राजकारणाला खर्या अर्थाने दिशा देण्याचे कार्य हे ‘देवेंद्र पर्व’ काळात घडू शकते, हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला आहे. आताचे हे नवनिर्वाचित शासन महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले, हिंदुत्वाला सन्मान मिळवून देणारे, ‘स्वराज्य ते सुराज्य’ या दिशेने मार्गस्थ होणारे शासन आहे, हा विश्वासही जनतेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले महाराष्ट्राकडे पाहण्याचे व्हिजन पाहता ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हेच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सत्य होवो, ही शुभेच्छा.
मेरा पानी उतरता देख
किनारे घर मत बसा लेना
मैं समंदर हूँ
लौटकर वापस आऊंँगा।
2019 साली विश्वासघातामुळे मुख्यमंत्रीपदाऐवजी विरोधी पक्षनेते बनलेल्या देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत या ओळी सांगितल्या होत्या. पाच वर्षांनी त्या अशा खर्या ठरतील, याची कदाचित कुणी कल्पनाही केली नसेल. आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सूत्रसंचालकांनी मा. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी घोषणा केली, तेव्हा परिसरात पुढील काही मिनिटे तरी ’लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ - देवा भाऊ देवा भाऊ, जय श्रीराम, एक है तो सेफ है इ.’ घोषणांच्या वर्षावाने सारे वातावरण फुलून गेले होते. “मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की,...” हे धीरगंभीर वाक्य आझाद मैदानाच्या परिसरात दुमदुमले आणि सारा परिसर आनंदाने न्हाऊन निघाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, या आत्मीयतेने आले होते. प्रचंड जनसागर आझाद मैदानात उसळला होता. बसेस-ट्रेनमधून माणसांचे लोंढेच्या लोंढे आझाद मैदानाकडे कूच करीत होते. सर्वांच्या चेहर्यावर एकच होते की, देवेंद्र भाऊ शपथ घेतानाचा क्षण आपल्याकडून राहून गेला नाही पाहिजे.
मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास कैक हजारोंच्या संख्येमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे शीर्षस्थ नेते, एनडीएचे नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अनेक दिग्गज नेत्यांची व्यासपीठावर हजेरी होती. तसेच राजकीय क्षेत्रातले नेते-पुढारी-कार्यकर्ते, संघ परिवारातल्या विविध संघटनांतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, कला क्षेत्रातील मंडळी, उद्योजक मंडळी, काही निवृत्त सैनिकी अधिकारी, वेगवेगळ्या समाजघटकांतील लोक, त्याचबरोबर धार्मिक क्षेत्रातून साधुसंत-महात्मे, भन्ते आशीर्वचने घेऊन आली होती. महाराष्ट्र ही भूमी वीरयोद्ध्यांची, तशीच ती साधुसंतांची भूमी आहे. ’राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा। नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा’ हे गोविंदाग्रजांचे गीत प्रत्यक्ष आझाद मैदानावर अवतरले होते.
खरं तर हे असे सोहळे टीव्हीसमोर बसून पाहिले तर अधिक स्पष्ट आणि चांगले दिसतात... पण प्रत्यक्ष उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पाहणे हा वेगळाच अनुभव. सकारात्मक ऊर्जा काय असते, हे 5 डिसेंबरला झालेल्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात अनुभवता आले. प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती, मात्र अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्यामुळे अधिक खुर्च्या आणि पाण्याची व्यवस्था केली गेली. तरीदेखील माणसांचा ओघ काही कमी होत नव्हता. जागोजागी स्क्रीन लावल्या होत्या. खुर्च्या मिळाल्या तर ठीक, नाही तर जमिनीवर बसण्याची तयारी आलेल्या मंडळींनी दाखविली. एकमेकांना जोडून तीन ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली होती. शपथविधीच्या मुख्य व्यासपीठावर ’महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हे लिहिलेले वाक्य सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
’महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हे वाक्य लक्ष वेधून घेण्याबरोबरहेही दर्शवीत होते की, महाराष्ट्राच्या राजकारणाने आणि समाजकारणाने आता कूस बदलली आहे. आघाडीच्या ’इस्लामिक-लेफ्टिस्ट’ प्रतिगामीपणाला महाराष्ट्राने चपराक देऊन पुरोगामित्व म्हणजे काय, हे दाखवून दिले आहे. राजकारणाला खर्या अर्थाने दिशा देण्याचे कार्य हे ‘देवेंद्र पर्व’ काळात घडू शकते, हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेत दिसत होता. आताचे हे नवनिर्वाचित शासन महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले, हिंदुत्वाला सन्मान मिळवून देणारे, ‘स्वराज्य ते सुराज्य’ या दिशेने मार्गस्थ होणारे शासन आहे, हा विश्वासही जनतेत दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत वाटले नव्हते एवढे अपयश पदरी असताना खचून न जाता लढवय्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली. अडीच वर्षांत झपाट्याने हाती घेतलेली विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी दिवसरात्र घेतलेली मेहनत महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली होती. नावाने केवळ महाविकास आघाडी असलेल्या सरकारचा अनुभवही जनतेच्या गाठीशी होता. विकासाच्या उलट भकासाच्या दिशेने महाराष्ट्र अधोगतीकडे चालला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना घोषित आणि पारित केलेल्या विकासकामांना अडसर वा बंद करण्याचा चंग या बिघाडी सरकारने बांधला होता, हे जनता विसरलेलीच नव्हती. त्यात लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात कोणत्या खालच्या पातळीचा आणि खोटे विमर्श प्रस्थापित करण्याचा या बिघाडीने प्रयत्न केला आणि परिणामी लोकसभा निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला. राजकारणात जिंकण्याची आणि सत्ता आपली असावी, ही आकांक्षा काही चूक नाही; पण असंगाशी संग करावा आणि कहर म्हणजे व्होट जिहाद, लँड जिहादच्या पत्रकावर सह्या करणे, याचा अर्थ आपणच आपली कबर खणण्यासारखे आहे. व्यक्तिगत आणि पक्षीय आकांक्षेपुढे महाराष्ट्र राज्याला पर्यायाने देशाला वेठीस धरताय, हे जनतेच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.
हिंदू समाजाची वृत्ती सहिष्णू आहे; परंतु आपल्या धर्माचा अपमान/निंदा तो सहन करू शकत नाही. म्हणून पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदुहिताचे सरकार आले नाही, तर आपल्या येणार्या पिढ्यांचे भविष्य धोक्यात येईल. हे गंभीर संकट ओळखून समाजातील सज्जनशक्ती, संघशक्ती, संतशक्ती आणि त्यासोबत मातृशक्ती एकवटली आणि त्यांनी चमत्कार घडवून महायुतीला घवघवीत यशाचे मानकरी ठरविले. आता सत्तास्थानी हिंदुहिताचे समर्थन करणारेच येणार, ही शाश्वती असतानाच खोटे विमर्श विरोधकांनी पसरवायला सुरुवात केली. त्यातच महायुतीत मुख्यमंत्रीपद आणि अन्य पदांची रस्सीखेच चालू आहे, त्यामुळे हे नाराज-ते नाराज, युती तुटणार, सत्तेची वेगळी समीकरणे पाहायला मिळणार, अशा संभ्र्रमात टाकणार्या बातम्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यापर्यंतच्या काही तासांपर्यंत डावी इकोसिस्टीम तिखटमीठ, मसाला लावून सांगत होती.
ज्या आशेने महायुतीला निवडले खरे; पण 2019 सारखी अभद्र आघाडी आपल्या पदरात पडायला नको, अशी प्रार्थना महाराष्ट्राची जनता करीत होती. अखेरीस 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळ्याच्या मुख्य व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांना पाहून जनतेचा जीव भांड्यात पडला. मुख्यमंत्रीपदाचा मोह अनेक राजकीय नेत्यांना होतो; पण शपथविधी सोहळ्यातील चित्र पाहिले तर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीलाच देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने आजच्या युगातील धर्मराजाचा मोह झालेला होता असे वाटत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले देवेंद्रजी यांनी संघशिक्षेच्या शिदोरीचा कधीही विसर पडू दिला नाही. याचे दर्शन त्यांच्या प्रत्येक निर्णयात आणि कृतीतून प्रकट होत असते. रा. स्व. संघाचे संस्थापक पू. डॉ. हेडगेवार म्हणत की, संकटे उगाच येत नाहीत. ती ईश्वरी योजनेतून येतात. संकटे आपल्या धैर्याची, चिकाटीची आणि सामर्थ्याची कसोटी पाहतात. संकटांना घाबरून हातपाय गाळून जो बसतो तो पुन्हा उठत नाही आणि संकटांचा जो सामना करतो, धैर्याने लढतो, त्याला ईश्वरी प्रसाद लाभल्याशिवाय राहत नाही. देवाने प्रत्येक माणसात निष्क्रियतेच्या शक्ती भरल्या आहेत, तशाच दैवी शक्तीदेखील दिल्या आहेत. आपल्यातील या दैवी शक्तीची ओळख ज्याची त्याने करून घ्यायची असते. ही दैवी शक्ती देवेंद्रजी यांनी वैयक्तिक साधनेतून आणि संघसाधनेतून प्राप्त केली आहे, हे निश्चित. आता देवेंद्र 3.0 असे पोस्टर पाहून विरोधक टीका करू लागलेत की, खर्या अर्थाने हा दुसर्यांदा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आहे, पहाटेच्या शपथविधीवरून टीका झोडत आहे. राजकारणात ‘मातब्बर-जाणता राजा’ अशा समजणार्या महारथींना तरी हे जमले का, हा ज्याचा त्याने बोध घ्यावा. त्याच काळात विरोधी नेता म्हणून कसे काम करावे याचा वस्तुपाठही त्यांनी घालून दिला. देवेंद्र हे खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत, महाराष्ट्राचे व्हिजन असणारे दिग्गज नेता आहेत. तसे पाहू जाता 2014 साली मुख्यमंत्रीपदाची यशस्वी वाटचाल करून 2019 साली महायुतीचे सरकार स्थापन होईल असे वाटत असतानाच अभद्र आघाडीचे काळे सावट महाराष्ट्रावर पडले; परंतु चाणक्यनीतीने देवेंद्रजी यांनी एकनाथ शिंदे यांच्या साथीने ‘पॉलिटिकल करेक्शन’ केले. त्याच दरम्यान भिन्न राजकीय विचारसंस्कृतींचे अजित पवार हेही महायुतीचा एक भाग झाले. त्यामुळे अनेक जण नाराज झाले; पण देवेंद्र यांनी समन्वयाची धुरा आपल्या हाती घेऊन महायुतीचा कारभार अडीच वर्षे उत्तम प्रकारे हाताळला आणि महाराष्ट्राला दाखवून दिले की, ‘अकेला देवेंद्र’ काय काय करू शकतो. महाराष्ट्राच्या विकसित भविष्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही प्रशंसनीय आहे. एकनाथ शिंदे यांच्या साथीने जेव्हा सत्ता स्थापन करण्याची वेळ आली, तेव्हा कुठलेही पद न घेण्याची निर्मोही वृत्तीही त्यांनी दाखविली. त्याच क्षणी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली. याला म्हणतात एकनिष्ठ कार्यकर्ता. सोन्याची झळाळी ही तेव्हाच येते, जेव्हा ते तावूनसुलाखून बाहेर येते. या अर्थाने देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे सोने आहेत. गटनेतापदी नियुक्ती होत असताना त्यांनी म्हटलेले वाक्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसेच असे आहे - ‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत.’ विरोधकांनी अडकविण्यासाठी अनेक चक्रव्यूह निर्माण केले; पण त्या सर्वांना भेदून देवेंद्र जनसेवकाच्या रूपाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. ‘पुन्हा येईन, पुन्हा येईन’ यावरून टिंगलटवाळी करणार्यांनी देवेंद्रजींच्या आत्मविश्वासातून प्रेरणा घ्यावी असे वाटते.
देवेंद्र यांना अनेक बिरुदावली लावली जाते, मात्र ‘जनसेवक’ ही उपाधी त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्राप्त केली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा नेहमी चढत्या भाजणीतच राहिला आहे.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले महाराष्ट्राकडे पाहण्याचे व्हिजन पाहता ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हेच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सत्य होवो, ही शुभेच्छा.