एआय आणि ऑटोमेशन - भ्रम, संभ्रम आणि भवताल

विवेक मराठी    09-Nov-2024
Total Views |
@अमित लिमये
 
 
AI
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्‍या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याचे’ अशा उदासीन भूमिकेत न राहता त्याचं आपल्या क्षेत्राशी निगडित असं शिक्षण, कंपन्या, सरकार ह्यांची ह्याबाबतची धोरणे याचा डोळसपणे अभ्यास करून स्वत:ला अद्ययावत ठेवणे, हा त्यावरचा उपाय आहे.
कुठलीही कंपनी ही दोन प्रकारच्या लोकांवर चालते. एक- निर्णय घ्यायची क्षमता आणि अधिकार असणारे लोक आणि दुसरे त्यावर अंमलबजावणी करणारे, राबणारे लोक. निर्णय म्हणजे ज्याला धोरणात्मक म्हणता येतील; नवीन देशात, नवीन क्षेत्रात उडी मारणे, सप्लाय चेन नव्याने बांधणे, नवीन उत्पादन मुळातून डिझाईन करणे, नवीन मार्केट सेगमेंटमध्ये उतरणे असे जास्त जोखीम असणारे निर्णय. हे मोठे निर्णय मोठ्या लोकांवर सोडून दिले तरी अंमलबजावणी करणारे लोकही त्यांच्या पातळीवर रोज असंख्य निर्णय घेत असतात. कुठल्या सप्लायरला किती ऑर्डर द्यायची, कोणाला कामावर घ्यायचे, कुणाला काढायचे, कुठले प्रोजेक्ट अ‍ॅप्रूव्ह करायचे, कुठले डब्यात टाकायचे, एक ना दोन. आपले काम अंगवळणी पडल्याने आपल्या लक्षात येत नाही; पण निर्णय घेणे हेच आपले मुख्य काम आहे. निर्णय घेण्याचे हे काम वरवर वाटतं तितकं सोपं नसतं. अनेक शक्यता, उपशक्यता तपासत, भूतकाळात डोकावून भविष्यातल्या परिणामांचा अंदाज घेत निर्णय घ्यावे लागतात. विचार करून, व्यवस्थित गृहीतके मांडून निर्णय घेतला, की यशाची शक्यता वाढते. कंपनीचा धंदा दुप्पट, चौपट होणे किंवा कंपनी डब्यात जाणे हे कोण, कसा निर्णय घेतं आणि त्याची अंमलबजावणी कशी होते ह्यावर अवलंबून असतं. जितकी कंपनी मोठी, तितका तिचा पसारा मोठा! अनेक कारखाने, अनेक उत्पादने, अनेक बाजारपेठा, अभियांत्रिकी, उत्पादन, कच्चा माल खरेदी, विक्री, विपणन, वितरण, सेवा, दुरुस्ती अशा थेट आणि बिझनेस प्लॅनिंग, अकाऊंटिंग, फायनान्स, बँकिंग, टॅक्स, रिपोर्टिंग अशा साहाय्यक होणार्‍या छोट्यामोठ्या कामांचा व्याप! प्रत्येक निर्णय, त्याची अंमलबजावणी आणि त्यासोबत चालणारे व्यवहार उरकायला माणसं लागतात, माल लागतो, यंत्रे लागतात, वेळ लागतो आणि त्याबरोबर येत असते धंद्याची एक स्वत:ची अशी जोखीम. ही माणसे, माल, यंत्रे, वेळ आणि जोखीम असं सगळं कंपनीच्या ताळेबंदावर खर्चाच्या स्वरूपात मांडलं जातं. जितकी जास्त माणसे, यंत्रे, वेळ आणि माल लागेल तितका खर्च जास्त. जितकी जोखीम जास्त तितका ती टाळायचा किंवा निस्तरायचा खर्च अधिक. जितका खर्च अधिक तितका नफा कमी आणि धंदा वाढवायचा वेग कमी. कंपनी धंद्यात नफा कमावण्यासाठी उतरलेली असल्याने कंपनीचे व्यवस्थापकीय मंडळ आपला खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे आणि जोखीम कमी करणे यासाठी सतत नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करत असते. मग ते 19 व्या शतकातले यंत्रमाग असतील किंवा आताचे एआय आणि ऑटोमेशन. तंत्रज्ञानाच्या वापराने कंपन्या आपली आर्थिक कामगिरी सुधारतात, आलेला पैसा धंदा वाढविण्यासाठी गुंतवतात.
 
 
कुठल्याही कंपनीने कीर्द, खतावणी आणि इतर कागदपत्रे वापरून आपला व्यवसाय चालवण्याऐवजी कॉम्प्युटर सिस्टम्स वापरायची 1950 पासूनची परंपरा आहे. 1950 साली इंग्लंडच्या लायन्स नावाच्या चहा आणि बेकरी माल विकणार्‍या कंपनीने केंब्रिज विद्यापीठाने बनवलेली कॉम्प्युटर सिस्टम्स वापरून ह्याचा श्रीगणेशा केला होता. त्या वेळची सिस्टम ही मोठ्या व्हॅक्क्यूम ट्यूब्स आणि पार्‍याने बनलेली होती. व्यवहार नोंद, त्याबाबतची माहिती साठवणे आणि ती नंतर लेखापरीक्षण किंवा अभ्यासासाठी वापरणे हे अतिशय महाग आणि क्लिष्ट होतं. जसजसं तंत्रज्ञान सोपं आणि स्वस्त होत गेलं तसतसा वापर वाढत गेला. आज, साधारण 75 वर्षांनंतर जगभरात लहानमोठे सगळे उद्योग आपला सगळा व्यवहार विविध कॉम्प्युटर सिस्टम्स वापरून चालवतात. कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्‍या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. मीडियाला हल्ली कुठलीही बातमी अथवा विषय खळबळजनक आणि अतिरंजित करून मांडायची सवय लागली आहे त्या अनुषंगाने हेही ठीकच; पण नवीन तंत्रज्ञान येणार आणि ते सामान्य माणसाच्या नोकर्‍या खाणार, लोक रस्त्यावर येणार, हा जुनाच बागुलबुवा आहे. 19 व्या शतकात, ऐन औद्योगिक क्रांतीच्या भराच्या काळात जेव्हा इंग्लंडमधील कापड उद्योगाने हातमागाऐवजी यंत्रमाग आणला तेव्हासुद्धा हाच बागुलबुवा उभा करून संप, आंदोलने झालेली आहेत. ‘लुडिट आंदोलने’ ह्या नावाने ही आंदोलने कुप्रसिद्ध आहेत. हे कामगार आंदोलक म्हणजे लुडिट्स रात्री मुखवटे चढवून मिल्समध्ये शिरायचे आणि यंत्रमाग मोडून पार नासधूस करून जायचे. ह्यांचा उच्छाद इतका वाढला की, सरकारने यंत्रमागाची नासधूस करण्याच्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा जाहीर केली. काही जणांना फाशी दिलीसुद्धा, बर्‍याच आंदोलकांना तडीपार केलं. अनेक लुडिट्स विनाकारण जीव गमावून बसले आणि अनेक बदनाम झाले. नोकर्‍या जायच्या भीतीने इतकं उग्र आंदोलन केलं खरं, पण खरी परिस्थिती काय होती? औद्योगिक क्रांतीनंतर एकट्या ब्रिटनमध्ये एकाच वेळी चार हजार मिल्स तीन पाळ्यांमध्ये सुरू होत्या. ह्या मिल्स लाखो रोजगार तयार करत होत्या. ह्या नोकर्‍यांमुळेच लोकांचा लोंढा शहराकडे येत गेला. नवी शहरे वसत गेली. त्यातून अजून रोजगार निर्माण झाले. एक सुष्टचक्र सुरू झालं. लुडिट्सची ही चळवळ त्या काळी भारतातसुद्धा झालेली आहे. आजही कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला विरोध करणार्‍यांना लुडिट्स म्हणतात. भारतात बँका जेव्हा ह्या सिस्टम्स वापरायला लागल्या तेव्हा आता ह्या सिस्टम्स लोकांच्या नोकर्‍या घेऊन जाणार, अशी आवई तेव्हाही उठली होती आणि बँकांच्या युनियन्सनी तेव्हाही संप केलेच होते. आता आपण बँकांचा कारभार सिस्टम्सशिवाय चालला आहे, अशी कल्पना तरी करू शकतो काय?
 
 
AI
 
आज एआयचा उदोउदो होत असला तरी औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. इंडस्ट्रियल रोबोट्स, कारखान्यात माल इकडून तिकडे नेणार्‍या स्वयंचलित ट्रॉल्या, असेम्ब्ली लाइन्स वगैरेने कामगार वर्गाची उत्पादकता प्रचंड वाढली आहे. हेच ऑटोमेशन ज्याला बॅक ऑफिस म्हणता येईल अशा फायनान्स, सप्लाय चेन, खरेदी, विक्री वगैरे व्यवहारात गेली चार वर्षं आलं आहे. एआय तंत्रज्ञान हीच उत्पादकता अनेक पटींनी वाढवेलच; पण एआयचा खरा उपयोग निर्णयक्षमता अचूक करून धंद्यातली जोखीम कमी करणे, मशीन्सवरची कामे जास्त अचूक करणे आणि मशीन्सची उत्पादकता वाढवणे ह्या गोष्टींत जास्त होणार आहे. ज्याला आपण जनरेटिव्ह एआय म्हणतो, ते तंत्रज्ञान वापरून मनुष्यबळाची उत्पादकता प्रचंड प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे नोकर्‍या कमी होतील, ह्या भीतीला फार अर्थ नाही. नोकर्‍या घेऊन जाणार, अशी भीती आज जरी वाटत असली तरी ह्यामुळे अंतिमतः भरभराटच होणार आहे. कुठल्याही बदलाला सामोरे जाताना व्यक्तिशः आपल्याला, समाजाला आणि सरकारला थोडं बदलावं लागतंच. तसं इथेही लागेलच. आपल्या आजूबाजूला असलेलं एक साधं उदाहरण बघू.
 
 
जगभरात जशा गाड्या रस्त्यांवर वाढायला लागल्या तसं चौकाचौकांत उभं राहून पोलीस वाहतूक नियमित करायला लागले. म्हणजे बघा, टेक्नॉलॉजीने गाड्या बहुसंख्य जनतेला परवडतील अशा संख्येनं बनवल्या नसत्या, तर वाहतूक पोलीस हा विभागच बनला किंवा वाढला नसता. त्यामुळे एकीकडे टांगा बनवणारे आणि चालवणारे बेकार झाले, तर दुसरीकडे गाडी बनवण्यासाठी लागणारे थेट आणि अप्रत्यक्ष असे डीलरशिप, मेकॅनिक, वाहतूक पोलीस असे असंख्य रोजगार तयारसुद्धा झाले. ज्या टांगावाल्यांनीस्वतःला बदलत गाड्या लावल्या ते पुढं गेले. ‘नया दौर’ चित्रपटातल्या नायकाप्रमाणे काळाचं चक्र उलट फिरवायचे स्वप्न पाहणारे लोक जिथे होते ते तिथेच थिजून गेले. आपण थोडं अजून पुढं जाऊ. गर्दी वाढली तशी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून सिग्नल्स, टायमर आले. वाहतूक पोलीस कमी झाले; पण दुसरीकडे सिग्नल्स बनवणारी व्हॅल्यू चेन आणि तिने तयार केलेले नवीन रोजगार आले. तुम्हाला कधी तरी चौकात अजिबात गर्दी नसतानाही पेट्रोल जाळत लाल सिग्नलवर आपण उगाच उभे आहोत असं वाटलं असेल ना? किंवा तुम्ही चौकाजवळ जात असताना, इतर रस्त्यांवर कुणीच नसतानाही तुमचा हिरवा सिग्नल लाल झालेला बघून, हा थोडा वेळ अजून हिरवा राहिला असता तर, असा विचार आला असेल ना? ऊडठउ नावाच्या तंत्रज्ञानाने तेही साध्य केलंय. गाडीत एक ऊडठउ बॉक्स, एक बॉक्स सिग्नलच्या खांबावर, सिग्नलच्या कंट्रोल सिस्टीमशी जोडलेला. तुम्ही सिग्नलला उभे आहात आणि तुमच्या गाडीने सिग्नलला इशारा केला की, कुणी येत नसेल तर मला जाऊ दे. सिग्नलला चौकातल्या कॅमेराकडून फीड येत असतेच. ती जर क्लिअर असेल तर सिग्नल कंट्रोल तुमचा लाल सिग्नल टायमरआधीच हिरवा करेल. तुम्ही वेगात चौकात येत असताना सिग्नलला सांगितलं की, कुणी येत नसेल तर माझा सिग्नल हिरवाच राहू दे. सिग्नल काही क्षण हिरवा राहील आणि तुम्ही चौक पार कराल. कॅलिफोर्नियामध्ये फक्त दोन टक्के सिग्नल्सवर आणि थोड्याशाच गाड्यांमध्येच ही प्रणाली लावून फक्त दोन महिन्यांच्या चाचणीतून 900 तास जे सिग्नलवर उभं राहण्यात वाया जायचे ते वाचले आहेत. ह्या सिस्टीम्समधून डेटा गोळा करून सिग्नल डायनॅमिक टायमर्स वापरून अधिकाधिक समृद्ध होत जाणार आहेत. कार्बन उत्सर्जन कमी होईल ते वेगळंच. देशभर किंवा जगभर ही सिस्टीम लागेल तेव्हा प्रत्येक गाडीत हे बॉक्सेस, प्रत्येक चौकात हे बॉक्सेस, त्यांची उत्पादन व्हॅल्यू चेन, इन्स्टॉलेशन, सर्व्हिस, वॉरंटीमधून किती तरी नवे जॉब्स तयार होतील. ह्या सगळ्याची सुरुवात चौकात सिग्नल्स लावून झाली होती. त्या वेळी जर वाहतूक पोलिसांचे रोजगार जाणार म्हणून कोणी आंदोलन केलं असतं तर? आजसुद्धा अनेक वाहतूक पोलीस बस, ट्रक आणि गाड्यांच्या सायलेन्सरला तोंड देत, धूर गिळत, फुप्फुसाचा खुळखुळा करत उभे असतात.
 
 
आता एआय तंत्रज्ञानाचा जगभरात अंगीकार करायच्या वेगाकडे येऊ. ज्या वेगात एआय सगळीकडे पसरेल असं भाकीत वर्तवलं जातंय त्यापेक्षा त्याचा वेग हळू असणार आहे. आपल्या सगळ्यांना त्याच्याशी जुळवून घ्यायला, नवीन गोष्टी शिकायला वेळ मिळणार आहे. आज सर्व पातळ्यांवर जिथे घाऊक प्रमाणात निर्णय आणि अंमलबजावणीसाठी कंपन्यांमध्ये लोक आहेत तिथे, त्यांच्याऐवजी एआय तंत्रज्ञान येणार नसून त्यांच्यासाठी ते येणार आहे. निर्णयप्रक्रिया ही पूर्णपणे एआयवर सोपवून बिनधास्त राहायला अजून खूप वेळ आहे. हे जितकं सोपं वाटतं तितकं ते नाहीये. कारण एआय तंत्रज्ञान हे ज्या सिस्टम्स आणि डेटावर अवलंबून आहे तो डेटाच कंपन्यांमधून पाहिजे त्या स्वरूपात, प्रमाणात उपलब्ध नाहीये किंवा जो आहे तो विश्वासार्ह नाहीये. वेळ लागणार आहे तो यासाठी. अजून एक कळीचा मुद्दा म्हणजे निर्णय घेतला तर त्याची जबाबदारी कुणाची? आज माणसं जेव्हा निर्णय घेतात तेव्हा जबाबदारी सरळ असते. समजा, कंपनीमध्ये एखादा निर्णय एआय प्रणाली वापरून घेतला आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं तर जबाबदार कोण असेल? अधिकारी? एआय तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी की डेटा आणि बिझनेस सिस्टम्स? अजून एक सोपं उदाहरण बघू. तुम्हाला स्वयंचलित गाड्यांबद्दल माहिती असेलच. स्वयंचलित गाडीचे पाच टप्पे आहेत. लेन डीपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर अशा सेन्स अँड इन्फॉर्म लेव्हल एकपासून ते संपूर्ण स्वयंचलित मोडच्या लेव्हल पाचपर्यंत. ह्या पाचव्या लेव्हलला गाडीत ड्रायव्हरसाठीचे कंट्रोल्स नसतात. अ‍ॅक्सलरेटर, क्लच, ब्रेक्स, स्टीअरिंग व्हील काही नाही. जायच्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आणि निवांत बसायचं. चालवायची म्हटलं तरी गाडी चालवता येणार नाही. सगळं गाडीत असलेला मोठा कंट्रोलर कॉम्प्युटर बघणार. रस्ता, वळण, ट्रॅफिक, पादचारी, लेन्स, क्रॉसिंग, सिग्नल्स, शाळेचा झोन, हॉस्पिटलचा झोन हे सगळं झालंच. त्यावर हवामान, ऊन, प्रकाश, सूर्य समोर आहे की मागे, कुठून प्रकाश परावर्तित होतोय; पाऊस, बर्फ, धूळ, रोड कन्स्ट्रक्शन!! एक ना दोन! ह्या सगळ्याची इत्थंभूत माहिती कंट्रोलरला देणारे अनेक सेन्सर्स; फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, सराऊंड कॅमेरा, रडार, लायडार, डीएसआरसी ट्रांसिव्हर्स, कारमध्ये असलेले शंभर-दीडशे इतर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स. ह्या सगळ्या जंजाळातून मिली सेकंदात काही हजार मेसेजेस मुख्य कंट्रोलरकडे जातात. हे सगळं प्रोसेस करून ब्रेक मारायचा, की चालत राहायचं, वेग वाढवायचा, वळायचं, लेन बदलायची असे निर्णय लेव्हल पाच ऑटोनॉमस गाडी दर मिली सेकंदाला घेते अन् त्यानुसार कंट्रोल करते. जवळपास प्रत्येक प्रमुख कार निर्मात्याकडे हे तंत्रज्ञान आज आहे. किती लेव्हल पाच गाड्या आज रस्त्यावर धावतात माहिती आहे? शून्य!!! कारण? लेव्हल पाच ऑटोनॉमस गाडी हे जे ड्राइव्ह करताना निर्णय घेते त्याचा परिणाम म्हणून जर तो एखाद्या अपघातात सापडला तर जबाबदारी कोणाची? हा तो जबाबदारीचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न इतर इंडस्ट्रीजने मोठ्या प्रमाणात एआय वापरायला सुरुवात करतील तेव्हा त्यांना, त्यांच्या कस्टमर्स लोकांना आणि त्यांच्या विमा कंपन्यांना पडलेला आहे.
 
 
ह्या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य एकच आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा तंत्रज्ञानाने उद्योगधंद्यांंना त्यांच्या ताळेबंदातून मोठ्या प्रमाणात खर्च आणि जोखीम कमी करायची हमी दिलेली आहे, तेव्हा तेव्हा उद्योगधंद्यांनी ते तंत्रज्ञान स्वीकारून आपला उत्कर्ष साधला आहे आणि पर्यायाने लोकांची, समाजाची, राष्ट्राची प्रगतीच साधली आहे. एआयबाबतीतही हेच होणार आहे. एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणणार हे निश्चित आहे. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याचे’ अशा उदासीन भूमिकेत न राहता त्याचं आपल्या क्षेत्राशी निगडित असं शिक्षण, कंपन्या, सरकार ह्यांची ह्याबाबतची धोरणे याचा डोळसपणे अभ्यास करून स्वत:ला अद्ययावत ठेवणे, हा त्यावरचा उपाय आहे.