विवेक गिरिधारी
9422231967
कर्णबधिरांचे पूर्वप्राथमिक शिक्षण व त्यातून ती मुले सर्वसाधारण शाळेत जाण्यासाठी प्रयत्न करणे, हा एक मोठा क्रांतिकारी टप्पा आहे. या दिशेने दिव्यांगांच्या शिक्षणात पुण्यातील रक्षाताई देशपांडे ह्या गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ पायाभूत स्वरूपाचे काम करीत आहेत. अशा स्वरूपाचे पथदर्शी काम उभे करणे आणि विस्तारणे यातील त्यांचे योगदान मोठे आहे.
कर्णबधिरांचे पूर्वप्राथमिक शिक्षण व त्यातून ती मुले सर्वसाधारण शाळेत जाण्यासाठी प्रयत्न करणे, हा एक मोठा क्रांतिकारी टप्पा आहे. या दिशेने दिव्यांगांच्या शिक्षणात पुण्यातील रक्षाताई देशपांडे ह्या गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ पायाभूत स्वरूपाचे काम करीत आहेत. अशा स्वरूपाचे पथदर्शी काम उभे करणे आणि विस्तारणे यातील त्यांचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्र राज्यासाठीही ते भूषणास्पद आहे!
ही सर्व धडपड करणार्या रक्षाताई या कॉक्लिया संस्थेच्या वतीने कर्णबधिरांसाठी चालविण्यात येणार्या शैक्षणिक कामाच्या प्रमुख धुरीण आहेत. ‘प्रत्येक कर्णबधिर मूल बोलेल!’ या आत्मविश्वासाने या संस्थेतर्फे पुण्यासह महाराष्ट्र व गोवा येथे 11 ठिकाणी सध्या वाचा व भाषा प्रशिक्षण केंद्रे चालविण्यात येतात. रक्षाताई या कॉक्लिया पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच या संस्थेच्याही विश्वस्त खजिनदार आहेत. याशिवाय त्या पुण्यातील चिंचवडमधील मोरया हॉस्पिटलमध्येही विश्वस्त आहेत.
शिक्षण व कामाची मुहूर्तमेढ
खरे तर रक्षा देशपांडे ह्या चिंचवडच्या एका शाळेत संगीत शिक्षिका म्हणून 1998च्या सुमारास रुजू झाल्या होत्या; परंतु त्यांचे कर्णबधिर मुलांना शिकविण्याचे शिक्षण झाले असल्याचे समजल्याने चिंचवडमधील एक पालक अशोक पाटील यांनी आपल्या कर्णबधिर मुलाला शिकविण्याचा आग्रह त्यांच्यापाशी धरला. त्यांनीच रक्षा देशपांडे यांची निष्णात कान, नाक व घसातज्ज्ञ डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्यासोबत भेट घडवून आणली. या भेटीतच कॉक्लिया संस्थेच्या वाचा-भाषा प्रशिक्षण केंद्राच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वाचा-भाषा प्रशिक्षण केंद्र चालू करण्यासाठी डॉ. वाचासुंदर हे एका सुयोग्य व्यक्तीच्या शोधात होतेच.
ऑक्टोबर 1998 मध्ये चिंचवडच्या मोरया मंगलमूर्ती वाडा येथे त्यांनी अनौपचारिकरीत्या कर्णबधिरांसाठी कामास सुरुवात केली. सुरुवातीला कर्णबधिर पालकांचे मेळावे, त्यांचे समुपदेशन व कर्णबधिर मुलांसाठी एकास एक (वन टू वन) याप्रमाणे शिकविण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. 2002 मध्ये या कामासाठी कॉक्लिया पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच या नावाने स्वतंत्र संस्थेची रीतसर अधिकृत नोंदणी झाली.
रक्षा देशपांडे या उच्चविद्याविभूषित असून त्यांचे मानसशास्त्र व संगीत या दोन विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. मिरज येथील सुप्रसिद्ध गांधर्व विद्यालयातून त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली. नाशिकच्या मुक्त विद्यापीठातून त्यांनी कला शाखेत पदवीपर्यंत तर मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुण्यातील वि. रा. रुईया महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पदविका (कर्णबधिरत्व) घेतलेली आहे.
कर्णबधिरांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची गरज व सुरुवात
कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया केल्यास कर्णबधिर मुलास ऐकू येऊ शकते व ऐकू येऊ शकत असल्याने बोलताही येऊ शकते हे 1990च्या दशकात जगभरात सिद्ध झाले होते. श्रवणयंत्रापलीकडचा हा या क्षेत्रातील क्रांतिकारी शोध होता. 1998-99च्या सुमारास डॉ. वाचासुंदर अमेरिकेत चार महिने वास्तव्य करून कर्णबधिरांसाठी वरदान ठरणारी ही विशेष शस्त्रक्रिया शिकून आले, कारण आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग उपेक्षित व वंचित समाजासाठी व्हावा असे त्यांना मनोमन वाटत होते. उपेक्षित अथवा दुर्लक्षित समाजासाठी सेवाकार्य करण्याचा संघाचा संस्कार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.
कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे अशा मुलांचे वाचा-भाषा प्रशिक्षण. त्यासाठीची व्यवस्था रक्षा देशपांडे यांच्या पुढाकारामुळे उभी राहू शकली. वय वर्षे 0 ते 6 वयोगटासाठी काम करण्याचा कोणताही पूर्वअनुभव नसताना रक्षा देशपांडे शाळेमध्ये प्रचलित शिक्षिकेचे कायमस्वरूपी काम करण्याची संधी सोडून धाडसाने या नवीन कामासाठी तयार झाल्या. ही नवी जबाबदारी त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली व त्याला अनुकूल अशी स्वतःची तयारीही चालू केली. सुरुवातीला त्यांनी पूर्वप्राथमिक वयोगटातील कर्णबधिर मुलांसाठी एकास एक (वन टू वन) याप्रमाणे शिकविण्याचे काम करणार्या पुण्यातील शब्दवेध संस्थेत रीतसर आठवडाभराचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे सकाळी अर्धवेळ संगीत शिक्षिका व दुपारनंतर कर्णबधिर मुलांसाठीची विशेष शिक्षिका असे दुहेरी काम चालू झाले.
रक्षा देशपांडे :संपर्क : 9923289844
दुसरीकडे चिंचवड गावात या कर्णबधिरांसाठीच्या विशेष प्रशिक्षण केंद्राची वार्ता कर्णोपकर्णी पसरली. ‘या बाई मुक्या-बहिर्यांना बोलायला शिकवितात!’ असा त्यांचा लौकिक हळूहळू सर्वत्र पसरू लागला. त्यामुळे त्यांच्याकडे ऐकू येणार्या, पण बोलू न शकणार्या मुलांची संख्या वाढू लागली. त्यातून चिंचवड गावात एक व पुण्यात शिवाजीनगर-गणेशखिंड भागात डॉ. वाचासुंदर यांच्या दवाखान्यात एक अशी दोन वाचा-भाषा प्रशिक्षण केंद्रे आकाराला आली.
विशेष प्रशिक्षण व पदविका अभ्यासक्रमास सुरुवात
2003 मध्ये मुंबईच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट येथे चिंचवडमधील रक्षा देशपांडे व पुण्यातील आशा जोशी यांनी ‘कर्णबधिरांचे लवकर निदान व तत्पर उपचार’ या विषयावरचे विशेष प्रशिक्षण घेतले. स्वतःचा मुलगा अवघा आठ महिन्यांचा असताना रक्षा देशपांडे यांनी मुंबईला आठवडाभर राहायचे व शनिवार-रविवार पुण्याला यायचे अशी कसरत करत हे प्रशिक्षण जिद्दीने व हिरिरीने मुंबईच्या वार्या करत पूर्ण केले. या इन्स्टिट्यूटच्या मदतीने व त्यांच्याच योजनेतून पुण्यात पुढे सलग तीन वर्षे ‘लवकर निदान व तत्पर उपचार’ केंद्र संस्थेला चालविता आले. 2002 ते 2006 या काळात दररोज स्कूटरवर 60-70 किलोमीटर फिरून हिंजवडी परिसरातील वाड्या वस्त्यांवर व वीटभट्ट्यांवर मुलांना जागेवर जाऊन शिकविण्याचा खटाटोप त्यांनी सलग चार वर्षे केला. या सातत्याचा फायदा 10 कर्णबधिर मुलांना झाला. या कामावर आधारित शोधनिबंध कर्णबधिर शिक्षकांच्या राष्ट्रीय अधिवेशनात वाचण्यात आला. रक्षा देशपांडे यांच्या या शोधनिबंधाला नावीन्यपूर्ण अशा उत्कृष्ट शोधनिबंधाचे पारितोषिक मिळाले.
सातत्यपूर्ण कामाची दखल घेत 2008 मध्ये शासनाच्या भारतीय पुनर्वास परिषद (RCI) यांच्यातर्फे कर्णबधिरत्व असणार्या विशेष मुलांसाठीचा पूर्वप्राथमिक शिक्षण पदविका (DESCE-HI) हा एक वर्षाचा अभ्यासक्रम चालविण्याची संस्थेस मान्यता मिळाली. अशी परवानगी मिळणारी ही महाराष्ट्रातील पहिली व एकमेव संस्थाच होती. देशभरात फक्त चार ठिकाणी हा अभ्यासक्रम शिकविला जातो. यातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या 75 व्यक्तींनी ही पदविका आत्तापर्यंत पूर्ण केली आहे.
पालक प्रशिक्षणावर विशेष भर
कर्णबधिरांचे लवकर निदान व तत्पर उपचारापाठोपाठ अत्यावश्यक पूर्वप्राथमिक शिक्षण ही संकल्पना समाजात रुजवायची असेल, तर एकाच वेळी अनेक अंगांनी काम करावे लागेल. येणार्या मुलांना शिकविणे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, नवीन येणार्या मुलांना माहिती सांगणे, केंद्रात येणार्या मुलांचे वर्षभराचे कार्यक्रम आखून त्याची परिणामकारक अंमलबजावणी करणे, या सर्वांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडू लागली तेव्हा ती उणीव भरून काढण्यासाठी ‘पालक प्रशिक्षण’ ही संकल्पना उदयास आली. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस म्हणजे फक्त रविवारी चालणारा असा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. हा अभ्यासक्रम तयार करण्यात के.ई.एम. रुग्णालयाच्या वाचा व भाषा प्रशिक्षण केंद्राचा 20 वर्षे अनुभव असणार्या आशा जोशी व रक्षा देशपांडे यांनी विशेष पुढाकार घेतला. याआधारे दीडशेहून अधिक पालकांना प्रशिक्षण देण्यात आले.
कर्णबधिर मुलांना शिकविण्याची शिक्षिका आणि मुलांचे प्रमाण हे 2 : 8 असे असते. त्यामुळे शिकू इच्छिणार्या मुलांच्या संख्येबरोबरच शिक्षकांची गरज वाढती आहे. शिकविण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने मुलांच्या मातांचीही मग मदत घेतली जाते.
कर्णबधिर मुलांच्या कुटुंबाची मानसिकता
बाळाची सोनेरी स्वप्ने रंगवत कोणतीही माता बाळाला जन्म देत असते; पण एखादीला जेव्हा कळते की, आपले बाळ कर्णबधिर आहे तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकते. तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेला असतो. मला आता कर्णबधिर बाळाची आई म्हणून ओळखणार, या कल्पनेनेच तिला धस्स झालेले असते, मन सैरभैर झालेले असते. या धक्क्यातून बाहेर यायला तिला बराच वेळ लागतो. सावरेपासून...स्वीकारेपर्यंतचा मानसिक टप्पा मोठा असतो. दिव्यांग मूल आपल्या पदरी आहे, या विचारानेच ती अर्धी खचलेली असते.
मग नानाविध शंकांनी तिचे मन कुरतडायला होते. मूल एकटे प्रवास करू शकेल का? त्याला सगळे चिडवणार तर नाहीत ना? त्याचे शिक्षण कसे होणार? ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहणार? त्याला वैवाहिक जीवनात अडचणी तर येणार नाहीत ना? असे हजार प्रश्न विचारत ती माता मनोमन रडत असते. उद्याच्या सुखाच्या साशंकतेने तिचा आजचा दररोजचा प्रवास वेदनादायी झालेला असतो. दुसरीकडे आई हीच मुलाची पहिली व शेवटची आशा असते. मग सुरू होतो तो हिमतीने स्वीकारण्यापासून सामोरे जाण्यापर्यंतचा आईचा प्रवास!
कर्णबधिर बाळाचे त्याच्या आई-वडिलांनी प्रेमाने ठेवलेले नावच मुळी त्याच्या कानावर पडू शकत नसते. दुसरीकडे पालक आपल्याला ‘बाबा’ अथवा ‘आई’ अशी हाक कानावर कधी पडेल यासाठी आसुसलेले असतात ते वेगळेच! कर्णबधिरत्व हे असे अपंगत्व आहे जे डोळ्यांना दिसत नाही. ते लपलेले अपंगत्व आहे.
मुलाची कॉक्लिया इम्प्लांटची शस्त्रक्रिया झाली अथवा श्रवणयंत्र बसविले की लगेच आपले मूल छान बोलणार! या भाबड्या कल्पनेतून मातेला बाहेर काढून तिलाच मुलाला बोलते करण्याच्या खटाटोपात सहभागी करून घ्यावे लागते. खरे तर आईला केंद्रस्थानी ठेवूनच कर्णबधिर मुलाच्या प्रशिक्षणाला सुरुवात होते. अनेकांच्या सल्ल्याने व नकारात्मक विचारांनी ती माऊली आधीच त्रस्त झालेली असते. तिच्याशी गप्पा मारत, तिला मोकळे करत व आधार देत नुसते ‘तू लढ, मी आहे ना मदतीला!’ एवढेदेखील अनेकींना पुरते.
स्वरनाद - पूर्वप्राथमिक शाळा ते बहुआयामी पुनर्वसन केंद्र
2009 मध्ये स्वरनाद नावाने पूर्वप्राथमिक शाळेस शिवाजीनगर परिसरात संस्थेने सुरुवात केली. हा महत्त्वाचा टप्पा होता. 2019 मध्ये पुणे महानगरपालिकेने कोथरूडमध्ये एक इमारत संस्थेला उपलब्ध करून दिली. तेव्हापासून तेथे ही वय वर्षे 3 ते 6 वयोगटातील सुमारे 100 मुलांसाठी शाळा चालू आहे. याच इमारतीमध्ये आता 2022 मध्ये श्रवणक्षम मुलांसाठीचे बहुआयामी पुनर्वसन आणि सर्वसमावेशक विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
कॉक्लिया बसविल्यानंतर व योग्य प्रशिक्षण झाल्यानंतर सर्वसामान्य शाळेत निवडक मुलांचा पहिलीत प्रवेश होत असतो. त्याचा अवर्णनीय असा आनंद त्या मुलांच्या पालकांना होत असतो. शिक्षकांच्या चेहर्यावरील समाधान हे तर दोन वर्षांच्या वाचा-भाषा प्रशिक्षणाच्या कष्टाचे चीज झाले, या भावना व्यक्त करणारे असते. म्हणून सामान्य शाळेत पहिलीच्या प्रवेशाला पात्र ठरलेल्या या निवडक मुलांचा अनोखा ‘पदवीदान’ समारंभही स्वरनादमध्ये दरवर्षी पार पडत असतो. गेल्या काही वर्षांत 200 हून अधिक मुलांना सर्वसाधारण शाळेत स्वरनादच्या विशेष प्रयत्नांमधून प्रवेश मिळविता आला, ही मोठीच उपलब्धी आहे!
कार्याचा वाढता विस्तार
दरम्यानच्या काळात खेड तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती शिबिरे घेतल्यानंतर 2010 मध्ये राजगुरुनगरमध्ये वाचा-भाषा प्रशिक्षण केंद्र नव्याने चालू झाले. 2014 मध्ये गोवा राज्यातील फोंडा व परवरी येथेदेखील केंद्र सुरू झाले. त्याच वर्षी पुणे जिल्ह्यातील मंचर येथे केंद्र सुरू झाले. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे येथे 2022 मध्ये एका निवासी प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून तेथे ग्रामीण भागातील 20 मुलांची त्यांच्या आईसह निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलांनासुद्धा आता ही पूर्वप्राथमिक वाचा-भाषा शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच वर्षात पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात वाचा- भाषा प्रशिक्षण केंद्र नव्याने चालू झाले. याचबरोबरीने तेथे चालू झालेले ‘लवकर निदान व तत्पर उपचार’ केंद्र ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे आहे. कोकणातही सुरुवातीला दापोली व अलीकडे कुडाळ येथे नव्याने वाचा-भाषा प्रशिक्षण केंद्र चालू झाले आहे.
रक्षाताईंच्या पायाभूत उभारणी व विस्तार याची दखल घेत त्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे युवा गौरव पुरस्कार (2007), रोटरी क्लब शिवाजीनगरतर्फे उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार (2007), लोकमत सखी सन्मान पुरस्कार (2013), इंडिया प्राइम वुमेन आयकॉन अॅवॉर्ड (2022) असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
पुढची दिशा
2011च्या अधिकृत जनगणनेनुसार देशभरात जवळपास 50 लक्ष लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या श्रवणदोषाला सामोरे जावे लागत आहे. आज तर ही संख्या प्रत्यक्षात याहून किती तरी अधिक असणार आहे यात शंका नाही. सध्या भारतात दरवर्षी प्रत्येक 1000 मुलांच्या जन्मामागे चार कर्णबधिर मुले जन्माला येतात. सुमारे 18 हजार कर्णबधिर मुले दरवर्षी जन्माला येतात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे पाच हजार कर्णबधिर मुले जन्माला येतात.
खेड्यात काय, अगदी तालुकापातळीवरसुद्धा नवजात बालकांच्या श्रवणक्षमतेची तपासणी करणारी कोणतीही शासकीय अथवा खासगी यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे कर्णबधिरत्वाची अधिकृत निश्चिती होईपर्यंतच दोन-तीन वर्षे उलटून गेलेली असतात. एकदा समजल्यानंतर स्वीकारण्यातही बराच कालावधी जातो. पुढे शस्त्रक्रियेसाठी हालचाल होऊन प्रत्यक्ष ती होईपर्यंत मुलांच्या वाचा-भाषा शिकण्यासाठीची मौल्यवान वर्षे उलटलेली असतात. त्यामुळे मुलांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश नाकारण्याची शक्यता वाढते व नाइलाजाने त्यांना कर्णबधिरांसाठीच्या विशेष शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. त्या दृष्टीने ‘लवकर निदान व तत्पर उपचार’ केंद्र ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे आहे व देशातील प्रत्येक तालुक्यात ते असायलाच हवे आहे. अशी लवकर तपासणीही सक्तीची होणे तितकेच गरजेचे आहे. आव्हान नक्कीच खूप मोठे आहे! त्यासाठी खूप व्यापक जनजागृती व सर्व पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे.
आता काही शासकीय योजनेतूनही या कॉक्लिअर इम्प्लांटच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करवून घेणार्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. शस्त्रक्रियेनंतरचा मुलांचे वाचा-भाषा प्रशिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी आता फक्त महाराष्ट्र राज्यातील नव्हे, तर देशातील प्रत्येक जिल्ह्यात ‘स्वरनाद’सारखी केंद्रे उत्स्फूर्त व स्वयंसेवी प्रयत्नांमधून उभी राहणे नितांत गरजेचे आहे!