संकल्पपूर्ती ते नवीन संकल्प

विवेक मराठी    27-Dec-2024
Total Views |
विशाखा पाठक
@ 9881236512

bhagwat geeta
 
एखादा संकल्प पूर्ण केल्यावर त्या आनंदात असतानाच नवीन संकल्प करण्याचा निर्धार करणे, हे तो आनंद वर्धिष्णू करणारे आणि अधिक वाढविणारेच असते, हा अनुभव सध्या मी घेत आहे. नुकताच मी शृंगेरी येथे जाऊन कंठस्थ गीतापठणात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हा माझा जीवन संकल्प होता. परमपूजनीय शंकराचार्यांच्या हस्ते आपण पुरस्कार घ्यायचा, हा माझा जीवननिर्धार होता. पुरस्कार घेतल्यानंतरच नागपूरला आल्यावर मी ठरविले की, फक्त आपणच हा पुरस्कार घेऊ नये, तर नागपुरातील किमान 21 भगिनींना हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित करायचे, त्यांच्यासाठी गीता वर्ग घ्यायचे आणि ते कंठस्थ वर्ग सुरू झाले आहेत.
आपण भारतीय. आपले वैशिष्ट्य आहे की, आपण उत्सव, यात्रा, तीर्थक्षेत्र आणि देवदर्शन या ठिकाणी जायला अत्यंत उत्सुक असतो. आपल्या देशात विविध गावे त्यासाठी प्रसिद्ध आहेत. आसेतू हिमालय विविध ठिकाणी आणि प्रवासासाठी सिद्ध आहोत. द्वारकेचा श्रीकृष्ण, अयोध्येचा श्रीराम ही आपली दैवते आणि शृंगेरीचे परमपूज्य शंकराचार्य आपले श्रद्धास्थानच. परमपूज्य आदिशंकराचार्यांनी तर बालपणीच अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादन करत जैन आणि बौद्ध मतांचे खंडन केले आणि संपूर्ण भारत उभाआडवा फिरून हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली. शंकराचार्यांचे केवळ नाव घेतले तरी आदराने नतमस्तक व्हायला होते. शंकराचार्य आणि त्यांचे शृंगेरी पीठ याचे वलय खूप वर्षांपासून मनात होते. शंकराचार्यांची स्तोत्रे गेय आणि संस्कृत भाषेतील आहेत; पण सहज सोप्या संस्कृतमध्ये ती आहेत. गणपती स्तोत्र, चर्पट पंजरिका आणि कनकधारा ही स्तोत्रे तर सहज मुखोद्गत होण्यासारखी आहेत. थोडे मोठे झाल्यावर गीतादेखील जवळची वाटू लागली. माझी आई कै. प्रभा साठे हिचे तर गीतेवर फारच प्रेम होते आणि तिच्यामुळेच मला गीता येऊ लागली. मोठा आवाज आणि गीतेचे स्पष्ट उच्चार असे दोन गुण माझ्या खात्यात बर्‍याच वर्षांपासून जमा आहेत. त्याचबरोबर मनात कुठे तरी शृंगेरी या शंकराचार्यांच्या गावाबद्दल आणि त्यांच्या शारदापीठाबद्दल उत्सुकताही रुजली होती. निवृत्त होईपर्यंत गीता पाठ झाली होती आणि गीता वर्ग पुढे घेतल्यावर गीता कंठस्थ झाली. गीता धर्म मंडळाच्या परीक्षेत मी उत्तीर्णदेखील झाली होती; पण पुढे शृंगेरीला जाता येते याची मला काही कल्पना नव्हती आणि जेव्हा कळले त्या वेळेला जवळपास दहा वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. अचानक शृंगेरीला परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेली मैत्रीण भेटली आणि गीता कंठस्थ असल्याने सगळा मार्ग सोपा झाला, वाट दिसली आणि वाटचालीला वेग आला.
 
 
शृंगेरी हे गाव तसे कर्नाटकातले. तिथे आमूलाग्र गीता कंठस्थ परीक्षा घेतात. संपूर्ण भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही तेथे परीक्षार्थी येतात. कोविडकाळामध्ये दोन वर्षे कोणाचीही परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या बरीच वाढली होती.कोरोनाचे संकट टळल्यावर एकेकाला द्यायचे आमंत्रण येणे सुरू झाले होते. शृंगेरीला जायचे तर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही. शिवाय हे गावही पर्वतराजीवर. त्यामुळे तिथे जाण्याचा रस्ता हा तसा कठीणच आहे. खूप वळणावळणाचा आणि घाटाचा आहे. आम्ही रेल्वेने नागपूर-मुंबई-उडुपी आणि शृंगेरी असा प्रवास केला.
 
 
2023 च्या नवरात्रात आमच्या सहा जणींचे परीक्षेचे अर्ज भरून आमच्या प्रशिक्षिका पुण्याच्या सुनीती उटांगळे यांच्याकडे पाठविले. त्यामध्ये आम्ही दोघी जणी नागपूरच्या होतो, तर सौ. निकम, सौ. जाधव व सौ. कुळकर्णी या तिघी पुण्याच्या होत्या. तिसरी एक सौ. दीक्षित ही तर थेट अमेरिकेहून आली होती. अशा सहा जणांचे परीक्षा अर्ज सुनीताताईंच्या शिफारशीनंतर शृंगेरीला पाठविले गेले. तेव्हापासून दर महिन्याला आम्ही प्रतीक्षा करत होतो आणि तब्बल एका वर्षाने ऑक्टोबर 2024 मध्ये आम्हाला आमंत्रणाचा फोन आला.
 

geeta 
 
7 डिसेंबर 2024 ला आम्हाला शृंगेरीत पोहोचायचे होते आणि आपण पोहोचण्याचा रिपोर्ट मंदिरात द्यायचा होता आणि 8 तारखेला आमची परीक्षा होणार होती. हा निरोप आला आणि मग परीक्षेची लगीनघाई सुरू झाली. कसे जायचे याचे विचारमंथन सुरू झाले. पुणेकर आणि अमेरिकेच्या भगिनी या थेट विमानानेच पुण्याहून एकत्र जाणार होत्या. विमानाने त्या पुण्याहून मंगलोरला जाऊन टॅक्सीने शृंगेरीला पोहोचणार होत्या.
 
 
आम्हाला मात्र हा प्रवास नागपूरहून खडतर होता. मी व निशा खंडाळकर यांनी असा निर्णय घेतला की, आपण नागपूरहून मुंबईला जाऊ व मुंबईमार्गे उडुपी-शृंगेरी असा प्रवास करू. त्याप्रमाणे आमची रेल्वेने जायची आणि यायची दोन्ही आरक्षणे झाली. मात्र हा प्रवास बराच मोठा आणि लांबचा होता. शृंगेरीला जाण्यापूर्वी उडुपीला गीता मंदिर आहे. त्याला कृष्णमठही म्हणतात. त्या परिसरातच गीता मंदिर आहे आणि त्या ठिकाणी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड गीतापाठ आणि गीतापठण सुरू असते. मात्र त्यात सहभागी व्हायला आणि सेवा द्यायला नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. दोन दोन महिने आधीपासून नावे नोंदविलेली असतात; पण मला वाटते की, भगवान श्रीकृष्णालाच आमची सेवा हवी होती. त्यामुळेच सर्व योग जुळून आला. रामटेक येथील कालिदास संस्कृत विद्यापीठातील माझी मैत्रीण एका अभ्यास वर्गासाठी ऑक्टोबर महिन्यातच उडुपीला जाणार होती. तत्पूर्वी आमचे आरक्षण झाले असल्याने आम्ही तिला तेव्हाच तारीख आणि वेळ सांगितली आणि आमचे नाव नोंदवायला सांगितले. तिनेही तत्परतेने ते काम केले. शिवाय तिथल्या आचार्यांचा नंबर तोही मला पाठविला. आम्ही 6 डिसेंबरला दुपारच्या सुमाराला उडुपीला पोहोचलो आणि 12च्या सुमाराला मोबाइल खणखणला. समोरून इंग्रजीत विचारले गेले- आपण सौ. पाठक का आणि गीतापठणासाठी आपण नाव नोंदविले आहे काय? मला त्या तत्परतेचे फार कौतुक वाटले आणि मी होकार दिला.पुढे त्यांनी सांगितले, ठीक आहे. आपण बरोबर तीन पंचेचाळीसला मंदिरात पोहोचा. दुपारी 4 ते 7 या तीन तासांत तुम्हाला गीतापठण करायचे आहे. आम्ही तिथे वेळेत पोहोचलो. तिथेच कोटी गीता लेखन संकल्प. गोपालकृष्णाच्या मूर्ती समोर मांडून ठेवल्या होत्या आणि त्यांची पूजाही केलेली होती. नागपुरातील बर्‍याच जणींनी या गीतालेखनाच्या उपक्रमात सहभाग घेतला होता. माझी मैत्रीण निशा खंडाळकरची वही होती आणि ती आम्ही मंदिरात दिल्यावर त्यांनी आम्हाला एक अर्ज भरायला दिला आणि आमचे गीतापठण पूर्ण करून आलो त्या वेळेला त्या वहीचे पूजन करून प्रमाणपत्रही तयार होते. आम्ही गीतापठणाचा संकल्प सोडला आणि आम्ही दोघेही 4ला काही मिनिटे कमी असताना गीतापठणाला बसलो. समोर खूप मोठी कृष्णाची मूर्ती होती आणि तिथे बसून समोर कृष्ण मंदिर नजरेसमोर ठेवून गीतापठण करायचे होते. एकूण काय, तर दुसर्‍या दिवशी होणार्‍या परीक्षेची रंगीत तालीमच आमची झाली होती. बरोबर 7 वाजता आमचे गीतापठण संपले आणि आम्ही खाली मंदिरात पुन्हा आलो. त्या ठिकाणी प्रसादी घ्यायचे निमंत्रण मिळाले. इडली सांबार याचा प्रसाद आणि वरून गरमागरम कॉफी घेऊन आम्हाला तरतरी आली आणि तिथेच आम्हाला गीतापठण केल्याचा बिल्ला मिळाला. हा बिल्ला साडीला लावला आणि आम्ही कृष्ण मंदिरात गेलो. त्या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी होती की, रांगेत उभे राहून किमान दोन-तीन तासांनंतर आमचे दर्शन होणार होते आणि त्यापूर्वी 9 वाजता मंदिर बंद होणार होते. आम्ही रांगेत उभे असतानाच कुणी तरी आमचा बिल्ला बघितला आणि ते समोर येऊन म्हणाले, “आप इधर क्या कर रही है? आप इधर से आईये,” असं म्हणून त्यांनी आम्हाला रांगेतून बाहेर काढले आणि थेट कृष्णमूर्तीसमोरच नेले. मी तर ‘हे कसे काय कृष्णा?’ असा प्रश्न विचारूनच पुढे दर्शनाला गेली. तेव्हा ‘तू मेरे मार्ग पर पैर रख कर तो देख तेरे सब मार्ग न खोल दू तो कहना’ या भगवान श्रीकृष्णाच्या विलक्षण लीलेचा अगाध अनुभव आम्हाला आला आणि हा अनुभव घेऊनच आम्ही दुसर्‍या दिवशी मार्गाला लागलो. तेथील मनमोहक निसर्गाने आम्ही भारावून गेलो. आताच एवढा कठीण रस्ता आहे; तर शंकराचार्यांच्या वेळी हा रस्ता किती कठीण असेल याची कल्पनाही करवत नाही आणि नुसत्या कल्पनेने आमच्या अंगावर काटा आला. संपूर्ण भारतभ्रमण इतक्या कोवळ्या वयात आणि मनोमन आचार्यांना वंदन केले. जवळजवळ तीन तासांच्या प्रवासानंतर टॅक्सी थांबली.शृंगेरी आले होते. पाय खाली ठेवताना त्या भूमातेला वंदन केले. कदाचित त्यांच्या पायधुुळीतील रजःकण आपल्या मस्तकी लागतील, याच भावनेने हा नमस्कार केला होता. या विचारात गुंतले असतानाच मैत्रिणींनी आवाज दिला. कार्यालयाचे सोपस्कार आटोपले. पुण्याहून आलेल्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या. आम्ही सगळे समोरच्या खोल्यांमध्ये विसावलो होतो. ज्या वेळी कार्यालयात गेलो त्या
 
लेख वाचा...
सद्भावनेचा गीतायज्ञसैनिकहो... तुमच्यासाठी

https://www.evivek.com//Encyc/2023/4/1/Bhagwat-Gita-reading-was-done-by-women-for-the-soldiers.html
 
वेळी सूचना मिळाली- बरोबर 8 वाजता उद्या हजर व्हायचे आहे. त्या दिवशी रात्रीही सुनीताताईंनी आमचा क्लास घेतला आणि सांगितले की, उद्या सकाळी परीक्षेला जाताना साडी नेसून, बांगड्या घालून, कुंकू लावून आणि गजरा घालून अशाच सुवासिनी होऊन परीक्षेला या. शिवाय त्यांनी सकाळी पावणेसात वाजता आम्हाला पुन्हा एकदा बोलावले. मन स्थिर राहावे म्हणून थोडा योगाभ्यास करून घेतला आणि बरोबर 8 वाजता आम्ही मंदिराच्या कार्यालयात पोहोचलो. त्या ठिकाणाहून आम्हाला जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर नेण्यात आले. मात्र या वेळी चप्पलच काय तर मोजेदेखील घालता येत नव्हते. शंकराचार्यांचे शिष्य पुढे होते.तेही शंकराचार्यांच्या पठडीतच होते. त्यामुळे आम्हाला त्यांच्या मागे जवळजवळ धावतच जावे लागले; पण ध्येय होते परमपूजनीय शंकराचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र मिळवायचे आणि बक्षीस घ्यायचे. त्यामुळे दगडगोटे आणि बारीक खडेही दिसत नव्हते. अंतर पार झाले आणि एकदाचे मंदिर परिसरात पोहोचलो. दहा मिनिटांत परीक्षा सुरू झाली. आचार्य आणि आम्ही एकेक भगिनी अशीच ती परीक्षा होती. आचार्यांनी धीरगंभीर स्वरात ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि’ हा श्लोक विचारला आणि मग पुढे तीस मिनिटे माझी परीक्षा सुरू होती. कुठल्याही अध्यायातून कुठल्याही अध्यायात आचार्य घेऊन जात होते आणि त्यांनी सांगितलेल्या श्लोकाचे पुढचे श्लोक मी म्हणत होते. त्यांच्या चेहर्‍यावरील भाव काही कळू नये इतके गंभीर होते. आपण बरोबर म्हणतोय की चूक आहे याचे आकलन त्यांच्या चेहर्‍यावरून होणे शक्यच नव्हते. निर्विकार चेहर्‍याने त्यांनी ही परीक्षा घेतली. त्यातला सहानुभूतीचा भाग एकच की, मला खाली बसता येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी सोबत नेलेला स्टूल मला वापरण्याची अनुमती दिली. त्या ठिकाणी एक बंधन आहे की, शंकराचार्यांच्या आसनापेक्षा उच्च आसनावर आपल्याला बसता येत नाही. त्यामुळे त्या स्टुलावर बसूनच पूर्ण परीक्षा झाली. जवळजवळ तीन तासपर्यंत आमच्या सहाही जणांची परीक्षा झाली.निकाल संध्याकाळी लागणार होता. त्यामुळे त्यांनी रूमवर परत जायला सांगितले. रूमवर परत गेलो त्या वेळी पायातून फक्त रक्त येणेच बाकी राहिले होते. पाय विलक्षण दुखत होते. तेवढ्यात झोपेचे औषध घेतले आणि झोपी गेले. संध्याकाळी बक्षीस घ्यायला जाता येईल अशी शारीरिक स्थिती नव्हती आणि जेवणही राहिले होते; पण झोपेची शरीराला जास्त गरज होती. 5 वाजत होते तरी डोळे उघडत नव्हते. मी बक्षीस घ्यायला जाणार नाही, असे मी स्पष्टपणे सांगितले; पण सुनीताताई पुढे आल्या आणि त्या म्हणाल्या, तुम्ही मोजे घाला. आपण मोजे घालून तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जाऊ. मला चालता येणार नाही, हा युक्तिवाद त्यांच्यापुढे थिटा पडला आणि कसेबसे तयार होऊन मी गोपुरापर्यंत गेले. त्या ठिकाणी भगवंतांनी एक व्हीलचेअर दाखवली आणि त्या व्हीलचेअरवर बसून माझा पुढचा प्रवास झाला. पुन्हा ते एक किलोमीटरचे अंतर या वेळी व्हीलचेअरवर बसून पार झाले. मंदिरात पोहोचल्यावर पूजनीय शंकराचार्यांचे आगमन होईपर्यंत आम्हा सर्वांना गीतापठण करावे लागले. शंकराचार्यांचे आगमन झाले. या शंकराचार्यांचे व्यवहारी नाव विधुशेखर भारती. त्यांच्या अतिप्रसन्न व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारावून गेलो होतो. शंकराचार्यांनी आमच्या वडिलांचे नाव असणारे प्रमाणपत्र म्हणजे माहेरकुळीची ओळख देऊन व विद्यमान नाव सांगणारेही प्रमाणपत्र दिले. ते प्रमाणपत्र विशेष वाटले, कारण कुठल्या गावचे आणि कुठल्या पित्याचे आम्ही आत्मजा आहोत याचाही उल्लेख त्यात होता. सर्व जणी बाहेर आल्यावर आचार्य बाहेर आले आणि त्यांनी सांगितले की, तुम्हा सहा जणींचाही पहिला क्रमांक आला आहे. तुमच्या प्रत्येकीच्या बँक खात्यात पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचे 21 हजार रुपये जमा होतील. परमपूजनीय शंकराचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र घेण्याची अनेक वर्षांपासूनची बाळगलेली मनीषा पूर्ण झाली. एक संकल्प पूर्ण झाला; पण त्याच क्षणी एक नवीन संकल्प जन्म घेता झाला तो म्हणजे नागपुरातून किमान 21 जणांना शृंगेरीला कंठस्थ गीतापठणाला पाठविण्याचा. असा एक वेगळाच संकल्पपूर्ती ते नवा संकल्प असा प्रवास जन्म घेता झाला.