@डॉ. विवेक राजे 9881242224
बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येताना दिसते आहे. आज बांगलादेशातील हिंदूंविरोधी हिंसाचाराचा इतिहास सोडून दिला, तरी वर्तमानात घडणार्या हिंदूंच्या कत्तलींकडे वा हिंदूंविरोधी हिंसाचाराकडे दुर्लक्ष कसे करता येईल? या कत्तली बांगलादेशचा अंतर्गत मामला आहे, असे म्हणून जगभरातील हिंदूंनी त्याकडे दुर्लक्ष करावे का? जागृत हिंदू समाज असे दुर्लक्ष करू शकेल का? हे आज कळीचे मुद्दे आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या आवरणाखाली बांगलादेशात मागील पन्नास वर्षे सातत्याने हिंदूंची कत्तल सुरू आहे.
सध्या आपला शेजारी बांगलादेश जगभरातील बातम्यांमध्येे वारंवार झळकताना दिसतो आहे. या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपले एक बेट (सेंट मार्टिन) अमेरिकेला वापरण्यासाठी देण्यास नाकारले. मग त्यानंतर त्या देशात आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलन सुरू झाले. ते चिघळत जाऊन त्याची परिणती एका हिंसक आंदोलनात झाली. जवळजवळ 300 विद्यार्थी मारले गेल्याचा तेव्हाच्या बांगलादेश सरकारवर आरोप झाला. विद्यार्थी आंदोलनात मुस्लीम मूलतत्त्ववादी लोकांनी चंचुप्रवेश करीत ते आंदोलन हायजॅक केले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थी आणि इस्लामिक मूलतत्त्ववादी यांनी अजूनच बेभान होत आंदोलन अधिकच हिंसक केले. पोलीस आणि सैन्यदलाने बघ्याची भूमिका घेत लोकशाही मार्गाने निवडून आलेले शेख हसीना यांचे सरकार उलथून पडू दिले. शेख हसीना यांना शेजारी भारतात आश्रय घ्यावा लागला. लागलीच आपल्या देशातून परागंदा होऊन, अमेरिकेत जाऊन बसलेले तथाकथित अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात एक काळजीवाहू सरकार तिथे स्थापन करण्यात आले; पण त्या देशातील हिंसाचार थांबला नाही. बांगलादेशातील घडामोडी जरी त्या देशाचा अंतर्गत मामला असला तरी, या हिंसाचाराच्या मागे एक निश्चित असे सूत्र दिसून येते. वास्तविक अगदी देश म्हणून बांगलादेश अस्तित्वात येण्याअगोदरपासून तेथील हिंसाचाराच्या मागे हेच सूत्र दिसून येते. हे सूत्र म्हणजे प्रत्येक वेळी हिंदू समाजाला तिथे बहुसंख्य असलेल्या मुस्लीम लोकांनी हिंसेचे लक्ष्य करणे होय. तेथील हिंसाचार हा नेहमीच हिंदूविरोधी हिंसाचार होता आणि आहे. सध्या सुरू असलेला हिंदूविरोधी हिंसाचार तर आता टोकाला गेलेला आहे. (1970 च्या दशकातील बांगलादेश आंदोलनाच्या वेळीदेखील, पाकिस्तानी पंजाबी मुस्लीम सैन्याने बांगलादेशी हिंदूंनाच प्रामुख्याने लक्ष्य केले होते, हे इथे लक्षात ठेवले पाहिजे.) अनेक वर्षांपासूनच तिथे हिंदू मंदिरांवर हिंसक हल्ले केले जाताना दिसून येतात. सध्या सुरू असलेल्या हिंसाचारात जगभरात पसरलेल्या इस्कॉन संप्रदायाच्या मंदिरावर हल्ला केला गेला आणि इस्कॉनला आतंकवादी संघटना म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी केली गेली. चिन्मय कृष्णदास हे कधी काळी इस्कॉनशी संबंधित असलेले संन्यासी. त्यांनी हिंदूंवरील हल्ले व हिंसाचार थांबवा, या मागणीसाठी सांविधानिक व शांततापूर्वक राजधानी ढाक्यात मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने तेथील हिंदू समाज या मोर्चात सामील झाला. या मोर्चात बांगलादेशाच्या झेंड्यापेक्षा भगवा ध्वज उंच फडकत होता, असा ठपका ठेवून चिन्मय कृष्णदास यांना अटक केली गेली आणि तेथील सरकारचे प्रमुख असलेले मुहम्मद युनूस हे तोंडाने बोलण्याव्यतिरिक्त काही करू शकलेले नाही. तेथे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येताना दिसते आहे. आज बांगलादेशातील हिंदूंविरोधी हिंसाचाराचा इतिहास सोडून दिला, तरी वर्तमानात घडणार्या हिंदूंच्या कत्तलींकडे वा हिंदूंविरोधी हिंसाचाराकडे दुर्लक्ष कसे करता येईल? या कत्तली बांगलादेशचा अंतर्गत मामला आहे, असे म्हणून जगभरातील हिंदूंनी त्याकडे दुर्लक्ष करावे का? जागृत हिंदू समाज असे दुर्लक्ष करू शकेल का? हे आज कळीचे मुद्दे आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या आवरणाखाली बांगलादेशात मागील पन्नास वर्षे सातत्याने हिंदूंची कत्तल सुरू आहे. 1975 मध्ये बांगलादेशात एकूण लोकसंख्येच्या 13.5% असलेल्या हिंदू लोकसंख्येत घट होऊन, 2011 मध्ये तेथे हिंदू लोकसंख्या फक्त 8.5% उरलेली आहे. मागील 50 वर्षांत, त्या देशाच्या एकूण लोकसंख्येत दुपटीने वाढ झालेली असली, तरी हिंदूंची लोकसंख्या मात्र 75 लाखांनी कमी झाली, असे त्याच देशाचा जनगणना अहवाल सांगतो.
हिंदू समाज आज जगभर पसरलेला आहे. विविध देशांमध्ये हिंदू समाज व्यापार-व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने मागील चार-पाच पिढ्या स्थायिक झाला, तसाच तो बांगलादेशातदेखील मागील काही पिढ्यांपासून, नव्हे हजारो वर्षांपासून स्थायिक आहे. मागील दोन दशकांत टेक्स्टाइल आणि होजियरी उद्योगातील अनेक भारतीय उत्पादकांनी बांगलादेशात आपले व्यवसाय केंद्र स्थापित करून तेथील स्वस्त मजुरी दराचा फायदा घेत मोठे उद्योग उभारले आहेत. त्याबरोबरच बांगलादेशचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढवण्यात भरीव योगदान दिलेले आहे. हे बहुतेक उत्पादक भारतीय हिंदू आहेत. तेथील हिंसक हल्ले हे प्रामुख्याने समाजाच्या खालच्या स्तरावरील हिंदू समाजावर होताना दिसत आहेत. कोणत्याही संप, मोर्चा किंवा आंदोलनाचा थेट परिणाम हा हातावर पोट असणार्या समाजघटकावर सर्वप्रथम आणि सर्वात हानीकारकरीत्या होत असतो. शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील 50 जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर 200 पेक्षा जास्त हल्ले झाले आहेत, असे त्या देशाचे अहवालच सांगतात. हिंसक आंदोलनात बळी पडणारे बहुतेक हिंदू हे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. हे हल्ले अशांत आणि अस्थिर परिस्थितीतदेखील, ज्यांना पोटासाठी घर सोडणे भाग पडते, अशाच गटातील लोकांवर केले जात आहेत. यामुळेच अनेक दिवस संयम ठेवत काहीशा मूकपणाने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांकडे बघत असलेल्या भारतातील हिंदू समाजाचा बांध आता फुटण्याच्या बेतात आहे. नेहमीच अत्यंत सुसंस्कृत आणि संयमी भूमिका घेणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील बांगलादेशमधील हिंदूविरोधी हिंसाचारावर चिंता प्रगट केली आहे. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, हत्या, जाळपोळ याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात तेथील व्यवस्था अशा हिंसक कारवायांना आळा घालण्याऐवजी निव्वळ बघ्याची भूमिका घेते आहे ते चिंताजनक आहे. आपल्या संरक्षणासाठी सांविधानिक मार्गाने एकत्र येणार्या हिंदू समुदायाच्या लोकांवर देशद्रोहासारखे आरोप ठेवणे हे अयोग्य आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. संघाने यापेक्षा जास्त कठोर शब्द याआधी कधी वापरल्याचे आठवत नाही. विश्व हिंदू परिषदेनेदेखील या हिंसाचाराची दखल घेत दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलनाने या हिंसाचाराचा निषेध केला. बांगलादेशमध्ये कोणताही हिंदू आज सुरक्षित नाही. हिंदू डॉक्टर, अध्यापक, संन्यासी, वकील वा पत्रकार कोणीही असलात तरी आज त्यांच्यावर अत्याचार होताना दिसत आहे. भारतीय हिंदू समाज फार काळ या हिंसाचारावर संयम बाळगू शकणार नाही, असे दिल्ली प्रांताचे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष कपिल खन्ना यांनी म्हटले आहे. अनेक भारतीय हिंदू बांधवांच्या भावनांचा बांध या अत्याचाराच्या घटनांमुळे फुटताना दिसतो आहे. तरीही भारतीय हिंदू आजही अत्यंत संयमाने आणि सांविधानिक मार्गानेच या सर्व प्रकारावर व्यक्त होताना दिसतो. अमेरिकन डीप स्टेट, सीआयए आणि पाकिस्तानी आय.एस.आय. यांनी संगनमताने बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून पाडून आपला पित्तू मुहम्मद युनूस याची तेथील सरकारचा प्रमुख म्हणून नेमणूक केली, हे सत्य सर्व जगासमोर आता उघड झालेले आहे. या अमेरिकन डीप स्टेटला अशाच प्रकारची अस्थिरता भारतातदेखील निर्माण करायची आहे हेही आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच अमेरिकन मुत्सद्दी ग्रॅहॅम मेयर आणि गॅरी अपेलगार्थ हे, भारतातील उपद्रवमूल्य असलेल्या फारूख अब्दुल्ला, असदुद्दीन ओवेसी आणि अन्य प्रांतीय नेत्यांना काही महिन्यांपूर्वी भेटले होते, हे वाचकांना आठवतच असेल. भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे डीप स्टेटचे हे प्रयत्न 2019 पासूनच या देशात सुरू आहेत. सीएएविरोधी आंदोलन असो वा दिल्लीच्या सीमेवरील महिनोन्महिने चाललेले खलिस्तानी प्रवृत्तींनी व काही आंदोलनजीवींनी हायजॅक केलेले तथाकथित शेतकरी आंदोलन असो, त्यामागे अमेरिकन डीप स्टेटच्याच कारवाया होत्या हेही आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. या देशात कुठल्या ना कुठल्या प्रकारे अस्थिरता निर्माण करण्यात यांना रस आहे. म्हणूनच आजपर्यंत बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर निषेधाचा एक शब्दही न उच्चारणार्या काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीची कीव करावी तेवढी थोडी आहे. मात्र अचानक कालपरवा काँग्रेस पक्षाचे कुणी इम्रान मसूद यांना कंठ फुटला आहे. बांगलादेशबरोबरचे सर्व संबंध भारताने तोडावेत व या हिंसाचारावर सक्त कारवाईची भारत सरकारने बांगलादेश सरकारकडे मागणी करावी, असे त्यांनी प्रतिपादन केले. बांगलादेशने अल्पसंख्याकांवरील हिंसक हल्ले त्वरित थांबवावे अन्यथा भारताने त्यांच्यावर व्यापारी बहिष्कार घालण्याची मसूद यांनी सूचना केली आहे. बांगलादेश आजही भारतीय औषध कंपन्यांवर अनेक महत्त्वाच्या औषधांसाठी अवलंबून आहे. भारताने अगदी काही ’जीवनरक्षक’ औषधांचा पुरवठा थांबवला तरीही बांगलादेशी सरकार आणि तेथील मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांना गुडघ्यांवर रांगावे लागेल अशी आजची स्थिती आहे. पूर्वीची थकबाकी न मिळाल्याने, या अस्थिर परिस्थितीत या देशाचा वीजपुरवठा अर्ध्यावर आणून अदानी समूहाने या देशाला परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारने याआधी पाकिस्तान आणि मालदीवची यशस्वी व्यापारी कोंडी करून दाखविली आहे. जर भारत सरकारने जीवनावश्यक औषधांचा पुरवठा थांबवण्यासारखी पावले उचलली तर जागतिक मानवाधिकार आणि इतर अमेरिका-युरोपमधील अनेक संघटना (एनजीओ) ज्या आज हिंदूंवरील हिंसाचारावर मूग गिळून बसल्या आहेत, शेपटीवर पाय पडल्यासारख्या भुंकायला लागतील हेही निश्चित आहे; पण आपल्या कोणत्याही कृतीमुळे अमेरिकी डीप स्टेटला आपल्या कारवाया इथे सुरू करता येणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण भारतातील विरोधी पक्षदेखील याचीच वाट पाहातो आहे. त्यामुळे मोदी सरकार अत्यंत संयमाने या विषयाची हाताळणी करताना दिसते. बांगलादेशी मुसलमानांचा हिंदुद्वेष तसा जुना आहे. स्वातंत्र्याआधी केलेला डायरेक्ट अॅक्शन डे, नोआखालीतील दंगे वाचकांना आठवतच असतील. बांगलादेशला पश्चिम पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त करण्याच्या चळवळीतदेखील तेथील हिंदू आघाडीवर होते. त्यामुळेच जनरल नियाझींच्या पंजाबी पाकिस्तानी सैन्याने तेव्हा वेचून वेचून तेथील हिंदूंवर अत्याचार केल्याचे दाखले आहेत. पुढे भारताच्याच मदतीने बांगलादेश स्वतंत्र देश बनला; पण म्हणून या बांगलादेशी मुसलमानांनी हिंदुद्वेष करणे सोडून दिले असे नाही. अगदी शेख हसीनांच्या शासनकाळातदेखील हिंदू मंदिरांवर हल्ले होतच होते. अनेक ठिकाणी हिंदू कुटुंबे दहशतीच्या छायेखाली दिवस कंठत होती. हिंदू स्त्रिया आणि मुली यांचा अनेक प्रकारे छळ केला जातच होता. हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांबाबत असा अंदाज आहे की, बांगलादेश मुक्तियुद्धादरम्यान 3,00,000 ते 30,00,000 हिंदू लोक मारले गेले होते. तसेच 3,00,000 ते 4,00,000 बंगाली हिंदू महिलांवर बलात्कार झाले होते. 1971 च्या पाकिस्तानी सैन्याने आणि इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांनी केलेल्या हिंसक अत्याचारामुळे अंदाजे एक करोड पूर्व पाकिस्तानी लोकांनी भारतात आश्रय घेतला होता ज्यात 80% हिंदू होते. एका आकडेवारीनुसार 1971 च्या बांगलादेश मुक्तियुद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्य आणि इस्लामिक मिलिशिया (जे अर्धप्रशिक्षित असतात व अडचणीच्या वेळी, गरजेच्या वेळी सैनिक म्हणून काम करू शकतात असे लोक) यांच्या छळापासून वाचण्यासाठी सुमारे आठ दशलक्ष हिंदू भारताच्या विविध भागांत पळून गेले. बांगलादेश मुक्तिसंग्रामानंतर असे आढळून आले की, त्यापैकी 1.5 दशलक्ष हिंदू भारतात राहिले, तर उर्वरित 6.5 दशलक्ष बांगलादेशात परत गेले. हिंदूंवर अत्याचार करण्यात पंजाबी मुसलमानांइतकेच बंगाली मुस्लीमदेखील आघाडीवर असतात. दुर्दैवाने फाळणीचा रक्तरंजित इतिहास सांगताना पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) बद्दल तेवढे लिहिले किंवा बोलले जात नाही. आत्तादेखील बांगलादेशात जी काही उलथापालथ होते आहे, त्याचा फायदा घेऊन बंगाली मुसलमान हिंदू समाजावर अत्याचार करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत, कारण आज शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी घातली गेली आहे. त्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी तीन राजकीय पक्ष पुढे आलेले दिसतात. एक बेगम खलिदा झिया यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, दुसरी जमियत ए इस्लामी आणि तिसरी आणि सर्वात धोकादायक व मूलतत्त्ववादी असलेली हिजबुल तहरिर. यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमियत ए इस्लामी यांनी या देशातील प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेतलेल्या आहेत. मुळात हे दोन्ही पक्ष कडवे इस्लामिक राजकारण करणारे पक्ष आहेत; परंतु सर्वात धोकादायक बाब म्हणजे या उलथापालथीने हिजबुल तहरिर पक्षालादेखील काही अवकाश प्राप्त करण्याची संधी दिली. हिजबुल तहरिर हा पक्ष अतिरेकी इस्लामिक विचारसरणीचा पक्ष असून या पक्षाचा खिलाफतला पाठिंबा आहे. तसेच या पक्षाचा बांगलादेशाच्या लष्करावर प्रभाव पडताना दिसून येत आहे. या तीनही गटांनी बांगलादेशाला अधिकच इस्लामिक किंवा इस्लामवादी करण्याची मागणी केलेली आहे. त्यातही हिजबुल तहरिर या पक्षाचा बांगलादेशमध्ये शरिया कायदा लागू करण्याचा हट्ट आहे. हे सगळेच तेथील हिंदू समाजाच्या दृष्टीने भयावह आहे. या सगळ्या दंग्यांच्या आणि हिंसक आंदोलनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि सैन्याची शस्त्रे पळवण्यात आली. हीच शस्त्रे मग तेथील हिंदू समाजावर हल्ले करण्यासाठी वापरण्यात आली. मुहम्मद युनूस यांनी मध्यावधी सरकार स्थापन केल्यानंतर हजारो हिंदू शिक्षकांना मारझोड करून राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आले. अनेक छोट्या हिंदू व्यावसायिकांना आणि शेतकर्यांना मारझोड करून आपल्या जागा सोडून जाण्यास भाग पाडण्यात आले.
हिंदू समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत चिंताजनक आहे. भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंवर हिंसक हल्ले होऊ नयेत, तेथील हिंदू समाज सुरक्षित राहावा यासाठी आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांच्या चौकटीत जे जे शक्य आहे ते ते करतेच आहे. मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात अतिरेकी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणी फोफावताना दिसते आहे. तेथील हिंदू जरी सांविधानिक चौकटीत आपल्या सुरक्षिततेसाठी एकत्र आलेले दिसत असले आणि मुहम्मद युनूस जरी मानवाधिकाराच्या गप्पा मारीत असले तरी त्यांच्या सरकारमधील घटक पक्षच अतिरेकी मुस्लीम मूलतत्त्ववादी आहेत हे विसरता येत नाही. त्यामुळे तेथील हिंदूंनी एकत्र येऊन जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचनात्मक तयारी करणे आवश्यक आहे. आता बांगलादेशातील हिंदू नेमस्त राहिले तर त्यांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे आणि भारतीय हिंदू समाजाने तेथील हिंदू समाजाला संपूर्ण कृतिशील पाठिंबा देणे क्रमप्राप्त आहे.