संघनिर्माता डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे विसाव्या शतकात झालेल्या अनेक महापुरुषांपैकी एक महापुरुष एवढेच त्यांचे महत्त्व नाही. समष्टीचा विचार घेऊनच त्यांचा जन्म झाला, असे म्हणावेसे वाटते. परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण, घडणार्या घटनांचे विश्लेषण, सामाजिक दृष्टिकोनातून त्या घटनेचा निष्कर्ष व मला काय केले पाहिजे याचा विचार करून कृती हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य सांगता येईल.
नागपूरहून प्रकाशित होणार्या त्या काळातील ‘महाराष्ट्र समाचार पत्रा’त एका सभेचे वृत्त छापून आले होते. ते असे... सभेतील काही लोक मध्येच उभे राहिले. म्हणता म्हणता पाच सेकंदांच्या आत वाकर रोडच्या बाजूचे सर्वच लोक विजेच्या धक्क्यांनी उभे राहावे तसे उभे राहिले व पाठीमागे वाघ लागावा, त्याप्रमाणे जीव मुठीत धरून पळत सुटले. इतक्यात सभेतील किटसन लाइटचे दिवे गर्दीचे धक्के लागून खाली पडले व मालवले. धावत असलेली गर्दी व्यंकटेश थेटर्सच्या भिंतीवर आदळली. चेंगराचेंगरी झाली. लोक एकाएकी पळत सुटल्यामुळे कित्येकांच्या काठ्या हरवल्या, कोणाचे जोडे गेले, कोणाच्या टोप्या गहाळ झाल्या, कुणी दुपट्टे गमावले, कोणाचे धोतर सुटले. इतकी चार हजार मंडळी क्षणभरात भीतीने गर्भगळीत झालेली दिसली. खरा प्रकार चौकशीअंती असा कळला की, सभेच्या मध्यभागी बसलेल्या एका माणसाला पायाखाली बेटकुळी आहे असे वाटले. म्हणून तो उठून खाली पाहायला लागला. शेजारपाजारचे पाच-दहा जण उभे राहिले. कोणी तरी साप साप म्हणून ओरडला. असे ऐकताच लोक पळू लागले. एकाचे पाहून दुसरा पण भयाने पळू लागला. नव्याण्णव टक्के लोक आपण पळतो का? हे न समजता पळत सुटले.
आपण त्या वेळी असतो, ही बातमी वाचली असती, तर एकदुसर्याला मिरची-मसाला लावून सांगितले असते व थोडा वेळ करमणूक करून घेतली असती. काय हा एका बेडकाचा पराक्रम! चार हजारची सभा उधळली गेली. जे सभेत नव्हते ते बातमी वाचून हसले असतील. काय आपली जनता, असेही अनेक जण म्हणाले असतील.
डॉ. हेडगेवार त्या दिवशी नागपुरात नव्हते. ‘महाराष्ट्र समाचार पत्रा’तील सभेचे हे वर्णन वाचून ते विचारात पडले. सभेच्या संचालकांपैकी काही जणांना आवर्जून भेटले होते. श्रोत्यांचे सोडा, तुम्ही मंडळींनी वेळीच पुढे येऊन लोकांना का आवरले नाही? असे विचारले. ‘मी एकटा काय करणार’ हे वाक्य सर्वांकडून ऐकावे लागले.
‘मी एकटा काय करणार’ हे वाक्य आपल्यालाही अनेक वेळा ऐकायला मिळते. हिंदू माणूस सभेत असो, यात्रास्थळी असो, कुंभमेळ्यात असो, तो असतो एकटाच. हा एकटेपणाचा न्यूनगंड हिंदू समाजाला आत्मविनाशाकडे घेऊन जाईल, असे डॉक्टरांना वाटले. मी एकटा नाही. अवतीभोवतीचा समाज माझा आहे, असे त्याला वाटले पाहिजे. ‘मी नव्हे आम्ही’ हा भाव हिंदू समाजात रुजला पाहिजे. याचा विचार करून डॉक्टरांनी प्रारंभ केलेले कार्य म्हणजे ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’.
संघ म्हणजे रोज एक तास चालणारी संघाची शाखा. शाखा म्हणजे सामूहिकतेचा अनुभव. प्रतिदिन एकत्र येऊन आपण एकटे नसून अनेकांतील एक आहोत. सिंधूतील एक बिंदू आहोत, ही भावना पक्की झाली तरच एकटेपणामुळे उत्पन्न होणारी भयग्रस्तता दूर होईल.
संघशाखा म्हणजे व्यक्तीचा अहम्कडून वयम्कडे प्रवास. अहम्चा संकोच आणि वयम्चा विस्तार.
संघशाखेत गायली जाणारी गीते सरळ, सोपी आणि ‘आम्ही’ हा भाव पुष्ट करणारी असतात. उदाहरणार्थ 1. आम्ही गड्या (मी गड्या नव्हे) डोंगरचं राहणारं, चाकर शिवबाचं होणार. 2. व्यक्तित्वाच्या उल्लंघुनिया सार्या आकुंचित सीमा, विशाल हृदयी स्थापन केली विराट पुरुषाची प्रतिमा. 3. ज्या अहंकार कोषात, कोंडूनी पडे पुरुषार्थ, तो कोष दुभंगुनी होतं, हे विशाल जीवन आता. 4. जगेल अवयव का शरीराविण, घटक जगे का समाज सोडून, ह्या तत्त्वाने जगतो जीवन, समाज सारा कुटुंब गणिले सोडुनिया निज स्वार्थ ।
समाज संघाचा व संघ समाजाचा, अशी भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. शाखा गावाची असते. संपूर्ण वस्तीची असते. शाखा चालवणारा स्वयंसेवक कोणत्याही जातीचा असला तरी विचार सर्व गावाचा, समग्र वस्तीचा होतो.
एखाद्या व्यक्तीला मोठे करण्याची, नेता बनवण्याची कार्यपद्धती संघाने अवलंबिली नाही. संघशाखेचा आधार सामूहिकता आहे. सामूहिक खेळ, सामूहिक समता, सामूहिक कवायत, सामूहिक संचलन, सामूहिक गायन, सामूहिक प्रार्थना असे शाखेचे स्वरूप असते. भागीदार होणारे बाल, तरुण व प्रौढांमध्ये ‘आम्ही’ हा भाव निर्माण व्हावा, हा हेतू असतो. ‘आम्ही’ या शब्दामध्येच आत्मविश्वास भरला आहे. 1926 साली संघशाखा प्रारंभ झाली. नागपूरमध्ये काही तरुणांच्या मनात ‘आम्ही’ हा भाव निर्माण झाला होता. त्यामुळे 1927 ला नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत हिंदूंचे रक्षण होऊ शकले. ‘आम्ही’चा दायरा कितीही मोठा होऊ शकतो. समाजामध्ये ‘आम्ही’ भाव निर्माण करणार्या ऐंशी हजारांहून अधिक संघशाखा आहेत. अरुणाचल असो, गुजरात असो, उत्तराखंड असो, केरळ असो, सर्वत्र हा प्रयत्न चालू आहे.
‘आम्ही’ या शब्दामध्ये आपुलकी भरलेली आहे. भूकंप, पूर, चक्रवात, अकाल, दुष्काळ अशा संकटकाळी मदतीला जाण्याची सहज प्रवृत्ती दिसून येते.
‘आम्ही’ म्हणजे सहसंवेदना. संवेदना उत्पन्न करणारी गीते मोठ्या आवडीने शाखेवर गायली जातात. उदाहरणार्थ- 1. जो भाई भटके पिछडे हात पकड़ ले साथ चले, भोजन कपडा घर की सुविधा शिक्षा सबको सुलभ मिले । उंच नीच लवलेश न हो छुवा छुत अवशेष न हो, एक लहू सबकी नस-नस में अपनेपन की रीत गहे । 2. शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है, कोटी आंखों से निरंतर आज आसू बह रहे हैं । आज अगणित बंधू अपने यातनायें सह रहे है, दुख हरे सुख दे सभी को एक यह आचार है । एक यह आचार है ।
दहा भाषणांनी जे होणार नाही, ते एका गीताने होते, असा अनुभव संघशाखेत येतो. सध्या एक लाख साठ हजार सेवाकार्ये या ‘आम्ही’ भावामुळे स्वयंसेवकांद्वारे चालू आहेत. संघाची शाखा म्हणजे समाजामध्ये कर्तव्यभाव जागे करणारे काम. ’भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या वाक्यापासून संविधानामध्ये दिलेली प्रतिज्ञा सुरू होते. ‘भारतमाता की जय’ हे वाक्य पहिल्या दिवसापासून संघाने स्वीकारले आहे. संघशाखेवर उपस्थित असलेली सर्व मंडळी सामूहिकरीत्या ‘भारतमाता की जय’ म्हणतात. समूह कितीही मोठा असो, विविध भाषा-भाषी असो, विविध संप्रदाय मानणारा असो, विविध प्रांतांचा असो, जेव्हा सर्व एकस्वराने ‘भारतमाता की जय’ म्हणतात, तेव्हा ’भारत माझा देश आहे’ या शब्दाची खोली खूप वाढते. उच्च-नीचता, शिवाशिव, भाषाभेद, प्रांतभेद, उत्तर-दक्षिण अथवा पूर्व-पश्चिम कोणताही भेद एका मातेचे संतान म्हटल्यावर उरतच नाही. सर्वांवर समान प्रेम करणे, नियमांचे पालन करणे स्वाभाविक येते. अधिकारबोध नाही, कर्तव्याचा बोध जागा होतो.
संघाचे कार्य प्रारंभ होऊन नव्याण्णव वर्षे पूर्ण झाली. ‘आम्ही’ भाव भरण्यामध्ये संघाला बर्यापैकी यश प्राप्त झाले आहे. शताब्दी वर्षात वयम्चा दायरा अजून वाढवायचा संघाचा विचार आहे. समाजहिताचे छोटे-मोठे काम करणार्या, करण्याची इच्छा असलेल्या अशा व्यक्ती व संस्था खूप आहेत. अशा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा विचार आहे, योजना आखल्या जात आहेत.
‘भारताच्या महारथा या सारे मिळूनी ओढू या ।’
सर्वांना म्हणजे कोणालाही सहभागी होता येईल, आपले योगदान देता येईल. मतभेद व मनभेद होण्याचा प्रश्नच होणार नाही व वयम् भावनेचा चमत्कार समाजाला पाहायला मिळेल. असे पाच विषय शताब्दी वर्षानिमित्त निवडले आहेत.
1. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक व्यवहार समरसतेचा असावा. कोणत्याही प्रकारच्या भेदभावनेला थारा देऊ नये. शिवाशिवीचा भाव संपूर्णपणे नष्ट व्हावा.
2. आपल्या कुटुंबसंस्थेची संस्कारक्षमता वाढवावी.
3. पर्यावरण शुद्ध राहावे म्हणून प्रत्येकाला सहज करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. पाणी- घराला, उद्योगाला व शेतीला जपून वापरावे. जन्मदिवस एखादे रोप लावून साजरा करता येईल. अयोग्य प्लास्टिक न वापरणे व कचर्याचे योग्य विनियोग करणे.
4. नागरी कर्तव्याचे पालन - यात वाहतुकीच्या नियमांच्या पालनापासून उमेदवार निवडीकरिता मतदान न चुकता करेपर्यंत अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो ज्याचा त्याने विचार करावा.
5. स्वदेशीचे आचरण व स्वाभिमानाने जगणे. स्वदेशी आचरणामुळे रोजगारनिर्मिती होते. प्रत्येकाने किमान एक जरी खादीचा कपडा वापरला, तरी पुष्कळ लोकांना रोजगार मिळेल. भजन, भोजन, भवन, भाषा, भूषा यामध्ये स्वदेशी तत्त्व किती आणता येईल? याचा विचार करावा.
स्वाभिमान- आपल्या देशाचा, पर्वतांचा, नद्यांचा, आपल्या ऋषीमुनी, साधू-साध्वींचा, संत, वैज्ञानिक, कलाकारांचा, वीर- पराक्रमी पुरुषांचा, वीरांगनांचा, आपल्या सर्व भाषा-भगिनींचाही असणे महत्त्वाचे आहे. उगवत्या नवीन पिढीला हा स्वाभिमानाचा वारसा मिळाला पाहिजे.
जितका ‘आम्ही’ हा भाव जागृत होईल, तितका भारत प्रगतिपथावर जाताना अनुभवाला येईल.
आम्ही पुत्र अमृताचे,
आम्ही पुत्र या धरेचे ।
उजळून आज दावू,
भवितव्य मातृभूचे ।
नागपूरमध्ये एका सभेत घडलेल्या घटनेमागे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे किती सखोल चिंतन होते. ‘एकटेपणाचा दोष’ जाऊन ‘आम्ही’ भाव वाढवणारी संघशाखा देशाला मिळाली, ही व्यक्तीचे व समाजाचे आमूलाग्र परिवर्तन घडवणारी गोष्ट नाही का?