हा अरुणोदय व्हावा...

06 Dec 2024 18:47:06
 
devendra fadnavis
 
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला फडणवीस यांनी दिलेल्या वचनाची या वेळेस त्यांनी पूर्तता केली. ते वचन होते ‘मी पुन्हा येईन’... या वाक्याची विरोधकांसह अनेकांनी त्या वेळी खिल्ली उडवली होती; परंतु फडणवीस खरोखरच पुन्हा आले. शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही घेऊन पुन्हा आले. त्यांनी तेव्हा उच्चारलेले ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवले; परंतु मी कशासाठी पुन्हा येईन, हेही त्यांनी तेव्हा सांगितले होते. ते अनेक जण विसरले. ‘मी पुन्हा कशासाठी येईन’ हे जर आपण समजून घेतले, तर देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची दृष्टी आपल्याला समजू शकते.
 
“मी, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...” या दि. 5 डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर उच्चारल्या गेलेल्या ओळी महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेल्या. या ओळींचे महत्त्व केवळ एका निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व विजयाच्या राजकीय संदर्भापुरते मर्यादित नाही. या ओळी नव्या महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरू शकतील, इतकी त्यांची क्षमता आहे. नियतीने पाच वर्षे कठोर परीक्षा घेतल्यानंतर आता त्याच नियतीने नवा महाराष्ट्र घडवण्याचे शिवधनुष्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर ठेवले आहे. स्वकर्तृत्व सिद्ध केलेले धुरंधर राजनेता देवेंद्र फडणवीस यांच्यात हे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य निःसंशयपणे आहे; परंतु हा नवा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी एकट्या फडणवीस यांची नाही, ती समाज म्हणून आपणा सर्वांची आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
 
आज महाराष्ट्र केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्याही एका वेगळ्या, स्थित्यंतराच्या कालखंडातून जातो आहे. मागील दोन-तीन वर्षे राज्यातील जातीजातींमध्ये संघर्ष, तेढ निर्माण व्हावी याकरिता विरोधक कोणत्या स्तरावर जाऊन षड्यंत्रे रचत होते, हे आपण पाहिले. सकल हिंदू समाजात मराठा समाज, ओबीसी समाज, दलित समाज अशी उभी विभागणी व्हावी, आपापसांत संघर्ष पेटावा आणि त्यातून ही संघटित हिंदू शक्ती विभाजित व्हावी, यासाठी असंख्य प्रयत्न झाले. त्यांना खतपाणी घालणार्‍यांत महाराष्ट्राच्या ज्येष्ठ, मुरब्बी वगैरे म्हटल्या गेलेल्या नेत्यांपासून समाजातील पुरोगामी, सेक्युलर, लिबरल वगैरे म्हणवणार्‍या मंडळींपर्यंत अनेकांचाच सहभाग होता. यामागे हिंदुत्ववादी भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये, इतका शुद्ध राजकीय हेतू! यातून महाराष्ट्राच्या समाजजीवनावर किती भयानक आणि दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात, याची कल्पना असूनही हे सारे घडवले जात होते. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर, हिंदुत्ववादी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर हे सारे प्रयत्न सुरू झाले असे वरकरणी दिसत असले तरी वास्तविक याची सुरुवात 2014-15 मध्येच झाली होती. देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक तरुण, आश्वासक, कर्तबगार चेहरा म्हणून उदय झालेला होता. हा चेहरा आपली चाळीस-पन्नास वर्षांपासून चाललेली दुकाने बंद करून टाकेल, या भीतीने राज्यात काय काय घडवले जात होते, हे आपल्यातील अनेकांच्या लक्षात असेल. कोरेगाव-भीमा प्रकरणात किती मोठे अर्बन-नक्षल नेटवर्क कार्यरत होते, त्यांनी अशांतता माजवण्याचे काय काय डाव रचले होते, सुरुवातीला शांतपणे काढण्यात आलेल्या मराठा मोर्चांमध्ये अशांतता पसरावी यासाठी काय काय गोष्टी घडल्या, हे सर्व घडत असताना सातत्याने कथित पुरोगामी मंडळी येता-जाता फडणवीसांची जात काढून कसे पाण्यात पाहत होती, अशी किती तरी उदाहरणे आहेत. या षड्यंत्रांना बळी पडण्याचा महाराष्ट्राचा स्वभाव नाही. त्यात सहभागी होण्याचा तर नाहीच नाही. त्यामुळे जवळपास प्रत्येक निवडणुकीत जनतेने या कारस्थानांना मतपेटीतून उत्तर दिले. म्हणूनच मग हिंदुत्ववादाची राजकीय शक्ती विभाजित करण्याचा निर्णायक डाव टाकला गेला. त्या वेळची शिवसेना आपल्या नेतृत्वाच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी अलगदपणे या जाळ्यात सापडली. पुढील अडीच वर्षांत राज्याच्या आर्थिक विकासाला खीळ घालण्यासाठी, फडणवीसांनी सुरू केलेले दूरदर्शी प्रकल्प रखडवण्यासाठी सारे काही करण्यात आले. त्या वेळी खुर्चीवर बसलेले नेतृत्व कशातलेच काहीच न कळणारे आणि ते स्वतःच उघडपणे सांगणारे असल्याने हे करणे अधिक सोपे गेले; परंतु कोंबडे कितीही झाकले तरीसूर्योदय थांबत नसतो. अडीच वर्षांच्या या फरफटीनंतर हिंदुत्ववाद मानणारी शिवसेना थेट नेतृत्वातच बदल करून भाजपसोबत आली. इतकेच नव्हे तर पुढे चक्क राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्षही आपल्या नेतृत्वाला उघडपणे बाजूला सारून भाजपसोबत आला.
 

devendra fadnavis  
 
आपण आजवर टाकलेले डाव आपल्यावरच उलटत असल्याने स्वाभाविकच पुन्हा जातीय विद्वेषाचे खेळ सुरू झाले; परंतु या वेळी मात्र जनतेने मतपेटीतून अशी काही चपराक दिली की, आता ही मंडळी या धक्क्यातून कधी आणि कशी सावरते, याबाबतही शंका निर्माण झाली आहे. आम्हाला जातीयवाद नकोय, तर राष्ट्रीय विचार अंगीकारणारे आणि विकासात्मक दृष्टिकोन असणारे स्थिर सरकार हवे आहे, हाच स्पष्ट संदेश महाराष्ट्राने या निवडणुकीतून दिला. हे निकाल, यातून स्थापन झालेले स्थिर-सशक्त सरकार आणि या सरकारला देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दूरदर्शी नेत्याचे नेतृत्व या सार्‍यामुळे यापूर्वी कधीही मिळाली नव्हती, अशी संधी महाराष्ट्रापुढे आज चालून आली आहे. ती संधी आहे महाराष्ट्राच्या हरवत चाललेल्या वारशाचे पुनर्जागरण करण्याची!
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा? 

https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/
महाराष्ट्राने कायमच देशाची वैचारिक आणि सांस्कृतिक दिशा निश्चित करण्याचे काम केले आहे. परकीय, अन्यायी इस्लामी सत्तांना उलथवून टाकत लोकाभिमुख हिंदू स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीत जन्मले. त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याच्या आणि स्वाभिमानाच्या विचारावरच पुढे हिंदवी साम्राज्य अटकेपार पोहोचले, भारताच्या रक्षणार्थ पानिपतावर धारातीर्थी पडले. ब्रिटिशकाळात सामाजिक सुधारणांच्या व सामाजिक न्यायाच्या चळवळीत महाराष्ट्र अग्रस्थानी होता. आज जगाला हेवा वाटावा अशी समर्पित आणि सुसंघटित हिंदू शक्ती उभी करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच भूमीत जन्मला. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या आर्थिक प्रगतीमध्येही महाराष्ट्राने कायमच मोठा वाटा उचलला. सहकारासारख्या आर्थिक चळवळी येथे यशस्वीपणे रुजल्या. हा महाराष्ट्राचा स्थायिभाव आहे. राष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी या महाराष्ट्राने दिलेले योगदान, हाच येथील महाराष्ट्र-धर्म आहे, हाच आपला वारसा आहे. हा वारसा लुप्त व्हावा, विस्मृतीत जावा आणि आपापसांत सतत संघर्ष करत राहणार्‍या समाजाची निर्मिती करून आपले राजकीय स्वार्थ साधले जावेत, यासाठी दर वेळी प्रयत्न झाले. या वेळीही ते झाले; परंतु त्यांना या निवडणुकीच्या निकालांनी निर्णायक उत्तरही मिळाले. याकरिता राज्यातील हिंदुत्व विचार मानणार्‍या असंख्य संस्था-संघटना, कार्यकर्ते, समाजातील विविध मान्यवर यांनी जे अथक परिश्रम घेतले, त्याला तोड नाही. या परिश्रमांमुळे आपल्याला जातींत विभाजित करण्याचे इतके प्रयत्न होऊनही आपण सर्वांनी हिंदू म्हणून मतदान केले. याचा अर्थ असा नाही की, हिंदूविरोधी शक्ती कायमच्या संपल्या. त्यांची अखेरची फडफड होणे अद्याप बाकी आहे. या विभाजनवादी वृत्तींना समाजातून कायमचे हद्दपार करायचे असेल, तर केवळ राजकीय नेतृत्वाने यासाठी प्रयत्न करून भागणार नाही.
 
 
तसे झाल्यास पुन्हा पुढच्या निवडणुकीपूर्वी असेच संघर्ष उभे राहतील आणि ’पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती येईल. त्यासाठी संपूर्ण समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मंडळी, संस्था-संघटना आणि त्यांचे धुरीण यांनी एकत्र येऊन सखोल विचारमंथन करणे व त्यानुसार कृती करणे आवश्यक ठरते. महाराष्ट्राची पुढील काळातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वाटचाल कशी असेल, त्याचा अजेंडा काय असेल आणि या सार्‍यातून ’जात-आधारित’ नव्हे, तर ’कर्तृत्वाधारित’ समाज कसा घडू शकेल, तो समाज जगाच्या वेगासोबत बरोबरी करून त्या स्पर्धेत कसा धावू शकेल, अशा सर्वच विषयांवर राज्यातील विचारी जनांनी एकत्र येणे आता गरजेचे असणार आहे. तसे एकत्र येण्याकरिता लेखात आधी उल्लेखल्याप्रमाणे आज वेळ आणि संधीही कधी नव्हे इतकी व्यवस्थित जुळून आली आहे. या सर्व विषयांचा आवाका असणारे, त्यावर स्वतःची अशी निश्चित व्हिजन असणारे आणि ती व्हिजन प्रत्यक्षात आणण्याची अफाट क्षमता असणारे नेतृत्व आज फडणवीस यांच्या रूपाने सत्तेत आले आहे.
 
 
पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला फडणवीस यांनी दिलेल्या वचनाची या वेळेस त्यांनी पूर्तता केली. ते वचन होते ’मी पुन्हा येईन’... या वाक्याची विरोधकांसह अनेकांनी त्या वेळी खिल्ली उडवली होती; परंतु फडणवीस खरोखरच पुन्हा आले. शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही घेऊन पुन्हा आले. खरे तर ते 2019 मध्येही आलेच होते; परंतु आपल्याच सहयोगी पक्षाने केलेल्या दगाफटक्यामुळे मुख्यमंत्री होता होता राहिले. या वेळी त्यांनी असे काही होण्यासही वाव ठेवला नाही. त्यांनी तेव्हा उच्चारलेले ’मी पुन्हा येईन’ हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवले; परंतु मी कशासाठी पुन्हा येईन, हेही त्यांनी तेव्हा सांगितले होते. ते अनेक जण विसरले. ’मी पुन्हा कशासाठी येईन’ हे जर आपण समजून घेतले, तर देवेंद्र फडणवीस या व्यक्तीची दृष्टी आपल्याला समजू शकते. सर्वांगीण विकास आणि प्रखर राष्ट्रीय विचार या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. त्या दोन्हीही हिंदू प्रेरणेचा, हिंदू जीवनमूल्यांचाच भाग आहेत. हे समजून घेऊन त्यानुसार आपले कार्यकर्तृत्व घडवणार्‍यांपैकी देवेंद्र फडणवीस हे एक महत्त्वाचे नाव आहे. आज ते ज्या स्थानी आहेत, तिथे ते स्वकर्तृत्वाने पोहोचले आहेत. अशा नेतृत्वाला समाजातील सर्व घटकांनी आणि त्यातील धुरीणांनी एकत्र येऊन साथ दिली, तर महाराष्ट्राच्या क्षितिजावर नवा अरुणोदय होईल, यात काही शंका नाही. हा अरुणोदय शाश्वत, सर्वांगीण आणि संपन्न महाराष्ट्राचा ठरावा, हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना.
Powered By Sangraha 9.0