सुटो ब्रीद आम्हांसी सांडूनी जाता

विवेक मराठी    30-Nov-2024   
Total Views |
@सुरेश जाखडी 7738778322
परमेश्वर अत्यंत दयाळू असल्याने तो भक्ताचे पूर्वायुष्य पाहात नाही. भक्ताची भक्ती, प्रेम, शरणागत अवस्था पाहून तो भक्तावर कृपा करतो. भेदभाव न करता भगवंत भक्ताला उद्धाराची संधी देत असतो. शरणागत भक्ताचा उद्धार करणे हे परमेश्वराचे ब्रीद असते, तशी त्याची प्रतिज्ञा असते. भगवंत आपले ब्रीद कधी सोडत नाही. ‘रघुनायका मागणे हेचि आता’ या ‘करुणाष्टका’च्या शेवटच्या श्लोकातून भक्त देवाला, तुझ्या ब्रीदासाठी या दीन दासाला उद्धरावे, अशी विनंती करीत आहे.

ramdas swami
 
सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी अहंकार, देहबुद्धी, गर्व, ताठा हे भाव पुरेपूर भरलेले असतात. आपल्या मदाहंकाराने तो इतरांना तुच्छ समजतो. त्याला वाटत असते की, मी श्रेष्ठ, मी शहाणा, मी शक्तिमान. स्वतःविषयी असा समज झाल्याने त्याला परमेश्वरी सत्तेचाही विसर पडतो; तथापि हा गर्व, अहंकार फार काळ टिकत नाही. प्रत्येक माणसाला आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी दुःख, दैन्य, नैराश्य, विघ्न, आजारपण, शारीरिक क्लेश, अपमान या किंवा यापैकी काही अवस्थांना सामोरे जावे लागते. या दुःखद स्थिती अनुभवत असताना काही काळ आपण निराधार आहोत, असहाय आहोत याची जाणीव झाल्याने माणसाचे मन सृष्टिनिर्मात्याचा विचार करू लागते. ऐश्वर्यसंपन्न, दयाळू सृष्टिकर्ता परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन प्रार्थना करावी असे त्याला वाटू लागते. या प्रार्थनेतून भक्ताला आपल्या आंतरिक उणिवांची जाणीव होते आणि समाधानप्राप्तीसाठी परमेश्वराची कृपा मिळवावी असे त्याला वाटू लागते. स्वामींनी ‘दासबोधा’त पारमार्थिक प्रगतीची बद्ध-मुमुक्षू-साधक-सिद्ध ही स्थित्यंतरे वर्णन केली आहेत. बद्ध अवस्थेत माणूस आपल्या देहालाच सर्वस्व मानून दृश्य जगाला शाश्वत व नित्य समजत असतो.
 
 
सर्व ऐहिक गोष्टी माझ्यासाठी आहेत, या भावनेतून तो स्वार्थी बनतो. स्वार्थ, अहंकार, मीपणा हे बद्धाचे जीवन असते. त्यानंतर अहंभाव, मीपणा बाजूला सारून परमेश्वर चिंतनाकडे वळणार्‍या माणसाला स्वामींनी मुमुक्षू म्हटले आहे. मुमुक्षू अवस्थेकडे वळलेल्या भक्ताला आपले पूर्वीच्या बद्धावस्थेतील विकार, अहंभाव, स्वार्थ आठवून आपला उद्धार कसा होणार याची चिंता वाटू लागते; तथापि शरणागत भक्त कसाही असला तरी त्याचा उद्धार करणे हे परमेश्वराचे ब्रीद आहे. परमेश्वर अत्यंत दयाळू असल्याने तो भक्ताचे पूर्वायुष्य पाहात नाही. भक्ताची भक्ती, प्रेम, शरणागत अवस्था पाहून तो भक्तावर कृपा करतो. अशा भक्ताचे पूर्वायुष्य देव पाहात नाही. भेदभाव न करता भगवंत भक्ताला उद्धाराची संधी देत असतो. शरणागत भक्ताचा उद्धार करणे हे परमेश्वराचे ब्रीद असते, तशी त्याची प्रतिज्ञा असते. भगवंत आपले ब्रीद कधी सोडत नाही. ‘रघुनायका मागणे हेचि आता’ या ‘करुणाष्टका’च्या शेवटच्या श्लोकातून भक्त देवाला, तुझ्या ब्रीदासाठी या दीन दासाला उद्धरावे, अशी विनंती करीत आहे.
 
ब्रिदाकारणें दीन हातीं धरावे ।
म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावें ।
सुटो ब्रीद आम्हासि सांडूनि जाता ।
रघुनायेका मागणें हेंचि आता ॥9॥
 
यापूर्वीच्या श्लोकांतून स्वामींनी भक्ताच्या मनातील आर्तता, तळमळ, व्याकूळता, श्रद्धा इत्यादी भाव प्रकट करून देवाची करुणा भाकली आहे. भक्त म्हणतो, देवा, माझ्या मनात सांसारिक स्वार्थ, मोह ठेवू नको. द्रव्यदारा इत्यादी ऐहिकाची लालसा, कुबुद्धी, दुराशा, संशय, भय, नैराश्य, चिंता या विकारांपासून माझी मुक्तता कर. हे सारे देवाला सांगून झाले, तरीही भगवंताजवळ काय मागावे हे समजत नाही, असे खर्‍या भक्ताच्या मनातील विचार स्वामींनी प्रकट केले आहेत. ’समर्थापुढे काय मागो कळेना’ अशी शरणागत भक्ताची अवस्था स्वामींनी मागील श्लोकात वर्णन केली आहे. शरणागत भक्ताचे रक्षण करून त्याचा उद्धार करणे हे भगवंताचे ब्रीद आहे. त्या ब्रीदासाठी तरी माझ्यासारख्या अज्ञानी भक्ताला तू हाताशी धरावे आणि माझा उद्धार करावा, असे भक्ताचे भगवंताजवळ मागणे आहे. देव शरणागत भक्ताचे रक्षण करतो, त्याचा उद्धार करतो. याच्या समर्थनार्थ स्वामींनी काही शास्त्राधार या ‘करुणाष्टका‘त दिलेले नाहीत किंवा काही आधारभूत पुराणकथांचा उल्लेखही येथे केलेला नाही; तथापि मनाच्या श्लोकांत ’नुपेक्षी कंदा देव भक्ताभिमानी’ या श्लोकगटात काही पुराणकथांचे संदर्भ देत, देव कधीही भक्ताची उपेक्षा करीत नाही, असे स्वामींनी स्पष्ट केले आहे. त्या पुराणकथा येथे ’करुणाष्टका’तील देवाचे ब्रीद सांगण्याकरिता उपयोगी आहेत. तत्कालीन लोकांना या कथा परिचित होत्या. त्यातील काहींचा धावता आढावा घेऊन देव आपल्या ब्रीदाला पावणारा आहे, हे पाहता येईल. तसेच तो भक्तांची काळजी घेतो याचाही प्रत्यय येईल. त्या कथांत भगवंताने आपला भक्त अंबरिष राजाला दुर्वास ऋषींच्या शापातून कसे मुक्त केले, त्याचप्रमाणे ज्याला गाईचे धारोष्ण मधुर दूध कधी प्यायला मिळाले नाही अशा अत्यंत गरिबीत वाढलेल्या भक्त उपमन्यूला भगवंतांनी दुधाचा सागरच दान देऊन टाकला. ध्रुव बाळाची कथा अशीच आहे. त्याला भगवंतांनी अढळपद मिळवून दिले. भक्त प्रल्हादाच्या कथेत, या शरणागत निष्ठावान भक्ताला अनेक संकटांतून, जीवघेण्या प्रसंगांतून सहीसलामत बाहेर काढले. प्रल्हाद नारायणाचे नाव घेतो व नारायणाची भक्ती करतो म्हणून त्याला छळणारा, त्याचा बाप हिरण्यकश्यपू या असुराला भगवंतांनी भक्तासाठी नृसिंह अवतार घेऊन कसे ठार मारले आणि आपला भक्त प्रल्हाद याला अभय दिले, या व इतर अनेक पुराणकथांचा संदर्भ देत स्वामींनी मनाच्या श्लोेकांत असा निष्कर्ष काढला आहे की,
 
’अनाथासि आधार चक्रपाणी’
 
म्हणून ’रघुनायका मागणे हेचि आता’ या ‘करुणाष्टका’च्या शेवटच्या श्लोेकात स्वामी देवाला त्याच्या ब्रीदाची आठवण करून देत आहेत आणि या भक्ताला, दासाला, शरणागताला उद्धरावे, अशी विनंती करीत आहेत. देवाशी जवळीक साधल्याने, या शरणागत भक्ताने भगवंताला एक सरळ प्रश्न विचारला आहे की, हे भगवंता, तू जर मला म्हणजे या अनाथ भक्ताला असेच सोडून दिले तर, ‘अनाथांचा, भक्तांचा उद्धार करणे’ हे तुझे ब्रीद, ही तुझी प्रतिज्ञा खोटी ठरणार नाही का? तेव्हा तुला मला, या अनाथ शरणागत भक्ताला, तसेच सोडून देता येणार नाही. मला उद्धरून न्यावे लागेल. मी तुला विनवीत आहे की, हे देवा, माझे प्रापंचिक मोह दूर सारावे. मला मायापाशातून मुक्त करावे. माझ्या मनातील संसारव्यथा, भय, चिंता, वासना, कुबुद्धी हे विकार दूर करावेत आणि तुझे ब्रीद राखून या अनाथाचा उद्धार करावा. हे भगवंता, तू ब्रीदाला जागणारा आहेस. या अनाथाला तू असेच सोडून दिलेस तर तुझे ब्रीदवाक्य खोटे ठरेल. असे स्पष्टपणे आपल्या धन्याला, देवाला सांगणारा हा दास आहे, भक्त आहे. या भक्ताच्या ठिकाणी सख्यभक्ती उदित झाल्याने या ‘सुटो ब्रीद आम्हांसि सांडूनि जाता’ असे म्हणण्याचे तो धाडस करीत आहे. अशा धाडसातच खरे भक्तिप्रेमसुख आहे. ते ज्ञानी पंडितांना मिळणार्‍या ज्ञानानंदापेक्षा श्रेष्ठ आहे असे भक्ताला वाटत असते. सर्व संतांनी पंडिती ज्ञानापेक्षा भक्तिप्रेमाला महत्त्व दिले आहे. संत तुकाराम म्हणतात,
 
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियांसि ।
 
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तूं देव ऐसे करी ॥
 
यानंतर, समर्थांनी लिहिलेल्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या करुणाष्टकांचा परिचय पुढील लेखापासून करून घ्यायचा आहे. त्यावर चर्चा करताना भक्ताच्या अंत:करणातील सच्चेपणा, प्रेमाची आर्तता यांचा प्रत्यय येईल आणि समर्थांच्या प्रभावी वाणींचा अनुभव घेता येईल.
 

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..