चित्तगाव पर्वतीय क्षेत्र - बौद्धांची ससेहोलपट

विवेक मराठी    11-Dec-2024   
Total Views |

Bangladesh violence 
 
 ब्रिटिशांनी चित्तगावला ’प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले होते. तेथे बौद्ध बहुसंख्य होते. 1963ला पाकिस्तानच्या घटनेत बदल करून चित्तगावचा ’प्रतिबंधित क्षेत्राचा’ दर्जा काढून टाकण्यात आला. बांगलादेशनिर्मितीनंतर चित्तगांवमधील बौद्धांच्या स्थितीत कुठलाही बदल झाला नाही. नुसता एक अत्याचारी जाऊन दुसरा अत्याचारी आला इतकाच काय तो बदल. या वेळी बांगलादेश सैन्य व मुजीब यांच्या अवामी लीगच्या ’रक्षा बाहिनी’ या सशस्त्र दलाने जुम्मा बौद्धांवर अत्याचार सुरू केले.
 
बांगलादेशात अर्धा टक्का असणारे बौद्ध मुख्यत्वे चित्तगाव पर्वतीय क्षेत्रात राहतात. बांगलादेशातील बौद्ध थेरवादी आहेत. चित्तगावमध्ये चकमा, मर्मा, बॉम, चाक, खियांग, खुमी, लुशाई, म्रो, पांखो, तंगचन्या व त्रिपुरा हे 11 वांशिक गट आहेत. हे वांशिक गट ’झूम’ (शेतीत कापणी झाल्यावर जमीन जाळतात) करतात म्हणून त्यांना ’जुम्मा’ हे सामायिक नाव पडले आहे. सात लक्ष जुम्मांमध्ये हिंदू, बौद्ध किंवा ख्रिस्ती आहेत. चकमा व मर्मा हे त्यातील मोठे गट असून दोन्ही गट थेरवादी बौद्ध आहेत. हे वांशिक गट स्वत:ला तेथील मूलनिवासी मानतात.11947च्या 'Indian Independence Act' अनुसार हा प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आला होता. भारताच्या घटना समितीने 'Chittagong Hill Tracts People's Association'ला प्रतिनिधित्व दिले होते. हा भाग भारतात समाविष्ट व्हावा असे ठाम प्रतिपादन स्थानिक नेत्यांनी ’बंगाल सीमा आयोगा’पुढे केले होते व त्यासाठी बौद्धांच्या शिष्टमंडळाने सरदार पटेलांची भेट घेऊन त्यांच्याकडून समर्थनही मिळवले होते, तसेच नेहरूंनीही ’सांस्कृतिक व धार्मिक आधारावर चित्तगाव पर्वतीय क्षेत्राला भारतात समाविष्ट करण्यात यावे’ असे माऊंटबॅटनला सांगितले होते; पण कर्ण़फुली नदी पूर्व बंगालसाठी जलविद्युत ऊर्जेचा एकमेव स्रोत असल्यामुळे व चित्तगाव या नदीला जोडून असल्यामुळे हा सर्व प्रदेश पाकिस्तानला मिळावा, असा युक्तिवाद मुस्लीम लीगच्या नेत्यांनी केला. मुस्लीम लीगच्या नेत्यांची चिकाटी व काँग्रेस नेत्यांची उदासीनता ह्यामुळे स्थानिक नेत्यांचा विरोध असतानाही पंजाब-बंगाल सीमा आयोगाचे अध्यक्ष सर सिरिल रॅडक्लिफ़ यांनी चित्तगाव पाकिस्तानला दिले. खुलनातील 51% हिंदू व चित्तगावमधील 85% बौद्धांसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात यावे, अशी मागणी सरदार पटेल, हिंदू महासभा नेते श्यामाप्रसाद मुखर्जी व इतिहासकार रमेशचंद्र मझुमदार ह्यांनी अनेकदा स्वतंत्रपणे केली होती; पण नेहरूंना अशा कोणत्याही प्रस्तावात स्वारस्य नव्हते. 2 पाकिस्ताननिर्मितीनंतर 1953ला कर्ण़फुली नदीवर कागदनिर्मिती प्रकल्प व कपताई जलविद्युत प्रकल्पाच्या नावाखाली पद्धतशीरपणे मुस्लीम कुटुंबांना चित्तगावमध्ये स्थलांतर करून वसविण्यात आले. दंगे व अल्पसंख्याकांवर हल्ले सुरू झाले व परिणामत: 1961ला 60,000 जुम्मा लोक निर्वासित म्हणून भारत व म्यानमारमध्ये आले. श्रीलंका व इतर काही सरकारांनी पाकिस्तानकडे ह्याचा निषेध नोंदविल्यावर हे हल्ले कमी झाले. 1961च्या ह्या स्थलांतरितातील चकमा बौद्धांना अरुणाचल प्रदेशातील तिरप, लोहित व सुबानसिरी जिल्ह्यांत वसविण्यात आले. नुकतेच भारत सरकारने 1964 पासून भारतात राहणार्‍या चकमा बौद्ध व हाजोंग हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देणार असल्याचे सांगितले.
 
 
कर्ण़फुलीवरील प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले व 640 चौरस किमी सुपीक शेतजमीन पाण्याखाली गेली. ह्यात उपजाऊ जमिनीचा 40% हिस्सा होता. ह्यामुळे एक लक्ष लोक (बहुतांशी चकमा बौद्ध) विस्थापित झाले. यातील 10 हजार निर्वासित म्हणून भारतात आले व अन्य 60 हजार लोकांना सरकारने घोषित केलेली नुकसानभरपाई प्रत्यक्षात मिळालीच नाही. 5.1 कोटी डॉलर्सपैकी प्रत्यक्षात केवळ 2.6 लक्ष डॉलर्सचे वाटप झाले. तसेच ह्या प्रकल्पातून निर्माण केलेली वीज सरकारी कार्यालये, पोलीस ठाणी व सैन्याच्या बराकींना पुरविण्यात आली, 1983 पर्यंत चित्तगावमधील कपताई, रंगमती व चंद्रघोना या तीन गावांनाच ही वीज मिळत असे, त्यामुळे बहुतांश बौद्ध पूर्वीप्रमाणे अंधारातच राहिले.
 
 
ब्रिटिशांनी चित्तगावला ’प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले होते. तेथे बौद्ध बहुसंख्य होते. 1963ला पाकिस्तानच्या घटनेत बदल करून चित्तगावचा ’प्रतिबंधित क्षेत्राचा’ दर्जा काढून टाकण्यात आला. बांगलादेशनिर्मितीनंतर चित्तगांवमधील बौद्धांच्या स्थितीत कुठलाही बदल झाला नाही. नुसता एक अत्याचारी जाऊन दुसरा अत्याचारी आला इतकाच काय तो बदल. या वेळी बांगलादेश सैन्य व मुजीब यांच्या अवामी लीगच्या ’रक्षा बाहिनी’ या सशस्त्र दलाने जुम्मा बौद्धांवर अत्याचार सुरू केले. मुजीब सरकारने 'Chittagong Hill Tracts Development Board' सुरू करून बंगाली मुस्लिमांना चित्तगावमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली मुस्लिमांच्या चित्तगावमधील स्थलांतराला अजून चालना दिली. मुस्लिमांचे चित्तगावमध्ये स्थलांतर व मुस्लिमेतरांचे चित्तगावमधून स्थलांतर ह्यामुळे 15 ऑगस्ट 1947ला केवळ दीड टक्का असलेली मुस्लीम लोकसंख्या (उर्वरित 98.5% मुस्लिमेतरांपैकी 85.5% बौद्ध होते) 1961ला 11.8% व 1981ला 34.5% पर्यंत पोहोचली. आज चित्तगावमध्ये मुस्लीम बहुसंख्य आहेत. 1972ला मानवेंद्र नारायण लार्मा यांच्या नेतृत्वाखाली 18 जुम्मा नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुजीबांची भेट घेऊन चित्तगावला स्वायत्तता द्यावी, पुन्हा ’प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित करावे इ. मागण्या केल्या; पण मुजीबांनी त्या धुडकावून लावल्या व जुम्मा बौद्धांची ’़फुटीर’ म्हणून संभावना केली. 1981ला ’अशांत क्षेत्र कायदा’ करून राष्ट्रविरोधी कारवायांत भाग घेतल्याच्या संशयावरून कोणालाही गोळ्या घालण्याचा अधिकार कनिष्ठ हुद्द्यांवरील सैनिक व पोलिसांना देण्यात आला होता.3
छायाचित्र सौजन्य: कबीर, पृष्ठ 67
1980 ते 1993 दरम्यान बांगलादेशी सैन्य व चित्तगांवमधील मुस्लिमांनी मिळून 11 मोठ्या नरसंहाराच्या घटना घडवून आणल्या. परिणामत: 54 हजार जुम्मा बौद्धांनी भारतात स्थलांतर केले. 1992ला या निर्वासितांनी पुन्हा बांगलादेशात परत येण्यासाठी भारत-बांगलादेशात करार झाला; पण निर्वासित परतले तरी त्यांच्या जमिनी मुस्लिमांनी बळकावलेल्या होत्या. 1980ला स्नेह कुमार चकमा यांच्या नेतृत्वाखालील 'Buddhist Minority Protection Committee'ने चित्तगावच्या इस्लामीकरण व बौद्धांच्या धर्मांतरासाठी बांगलादेश सरकारला जबाबदार धरले होते. 1986ला दिद्दीनला पोलीस ठाण्याच्या अधिकारक्षेत्रातील बोआलखाली गावात ’धलैमा बुद्ध विहार’ नामक अनाथालय व खगराचारीतील दोन अन्य विहार आगीत भस्म झाले. 2005ला न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती, त्यात मंगलकुमार चकमा, मृणाल कांती चकमा, एना ह्यूम व अल्बर्ट मॅन्कीन इ. नेत्यांनी अल्पसंख्याकांची व्यथा मांडली. 17 नोव्हेंबर 1993ला नरनियाचार येथे झालेल्या हत्याकांडात अनेक जुम्मा बौद्धांना ठार मारण्यात आले होते. 21 एप्रिल 2002ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बौद्ध भिक्खू ’ज्योती महास्थविर’ यांची चित्तगावमधील हिंगला या गावी एका बौद्ध अनाथालयात तलवारीने वार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती.4
कल्पना चकमा
12 जून 1996ला मानवाधिकार कार्यकर्ती ’कल्पना चकमा’ हिचे चित्तगावमधील लल्लीघोना जिल्ह्यातील रंगमती गावातील घरातून अपहरण करण्यात आले होते; तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा ठावठिकाणा कोणालाही माहीत नाही. कल्पना ह्या "Hill Women's Federation'च्या महासचिव होत्या. खुषी कबीर यांनी वर्णन केल्याप्रमाणे चित्तगावमध्ये मूलनिवासींवर होणार्‍या सर्व प्रकारच्या छळ, दडपशाही, शोषण, भेदभाव, नागवणूक, बलात्कार, अपहरण व हत्या ह्याविरुद्ध नेहमी प्रखरपणे आवाज उठवणार्‍यांचे ‘कल्पना’ ह्या प्रतीक होत्या. या अपहरणाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व कल्पना यांचे बंधू कालिंदी कुमार चकमा यांच्यानुसार लेफ्टनंट फ़रडोस यांच्यासह जिल्हा संरक्षक पोलीस नुरूल हक व सलाह अहमद यांनी कल्पनाचे अपहरण केले होते. 21 वर्षे झाली तरी अजून ह्या खटल्याचा निकाल लागलेला नाही व आरोपी सापडून शिक्षा झालेली नाही. चित्तगावमधील महिलांवरील हिंसाचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.5
सन हिंदू-बौद्ध टक्केवारी
1951 22.89
1961 19.28
1971 14.30
1981 13.04
1991 11.37
2001 10.03
स्रोत: गोडबोले, पृष्ठ 63-64
 
जिल्हानिहाय बौद्ध लोकसंख्या
 
स्रोत: Census 2011 Bangladesh: The vanishing Hindus!, 4 May 2015, News Bharati English
डिसेंबर 1997 मध्ये मुजीबकन्या शेख हसीना यांच्या अवामी लीग व पर्बतीय छत्रग्राम जन समहती समिती यांच्यात करार होऊन चित्तगावमधील बौद्धांसाठी तरतुदी करून शांतता प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला; पण ह्यातील बहुतांश तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. एप्रिल 1996ला श्रीमती सविताताई आंबेडकरांनी अगरतळा (त्रिपुरा) येथील जुम्मा निर्वासितांच्या छावणीला भेट दिली होती.6 हा अपवाद वगळता भारतातील रोहिंग्या मुसलमानांविषयी पाझर ़फुटणार्‍या तथाकथित सेक्युलर, बुद्धिवादी, मानवतावाद्यांना भारतातील जुम्मा बौद्ध निर्वासितांविषयी जाणून घेऊन त्यांचे दुःख का मांडावेसे वाटले नाही?
 
संदर्भ
 
1. गोडबोले, पृष्ठ 64-65
2. उपरोक्त, पृष्ठ 67-68
3. उपरोक्त, पृष्ठ 66 ते 78
4. उपरोक्त, पृष्ठ 74 ते 78
 
5. Irani, Bilkis. Activists hold memorial, demands exemplary punishment for Kalpana Chakma abductors, 12 June 2017, Dhaka Tribune
6. गोडबोले, पृष्ठ 76-78

अक्षय जोग

सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व क्रांतिकारक ह्या विषयाचे अभ्यासक. www.savarkar.org संकेतस्थळाच्या कार्यात सहभाग. विश्व संवाद केंद्र, पुणे कार्यकारिणी सदस्य.