नाशिकमध्ये वृद्धांसाठी ‘आनंदालय’

विवेक मराठी    30-Nov-2024   
Total Views |
 
Anandalay
बदलणारी कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती पाहता कुटुंबातील ज्येष्ठांना आनंद, समाधान व सन्मानाने जगता येईल अशी रचना असली पाहिजे. या संकल्पनेतून वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आनंदालय’ हा प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहिला आहे.
यंदाच्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे घोषवाक्य ’वृद्धत्वाचा सन्मान’ हे आहे. विभक्त कुटुंब पद्धती, परदेशात मुले आणि बदलणारी सामाजिक परिस्थिती यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे. यापुढच्या काळात वृद्धाश्रमात राहणार्‍या ज्येष्ठांची संख्या वाढत जाणार असेल, तर त्यांना आनंद, समाधान मिळेल व सन्मानाने जगता येईल अशी रचना असली पाहिजे. या संकल्पनेतून ’आनंदालय’ हा प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहिला आहे. नाशिकच्या गंगापूर रोडवरील सोमेश्वर लॉन्सजवळ आल्हाददायक वातावरणात हा सुंदर प्रकल्प साकारण्यात आला आहे.
 
वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे ’आनंदालय’ उभे राहिले आहे. देणगीदाखल मिळालेल्या एक एकर जागेत 20 हजार चौ. फुटांवर दोन मजली इमारत बांधण्यात आली असून वृद्धांना सोयीस्कर ठरतील अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. 15 हजार ते 20 हजार रुपये दरमहा देऊन त्यांना सुखासमाधानाने राहता येईल. दोन, तीन व चार जणांची सोय असणार्‍या 24 खोल्या बांधण्यात आल्या असून त्याशिवाय महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र निवासव्यवस्थादेखील करण्यात आली आहे. सुसज्ज स्वयंपाकघर, भोजनकक्ष, वाचनालय, बैठे खेळघर बांधण्यात आले आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सौर ऊर्जेवर विजेची गरज भागवली जाईल. गरजेनुसार वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. त्यासाठी श्रीगुरुजी रुग्णालयाचे सहकार्य लाभले आहे. एकूण 85 वृद्ध स्त्री-पुरुष येथे आयुष्याची संध्याकाळ आनंदाने सकारात्मक समाधानात घालवू शकतील. पहिल्या टप्प्यात 50 वृद्धांची व्यवस्था करण्यात येत आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक आजी-आजोबा राहायला येत आहेत.
 

Anandalay 
 
अधिक माहितीसाठी
संस्था खजिनदार - हेरंब गोविलकर - 9890368689
प्रकल्प प्रमुख- अपर्णा रत्नपारखी - 9881155180 
 
 
वृद्धाश्रम ही खरे तर पाश्चिमात्य संकल्पना. भारतीय संकल्पना वानप्रस्थाश्रमाची! पण वानप्रस्थाश्रम हा स्वखुशीचा मामला होता. वृद्धाश्रमात राहणे म्हणजे पहिल्यांदा लादलेला मामला वाटतो. सुरुवातीच्या काळात नकोशा वाटणार्‍या माणसांना नाइलाजाने पाठविण्याचे ठिकाण म्हणजे वृद्धाश्रम अशी समजूत दृढ होती. तिथे स्वखुशीने जावे असे कोणालाच वाटत नसे; पण नंतर काळ बदलला तशी समजूत, रीत बदलली. अनेक ज्येष्ठ आता स्वखुशीने वृद्धाश्रमात जाण्यास तयार असतात. वृद्धाश्रमांतही सुधारणा होत आहेत. या आनंदालयात घरपण, मायेचा ओलावा, आपलेपणा, जिव्हाळा आणि स्वातंत्र्य अनुभवता येईल. येथे गरजेनुसार परवडणार्‍या शुल्कात चार दिवसांपासून अधिक काळापर्यंत राहता येईल. जवळच सोमेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, गंगापूर धरण आहे. आगामी काळात योग, प्राणायाम, भजनसंध्या, करमणुकीचे कार्यक्रम, व्याख्याने असे उपक्रम सर्वांच्या सहकार्याने आयोजित केले जातील.
 


Anandalay 
 
या इमारतीची वाडा, चौक अशी रचना सुंदर दिसते. आल्हाददायक वातावरण, उत्तम सेवा व सर्वांना परवडणारे दर ही आनंदालयाची त्रिसूत्री आहे. अनेक संस्था, आस्थापना यांनी देणग्या देऊन आनंदालय वास्तू उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. सीएसआर फंडातून भरीव मदत केली आहे. अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांच्यासह सचिव विनीत महाजन, संपतराव पाटील, सतीश चितळे, श्रीराम महाजन, महेंद्र वारे, चंदूभाई पटेल, अ‍ॅड. श्याम घरोटे, किर्तिश जोशी यांनी अखंड परिश्रम करून हा प्रकल्प आकाराला आणला आहे.
 
 

संजय दामोदर देवधर

  • ज्येष्ठ पत्रकार, आणि आदिवासी वारली चित्रशैली अभ्यासक.

  • नाशिक येथे दैनिक गावकरीमध्ये 34 वर्षे कलाविभाग प्रमुख, वार्ताहर, कलासमीक्षक व उपसंपादक पदावर काम करून निवृत्त. सध्या फ्रिलान्स पत्रकारिता सुरु.

  • शैक्षणिक अर्हता - जी.डी.आर्ट ( ऍप्लाईड ) 1982 साली जे जे स्कुल ऑफ आर्ट येथून अव्वल श्रेणीत उत्तीर्ण.

  • अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांशी निकटचे संबंध व पदाधिकारी म्हणून कार्य. विविध स्पर्धांच्या परीक्षणाचा अनुभव.

  • संशोधनपर कार्य- आदिवासी वारली चित्रशैलीविषयी विशेष संशोधन. कार्यशाळांचे आयोजन करुन अनेकांना वारली कला शिकविण्याचा उपक्रम सुरु. आत्तापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो कलाप्रेमींना वारली चित्रकलेचे मार्गदर्शन. परदेशी पर्यटक देखील येऊन वारली कलेचे धडे गिरवतात.

  • वारली चित्रकलेच्या प्रसार व प्रचारासाठी वारली चित्रसृष्टी हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. त्याच्या चार आवृत्त्या लोकप्रिय झाल्या आहेत. Warli Art World या इंग्लिश पुस्तकाच्या दोन आवृत्ती परदेशातही पोहोचल्या आहेत. रसिक वाचकांचा या पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

  • चित्रसहल या आगळ्यावेगळ्या उपक्रमात आदिवासी पाड्यांवर शहरी कलाप्रेमींना नेऊन वारली जीवनशैली, त्यांची कला यांचे सुरेख दर्शन घडवले जाते. आतापर्यंत अनेकजण सहकुटुंब सहलीत सहभागी झाले.

  • विश्वविक्रम - ऑगस्ट 2018 मध्ये 1100 पेक्षा अधिक स्पर्धकांची ऑन द स्पॉट वारली चित्रस्पर्धा घेतली व दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. सर्वाधिक सहभागाबद्दल जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड तर चित्रांद्वारे सामाजिक संदेश दिल्याने वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले.

  • पत्रकारितेत विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने सन 2019 मध्ये वारली कलेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.