प्रकाशाचे कवडसे

विवेक मराठी    09-Nov-2024
Total Views |
@स्नेहा शिनखेडे
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं. 
vivek 
गदी कोरं कोरं मन घेऊन जगता येतं का माणसाला? रिक्तपणे जगणारे उंचच उंच शिडीच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचत असावेत बहुतेक. जुन्या-नव्या आठवणींनी मन तुडुंब भरलेलं असतं माणसाचं. रस्त्यावरून जाताना गंधाची झुळूक आली की मन कुठल्या कुठे घेऊन जातं. एखादे स्थळ, व्यक्ती, वस्तू, शब्द, नावं काहीही कानावर पडो वा दृष्टीस पडो, संदर्भ मनात विलंब न लावता प्रकट होतात. नंतर सुरू होतात आठवणींचे फेर. तो गोफ विणतानाच आयुष्य सरतं. हा खेळ माणसाला आवडतो. त्यात तो रमतो.
काळाची उजळणी करण्यासाठी इयत्ता दहावीची तुकडी खूप वर्षांनी आपल्या गावी एकत्र जमणार होती. सुजय नावाचा मित्र त्याच गावात स्थायिक झाला होता. नामांकित डॉक्टर म्हणून त्याची ख्याती होती. सहा-सात जणींनी ठरवलं. सुजयच्या घरीच उतरायचं, धमाल करायची, जुने दिवस पुन्हा जगायचे. त्यांनी सुजयला फोन केला, “अरे, आम्ही येतोय तुझ्या घरी मुक्कामाला.” ओसंडून वाहणारा आनंद न लपवता सुजय म्हणाला, “जरूर या. मी बाहेरगावी आहे; पण पोचतोय सकाळी. तुमच्यासाठी घराची किल्ली ठेवतो. सगळी सोय करतो.” ठरल्याप्रमाणे मैत्रिणी पोहोचल्या. सुजयला कळवलं. मग काय? वाटेत असलेल्या सुजयला धीर धरवेना. तो बायकोला म्हणाला, “अगं, किती उशीर होतोय आपल्याला. सगळ्या मुली घरी माझी वाट बघताहेत.” बायको चक्रावली. “मुली?” “अरे सुजय, त्या पंचाहत्तरी ओलांडलेल्या आज्ज्या आहेत. तूसुद्धा आजोबा आहेस. विसरलास का?” सुजयच्या मनात काळ थांबलेला होता. दहावीतला नुकतीच मिसरूड फुटलेला मुलगा त्याच्या उतरत्या देहात प्रकटला होता. इतर सारी दारं बंद करून मन पार भूतकाळात पोहोचलं होतं. काळ जगणं कुठे वाईट आहे? अळवावरच्या पाण्यासारखं असतं माणसाचं आयुष्य. कधीही नकळत निसटून जाणारं. तेच सुगंधी होतं ते क्षण क्षण शिक्षण देणारे कण जपून ठेवल्याने. घडून गेलेली प्रत्येक गोष्ट जगण्यासाठी प्रकाशाची पाऊलवाट निर्माण करत असते. अंधारात उजेडाला कंदील घेऊन उभी असते. आयुष्यात येणार्‍या अपरिहार्य उन्हाळ्यात वाळ्याची थंड, गंधभारित झुळूक यावी तसेच असतात काही क्षण आणि कण.
 
 
दरवर्षी गुरुपौर्णिमा आली की सरांची आठवण येते. त्या दिवशी त्यांचा तिथीने वाढदिवस असायचा. गुलाबाची टपोरी फुलं हातात सांभाळून नेत आम्ही मैत्रिणी भीतभीत जायचो त्यांच्या घरी. घर सजलेलं, उत्साही असायचं. वर्गात शिकवणारे सर त्या वेळी लुप्त व्हायचे. एरव्हीचा रुबाब नसायचा. सर विचारायचे, ”काय चाललंय वाचन?” आम्ही गप्प. ते म्हणायचे, “वाङ्मयाच्या विद्यार्थिनी तुम्ही. यादी सांगायची सोडून गप्प बसलात. हीच योग्य वेळ आहे पुस्तकं ग्रहण करण्याची. पुढे प्रपंचात रमाल आणि खंत करत बसाल. खूप वाचा, नोंदी करा. ते बियाणं म्हणजे शिदोरी असेल. कुठे, कधी, कसं उगवून येईल कुणी सांगावं?” तेव्हा ते सरांचे बोल कितपत कळले कुणास ठाऊक. पुढे मात्र वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मेंदूत टाकून दिलेल्या विचारांच्या बिया तरारून फुलून आल्या आणि अकस्मात बसलेले धक्के पचवता आले. एम.ए. मराठीच्या वर्गात ते पहिल्यांदा आले तो क्षण पक्का स्मरणात आहे. फुलाफुलांचा शर्ट घालून हसत हसत ते आत आले, स्थिरावले अन् थेट संवाद सुरू झाला. पहिली भेट सहसा कुणी विसरत नाही हे ते जाणून होते. शिक्षक म्हणून ओळख ठसवताना त्यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या आत्मचरित्रातलं पहिलंच वाक्य ‘अमुक एक घटना माझ्या आयुष्यात कधीच घडणार नाही असे राव काय रंक काय कुणीच म्हणू नये’ हे ठळकपणे रुजवलं. नियतीचा खेळ अज्ञात असतो. सरांच्या आयुष्यात अघटित घटना घडल्या. त्यातून सावरून ते उभे राहिले आणि जगण्याचा वस्तुपाठ घालून दिला.
स्वार्थ कमी करीत दुसर्‍याच्या मनातलं सुख-दुःख जाणून घेत संवेदना जपणं म्हणजे अध्यात्म, ही सरांनी केलेली व्याख्या खरी आहे. मनाच्या कुपीत अत्तराचा सुगंधी झरा झुळझुळत असेल तर बाहेरील आगीचं भय वाटत नाही. त्यामुळे वयाने टप्पे ओलांडले तरी स्वप्नाळू, भावुक होऊन आनंदी जगता येतं. स्वतःशी प्रसन्नतेने, आनंदाने वागता आलं पाहिजे. आपण जसं असावं असं आपल्याला वाटतं तसं आपण आहोत का? नसू तर आपल्या अपेक्षा किंवा आपलं वागणं चुकत असणार हे उघड आहे; परंतु हे आपणस्वतःशी कबूल करतो का? आयुष्यात खरेखुरे, स्वार्थनिरपेक्ष, उत्कट, उन्नत आणि तरल भावसंबंध स्वतःशी आणि इतरांशी जोडत राहा - ते शॉक अ‍ॅब्सॉर्बरचं कामही करत असतात. ‘माणूस’ नावाचं कोडं आयुष्यभर सुटत नाही.
 
 
प्रेमाच्या समृद्धीलाही टॅक्स द्यावा लागतो. माणसांची संपत्ती जमवली की त्याचा कर भरायचा, अभिमान बाळगायचा आणि आनंदी, हसरं आयुष्य जगायचं. हे सरांनी दिलेलं शिक्षण विसर पडावा असं नाहीच. पद्मा गोळे यांची कविता ‘आठवणी’ आठवते. ‘मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसतमुखानं त्यांना ‘या’ म्हणावं; उंची, मखमली, आसनं देऊन प्रेमानं ‘बसा’ म्हणावं. वाट निर्माण करणार्‍या आठवणी दारं उघडतात.’
 
 
जून-जुलै महिन्यांत भुरभुर गंधओला पाऊस पडायला लागला, की कधीही न आवडलेली शाळा आठवते. एक प्रकारचा विषाद मनात दाटून येतो. त्या आठवणी झटकून टाकताना मनात उभी राहते ती बेबीआत्या. तिची सय मनावर अंकुर उमलवणारं सिंचन करते. चाफेकळी नाक, नाजूक बांधा, दिसायला देखणी असलेल्या बेबीआत्याचं पदर खोचून धावपळ करणारं रूप आठवतं. तिची स्वयंपाकघरातली लगबग आठवते. घरात माणसांचा राबता रोजच. त्यात ती आमच्या शाळेजवळ राहत असल्यामुळे दुपारच्या मधल्या सुट्टीत आम्हीही जेवायला जायचो. रोज ती किती माणसांचा स्वयंपाक करायची कोण जाणे. तिचं आयुष्य हे कष्टदायी चढावासारखं होतं. मागे निघून गेलेले दिवस जगणं कशाला? असं वाटणारे होते. पुढे चांगली स्वप्नं बघावी या पठडीतलं तिचं व्यक्तिमत्त्व नव्हतं. तरीही ती हसतमुख होती. अजूनही आठवतो तो तिने भिजवलेला परातीतला मोठ्ठा कणकेचा गोळा, खमंग वासाचं फोडणीचं वरण, वेगवेगळ्या भाज्या, कोशिंबीर. रोज तेच ते सतत काम करणार्‍या बेबीआत्याला स्वयंपाकाचा कंटाळा नव्हता आणि तोच मनात पक्का रुजला. कधी, कसा ठाऊक नाही, पण संसारात तिच्याही नकळत तिने दिलेला वसा प्रत्येक क्षणी आनंद देऊन गेला. स्वयंपाक करणं म्हणजे नवं, सर्जनात्मक काम आहे, ती देवाची आराधना हे तिच्या स्वयंपाकघरातल्या नुसत्या अस्तित्वानं मनात ठसलं. एवढा मोठा स्वयंपाक करून ती तिच्या दोन-तीन तास चालणार्‍या पूजेला बसायची तेव्हा मौन. एरव्ही काहीही विचारा, ती मिस्कील, काही झोंबणारी उत्तरं द्यायची. स्वयंपाकघरात येऊन मुलांनी विचारलं, “आई, स्वयंपाक व्हायचाच आहे का ग अजून?” यावर तिला आलेला राग लपवत ती म्हणायची, “अरे, आज सकाळी गोट्या खेळायचा मूड होता. त्या खेळण्यामुळे उशीर झाला.” मुलं खजील व्हायची. ती हुशार होती. हस्ताक्षर मोत्यांसारखं होतं. नोकरी करायची आवड होती. एकदा ती म्हणाली, माझं जीवन म्हणजे ‘प्रभूचे देणे’ आहे. ते मी स्वीकारलं आहे.
 
 
वार्धक्यात काहीशा विकलांग अवस्थेत तिला भेटायचा योग आला तेव्हा तिचे डोळे सतत गळत होते. तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “या हातांनी रुचकर पदार्थ खाऊ घातले. वेळप्रसंगी धपाटा घातला आणि लिहिणं कसं सुंदर असावं हे शिकवलं.” ती म्हणाली, “बघ ना, आता साधी सही करता येत नाही मला.” गतकालीन अस्तित्वात ती रमली अन् पुन्हा संस्कार ताजे झाले.
शेजारी राहणार्‍या अनूचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला म्हणून बघितले तर ती चार मजले चढत गॅस सिलेंडर वर घेऊन येणार्‍या माणसाशी भांडत होती, दहा रुपयांसाठी. तो तिला पैसे मागत होता. ती म्हणाली, “ह्या लोकांचं काम आहे घरपोच सिलेंडर देण्याचं. वर पैसे का द्यायचे.” “ताई, महागाई वाढली आहे. परवडत नाही.” अनूचं स्वतःचं दुकान आहे. पैसा बर्‍यापैकी घरात येतो, तरीही ती कधी कधी दोन रुपयांसाठी भांडते तेव्हा आठवते ती प्रभाबाई, धुणंभांड्याचं काम करणार्‍या सुषमाची आई. एक दिवस दारात आली आणि विचारू लागली, “ताई, काही निवडायचं, पाखडायचं आहे का? असेल तर द्या.” घरात तसं काही काम नसताना मुद्दाम शोधून तिला काम देताना मनात एक भाव उमटला, की चला, यानिमित्ताने तिला पाच-पंचवीस रुपये देता येतील. काम झाल्यावर पैसे देताच ती म्हणाली, “नको हो ताई. पैसे कशाला? भागतंय माझं. घरात सगळे काम करतात, कमावतात. माझ्या जिवाला कशाला हवेत पैसे. नको.” ती निक्षून नाही म्हणाली. खरं म्हणजे ती घरातली एक उपेक्षित स्त्री होती. तिच्याकडे घरातल्या कुणाचंही लक्ष नसायचं. मुलंबाळं, सुना, सगळे रोजंदारीवर घराबाहेर पडणारे. सर्व जण पैसे कमावयाचे, खायचे, प्यायचे. ही म्हातारी उपाशी असायची. उगीच इकडेतिकडे फिरत असायची. तिला डोक्याला लावायला खोबरेल तेल नसायचं. उदबत्ती लावायची म्हटलं तर आगपेटी नसायची. उपास तर नेहमीचे. कधी दोन केळी घ्यायची सोय नाही. तरीही तिला पैसे दिले की तिचं आवर्तन- “भागतंय हो ताई संसारात. नको पैसे.” छोट्याशा पत्र्याच्या घरात तिला समृद्धी वाटायची. चारही बाजूला कापडं लावून कसाबसा आडोसा करून तिने तशा घरात मुलांना वाढवलं, मोठं केलं. नंतर एका खोलीत न परवडणारं भाडं भरून ती राहिली. आता अर्धपक्क्या पत्र्याच्या दोन खोल्यांत ती राहते तेव्हा तिला सुख वाटतं. म्हणून ती म्हणते, “भागतंय हो, भागतंय.” तिचे हे शब्द पोथीमधल्या ओव्यांसारखे वाटायचे. जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं तिने.
 
 
तिचा ‘भागतंय’ हा शब्द नेहमी मनात रुंजी घालत असतो. हव्यासाला मोडता घालतो. तिचे समोर आलेले दात पसरून ती मनमोकळी हसायची तेव्हा मनात प्रश्न उमटायचा, ‘संपत्ती म्हणजे नेमकं काय?’ आजही तो अंतर्मुख करतो. प्रभाबाई आज कुठे, कशी आहे कुणास ठाऊक! तिच्या पाऊलखुणा विसरणं शक्य नाही.
 
 
पावसाळ्याचे कुंद वातावरण असलेले ते दिवस होते. घरभर तर उदासवाणी शांतता होतीच. शिवाय वातावरणसुद्धा चिडीचूप होते. सर्वत्र सामसूम. दुपारचे 3 वाजले होते. मधून चिमण्या तेवढ्या चिवचिवाट करत होत्या. माजघरामध्ये पलंगावर ‘ऐंशी वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य जगलेल्या नलूआत्या अर्धवट बेशुद्धीमध्ये कसाबसा श्वास घेत होत्या. त्यांची ती अवस्था बघणं कठीण होतं. डोळे उघडू म्हणता उघडत नव्हते. कानाशी बोललेलं बहुतेक ऐकू जात असावं, कारण प्रतिसादाच्या हुंकाराचा भास होत होता. तेवढ्यात ‘ते’ आले. घाईघाईत पावलं टाकत कसल्याशा ओढीनं आत शिरले. एरवी त्यांनी घराच्या फाटकात पाऊल टाकलं, की सार्‍या घराला धाक, धास्ती बसून घराचं जिवंतपण संपून जायचं. त्यांचा दरारा तसा होता. आज मात्र ते कुणी वेगळे होते. इकडेतिकडे न बघता ते नलूआत्यांच्या बिछान्यापाशी आले. त्यांच्या उशाशी जागा करून बसले. यमाच्या दरबारात रांगेत उभ्या असलेल्या बंद डोळ्यांच्या नलूआत्यांच्या चेहर्‍यावरून, केसांवरून अतीव मायेने हात फिरवू लागले. त्यांचा कंठ दाटून आला, डोळे भरून आले.
 
शब्दांशिवाय स्पर्शातून ते नलूआत्यांशी बोलत होते, वात्सल्य प्रकटत होते. किती वेळ गेला कुणास ठाऊक. अवतीभवती सारं स्तब्ध होतं. ते दृश्य बघून मन गलबलून गेलं होतं. असा कसा असतो जगण्या-मरणाचा खेळ? क्षणात बाजी उलटवून टाकतो? कालपर्यंत बघितलेलं, अनुभवलेलं जुनं, जीर्ण झालेलं चिंधीसारखं नातं आज एकदम पालवी फुटल्यासारखं कोवळं कसं झालं? नितनूतन परमेश्वराचा हा नातेपालट खेळ सुंदर आहे हे कळून मन विरक्त होऊ बघत होतं.
 
 
कोण होते ‘ते’? ते नलूआत्यांचे एकुलते एक जावई होते. आयुष्यभर त्यांचं आणि जावयाचं नातं अटीतटीचं होतं. संघर्षाच्या ठिणग्या आगीचं भय दाखवत असत, कारण तसंच होतं. नलूआत्यांची मुलगी मंद होती. दिसण्यात, वागण्यात डावी होती. आपण ‘फसलो’ ही वेदना उरी शल्य घेऊन जावयांचा संसार चालला होता. दिसायला चारचौघांसारखा असला तरी त्यांना मानसिक साथ न लाभल्यानं ते बायकोवर डाफरताना सगळ्यांनी अनुभवलं होतं. बायकोबद्दल त्यांना आकस होता. धुुमसणारा राग बायकोच्या माहेरच्या माणसांवर निघायचा. नेहमी मानपान, रुसवे-फुगवे, अहंकार गोंजारणं. नातं फटकून होतं. सासूबाईंशी तर ते कायम फटकून वागत असत आणि... आज अचानक सासू-जावयामधला दुरावा अकस्मात संपला होता.
 
 
नलूआत्याचं अंतर्मन जागं झालं असावं. त्यांनी महत्प्रयासाने डोळे उघडले. काही क्षणच. जावयाकडे बघितलं. पैलतीरी लागलेल्या डोळ्यांत काय होतं? जणू काही जगात नुकत्याच आलेल्या अर्भकाचे ते डोळे होते. निरागसता, शरणागता. सारा भूतकाळ जणू पुसून गेला होता. नव्याकोर्‍या डोळ्यांकडे ते बघत होते. बोलता न येणार्‍या तान्ह्या बाळाला जे प्रेम हवं असतं ते स्पर्शातून देत होते. हे नाते नवीन होते. प्रेमाचे, अश्रूंचे, अलवार नाजूक माणसामाणसांमधल्या रेशीमबंधाचे. हा नवा बंध गुंफणारे क्षण अनोखे होते, अवाक् करणारे होते. नलूआत्यांना क्षणाक्षणाला साद घालणारा मृत्यू असं जन्माचं विस्कटलेलं नातं का बरं जोडत होता? खरं म्हणजे त्यातला अवकाश बरंच काही बोलत होता.
 
 
ज्या बिंदूपाशी माणसाचं जीवन सुरू होतं तिथेच येऊन परतणं यालाच का म्हणायचं जगणं? जुन्या झालेल्या शरीरात नलूआत्या तान्हेपण लेवून पलंगावर पडल्या होत्या. वृत्ती उठत नव्हती. शून्यता डोळ्यांत जाणवत होती. ऐंशी वर्षांच्या आयुष्यात किती तरी घडामोडी, तडजोडी, जोडणं, तुटणं घडलं असेल. अहंकाराने वाटा अडवल्या असतील. ते सगळं पार करून बाळपणाशी येऊन ठेपलेलं वार्धक्य कधीही न अनुभवलेलं वात्सल्य, प्रेम बघत नात्यांमधला गुंता सोडवत होतं. नलूआत्यांच्या माथ्यावरून, मुखावरून फिरणारा मायेचा स्पर्श त्यांच्या डिवचलेल्या अहंकारी जावयाचा नव्हता, तर वत्सल पित्याचा होता. हे दृश्य आत्मभान जागवणारं होतं. कवी ग्रेस यांची कविता मनामध्ये उमलून येत होती.
 
 
‘भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया’
 
 
प्रत्येक झाड आपलं बीज मागे ठेवून जातं. एखादं झाड तोडलं, पडलं किंवा उखडून गेलं तरी पुन्हा कोवळी पालवी उगवते. लहानसं रोप तरारून वर येतं. खरंच! माणसाचंही असंच असतं का? झाडाशी निजलेल्या नलूआत्या पुन्हा नवं अस्तित्व घेऊन उगवतील, बहरतील, मातीत मिसळून पुनःपुन्हा...
 
 
जुनं काहीही आवडत नसलेला तो परमात्मा नूतनीकरण करून जुनं मोडून नवं मांडतो आहे. खेळ चाललाय. सोंगट्या हलत आहेत त्यानुसार भाग्यरेखा बदलते आहे. नलूआत्यांचे प्राणपाखरू उडून गेले नव्या जन्मासाठी, त्या परमात्म्याच्या खेळासाठी; परंतु.... ज्यांचा जन्म सरायला अजून वेळ आहे त्यांना जागं करण्यासाठी वृद्धत्वातलं बाळपण एक जागृती आहे. ती आत्मचिंतनाची वाट आहे. ज्यांच्यामुळे हे घडलं त्या नलूआत्यांच्या जन्माचं सार्थक तर झालंच ना? एवढं पुरे.
 
 
स्मृतिसंचय असला तर निसर्ग झेलता येत नाही म्हणतात. त्यांचं रोजचं नवं नवं रूप आनंददायी असतं ते कळत नाही म्हणतात. असेलही; परंतु स्मृतींची पानं चाळताना काही तरी अलौकिक घडून जातं. पारलौकिकाचं दार उघडतं तो क्षण आठवणींनी जागं ठेवलेल्या शिक्षणामुळे येतो ना? काळाच्या वेगवान प्रवाहात सुखदु:खाच्या लाटांबरोबर वाहून जाताना लव्हाळ्यांची सोबत आयुष्य गोड करतं ना? स्मरण कधी उपकार करतं तर कधी अपकार. हे ज्याचं त्याला बरोबर कळतं. फक्त ते जीवनात उतरलं म्हणजे झालं.
 
 
एकदा एक नावाजलेले प्राध्यापक भाषण द्यायला एका ठिकाणी गेले. बघतात तर काय श्रोतृवर्ग वयाच्या साठीच्या पलीकडला, विरंगुळा म्हणून भाषणासाठी बसलेला, कधीही उठून जाण्याची शक्यता असलेला. प्राध्यापकांना धाक वाटला. मनात योजून आलेलं बोलणं शक्य नव्हतं. अध्यात्म हा त्यांचा पिंड नव्हता; परंतु ऐन वेळी त्यांना जे सुचलं ते श्रोत्यांच्या स्मरणात राहील असंच होतं. ते म्हणाले, “आता तुमचे रथात बसण्याचे दिवस आहेत. पुरे झाली पायपीट. पुरे झाले चढउतार; परंतु एक लक्षात ठेवा. रथाचा लगाम ज्याच्या हातात आहे त्याच्या पाठीला पाठ लावून बसा. मग तो तुमचा मुलगा-सून किंवा मुलगी-जावई असो किंवा काळजी घेणारं अन्य कुणी असो, त्याच्या शेजारी बसायचं नाही. शेजारी बसलात तर असंख्य सूचनांचा भडिमार कराल. खाचखळगे, खड्डे याविषयी सावध कराल. त्यापेक्षा पाठीला पाठ लावून बसलात तर पुढे जाल आणि लक्ष मागचं बघण्यात, आठवण्यात असेल. ती गुंतवणूक प्रवास कडू-गोड करेल.” श्रोत्यांना पटलं. गंतव्य ठिकाण कुणाला ठाऊक आहे? प्रवास कुठे चाललाय, कधी संपणार याविषयीही अनभिज्ञ असतो माणूस. गाव हाकेवर असले तरी समजत नाही. कवयित्री इंदिराबाई संत म्हणतात,
 
‘कुठे असेल ते गाव
जिथे आहे पोचायचे
कुठे असेल ते घर
जिथे आहे थांबायचे?
कुठे असेल तो स्वामी
त्याही वस्तूचा महान
ज्याच्या पायापाशी आहे
टाकायचे तनमन?’
 
 
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो. त्यात रमावं आणि कवयित्री पद्मा गोळे म्हणतात,
 
‘सगळ्यांना (आठवणींना) कुरवाळीत कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
पुन्हा कधी तरी अशीच गर्दी करण्यासाठी’