जरांगे फॅक्टरचा ओसरलेला प्रभाव

विवेक मराठी    07-Dec-2024
Total Views |
@कृष्णकुमार
 
लोकसभेत प्रतिकूल चित्र असतानाही त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव संपुष्टात आला. त्यास जरांगे यांची वैयक्तिक भूमिका व महायुतीच्या नेत्यांनी केलेली प्रचाराची आखणी हे प्रमुख कारण आहे. जरांगे यांच्या उलटसुलट विधानांमुळे मराठा समाज हा संभ्रमित झाला. मतदार नाराज झाले आणि मराठा समाजाने हिंदुत्वाची पुकार ऐकली आणि बहुतांश मतदारसंघांत मराठा समाज हा हिंदुत्ववादी शक्तीच्या पाठीमागे उभा राहिला.
 
Jarange Factor
 
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीचे आठपैकी सात उमेदवार विजयी झाले. या विजयात ‘जरांगे फॅक्टर’ हा महत्त्वाचा घटक होता, हे निर्विवाद सत्य आहे; परंतु लोकसभेत या भागात चाललेला जरांगे फॅक्टर विधानसभेला का चालला नाही? हा प्रश्न अनेक जणांना पडतो, कारण महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान झाले. मराठवाड्यात लोकसभेचे आठ मतदारसंघ आहेत, त्यापैकी छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य सात मतदारसंघांत म्हणजे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, बीड, नांदेड येथे जरांगे फॅक्टरचा प्रभाव राहिला. छ. संभाजीनगरात शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील यांना पराभूत केले. हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी छ. संभाजीनगरची लढाई झाली आणि जलील यांचा मागील पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेत मतदारांनी भुमरे यांना विजयी केले.
 
 
दिग्गज नेते पराभूत
 
एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असतात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हा मतदारसंघ धाराशिव, तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हिंगोलीला जोडल्याने निव्वळ मराठवाड्याचे 48 पैकी 46 मतदारसंघ आहेत. लोकसभेत 46 पैकी 32 जागांवर युतीला फटका बसला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र 40 जागांवर युतीच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. परळीत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे एक लाख 38 हजार एवढ्या मताधिक्यांनी विजयी झाले. राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, मीनल पाटील खतगावकर, सुरेश वरपूडकर, धीरज देशमुख आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. अपेक्षा नसतानाही दिग्गज नेत्यांच्या झालेल्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे जरांगे फॅक्टर चालला नाही हे आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे हे, आता मी कोणत्याही पक्षाला विजयी करा किंवा पाडा, असे सांगितले नव्हते, असा युक्तिवाद करीत असले तरी, आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पाडा, अंतरवाली सराटीतील लाठीमार डोळ्यासमोर ठेवा, अशी विधाने करून एक प्रकारे लोकसभेप्रमाणेच मतदान करण्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या दिले होते. सुदैवाने जरांगे यांना मानणार्‍या मराठा समाजाने आता हिंदुत्वाची पुकार ऐकली आणि या समाजाची मते विभागली गेली. बहुतांश मतदारसंघांत मराठा समाज हा हिंदुत्ववादी शक्तीच्या पाठीमागे उभा राहिला.
 
 
आंदोलनात राजकीय शिरकाव
 
जरांगे यांचे आंदोलन सामाजिक होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यास राजकीय वळण मिळाले ते जरांगे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाडा, या केलेल्या आवाहनामुळे. जरांगे यांना त्या वेळी मुस्लीम आणि मागासवर्गीय या वर्गातील भाजपविरोधी नेत्यांचीही साथ लाभली. भाजप हा घटनाविरोधी आणि अल्पसंख्याकविरोधी पक्ष असल्याचा जोरदार प्रचार झाला. जरांगे यांनी आरक्षण मिळत नसल्याने यांच्या सात पिढ्या उठणार नाहीत, असा पराभव करण्याचे आवाहन केले होते. देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली. याशिवाय संघटनात्मक दृष्टीने विचार करता लोकसभा प्रचारकाळात मराठा आंदोलन एका उंचीवर पोहोचले होते. अनेक गावांत नेत्यांना बंदीच्या पाट्या लागल्या होत्या. प्रचारासाठी आलेल्यांना आरक्षणासंबंधी भूमिका विशद करा, अशी मागणी करीत भंडावून सोडले गेले. जरांगे यांची आरक्षणाची मागणी ही प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठा समाजाशी संबंधित असल्याने लोकसभेत जरांगे म्हणतील तसे मतदान झाले.
 
 
वारंवार भूमिका बदलल्या
 
लोकसभेत प्रतिकूल चित्र असतानाही त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव संपुष्टात आला. त्यास जरांगे यांची वैयक्तिक भूमिका व महायुतीच्या नेत्यांनी केलेली प्रचाराची आखणी हे प्रमुख कारण आहे. विधानसभा निवडणुकीत आपण उतरणार, असे जरांगे यांनी घोषित केल्यामुळे राजकीय पक्षांची उमेदवारी न मिळालेले अनेक नेते जरांगे यांच्या अंतरवालीत जाऊन बसले होते. महायुती आणि महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार जरांगे यांना भेटून आपली बाजू मांडत होते. जरांगे यांनी राज्याचा दौरा करून व समाजाला विचारात घेत विधानसभेत उतरण्याचे ठरविले. कोणत्याही पक्षाचे उमेदवार आमच्याविरोधात उभे राहिले तरी 90 जागी मी म्हणेल तो उमेदवार निवडून येईल, अशी मांडणी जरांगे यांनी केली.
 
विधानसभेसाठी मराठा उमेदवारांनी अर्ज भरावेत; पण मी सांगेल तोच उमेदवार राहील, असे त्यांनी सांगितले; तथापि निवडणुकांचे अर्ज मागे घेण्याची मुदत जवळ आल्यानंतर जरांगे यांनी निवडणुकीत उतरणार नाही, अशी भूमिका घेतली. एकट्या मराठा जातीच्या भरवशावर उमेदवार निवडून येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या उलटसुलट विधानांमुळे मराठा समाज हा संभ्रमित झाला.
 

लोकसभेनंतर निर्माण झालेले जातीय विद्वेषाचे वातावरण निवळले. संतमहंतांच्या सभा, हिंदुत्ववादी संघटनांचा प्रचारात सक्रिय सहभाग, संघ व अन्य क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे सहकार्य त्यासाठी पूरकच ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’, तर उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणा देत एका अर्थाने हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. गावगाड्यात सलोखा राहिला पाहिजे, ही भावना समाजात निर्माण झाली. त्यामुळे तयार झालेल्या हिंदुत्ववादी वातावरणात जरांगे यांची हवा टिकली नाही.
 
 ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे मौलाना सज्जाद नोमानी, राजरत्न आंबेडकर, प्रहारचे बच्चू कडू आदी नेत्यांशी झालेल्याचर्चेनंतर विधानसभेतही एम फॅक्टर (मराठा, मुस्लीम, मागासवर्गीय) तयार होतो की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. जरांगे यांनी माघार घेतल्याने महायुती व महाविकास आघाडीला एक प्रकारे दिलासाच मिळाला. जरांगे गटाची उमेदवारी आपल्याला त्रासदायक ठरेल, हे बारामतीकरांच्या लक्षात आल्यामुळे असीम सरोदे तातडीने अंतरवाली सराटीत दाखल झाले व त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेचे फलित म्हणजे माघार होय, असे म्हटले जाते. त्यामुळे साहजिकच जरांगे यांना मानणार्‍या वर्गातील काही मतदार नाराज झाले व त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला.
 
 
जरांगे यांच्या आंदोलनात ओबीसी हा टार्गेट होता. विधानसभेत ओबीसींनी एकगठ्ठा मते युतीला टाकली. फडणवीस यांच्यावरही काही कारण नसताना सातत्याने टीका होत असल्याने समाजातील मोठा वर्ग दुखावला होता. भाजपमध्ये अनेक मराठा कार्यकर्ते आहेत. या वर्गाला जरांगेेंची भाषा आवडली नाही. (भाजपचे मराठवाड्यात निवडून आलेल्या 20 उमेदवारांपैकी 11 मराठा समाजातील आहेत.) लोकसभेनंतर निर्माण झालेले जातीय विद्वेषाचे वातावरण निवळले. संतमहंतांच्या सभा, हिंदुत्ववादी संघटनांचा प्रचारात सक्रिय सहभाग, संघ व अन्य क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे सहकार्य त्यासाठी पूरकच ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’, तर उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणा देत एका अर्थाने हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. गावगाड्यात सलोखा राहिला पाहिजे, ही भावना समाजात निर्माण झाली. त्यामुळे तयार झालेल्या हिंदुत्ववादी वातावरणात जरांगे यांची हवा टिकली नाही.
 
 
प्रचाराचे नियोजन
 
महायुतीने प्रचाराचे केलेले काटेकोर नियोजन कमालीचे यशस्वी झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून आघाडी पसरवीत असलेल्या चुकीच्या प्रचारास उत्तर दिले जात होते. शहरी भागाचा विचार करता अनेक मतदार हे पुणे, मुंबई, बंगळुरू आदी शहरांत नोकरीस आहेत. त्यांची यादी तयार करून ते मतदानाला येतील अशी व्यवस्था झाली. दुपारपर्यंत मुस्लीमबहुल केंद्राच्या तुलनेने हिंदू वस्त्यांमध्ये मतदानाचा जोर कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी हिंदू मतदार बाहेर कसे येतील यासाठी प्रयत्न सुरू केले. केवळ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच नव्हे, तर अन्य हिंदुत्वाला मानणार्‍या घटकांचे कार्यकर्ते त्यात सहभागी होते. जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र असणारे अंतरवाली सराटी हे गाव बीड आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर आहे. जालना जिल्ह्यात आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहिल्याने लोकसभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभेत या जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार विजयी झाले. लोकसभेला बीडमधून पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला होता, त्या जिल्ह्यात बीड वगळता अन्य पाच मतदारसंघांत महायुतीने बाजी मारली. हे बदललेले चित्र जरांगे फॅक्टरच्या पराभवाचे निदर्शक आहे. ही राजकीय परिस्थिती मान्य केली तरी, नवे सरकार येताच अंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषण करण्याचे जरांगे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे जरांगे यांचा आगामी पवित्रा पाहून त्यास कितपत प्रतिसाद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.