेदभावामुळे 1.13 कोटी हिंदूंनी बांगलादेशातून स्थलांतर केले आहे. म्हणजे सरासरी दररोज 632 व दरवर्षी 2 लाख 30 हजार 612 हिंदू देशत्याग करत आहेत. मुक्तियुद्धाआधी स्थलांतरितांचे प्रमाण दररोज 705 होते, तर 1971 ते 1981 मध्ये 512 व 1981 ते 1991 मध्ये 438 झाले; पण नंतर हे प्रमाण 1991 ते 2001 मध्ये 767 व 2001 ते 2012 मध्ये 774 इतके वाढले.’ तसेच किमान 22 मूलनिवासी समूह गायब झाले आहेत.1 म्हणजे 1971च्या आधीपासून हिंदूंचे स्थलांतर होत होते व बांगलादेशनिर्मितीनंतर 1971 ते 1991 मध्ये थोडेसे कमी झाले असले तरी बंद झाले नव्हते व 1991 ते 2012 हे प्रमाण 1971च्या आधीच्या प्रमाणापेक्षाही वाढले आहे.
 
 
1979ला प्रयाग येथे विश्व हिंदू संमेलन भरले होते, त्यात बांगलादेशातील 81 वर्षीय उपेंद्रनाथ दत्त निवेदनात म्हणाले, आमचा प्रश्न प्रत्यक्ष जीवनमरणाचाच प्रश्न आहे. हिंदू म्हणून नामशेष होण्याचे संकट आमच्यापुढे आ वासून उभे आहे... आम्ही मात्र असे अभागी आहोत की, मध्ययुगीन पाशवी प्रवृत्तीचे अन् क्रौर्याचे लक्ष्य व शिकार बनलो आहोत. बांगलादेशातील हिंदू शारीरिकदृष्ट्या वैफ़ल्यग्रस्त व सांस्कृतिकदृष्ट्या अपंग आहेत.2 वरील निवेदन बांगलादेशातील बंगाली अस्मिता फोल ठरून बांगलादेशाची धार्मिक मूलतत्त्ववादाकडे वाटचाल दर्शवते.
 
 
संदर्भ
 
1.Hasan, Kamrul. No Hindus will be left after 30 years, 20 Nov 2016, Dhaka Tribune
 
2. जोग, ब.ना.; दंगली, विराट प्रकाशन, 1980, पृष्ठ 35-36

अक्षय जोग

सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व क्रांतिकारक ह्या विषयाचे अभ्यासक. www.savarkar.org संकेतस्थळाच्या कार्यात सहभाग. विश्व संवाद केंद्र, पुणे कार्यकारिणी सदस्य.