@प्राची राजे
आजची कुटुंबसंस्था- तिची बलस्थाने आणि त्यातल्या त्रुटी यावर बोट ठेवणार्या आजच्या तरुणाईच्या कथांसाठी ‘सा. विवेक’ने कथा लेखन स्पर्धा आयोजित केली होती. 25 ते 40 वयोगटांतल्या युवावर्गासाठी झालेल्या या स्पर्धेला संख्यात्मक प्रतिसाद उत्तम मिळाला. परीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी आलेल्या कथांमधून दोन कथांची पारितोषिकासाठी निवड केली. त्या कथा या अंकात प्रकाशित करीत आहोत. पारितोषिक विजेत्या दोनही स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील लेखन वाटचालीस शुभेच्छा.
सहा वर्षांपूर्वी हरवलेली आपली लाडकी लेक रेखा हिचा शोध न थकता रमेशराव आणि शीलाताई घेत होत्याच. या सहा वर्षांच्या प्रदीर्घ काळात आपली लेक परत आपल्या घरी येणार ही उमेद त्यांनी सोडली नव्हती. पोलिस ठाण्याला अचानक बोलवून एक गुप्त हाती देऊन आणि लाडक्या पियूला आजी-आजोबांच्या पदरात घालून त्यांच्या जीवनाचा नवीन मार्ग मोकळा करून दिला होता. पियूसाठी त्यांना जगण्याची पुन्हा एकदा इच्छा निर्माण झाली होती. दोघांनी ’आपल्या जगण्याची उमेद’ म्हणजेच पियूला नव्या आशेने मिठी मारली.
नाव काय तुझं बाळा?” शीलाताईंनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या समोर असलेल्या सुमारे चार वर्षांच्या मुलीला विचारले. “माझं नाव पियू आहे, आजी.” लहान मुलीने तिच्या गोड आवाजात निरागसपणे उत्तर दिले. एवढ्यात शीलाताईंचे पती रमेशराव त्या मुलीशी बोलण्यासाठी पुढे सरसावले, “तुला माहीत आहे का आम्ही दोघे कोण आहोत?” त्यांनी त्या छोट्या मुलीला विचारले; तेव्हा पियूने उत्तर दिले, “हो आजोबा, माझी आई मला रोज तुमच्या दोघांबद्दल खूप गोष्टी सांगायची!” पियू पुढे म्हणाली, “तुम्ही दोघे खूप प्रेमळ आहात; तुम्ही दोघं माझ्या आईवर खूप प्रेम करत होता आणि आता तुम्ही दोघे माझ्यावरही खूप प्रेम कराल, असं आईने सांगितले आहे.” शीलाताई भावनावेग असह्य होऊन रडू लागल्या. आपले अश्रू आवरत, रमेशरावांनी हिंमत एकवटून पियूला कळकळीने प्रश्न विचारला, “पण तुझी आई कुठे आहे, बाळा?”
मागच्या सहा वर्षांपासून रमेशराव आणि शीलाताई हे जोडपे त्यांच्या एकुलत्या एक तरुण लेकीच्या बेपत्ता होण्याची तक्रार घेऊन गावातील पोलीस स्टेशनवर सतत फेर्या मारत होते. रमेशराव इनामदार हे गावातील सरकारी शाळेचे एक सन्माननीय शिक्षक होते. गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत, बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी ते नि:शुल्क मार्गदर्शनही करायचे. सर्वांच्या मदतीला धावून जाणार्या इनामदार मास्तरांशी गावकरी खूपच आदराने वागत असत. त्यांच्या पत्नी शीलाताई ह्यासुद्धा गोरगरीब व गरजू महिलांना नेहमीच साहाय्य करत असत. ‘साधारण परिस्थितीतले, पण सन्मानाने जगणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब’ अशीच त्यांची गावामध्ये ओळख होती.
मास्तरांची एकुलती एक कन्या रेखा हीसुद्धा तिच्या गोड स्वभावाने सर्व गावाची आवडती लेक बनली होती. नाकीडोळी रेखीव आणि गालांवरच्या खळ्यांमुळे अधिकच आकर्षक दिसणारी गोरीपान रेखा गावातल्या सर्व कुटुंबांची लाडकी होती. तिच्या गोड हसण्याचे आणि मितभाषी, मर्यादशील स्वभावाचे लोकांना नेहमीच कौतुक वाटायचे. गावातील सर्व महिलांना ’काकू’, ’मावशी’ संबोधत, रेखा जिथे जाईल, तिथे लोकांची मने जिंकून घेत असे. रमेशरावांनाही रेखाने खूप शिकावे, चांगली डिग्री, नोकरी, हे सर्व मिळवूनस्वतःच्या पायावर उभे राहावे, अशीच इच्छा होती.
खाऊनपिऊन सुखी-समाधानी असलेल्या ह्या छोट्याशा, बाळबोध वळणाच्या कुटुंबावर सहा वर्षांपूर्वी अचानक संकटाने घाला घातला. मास्तरांची रेखा संध्याकाळी देवळात जाऊन येण्यासाठी बाहेर पडली, ती रात्रीचा काळोख दाटून आला, तरी घरी परतली नाही. शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी, गावातील प्रत्येक परिचित कुटुंबाकडे चौकशी करून झाली; पण काहीच मागमूस लागला नाही. देवळातील पुजार्याने रेखा देवळात आल्याचे पाहिलेच नव्हते. नक्की काय घडले, हे कळायला मार्गच नव्हता. त्यामुळे सर्व गावकरी ’ईश्वराची अवकृपा’ असे समजून ह्या प्रसंगात मास्तरांना मदत करायला उभे ठाकले. कोणी पोलीस स्टेशनवर धाव घेतली, तर कोणी नदीनाले, विहिरींचाही शोध घेतला. हताश होऊन मास्तरांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. शीलाताईंची रडून रडून अवस्था खराब झाली होती. गावातील डॉक्टरांनी घरी येऊन त्यांना झोपेचे इंजेक्शन दिले; पण रमेशराव मात्र उघड्या डोळ्यांनी आणि घट्ट मनाने सर्व प्रसंगाला सामोरे जात राहिले.
बघता बघता ह्या प्रसंगाला सहा वर्षे उलटून गेली. हळूहळू गावकरी हा प्रसंग इतिहासजमा झाल्याच्या जाणिवेतून त्याला विसरूनही गेले; पण रमेशराव आणि शीलाताई मात्र त्यांच्या काळजाचा तुकडा दुरावल्याची खंत बाळगून ’आला दिवस पुढे ढकलत’ होते. कधी निराश होऊन मरण्याचा विचार करत होते, तर कधी ’रेखा नक्कीच परत येणार’ ह्या आशेवर तिच्या स्वागताची स्वप्ने रंगवत होते. देवळात जायला घरून निघालेली रेखा कधी तरी त्याच देवाच्या कृपेने सापडेल, ह्या आशेवर रोज देवळात प्रदक्षिणा घालत होते आणि सतत पोलीस ठाण्यात जाऊन रेखाच्या केसची काय प्रगती आहे, ह्याची जातीने चौकशी करत होते. सहा वर्षांत तीन पोलीस अधीक्षक बदलले, पण रेखाच्या शोधकार्यात काहीच प्रगती झाली नाही आणि तरीही रमेशराव व शीलाताईंनी आपली लेक परत येण्याची उमेद कधीच सोडली नाही.
सध्या गावातलाच, मास्तरांच्या हाताखालून शिकून मोठा झालेला विद्यार्थी श्रीकांत वैद्य, बदली होऊन वरिष्ठ अधीक्षक म्हणून ह्याच पोलीस ठाण्यात रुजू झाला होता. मास्तरांच्या रेखाला त्याने लहानपणापासून पाहिलेले होते आणि तिच्या बाबतीत असा काही प्रसंग घडल्याचे कळल्यावर तो अस्वस्थ झाला होता. मी स्वतः जातीने ह्या कामात लक्ष घालून रेखाचा शोध घेईन, असे आश्वासन त्याने मास्तरांना दिले होते. ह्या गोष्टीलाही सात-आठ महिने उलटून गेले होते; पण रेखाचा शोध लागण्याचे चिन्ह दिसत नव्हते आणि आज अचानक रमेशरावांना पोलीस स्टेशनवर तातडीने बोलावून घेत, वैद्यसाहेबांनी एका छोट्या मुलीचा त्यांच्याशी परिचय करून दिला.
रेखाचे बालपण साकारणारा गोंडस चेहरा धारण केलेली ही छोटुकली पाहून शीलाताईंच्या मनात वात्सल्य दाटून आले आणि करारी व्यक्तिमत्त्वाच्या रमेशरावांच्या मनालासुद्धा पाझर फुटला. त्यांनी नकळतच पियूला विचारले, “तुझी आई कुठे आहे, बाळा?”
त्यानंतर ह्या प्रकरणाचे प्रभारी पोलीस अधिकारी, श्रीकांत वैद्य हे रमेशराव आणि शीलाताई ह्यांच्याशी अधिकृतरीत्या बोलण्यासाठी पुढे आले आणि म्हणाले, “सर, बाई, आम्हाला माहिती आहे की, मी तुम्हाला जे काही सांगेन, ते सर्वच तुमच्यासाठी आश्चर्यजनक असेल; पण माझ्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सर्वांनाही ह्या मिळालेल्या माहितीवरून तितकाच धक्का बसला आहे. गेल्या सहा वर्षांपासून, तुम्ही रीतसर तक्रार नोंदवल्यानंतर, तुमच्या हरवलेल्या मुलीचा, ’रेखा’चा, शोध घेण्यासाठी आम्ही पोलीस खात्यातील सर्व लोक सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तुमच्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याचे गांभीर्य समजून, आम्ही सर्वांनी रेखाला सर्वत्र शोधली.
“आम्हाला सर्वांनाच ही अपहरणाची घटना असल्याचा संशय होता; त्यामुळेच आम्ही आपले संपूर्ण गाव आणि आजूबाजूचा परिसर शोधून काढला, अनेक छोट्या-छोट्या गुन्हेगारांची चौकशी केली, अनेक रुग्णालये आणि शवागारांची झडती घेतली. मागच्या सहा वर्षांत आम्ही तुमची मुलगी कोणी तरी पळवून नेल्याची प्रत्येक शक्यता तपासली. शिवाय ती कुठे अपघातात सापडली असेल का, ह्याचा कसून शोध घेतला. तुमच्या कोणी हितशत्रूने तिच्याशी काही अतिप्रसंग करून, तिचा जीव तर घेतला नाही ना, ह्याची प्रत्येक शक्यता तपासली. ’तुमची मुलगी सुरक्षित घरी परतणे’ हे आमच्या टीमचे नेहमीच ध्येय होते; म्हणूनच आज सहा वर्षांनंतरही आम्ही ह्या तपास मोहिमेची फाइल बंद करून टाकली नव्हती.
“पण दोन दिवसांपूर्वी आमच्या पोलीस स्टेशनच्या दारात ही छोटी मुलगी पहाटेच्या थंडीत गारठलेली, थंडीने थरथरत बसलेली आम्हाला दिसली. तिने सांगितले की, एका ट्रक ड्रायव्हरने, ज्याला ती ओळखतही नव्हती, अशा व्यक्तीने तिला येथे आणून सोडले. प्राथमिक झडती घेतली असता, मुलीच्या फ्रॉकच्या आतल्या बाजूला एक गुप्त खिसा शिवलेला असून त्यामध्ये लपवलेले हे पत्र आम्हाला सापडले. आम्ही ह्या पत्राच्या हस्ताक्षराची पुष्टी केली आहे; तुमच्या मुलीच्या जुन्या शालेय वह्या-पुस्तकांमधील लेखनाशी ह्याची तुलना करून नीट तपासले आहे; हे पत्र तुमच्या मुलीनेच, रेखानेच लिहिलेले आहे, हे नक्कीच!”
रमेशराव आणि शीलाताई ह्यांनी त्यांची मुलगी रेखा हिचे सुंदर, सुवाच्य हस्ताक्षर बघताक्षणीच ओळखले. त्या पालकांना कोणत्याही प्रकारची पडताळणी करण्याची गरजही नव्हती. पियूच्या चेहर्यातील रेखाचे बालपण त्यांना अंतःकरणापासून साद घालत होते. ते दोघेही उत्सुकतेने आणि अस्वस्थतेने ते पत्र वाचू लागले.
रेखाने लिहिले होते,
प्रिय आई आणि बाबा,
मला माहिती आहे की, तुम्ही दोघेही माझी खुशाली ऐकण्यासाठी अनेक वर्षांपासून वाट पाहात असाल. माझी काळजी करत, कसेबसे दिवस काढत असाल. मला तुमच्या कष्टांची जाणीव आहे. मी तुम्हा दोघांना शेवटचे पाहिले, त्याला आता सहा वर्षे उलटून गेली आहेत. तुम्ही खूप त्रास सोसत मला सर्वत्र शोधत असाल! मला कल्पना आहे की, पोलीसही माझा अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत.
पण आई, बाबा, आज मी तुम्हाला खरी घटना सांगायचे धैर्य एकवटते आहे.
आई, बाबा, तुम्हाला आठवतंय का, सहा वर्षांपूर्वी, माझ्या गायब होण्याच्या एक महिन्यापूर्वी, आपल्या गावात माझी शालेय मैत्रीण शोभा हिच्या मोठ्या बहिणीचे, विभाताईचे, लग्न होते; ज्याला मी सर्व मैत्रिणींबरोबर गेले होते. आम्ही मुलींनी तीन-चार दिवस तिथेच मुक्काम केला होता. तिथे मी गगनला पहिल्यांदा भेटले. नवरदेवाच्या वर्हाडातील हा सर्वात जास्त देखणा, राजबिंडा तरुण मला बघताक्षणीच अतिशय आवडला. नवरदेवाचा मित्र म्हणून तो मांडवात रुबाबात वावरत होता. त्याचे चालणे-बोलणे, इतरांशी थट्टामस्करी करणे, सगळेच इतके आकर्षक होते की, मला त्याची भुरळच पडली. मी राहून राहून त्याच्याकडे चोरटी नजर टाकत होते. तोसुद्धा सतत माझ्या मागेपुढे करत होता. माझेच फोटो काढत होता; माझ्याशी बोलायचे बहाणे शोधत होता. त्याच्याशी एकांतात बोलायला उत्सुक असल्याने मीही त्याला तशी संधी देत गेले, ज्याने आम्हाला दोघांना काही क्षण एकत्र, लोकांच्या नजरांपासून दूर घालवता आले. आम्ही लपूनछपून लग्नघरातील गच्चीवर रोज रात्री भेटलो आणि शांतपणे मनसोक्त बोललो. त्याच तीन-चार दिवसांमध्ये माझ्या मनात त्याच्याबद्दल खर्या प्रेमाच्या भावना उमलल्या. मी हा अनुभव आधी कधीच घेतला नव्हता. तुमच्या शिस्तीत राहिलेली मी, कधी गावातल्या मुलांशीही मोकळेपणाने बोलले नव्हते; पण आज मला जणू आकाशच मोकळं मिळालं होतं.
आम्ही एकत्र खूप सुखद क्षण घालवले, खूप गप्पा मारल्या. लग्नाचे समारंभ सुरू असताना आम्ही कोणालाही, अगदी माझ्या खास मैत्रिणींनाही माझ्या आणि गगनमध्ये निर्माण झालेल्या ह्या नात्याविषयी जाणवू दिले नाही.
लग्न समारंभ उरकून वर्हाडी परतले, तरी पुढचे कित्येक दिवस मी त्याच्याच विचारांनी मंतरलेले होते. महाराष्ट्रीय नसल्याने, हिंदी भाषेत अतिशय गोड बोलून लग्नात आलेल्या सर्वच तरुणींचे लक्ष वेधणारा गगन मला खूपच आवडला होता. गगनलाही त्या सर्व मुलींपेक्षा मी जास्त आवडल्याचा मला अतिशय आनंद होत होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो परत जायच्या आधीच आम्ही दोघांनी एकदुसर्याच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली. गगनने मला सांगितले की, तो मूळचा दिल्लीचा असून एका सुखवस्तू, संपन्न संयुक्त-कुटुंबाचा सर्वात धाकटा लाडका मुलगा आहे. तो भरपूर नोकर-चाकर असलेल्या आलिशान बंगल्यात राहतो, त्याचास्वतःचा व्यवसाय आहे आणि तो लाखोंमध्ये कमावतो. नवरदेव त्याचा जुना मित्र असून तो गगनच्याच कंपनीच्या मुंबई शाखेत काम करतो. मी प्रेमात पूर्णपणे आंधळी झाले होते आणि त्याच्याशीच लग्न करून, त्याच्यासोबत संसार करण्याचा मोह मला आवरत नव्हता. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक मला लग्नाची मागणी घालतोय, ह्या कल्पनेनेच मी मोहरले होते. तुम्ही दोघे मला अशा वयात, शिक्षण अपुरे सोडून लग्न करायला कधीच परवानगी देणार नाही, ह्याची मला पुरेपूर खात्री होती आणि लग्नासाठी दोन-तीन वर्षे थांबून, तुमचे मन वळवण्याइतपत धीर माझ्याजवळ राहिला नव्हता. गगनाला नकार दिला आणि तो परत इथे आलाच नाही तर? माझे काय होईल? इतक्या संपन्न कुटुंबाच्या मुलाला जर दोन-तीन वर्षांमध्ये पैसेवाल्या मुलींची स्थळं आली तर त्याचे आई-वडील माझा विचारही करणार नाहीत. शिवाय तोही माझ्यासारख्या गावातील मध्यमवर्गीय, सामान्य मुलीसाठी थांबेल का? हे सर्व विचार सतत माझ्या मनात येत होते. मी गगनच्या प्रेमात सैरभैर झाले होते आणि आम्ही दोघांनी लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला खात्री होतीच की, तुम्ही माझ्या ह्या निर्णयावरून जरी रागावलात तरी अशा चांगल्या, देखण्या, कमावत्या मुलाला तुम्ही दोघे अखेरीस ’जावई’ म्हणून स्वीकारणारच!
मग काय! मी त्याच्यासोबत घरातून पळून जायचे ठामपणे ठरवले. गगन दोन आठवड्यांनी गावात परत आला, ह्या वेळी मला कायमचा आपल्याबरोबर घेऊन जायला. आम्ही तीन-चार दिवस रोज संध्याकाळी देवळाच्या मागे भेटलो आणि सर्व पुढील बेत आखले. तुम्ही कोणीच माझ्यावर संशय घेऊ नयेत, म्हणून मी माझे काही सामानही बरोबर घेतले नाही. माझे आई-वडील, माझे गाव, सर्व काही मागे टाकून, मी चौथ्या रात्री गगनला रेल्वे स्टेशनवर भेटले आणि त्याने मला दाखवलेल्या, वर्णन केलेल्या, त्या सुंदर चित्रातील स्वप्नवत आयुष्य जगण्यासाठी, त्याच्यासोबत दिल्लीला निघून आले!
पण आई, बाबा, इथे आल्यानंतर, दुर्दैवाने मला त्याचे खरे स्वरूप समजले. गगन आणि त्याचे मोठे कुटुंब येथे वस्तीमधील एका छोट्याशा घरात राहतात. गगनचे आई-वडील, चार मोठे भाऊ, भावजया आणि त्यांची मुले मिळून अठरा माणसांचा हा मोठ्ठाथोरला कुटुंबकबिला आहे. व्यवसाय सोडाच, पण गगनने कोणती नोकरीही कधीच नीट केली नाही, म्हणून त्याचे मोठे भाऊ त्याच्यावर कायमच नाराज असतात. त्याच्या कुटुंबातील प्रत्येक जण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, मजूर म्हणून किंवा घरगुती नोकर म्हणून कुठेना कुठे काम करत आहेत. अशा परिस्थितीत मी त्यांच्या मुलासोबत पळून आलेली त्यांना अजिबात आवडले नाही. घरातून पळून आलेली ’चरित्रहीन’ मुलगी म्हणून माझ्यावर शिक्कामोर्तब झाले.
कुटुंबातील इतर माणसे तर सोडाच, पण गगनसुद्धा माझा रोज अपमान करायचा, मारझोड करायचा. तेव्हा मला कळले की, गगनचा माझ्याशी लग्न करण्याचा कोणताही विचार नव्हता! तो फक्त त्याच्या शारीरिक गरजांसाठी मला त्याच्याजवळ ठेवायला उत्सुक होता. त्याने कधीच माझ्याशी लग्न केलं नाही! अशा परिस्थितीत त्या घरातील माझे स्थान मोलकरणीइतक्याच कमी दर्जाचे ठरले. त्या लोकांच्या घरातली धुणीभांडी, स्वयंपाकघराची कामं, मुले सांभाळण्याची सगळी कामं मीच करायचे. त्यावर, माझ्यावर सर्व प्रकारची बंधनं होतीच. मी काय करावे, काय खावे-प्यावे, कोणाशी बोलावे, घराबाहेर पडू नये, बाहेरच्यांशी अजिबात बोलू नये; ह्या सर्व गोष्टींवर रात्रंदिवस नजर ठेवली जात होती. त्यांच्या मनाविरुद्ध मी काहीही वागले किंवा एक वाक्यही बोलले तर ती लोकं मला मारहाण करायची. आणि सगळ्यात क्लेशदायक म्हणजे गगनकडून माझे रोज होणारे शारीरिक शोषण.
माझ्याकडे आता पूर्वीचे काहीच उरले नव्हते; पैसा नव्हता, स्वातंत्र्य नव्हते, आराम नव्हता! ज्या माणसासोबत मी एका चांगल्या आयुष्याच्या शोधात इथे आले होते, त्याने माझी सगळी स्वप्ने कुस्करून टाकली.
पण दोन वर्षांनी माझ्या दुःखाच्या आयुष्यात एक आनंदाचा किरण आला. ’मी आई होणार आहे’ ह्या गोड बातमीची मला चाहूल लागली. काही महिने घरात आनंदाचे वातावरण होते. नेहमीच फटकून वागणारी गगनची आई थोडी नरमाईने माझी विचारपूस करत होती. मोठ्या जावा छोट्याछोट्या कारणाने घालूनपाडून बोलत नव्हत्या आणि सर्व जण मला बर्यापैकी वागणूक देत होते; पण हा आनंद माझ्या ‘मुली’च्या जन्माच्या दिवशी संपला! त्या सर्वांना माझ्याकडून पुत्रजन्माच्या आशा होत्या, ज्या माझ्या कुशीत झोपलेल्या तान्ह्या पियूला पाहताच भंग पावल्या.
मला आठवतंय, त्या दिवशी गगनच्या आईने माझ्या पोटावर जोरात लाथ मारली आणि गगनला ह्या ‘मुली’ला कचराकुंडीत फेकून दे! असा आदेश दिला होता. मी खूप रडले, गयावया केली आणि माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्याशी लढलेही! ह्यानंतर, मी पुढील दोन वर्षांत आणखी तीन वेळा गर्भवती राहिले, परंतु प्रत्येक वेळी ह्या लोकांनी मला गर्भधारणा होताच, गावठी औषधोपचारांनी माझा गर्भपात केला. विनावेतन मजुरी करणारी एक फुकटची दासी अशी नऊ महिने अंथरुणाला खिळून राहिलेली त्यांना मानवणारे नव्हते. हळूहळू गगनलाही माझी गरज उरली नाही. तो दिवसभर बाहेरच उंडारत राहायचा आणि रात्री दारू पिऊन घरी येऊन ढाराढूर झोपून जायचा. तो पैसे कमावत नाही, ह्याची बोलणीही मलाच खावी लागत होती. मी आणि माझी मुलगी ’पियू’ चार वर्षे अतिशय दयनीय अवस्थेत जगलो. घरात जे काही उरले असेल, तेच लेकीला खायला घालून, मी बर्याच वेळेस अर्धपोटी उपाशी राहून जगायचे.
आई, बाबा, मी तुम्हाला खूप दुःख दिले आहे; तुम्हाला अशी संकटात टाकून मी पळून गेले. तुमच्या प्रेमाच्या व संरक्षणाच्या सावलीत वाढलेली मी, मी हरवल्यावर तुमचे काय होईल, तुम्हाला किती दु:ख होईल, किती यातना होतील, ह्याचा विचारही न करता तुम्हाला सोडून निघून आले. तेव्हा मनावर फक्त गगनच्या प्रेमाची धुंदी चढली होती, त्यापुढे तुमची माया मला दिसलीच नाही. मी कधी विचारच केला नाही, की मी गेल्यावर तुम्ही कसे राहाल, तुम्ही मला कुठे कुठे, कसे शोधाल? देवाने मला त्याच गोष्टीची ही शिक्षा दिली आहे!
तुमच्यासारखे सुसंस्कृत, आदर्श आई-बाबा मला लाभले; पण मी तुमच्या संस्कारांची कदर केली नाही. आपल्या बाळबोध वळणाच्या घरंदाज कुटुंबाचे दाखले गावातले लोक एकमेकांना देत असत; पण मी नेमकी त्याच्या विपरीत वागले. माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे आई-बाबा; पण तेव्हा गगनच्या प्रेमाच्या तुलनेत ते कमजोर ठरलं असावं! रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरच्या देखाव्याची दुनिया मला अधिक आकर्षक वाटली. तुम्हाला सोडून पळून जाताना बंधमुक्त झाल्याचा आनंद अनुभवत होते मी! मला कुठे कल्पना होती की, गगनच्या खोट्या प्रेमाचा हा पिंजरा मला कायमचा कैद करण्यासाठीच उघडला गेलाय? पण आता पश्चात्ताप करण्याचीही वेळ निघून गेली आहे.
आई, बाबा, मला तुमची दोघांचीही खूप आठवण येते. मी रोज पियूला तुमच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते. माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर किती प्रेम केले आणि माझी प्रत्येक गरज कशी पूर्ण केली; आमच्याकडे पैसा कमी असला, तरी आमचं आयुष्य किती आनंदी होतं, हे सगळं सांगून मी पियूला तुमच्याविषयी रोज माहिती देत असते. मी मागे सोडून आलेले सुखाचे आयुष्य माझ्या मुलीला तरी लाभावे, ह्या दु:खाच्या दलदलीतून तिची तरी सुटका व्हावी, एवढाच विचार करून, मी माझ्या मुलीला, पियूला, तुमच्याकडे पाठवत आहे. मला आशा आहे की, तुम्ही मला जेवढ्या प्रेमाने वाढवले, तेवढ्याच प्रेमाने तिलाही वाढवाल! आई-बाबा, माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला आहे; पण तरीही तुमच्या ह्या वेड्या मुलीची चूक माफ करा आणि माझं हे पत्र वाचून माझ्यावर राग न धरता, माझ्या लेकीचा स्वीकार करा. मला क्षमा करा, आई-बाबा, मला क्षमा करा!!
तुमची अपराधी तुमचीच रेखा.
आपल्या मुलीबद्दलचे हे भयानक सत्य ऐकून रमेशराव आणि शीलाताई ह्यांना धक्काच बसला. एवढ्या वर्षांत तिने जे काही सहन केले, त्याचा विचार करून दोघेही जोरजोरात रडू लागले. कसेबसे स्वतःला आवरून, लहान पियूकडे पाहात शीलाताई तिच्याजवळ गेल्या आणि ‘माझं बाळ, माझी नात’ म्हणत तिला मिठी मारली. रमेशराव पियूला कुरवाळत म्हणाले, “अगदी लहानपणीची रेखा दिसतेय; गोबर्या गालाची आणि सुरेख!”
सहा वर्षांपूर्वी रेखाचे नक्की काय झाले, ह्याचा आता ठावठिकाणा लागला होता; पण तरीही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरला होता, तो म्हणजे रेखाच्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश येईल का आणि तिची सोडवणूक करवून तिला सुखरूप घरी परत आणता येईल का? रमेशराव आता भावनिक गुंत्यातून बाहेर पडून थोडे घडलेल्या घडामोडींवर विचार करू लागले. तेथील वरिष्ठ अधिकार्यांकडे त्यांनी ह्यासाठी मदतीची याचना केली.
अधिकारी श्रीकांत वैद्य म्हणाले, “आम्हाला माहीत नाही की, पियूला इथे कोणी सोडले आहे. पियू खूपच लहान आहे. ती शिकलेली नाही; इतकंच काय, ती घराबाहेरही फारशी गेलेली नसावी, कारण तिच्या बोलण्यातून तिच्या दिल्लीतील घराविषयी कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही; पण निराश होऊ नका. आम्ही ताबडतोब दिल्ली पोलिसांची मदत घेऊन तिथे आमची एक टीम तैनात केली आहे. ते गगन आणि त्याच्या कुटुंबाला शोधायचा नक्कीच प्रयत्न करतील आणि तुम्हाला न्याय मिळवून देतील. शिवाय सहा वर्षांपूर्वी विभाच्या लग्नाला वर्हाडीत आलेल्या लोकांची, तिच्या नवर्याचीही विचारपूस आम्ही सुरू केली आहे. तुम्ही सकारात्मक राहा.
“पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला कळली आहे आणि ती आम्ही तुमच्यापासून लपवू शकणार नाही. तुमच्या मुलीच्या, रेखाच्या पत्राचं हे शेवटचं पान बघा,” असे म्हणत वैद्यसाहेबांनी आणखी एक कागद रमेशरावांच्या हातात दिला. रमेशरावांनी अधीर होऊन तो कागद उघडला. रेखाने तिथे लडखडत्या हाताने, थरथरत लिहिलेल्या अक्षरांत काही तरी खरडले होते-
आई, मी तुला हे सत्य कधीच सांगणार नाही, असे वाटले होते; पण आता हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवणे, म्हणजे तुला आणखी फसवण्यासारखे आहे. तू सहा वर्षांपासून माझ्या घरी परतण्याची वाट पाहात आशा लावून बसली आहेस; पण तरीही मी तुला निराश करणारी ही बातमी सांगते आहे. माझ्या सततच्या गर्भपातांच्या कारणाने आणि माझ्या गर्भाशयात सतत मारहाण झालेली असल्याने, मला गर्भाशयाच्या काही गंभीर आजाराने ग्रासले आहे. मी अवघ्या काही दिवसांत मरणार आहे, असे निदान इथल्या सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले आहे. माझ्यावर उपचार करायला गगन आणि त्याचे कुटुंबीय आर्थिकरीत्या असमर्थ आहेत आणि तशी त्यांची इच्छाही नाही; पण माझी शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते लोक एकाच अटीवर तयार झाले आहेत. ’पियूला माझ्या आई-वडिलांकडे सुखरूप परत पोहोचवावे’ हीच माझी अंतिम इच्छा होती. ह्या लोकांनी माझ्या मृत्यूनंतरच हे काम करायला मान्यता दिलेली आहे. असेही त्या लोकांना पियूला घरात ठेवायचेच नाही. मी मेल्यावर ती कोठे तरी रस्त्यावर पडून राहू नये, म्हणून मी त्यांना पियूला तुमच्या पत्त्यावर पाठवण्याची खूप विनवणी केली आहे. त्यामुळे माझी पियू आणि मी लिहिलेले हे गुप्त पत्र जर तुम्हाला पियूच्या खिशात सापडले, तर समजा, की तुमची मुलगी रेखा आता ह्या जगात नाही!
आई, माझ्या मुलीची काळजी घे.
तुम्हा दोघांना माझा शेवटचा साष्टांग नमस्कार!
तुमच्यापासून खूप दूर गेलेली, रेखा.
रमेशराव आणि शीलाताई स्तब्ध झाले. त्यांचा सहा वर्षांपासून चालत असलेला शोध आणि मुलगी घरी परतण्याची त्यांची आशा आज कायमची धुळीला मिळाली होती. वैद्यसाहेबांनी त्यांना बसवून पाणी दिले. वैद्यसाहेब आणि तेथील सर्वच अधिकारी गहिवरून गेले होते. वृद्ध इनामदार जोडप्याला रडताना पाहून पोलिसांच्या पोशाखातही त्यांच्यामधली माणुसकीची भावना उचंबळून आली होती. दाटलेल्या कंठाने वैद्यसाहेबांनी स्वतःच ’गगन आणि त्याच्या कुटुंबाला’ शोधून शिक्षा करण्याचे आश्वासन दिले; पण आता म्हातारे झालेले, थकलेले रमेशराव आणि शीलाताई हिंमत हारले होते. हा खटला पुढे चालू ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे नव्हती.
त्यांचा त्यांची लाडकी, एकुलती एक लेक ‘रेखा’चा शोध संपला होता; आता त्यांना दुसरं काही नको होतं.
पण देवाने रेखाऐवजी तिची प्रतिकृती असलेल्या पियूचा हात त्यांच्या रिकाम्या हातात दिला होता. कोणा एका अनोळखी माणसाने त्यांच्या पियूला त्यांच्यापर्यंत सुखरूप आणून पोहोचवले होते. खरं तर पियूबरोबर काहीही घडू शकले असते, अगदी काहीही! पण परमेश्वर त्यांचा पाठीराखा होता. त्यानेच पियूला आजी-आजोबांच्या पदरात घालून त्यांच्या जीवनाचा नवीन मार्ग मोकळा करून दिला होता. पियूसाठी त्यांना जगण्याची पुन्हा एकदा इच्छा निर्माण झाली होती. दोघांनी ’आपल्या जगण्याची उमेद’ म्हणजेच पियूला नव्या आशेने मिठी मारली.
काही कागदपत्रांवर रमेशरावांच्या सह्या घेऊन वैद्यसाहेबांनी सोळा वर्षीय बेपत्ता मुलगी ‘रेखा इनामदार’ हिची केस फाइल बंद केली. आजही ते वैयक्तिकरीत्या दिल्लीत गगनचा शोध घेत आहेत. एक ना एक दिवस, रेखाच्या गुन्हेगारांना शोधून काढून त्यांच्या दुष्कर्माची शिक्षा देईनच, हा निश्चय वैद्यसाहेबांच्या मनात कायम आहे.
पण, छोट्या पियूला गावात वाढताना, आपल्या प्रेमळ आजी-आजोबांच्या सावलीत हसताना-खेळताना पाहून त्यांनाही खूप दिलासा मिळतो.