‘यतो धर्मस्ततो जय:’ ह्या उक्तीप्रमाणे रामायण ही मूर्तिमंत धर्म असलेल्या रामाच्या विजयाची कथा आहे. दरवर्षी रावणदहन समाजाला अधर्म करणार्याला शिक्षा दिली पाहिजे हे शिकवते. अधर्माने वागू नये हेदेखील रावणदहन शिकवते. कोणी अधर्माने वागत असल्यास रामाप्रमाणे अन्यायाच्या विरुद्ध उभे राहण्यास शिकवते. म्हणूनच एक चांगला समाज घडवण्यासाठी रावणदहन करायची प्रथा पूर्वीच्या शहाण्या लोकांनी सुरू केली असावी. घुबडाला जसे सूर्यदर्शन त्रासदायक ठरते, तसे ही प्रथा समाजकंटकांच्या डोळ्यांत खुपत असेल तर त्यात आश्चर्य ते काय!
प्रभू श्रीरामाची कथा वेगवेगळ्या पंथांनी अनेक भाषांमधून प्राचीन काळापासून सांगितली आहे. ह्या सर्व लेखकांनी वाल्मीकी ऋषींना आदिकवी आणि ‘वाल्मीकी रामायणा’ला आद्यकाव्य मानले. रामायणाचा सर्वप्रथम आणि प्रामाणिक स्रोत ‘वाल्मीकी रामायण’ हे परंपरेने मानले आहे. नंतरहून रामायण लिहिणारे कवी, लेखक, संत, टीकाकार, अभ्यासक... वाल्मीकींना वंदन करून अथवा त्यांच्या रामायणाचा आधार घेऊन रामायण लिहितात. वैष्णव संत रामायण लिहिताना श्रीराम विष्णूचा अवतार असल्याचे सांगतात, जैन मुनी रामायण लिहिताना रामाच्या अहिंसेचे वर्णन करतात, बौद्ध रामकथा रामाच्या सम्यक बुद्धीचे वर्णन करते आणि शीख गुरू रामायण लिहितात तेव्हा ते रामाच्या शौर्याचे वर्णन करतात. वनवासी परंपरेतील रामायणात त्या त्या जनजातीच्या प्रथा दिसतात. एकूण पाहता प्रत्येक पंथ आपापल्या पंथाची शिकवण रामायणाद्वारे सांगतो.
अशा अनेक रामायणांमधून जर आपल्याला मूळ कथानक हवे असेल तर मात्र वाल्मीकींचे रामायण अभ्यासावे लागते. रावणसुद्धा नक्की कसा होता, हे जाणून घ्यायचे झाल्यास वाल्मीकींच्या रामायणाचा आधार घ्यावा लागतो. महर्षी वाल्मीकी सुरुवातीला ह्या काव्यासाठी तीन नावे सुचवतात -
काव्यं रामायणं कृत्स्न्नं सीतायाश्चरितं महत् ।
पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः ॥ 1-4-7
ते म्हणतात, ह्या काव्याचे नाव - ‘रामाचा प्रवास’, ‘सीतेचे महान चरित्र’ किंवा ‘रावणाचा वध’ आहे. हा वरवरचा अर्थ झाला. त्याचा गर्भित अर्थ असा की- रावण हा विश्रवा ऋषींचा मुलगा, पुलत्स्य ऋषींचा नातू अथवा ब्रह्माचा पणतू जरी झाला, तरी तो अधर्माने वागल्याने तो वधास योग्य झाला, शिक्षेस पात्र ठरला. म्हणूनच रावणाचा वध हा ह्या कथेचा विषय आहे.
रावणाचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व ‘वाल्मीकी रामायणा’तून कसे उलगडते ते पाहू -
रावण हा विश्रवा ऋषी आणि कैकसी राक्षसीचा मुलगा. त्याचा मोठा भाऊ कुबेर हा लंकेचा राजा होता. रावणाने कुबेराला लंकेतून हाकलून लावले आणि लंकेचे राज्य हडपले. तसेच त्याने कुबेराचे पुष्पक विमान घेऊन टाकले. कुबेराचा मुलगा नलकुबेर हा पुढे लंकेचा राजा झाला असता; परंतु रावणाने लंका बळकावून घेतल्याने त्याच्या पुतण्याला लंकेच्या राज्यावरील जन्मसिद्ध हक्कावर पाणी सोडावे लागले. रावणाने आपला हा पराक्रम स्वत: मोठ्या प्रौढीने सीतेला सांगितला. विश्रवा ऋषी मुलाच्या वागण्याने त्रासून गेले होते. रावणाने कुबेराशी केलेला दुष्ट व्यवहार पाहून, व्यथित अंत:करणाने विश्रवा ऋषी लंका सोडून निघून गेले.
पुढे विभीषणाने जेव्हा रावणाला कळकळीने सांगितले की, सीतेला पळवून आणलेस हे तू बरे केले नाहीस. सीता रामाला देऊन टाक नाही तर लंकेचा सत्यानाश होईल. कटू परंतु हितकारक बोल सांगणार्या विभीषणाला रावण म्हणाला- अरे निशाचर राक्षसा! हे दुसर्या कुणी म्हटले असते तर मी त्याचे मस्तक उडवून टाकले असते. तू माझा भाऊ आहेस म्हणून तुला मी मारत नाही.
कुलनाशका! तुझा धिक्कार असो! अहंकारी रावणाच्या अशा व्यवहाराने त्याचा लहान भाऊसुद्धा लंका सोडून निघून गेला. ज्या मनुष्याबरोबर त्याचे वडील आणि भाऊ राहू शकत नव्हते, तो मनुष्य स्वभावाने कसा असेल याचा विचार केला पाहिजे.
कुंभकर्णालासुद्धा रावणाने सीतेला पळवून आणलेले आवडले नाही; पण केवळ रावणाच्या क्रोधाला घाबरून तो युद्धाला तयार झाला. कुंभकर्णाला युद्धाला पाठवून, रावणाने त्याला मृत्यूच्या खाईत लोटले.
आपल्याला असे वाटते की, रावण किमान त्याच्या बहिणीसाठी तरी एक चांगला भाऊ होता; पण शूर्पणखा जेव्हा रावणाकडे आली आणि - लक्ष्मणाने माझे नाक कापले, तू त्याचा सूड घे म्हणाली, तेव्हा त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. मग तिने पवित्रा बदलून सांगितले- सीता फार सुंदर आहे. तुला राणी म्हणून शोभेल. तुझ्यासाठी मी तिला घेऊन येणार होते; पण तेवढ्यात लक्ष्मणाने माझे नाक कापले. आता तू जा आणि तिला पळवून आण आणि तिला तुझी पट्टराणी कर. मग इंद्र जसा शचीबरोबर शोभून दिसतो तसा तू तिच्यासह शोभून दिसशील. तेव्हा रावणाने सीतेला पळवून आणायचे ठरवले. शूर्पणखा रावणाबद्दल म्हणते- तो परस्त्रीवर हात टाकणारा, मत्त, निरंकुश, स्वैराचारी आणि कामासक्त माणूस आहे.
मंदोदरीने, तिच्या पित्याने, विभीषणाने, कुंभकर्णाने, मारिचाने- अशा अनेकांनी रावणाला उपदेश केला की, सीतेला पळवून आणणे चूक आहे, तिला रामाकडे परत कर; पण त्याने कुणाचेही ऐकले नाही. इतर राक्षस त्याच्या बाजूने उभे असले तरी तेसुद्धा रावणाने गुन्हा केला हे मान्य करतात. प्रहस्त नावाच्या राक्षसाने उघडपणे म्हटले- रावणा! तुझ्याकडून सीतेला पळवून आणण्याचा अपराध जरी घडला असला, तरी तू काळजी करू नकोस! आम्ही हनुमानाचा बंदोबस्त करू! (6.8.5)
रावणाबद्दल अजून एक गैरसमज आहे की, त्याने सीतेला हातसुद्धा लावला नाही. हा प्रश्न महापार्श्व नावाच्या राक्षसालासुद्धा पडला होता. युद्धाच्या आधी त्याने रावणाला विचारले की, तू का बरे त्या पळवून आणलेल्या स्त्रीचा बळजबरीने उपभोग घेत नाहीस? तेव्हा रावणाने त्याला सांगितले, मी तुला माझे गुपित सांगतो - पूर्वी मी पुंजिकस्थला नावाच्या अप्सरेचा बलात्काराने उपभोग घेतला. त्यावर तिने ब्रह्माकडे तक्रार केली. तेव्हा ब्रह्माने मला शाप दिला- पुन्हा कुठल्याही स्त्रीचा बळाने उपभोग घेतलास तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील. म्हणून मी सीतेला हात लावत नाही. (6.13.10)
रावणाला सहा पुत्र होते- मेघनाद, अतिकाय, नरांतक, देवांतक, त्रिशिर आणि अक्षयकुमार. या सर्वांना त्याने रामाशी युद्ध करायला पाठवले. हे युद्ध राष्ट्राच्या रक्षणासाठी नव्हते, तर सीतेपेक्षा मोठ्या वयाचा मुलगा असलेल्या प्रौढ रावणाला तरुण आणि सुंदर बायको मिळावी म्हणून युद्ध चालू होते. त्या युद्धात त्याचे सहाच्या सहा पुत्र कामी आले. दुसर्याची बायको मिळवण्यासाठी त्याने स्वत:च्या मुलांचा बळी दिला, भावांचा बळी दिला, पुतण्यांचा बळी दिला, प्रजेचा बळी दिला. स्वत:च्या हव्यासापायी लंका जाळली गेली आणि राज्यावर युद्ध लादले गेले.
नियम मोडणार्याला, दुसर्यांना त्रास देणार्याला, स्त्रीला भोगवस्तू समजणार्याला - शिक्षा होणे हा न्याय आहे. आज संविधानानुसार एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेणार्याला कारावासाची शिक्षा सांगितली आहे. (IPC Section 368, IPC Section 366)
रावणाने सीतेला धमकी दिली होती- लग्नाला होकार देण्यासाठी तुला एका वर्षाचा अवधी दिला होता. आता त्यातील दोन महिने उरले आहेत. दोन महिन्यांत माझ्याशी विवाह केला नाहीस तर तुला मारून, दुसर्या दिवशी स्वयंपाक्याकडून तुझं मांस शिजवून मी न्याहारीला खाईन. (5-22-9) अशा प्रकारची धमकी दिल्यास आज संविधानाने त्याला सात वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा दिली आहे. (IPC 503, 506)
रावणाने सीतेला फसवून पळवले (राम-लक्ष्मण कुटीत नसताना, वेश बदलून, भिक्षेच्या बहाण्याने तिला कुटीतून बाहेर येण्यास भाग पाडले), तिला दूर एका बेटावर डांबून ठेवले, भोवतीने राक्षसी पहार्यावर ठेवल्या आणि लग्नाला होकार मिळवण्यासाठी ठार मारायची धमकी दिली... ह्या सर्व गोष्टी आजसुद्धा कायद्याने गुन्हे समजल्या जातात.
रावणाचे आचरण असे असल्याने ‘वाल्मीकी रामायण’ असो, जैन रामायण असो, शाक्त परंपरेतील रामायण असो, वनवासी परंपरेतील रामायण असो अथवा शीख रामायण असो... प्रत्येक रामायणात तपशिलात थोडाफार फरक असला तरी राम-लक्ष्मण-सीता नायक आहेत आणि प्रत्येक रामायणात रावणाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्याच्याशी युद्ध करून त्याचा वध केला जातो.
एका इंग्रजी नियतकालिकाने मागच्या दसर्यानिमित्त ‘रावणलीला’ नावाचा विशेषांक काढला, ज्यामध्ये वीसेक लेखांतून रावणाचे यथेच्छ गुणगान केले आहे. स्त्रियांवर अन्याय करणार्या रावणाला तो राजा होता, विद्वान होता, शिवाय छान वीणा वाजवत असे म्हणून रामाने त्याचा वध करणे बरोबर नव्हते, तसेच आजकाल आपण दसर्याला रावणदहन करतो तेदेखील बरोबर नाही, अशा आशयाचे लेख छापले आहेत. ह्या लेखांमध्ये आणि - कोणा गरीब मास्तराच्या मुलाने बॉम्बस्फोट केला तर त्याला क्षमा करा म्हणणारे; कोणा अमीरजाद्याने बेफाम गाडी चालवून माणसांना उडवले तर त्याला सोडून देणारे; कोणा प्रसिद्ध नटाने बेकायदेशीर शिकार केली तर त्यावर अवाक्षर न काढणारे; स्त्रीवर अत्याचार करणार्याला शिक्षा देण्याऐवजी शिलाईयंत्र देणारे... अशा वृत्तांमध्ये काही एक फरक नाही. अशा नियतकालिकांमधून येणारे लेख म्हणजे, श्रीराम मंदिराची निर्मिती झाल्याने आणि रामाच्या विरुद्ध आजपर्यंत मांडलेले मुद्दे फोल असल्याचे उघड झाल्याने जळफळाट होऊन रावणाचा उदोउदो करायचा डाव्यांचा हा एक वायफळ प्रयत्न आहे.
रावणाविषयी रामाने म्हटले आहे, अधर्माने आचरण करणारा रावण बलवान आहे. त्याने इंद्रालासुद्धा हरवले होते, असे मी ऐकलंय. तर हनुमानाने रावणाबद्दल म्हटले, हा जर अधर्मी नसता, तर इंद्राबरोबर हा त्रैलोक्याचा रक्षणकर्ता झाला असता. दोघेही रावणाला धर्माच्या विरुद्ध वागणारा म्हणतात. म्हणजेच- रावण राजाचा धर्म पाळत नव्हता (प्रजेचे रक्षण करत नव्हता), पुत्रधर्म पाळत नव्हता (वडिलांना लंकेतून घालवले होते), पित्याचा धर्म पाळत नव्हता (मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल असे काही करत नव्हता), बंधुधर्म पाळत नव्हता (सगळ्या बंधूंना एक तर हाकलून लावले नाही तर युद्धात मरायला पाठवले)... इत्यादी.
रावण वेद जाणणारा होता, नित्य अग्निपूजा करणारा होता, तपस्या करणारा होता, शिवाचा भक्त होता, विद्वान होता, धैर्यवान होता, वीणावादक होता वगैरे चांगले गुण त्याच्याकडे होते; पण जसे एका वाळलेल्या वृक्षाला लागलेल्या आगीने पूर्ण वन जळून जाते अथवा एका कुपुत्रामुळे संपूर्ण कुळाचा नाश होतो त्याप्रमाणे केवळ एका दुर्गुणाने मनुष्याचा नाश होतो.
एकेन शुष्क वृक्षेण दह्यमानेन वह्मिना।
दह्यते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा॥
रावणामध्ये एक नाही तर अनेक दुर्गुण होते - पर-दार-अभिमर्शनम् (परस्त्री पळवणे), पर-राज्य-ग्रहणम् (दुसर्याचे राज्य हडपणे), पर-धन-हरणम् (दुसर्याचे धन चोरणे), पर-पीडा-दातुम् (दुसर्यांना पीडा देणे), असत्य-वदम् (खोटे बोलणे) इत्यादी. मग त्याचा नाश होणे स्वाभाविक होते. त्याची टक्कर जेव्हा तुल्यबळ रामाशी झाली तेव्हा त्याचा नाश निश्चित झाला.
‘यतो धर्मस्ततो जय:’ ह्या उक्तीप्रमाणे रामायण ही मूर्तिमंत धर्म असलेल्या रामाच्या विजयाची कथा आहे. दरवर्षी रावणदहन समाजाला अधर्म करणार्याला शिक्षा दिली पाहिजे हे शिकवते. अधर्माने वागू नये हेदेखील शिकवते. कोणी अधर्माने वागत असल्यास रामाप्रमाणे अन्यायाच्या विरुद्ध उभे राहण्यास शिकवते. म्हणूनच एक चांगला समाज घडवण्यासाठी रावणदहन करायची प्रथा पूर्वीच्या शहाण्या लोकांनी सुरू केली असावी. घुबडाला जसे सूर्यदर्शन त्रासदायक ठरते, तसे ही प्रथा समाजकंटकांच्या डोळ्यांत खुपत असेल तर त्यात आश्चर्य ते काय!