आजची कुटुंबसंस्था- तिची बलस्थाने आणि त्यातल्या त्रुटी यावर बोट ठेवणार्या आजच्या तरुणाईच्या कथांसाठी ‘सा. विवेक’ने कथा लेखन स्पर्धा आयोजित केली होती. 25 ते 40 वयोगटांतल्या युवावर्गासाठी झालेल्या या स्पर्धेला संख्यात्मक प्रतिसाद उत्तम मिळाला. परीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी आलेल्या कथांमधून दोन कथांची पारितोषिकासाठी निवड केली. त्या कथा या अंकात प्रकाशित करीत आहोत. पारितोषिक विजेत्या दोनही स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील लेखन वाटचालीस शुभेच्छा.
आपण आयुष्याची दुसरी इनिंग खेळताना खूप घाबरतो. आपण जास्त वेळ आयुष्याच्या खेळपट्टीवर उभे राहण्याचा प्रयत्न करतो. दुसरी इनिंग बिनधास्त खेळता आली पाहिजे, कारण इथे टेन्शनचे स्विंग नसते, ना जबाबदारीची स्पिन. फक्त आनंदाच्या धावा जमा करायच्या.
साईनाथ सुरेश टांककर
9004998898
ली का तुझी पॅकिंग?” मी रोहनला विचारले.
“हो, पूर्ण झाली आहे. बाकीचे मी तिथेच घेईन.”
“मस्त. आता काहीच टेन्शन नाही.”
“पण बाबा, एक टेन्शन आहेच.”
“कुठलं?”
“मी ऑस्ट्रेलियाला जातोय हे आईला आवडलेले दिसत नाही. बघा ना, आतासुद्धा आपल्यासोबत इथे नाहीये. एकटीच
बेडरूममध्ये बसली आहे.”
“अरे, आईचे मन आहे. तिच्यासाठी मुलगा कितीही मोठा झाला तरी तिच्या नजरेत तो लहानच असतो. त्यामुळे तू तिच्यापासून दूर जात आहेस हे मनाला पटवायला वेळ लागेल; पण तू काळजी करू नकोस. मी आहे ना इथे. तू निर्धास्त जा. तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. आईचे काय ते मी बघतो.”
रोहनने चक्क मला मिठी मारली. मिठी घट्ट करत म्हणाला, “बाबा, तुम्ही सॉलिड आहात. एकदम समजूतदार आणि मॅच्युअर. माझ्या मनातल्या इच्छा तुम्हाला न सांगताच समजतात. आज हे एवढे मोठे धाडस मी तुमच्यामुळे करू शकलो. बाबा, मी तिथे सेटल झालो, की तुम्हा दोघांनाही बोलावून घेईन. आपण सर्व जण तिथे मस्त सोबत राहू.” मी त्याला अलगद आलिंगनातून दूर केले. मला आठवत नव्हते की, गेल्या काही वर्षांत आम्ही अशी मिठी कधी मारली होती.
“पुढचं पुढे बघू रे.” मी डोळ्यांतील अश्रूंची कड त्याच्या नकळत पुसली. “एक गोष्ट मात्र आठवणीने कर. तुझ्या शिक्षणासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भर. विसरू नकोस.”
“काही काळजी करू नका बाबा. दर महिन्याच्या 5 तारखेला बँक खात्यात पैसे जमा होतील.” एवढे बोलून रोहनने माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला धीर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता; पण मला काहीच वाटत नव्हते. काळाची गरज आहे. मी नाही का माझ्या आई-बाबांना गावाकडे ठेवून मुंबईत आलो होतो. माझा मुलगाही तेच करतोय आणि त्यात काहीच गैर नाही. माझे आई-बाबा माझ्यासोबत नंतर मुंबईत आले. आता आम्ही ऑस्ट्रेलियात जायचे की नाही हे नंतर ठरवू.
रोहनचा फोन वाजला. तो फोन घेऊन त्याच्या रूममध्ये गेला. मी त्याला पाठमोरा जाताना पाहिले. त्याने बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. आता तो त्या दरवाजाच्या पलीकडे त्याच्या जगात होता. मी आमच्या बेडरूममध्ये आलो. निशा माझ्यावर रुसून बेडवर बसली होती. तिची अशी अपेक्षा होती की, मी रोहनला जाण्यापासून परावृत्त केले पाहिजे. मी त्याला प्रोत्साहन दिले याचे तिला दु:ख होते. आपला मुलगा आपल्यापासून दुरावला जातो आहे, ही भावना तिच्या मनात घर करत होती.
“निशा, रात्री लवकर जेवून घेऊ. आपल्याला लवकर निघावे लागणार. त्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये चेकिंगला जास्त वेळ लागतो. रात्री 11पर्यंत एअरपोर्टला पोहोचावे लागेल. मी साडेनऊला ओला मागवतो. उगाच उशीर व्हायला नको.” मी निशाला एवढे सगळे सांगितले; पण निशाचे काही लक्ष नव्हते.
“काय गं? कुठे लक्ष आहे?”
“ऐकते आहे मी.”
“तू रुसून का बसली आहेस?”
“माझा मुलगा मला सोडून एवढ्या लांब जातो आहे. मी आनंद साजरा करू?”
“कर ना. त्याच्या कर्तृत्वाने त्याला ही संधी मिळाली आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.”
“तुम्ही त्याला थांबवा ना.”
“कशासाठी? घेऊ दे ना त्याला अवकाशात झेप. चांगली संधी मिळाली आहे तर गवसू दे आकाश.”
“आपल्या देशात काही कमी संधी आहेत का?”
“निशा, तू असे बोलतेस? भारत आपला देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे; पण तू मनापासून सांग, आपल्या देशात खरंच त्याला योग्य संधी मिळेल? इथे किती अडथळे आहेत; आरक्षण, राजकारण, चापलुसी, भ्रष्टाचार. निशा, आपल्याला मान्य करायला हवे की, आपण स्वप्नातला भारत आपल्या नव्या पिढीला नाही देऊ शकलो.”
“प्रदीप, तुला माहीत आहे ना परदेशात गेल्यावर माणसं दुरावतात. तो प्रमिलाचा सतीश बघ. पूर्वी दरवर्षी यायचा. आता दोन वर्षांनी येतो. त्याचे बाबा वारले तेव्हा शेजार्यांनी त्यांना अग्नी दिला. काय उपयोग मुलगा असून जो शेवटच्या घटकेला दोन घोट पाणीसुद्धा पाजू शकत नसेल?”
या बायका कधीकधी किती मेलोड्रामा करतात. आता जाणीवपूर्वक करतात की त्यांच्या रक्तात असतो हे समजणे कठीण आहे; पण समोरच्याला त्यांचा मुद्दा पटवून देण्यात तरबेज असतात. आता समजा, मी ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात मेलो तर कुठे मला शेवटचे पाणी मिळणार. माझे अंतिम संस्कारसुद्धा होऊ शकणार नाही. आता ही गोष्ट तिला पटवून सांगणे गरजेचे आहे.
“निशा, हे बघ, रोहन आता मोठा झालाय, समजूतदार आहे. उगाच त्याच्या स्वप्नांना डगमगीत करू नकोस. तू नाण्याची दुसरी चांगली बाजू बघ.”
“मुलगा आईपासून दूर जातो याला दुसरी चांगलीबाजू काय असणार?”
हे सगळे टी.व्ही.चे दुष्परिणाम. या रटाळ मालिका या बायका बघतात आणि मग त्या मालिकेतल्या बायकांसारखे बोलतात. तिथे मालिकेत त्या बायकांचे नवरे हे सगळे सहन करतात, कारण त्यांना त्याचे पैसे मिळतात. इथे डोकेदुखीचा बामसुद्धा आपल्यालाच विकत घ्यावा लागतो.
“निशा, रोहन ऑस्ट्रेलियाला जातो याच्या अनेक चांगल्या बाजू आहेत आणि तू माझी साथ दे. मग बघ, आयुष्य कसे बदलून जाते.”
“आयुष्य बदललेच आहे; पण...” आणि ती हुंदके देऊन रडायला लागली.
मी आकाशातील चंद्र दाखवतो आहे आणि ही माझ्या बोटावरची नखे बघत होती. निशा माझ्या सहनशक्तीचा अंत पाहत होती. मुलगा परदेशात नोकरी करायला जातो आहे. चांगली लाइफस्टाइल जगायला मिळेल. त्याला हवे ते सर्व काही घेऊ शकतो. किती छान गोष्ट आहे. मी तर ड्युटी फ्रीच्या दारूची स्वप्ने पाहू लागलो होतो.
“निशा, आता शेवटचे सांगतो ते नीट ऐक आणि समजून घे. आपला मुलगा परदेशात नोकरी करायला जातो आहे. ह्या शुभकार्यात आपण त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला पाहिजे. मी ते करणार. तुझा निर्णय तू घे; पण एक लक्षात ठेव, जर हा रडवा चेहरा घेऊन त्याच्या समोर गेलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. त्याच्या जाण्याने आपल्याला आनंद झाला आहे हेच त्याला वाटले पाहिजे. स्वप्नांची उंची गाठताना हे भावनिक पाश मला नको. यातच त्याचे भले आहे आणि त्याच्या सुखात आपला आनंद. एअरपोर्टवरसुद्धा रडारड, भावनिक वाक्य बोलून त्याला गहिवरू द्यायचे नाही. तो जाईल तेव्हा त्याला छान घट्ट मिठी मारायची जी त्याला ऑस्ट्रेलियात आधार देईल.” मी तिला ठणकावून सांगितले.
निशा जागेवरून उठली. तडक माझ्या नजरेसमोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यांत मला एक आग जाणवली. सीरियलमध्ये अन्याय झाल्यावर पेटून उठतात त्या बायकांसारखी.
“आईचे मन तुला कळणार नाही. बापाचे काळीज दगडाचे असते.” एवढं बोलून ती परत बेडवर जाऊन बसली. हे म्हणजे फूलनदेवीच्या वेशात येऊन अलका कुबलचा डायलॉग बोलणे. मला काय बोलावे हेच सुचत नव्हते.
“मला तुमचे खेळ समजत नाही असे वाटले तुम्हाला. तुम्ही रोहनला प्रोत्साहन देता. त्याला काय वाटणार- बघा, आपले बाबा किती चांगले आहेत, मला साथ देतात. माझी आई मी जाऊ नये म्हणून मला इमोशनल ब्लॅकमेल करते. म्हणजे बाबा हिरो आणि आई व्हिलन. काय मिळते तुम्हाला आई आणि मुलामध्ये दुरावा निर्माण करून?”
हा त्या सीरियलचा परिणाम होता. बाप होणे ही जगातली सर्वात कठीण गोष्ट असते. मुलगा, भाऊ, मित्र होणे सोपे असते, कारण तुमच्यावरच्या अपेक्षा मर्यादित असतात; पण बाप झाल्यावर त्या अपेक्षांना मर्यादा उरत नाही. तुम्हाला डगमगून चालत नाही, भावुक होऊन चालत नाही. थकून तर मुळीच चालत नाही. इथे बापाचे कौतुकही होणार नाही, कारण बाप काहीच वेगळं करत नाही, ते तर त्याचे कर्तव्य असते.
“निशा, मी तुझ्यात आणि रोहनमध्ये दुरावा निर्माण करत नाही. उलट काळानुसार आपल्यात आलेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करतोय.” माझ्या या वाक्यावर निशाने माझ्याकडे पाहिले. तिच्या चेहर्यावरचे भाव बदलले. जणू तिला माझ्या वाक्याच्या मागचा अर्थ समजून घ्यायचा आहे.
“ते कसे?” माझा अंदाज बरोबर होता. चला, गेल्या 26 वर्षांत मी माझ्या बायकोला बर्यापैकी ओळखू लागलो होतो.
“निशा, गेली कित्येक वर्षे आपण आयुष्यातील क्षण रोहनच्या संगोपनात घालवले. त्याच्या परीक्षांचे टेन्शन घेतले. त्याच्या शिक्षणासाठी पैसा पुरवला. त्यासाठी धावपळ केली. नोकरी करताना मी तुला हवा तितका वेळ देऊ शकलो नाही. त्यात आईच्या आजारपणात दोन वर्षे गेली. या सर्वांमध्ये फक्त आपण दोघेच असे कुठे होतो?”
“मग त्याचा रोहनच्या ऑस्ट्रेलियात जाण्याशी काय संबंध?”
“संबंध आहे. अगं, तो इथे नसला की आपण आपला सगळा वेळ एकमेकांना देऊ शकतो. मधल्या काळात आपल्या नात्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला, तो दूर करू शकतो. पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडू शकतो.”
“पण तुझा जॉब?”
“मी राजीनामा द्यायचे ठरवले आहे.”
“काय?”
“अगं, रिटायरमेंटनंतरची सगळी सोय करून ठेवली आहे. अजून पाच वर्षे नोकरी केली तर असलेली ऊर्जासुद्धा निघून जाईल.”
“पण नोकरी सोडल्यावर करणार काय?”
“करण्यासारखे भरपूर काही आहे जे गेल्या 20-22 वर्षांत सुटले आहे. वाचन, सिनेमा, नाटक आणि मनसोक्त तुझ्यासोबत फिरणे. नवीन-नवीन प्रदेश बघू. परदेशवारी करू. वेगवेगळे पदार्थ खाऊ. आपल्या आयुष्याची ही दुसरी इनिंग छान खेळू.”
मी दाखवलेले स्वप्न पाहत निशा खिडकीकडे गेली. मी तिच्या मागून खिडकीपाशी गेलो. खाली लहान मुले खेळताना दिसत होती.
वेळ कसा निघून गेला हेच कळले नाही. आपला रोहन किती मोठा झाला...
“आणि आपण म्हातारे.” मी मध्येच म्हणालो. माझ्या वाक्यावर निशाने मागे वळून माझ्याकडे पाहिले.
“नाही रे. अजून तुझ्याकडे बघून वाटत नाही.” माझे केस मागे करत निशा म्हणाली.
“हो, मी संतूर साबणाने आंघोळ करतो ना.” माझ्या या वाक्यावर निशा खुदकन हसली. निशाच्या गालावर खळी पडली. कित्येक वर्षांनी मी ती पुन्हा निरखून पाहिली.
“एक गोष्टीचे उत्तर मनापासून देशील?” निशा माझ्या चेहर्यावरची नजर न काढताच म्हणाली.
“विचार ना.”
“रोहन जातोय याचे तुला अजिबात वाईट वाटत नाही का?”
“नाही. कारण तो त्याच्या स्वप्नांना गवसणी घालतोय.”
“तरीपण...”
“निशा, जेव्हा मी तुझ्याशी लग्न केले तेव्हा आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन आपण घेतले. बरोबर?”
“हो.”
“असे कुठलेही वचन आपल्याला रोहनने जन्म झाल्यावर दिले का?”
“नाही.”
“मग निशा, रोहन आपल्यासोबत राहिला पाहिजे, हा अट्टहास का? तो त्याचे जीवन त्याला हवे तसे जगेल. आपण का त्याला आपल्या पद्धतीने जगायला भाग पडायचे? त्याच्या निर्णयात त्याला ठेच लागली तरी चालेल; पण आपण लादलेल्या निर्णयामुळे त्याला ठेच लागली तर मला ते कधीच आवडणार नाही.”
निशा माझ्याकडे पाहू लागली. तिचे डोळे वाचण्याचा मी प्रयत्न करत होतो; पण त्यात थोडे पाणी होते. तिने चक्क मला मिठी मारली. कधीकधी भावना व्यक्त करायला शब्द नाही स्पर्श लागतात.
“थँक्स.”
“कशाबद्दल?” मी निरागसपणे विचारले.
“असेच.”
“निशा, रोहन ऑस्ट्रेलियाला गेला नाही, घरीच आहे. मिठी सोड आता. हे उद्यापासून.”
“असू दे. ऑस्ट्रेलियात आई-बाबा मुलांसमोर मिठी मारतात.” तिच्या या वाक्यावर आम्ही दोघेही हसू लागलो.
आपण आयुष्याची दुसरी इनिंग खेळताना खूप घाबरतो. आपण जास्त वेळ आयुष्याच्या खेळपट्टीवर उभे राहण्याचा प्रयत्न करतो. दुसरी इनिंग बिनधास्त खेळता आली पाहिजे, कारण इथे टेन्शनचे स्विंग नसते, ना जबाबदारीची स्पिन. फक्त आनंदाच्या धावा जमा करायच्या. दुसर्या इनिंगमध्ये मोठी पार्टनरशिप करायला आम्ही तयार झालो.