झोपलेला जागा झाला, त्याने चमत्कार केला

29 Nov 2024 13:15:53
@दिनकर माहुलीकर
विधानसभा निवडणुकीत जागावाटपापासून प्रत्यक्ष प्रचारापर्यंत महायुतीमध्ये जबरदस्त समन्वय होता. महायुतीचे यश हा राज्य सरकारची कामगिरी, लोककल्याणकारी योजनांचा परिणाम, भाजपचा संघटनात्मक प्रयत्न, विचार परिवाराने दिलेली साथ या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे; पण अखेरीस राष्ट्रीय विचारांचा मतदार उदासीनता झटकून मतदानाला बाहेर पडला म्हणून हे प्रयत्न यशस्वी झाले. मतदानाच्या वेळी जागे राहून हमखास मतदान केले, तर हिंदू समाजाचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, हा विधानसभा निवडणुकीचा धडा आहे.

bjp
 
भारतीय जनता पक्ष महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 288 पैकी 230 जागा जिंकून महाविजय मिळविला. या निवडणूक निकालाने संघ-भाजपविरोधी शक्तींना जेवढा धक्का बसला तितकाच आश्चर्याचा धक्का समर्थकांनाही बसला. भाजपच्या चिन्हावर 149 उमेदवार उभे होते व 132 निवडून आले, सुमारे 89 टक्के उमेदवार विजयी झाले. संसदीय लोकशाही पद्धतीतील निवडणुकीच्या राजकारणात ही अशक्य वाटणारी बाब आहे. दिल्ली किंवा तमिळनाडूत असे टोकाचे निकाल लागले होते; पण महाराष्ट्रात कधी असे होईल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नसणार.
 
 
निवडणुकीतील हा चमत्कार मतदारांनी केला आहे. त्यांना जागे करणार्‍या शक्तींनी केला आहे. मतदारांना आश्वासक वाटणारी कामगिरी करणार्‍या भाजप महायुती सरकारने केला आहे. मतदारांना भरवसा वाटेल अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिद्दीने पक्षाला मोठे यश मिळवून देणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
 
 
 
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप महायुतीचा पराभव झाला होता. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 31 मतदारसंघांतील जागा महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बंडखोर अपक्ष यांनी जिंकल्या. महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. 2014 आणि 2019 या सलग दोन लोकसभा निवडणुकांत 48 पैकी 42 जागा जिंकणार्‍या भाजप महायुतीची प्रचंड घसरण झाली. लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत होती. सहा महिन्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकीतही असाच निकाल लागेल आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल, असे महाविकास आघाडीने आणि पत्रकारांनी गृहीत धरले होते.
 

bjp 
 
जो जे वांछिल तो ते लाहो...
 
 
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यानंतर भाजप महायुतीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या राज्य सरकारची कामगिरी सरस होतीच. त्याला आता प्रभावी लोककल्याणकारी योजनांची जोड दिली. महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ‘शेतकर्‍यांच्या कृषिपंपांना मोफत वीज’ अशा योजनांचा धडाका लावला. केवळ योजनांची घोषणा झाली नाही, तर खूप कमी वेळ असूनही त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. महिलांची नोंदणी करून त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेही. शेतकर्‍यांचे कृषिपंपांचे बिल सरकारने भरले आहे, अशा शून्य रकमेच्या चालू बिलाच्या पावत्या शेतकर्‍यांना महावितरण या सरकारी वीज वितरण कंपनीकडून पोहोचल्या. या लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 32 लाख आहे, तर मोफत वीज मिळणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या 44 लाख आहे. यामुळे महायुतीच्या सफल योजनांची व्यापकता लक्षात येईल. महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक, मराठा, ओबीसी, दलित अशा सर्व घटकांना दिलासा वाटेल असे काही ना काही तरी ठोस असे महायुती सरकारने घोषित केले व त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ओबीसींमधील गुरव जातीसारख्या संख्याबळाने छोट्या असणार्‍या जातींची पहिल्यांदाच दखल घेतली गेली. त्यांच्यासाठी महामंडळे घोषित झाली. अगदी ब्राह्मण समाजासाठीही महामंडळ घोषित झाले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा खूप झाली. मराठा समाजाला भाजप महायुती सरकारने कायदा करून नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण दिले व त्याची अंमलबजावणी सुरू होऊन हजारो उमेदवारांना लाभ झाला याची चर्चा माध्यमांनी केली नाही. संबंधित कुटुंबांना आणि समाजाला मात्र प्रत्यक्ष अनुभव आला होता. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजासाठीची सारथी ही संस्था मोडकळीस आणली होती. त्या मुद्द्यावर कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींनी उपोषणही केले होते. महायुती सरकारने सारथी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा प्रभावी काम सुरू केले. मराठा समाजातील युवक-युवतींना व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मदत केली. मराठा समाजातील असे एक लाख व्यावसायिक या महामंडळाच्या आर्थिक साहाय्यामुळे उभे राहिले आहेत. थोडक्यात, महायुती सरकारने विविध समाजघटकांसाठी केवळ आकर्षक घोषणा केल्या नाहीत, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणीही सुरू केली. वाचकांच्या माहितीसाठी सांगायला हवे की, जरांगे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात होता. विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील एकूण 46 जागांपैकी 41 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यामध्ये भाजपने 20 जागा लढवून 19 जागा जिंकण्याचा समावेश आहे.
 
 
 
लोकसभेतील पीछेहाटीचे वास्तव...
 
लोकसभा निवडणुकीत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसर्‍यांदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले; पण महाराष्ट्रात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे माध्यमांमधून भाजप महायुतीने सर्व काही गमावले असे चित्रण होत असले तरी त्या पराभवामागचे वास्तव वेगळे होते. काही ठिकाणी झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचा हा परिणाम होता. उदाहरणार्थ धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पाच विधानसभा मतदारसंघांत एकूण 1 लाख 89 हजार मतांनी पुढे होता; पण मालेगाव मध्य या मुस्लीमबहुल मतदारसंघात काँग्रेसला एकूण 1 लाख 98 हजार मतांपैकी 1 लाख 94 हजार मते मिळाली आणि काँग्रेसने धुळे लोकसभा मतदारसंघ जिंकला. मुसलमानांनी व्होट जिहाद केला आणि हमखास जिंकणारच आहे म्हणून हिंदू झोपी गेला याचा हा परिणाम होता. ईशान्य मुंबईचा लोकसभा मतदारसंघही असाच गमावला.
 
 
भाजप महायुतीचा राज्यात लोकसभा निवडणुकीत सार्वत्रिक दारुण पराभव झालेला नव्हता. लोकसभा मतदारसंघांच्या अंतर्गत असलेल्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर महाविकास आघाडी 154 विधानसभा मतदारसंघांत आघाडीवर होती, तर भाजप महायुती 126 मतदारसंघांत आघाडीवर होती. राज्यात बहुमतासाठी 145 आमदारांची गरज असते, हे ध्यानात घेतले तर स्पष्ट होते की, लोकसभेच्या वेळीच महाविकास आघाडी फार पुढे नव्हती आणि महायुती फार मागे नव्हती. महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकूण मतांमध्येही फार फरक नव्हता. त्यामुळेच महायुतीला पुन्हा उभे राहण्यासाठी आधार होता. गरज होती फक्त आपल्या झोपलेल्या मतदारांना जागे करण्याची आणि निवडणुकीचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने करण्याची.
 
 
या विधानसभा निवडणुकीत जागावाटपापासून प्रत्यक्ष प्रचारापर्यंत महायुतीमध्ये जबरदस्त समन्वय होता. तीन मोठे पक्ष, अनेक छोटे पक्ष असे आव्हान असूनही जागावाटप सुरळीत पार पडले. अस्तित्वाची लढाई असल्याने महायुतीचे घटक पक्ष रागलोभ सोडून समन्वयाने काम करत होते. निवडणुकीच्या जाहिराती, सभांचे नियोजन, सोशल मीडियातील मोहीम अशा सर्व पातळ्यांवर कटकटी न होता सर्व सुरळीत पार पडले. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत एक विशेष बाब घडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचे सर्व नेते व कार्यकर्ते कामाला लागले होतेच. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना सज्ज झाली होती. त्यासोबत भाजपचे अनेक मातबर केंद्रीय नेते व अन्य राज्यांतील प्रभावी कार्यकर्ते महाराष्ट्रात आले व त्यांनी भाजपच्या विजयासाठी अपार मेहनत केली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना अनुक्रमे राज्य निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. नियुक्तीनंतर सुमारे चार महिने त्यांनी राज्यातच ठाण मांडून प्रभावी सूत्रसंचालन केले.
 
 
दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र आपण राज्यात लोकसभा निवडणूक जिंकली आणि विधानसभा निवडणूक जिंकणे ही फक्त औपचारिकता आहे, या भ्रमात राहिली. आता फक्त मुख्यमंत्री ठरवायचा आहे आणि मंत्रिमंडळाचा शपथविधीच बाकी आहे, अशा मानसिकतेत महाविकास आघाडीचे नेते आणि समर्थक राहिले. त्यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धाही सुरू झाली होती. हमखास विजय मिळणार आहे, काही करायची गरज नाही, अशा भ्रमात असलेल्या महाविकास आघाडीत कमालीचा विसंवाद राहिला. जागावाटपापासून प्रत्यक्ष प्रचारापर्यंत विसंवाद जाणवला. मतदानाच्या दिवशी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये महाविकास आघाडीपेक्षा अन्य उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याचा प्रकार घडला व त्याची तीव्र प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत उमटली. विसंवादाची अशी अनेक उदाहरणे आहेत.
 


bjp 
 
नॅरेटिव्ह उलटला...
 
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले; पण भाजपने स्वतःचे बहुमत गमावले. पक्षाच्या पीछेहाटीला काँग्रेस आघाडी आणि तिच्या समर्थक डाव्या चळवळ्यांनी निर्माण केलेला खोटा नॅरेटिव्ह कारणीभूत ठरला. कार्यकर्त्यांसमोर काही निश्चित ध्येय असावे म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या चारशेपार जागा निवडून येतील, अशी घोषणा करण्यात आली होती. चारशेपार म्हणजे संविधान बदलणार आणि आरक्षण रद्द करणार, असा खोटा नॅरेटिव्ह (विमशर्र्) काँग्रेस आघाडीने निर्माण केला. परिणामी मुस्लिमांसोबतच दलित आदिवासींच्याही विरोधी मतदानाचा फटका भाजप आघाडीला बसला. हे सर्व विमशर्र् खोटे होते; पण भीती निर्माण करण्यात काँग्रेस आघाडीला यश मिळाले. महाराष्ट्रात त्याचा विशेष फटका बसला. विधानसभा निवडणुकीसाठी हा मुद्दा नव्हता, कारण संविधान बदलण्याचा अधिकार विधानसभेला नाही.
 

bjp 
 
दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत नॅरेटिव्हच्या बाबतीत महाविकास आघाडीची फरफट झाली. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने’ला महाविकास आघाडीने सुरुवातीला विरोध केला, त्या पैशांना लाच म्हणूनही हिणवले; पण नंतर ‘लाडकी बहीण योजना’ गेम चेंजर ठरत आहे, असे लक्षात आल्यावर महाविकास आघाडीने दरमहा 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. व्होट जिहादच्या मुद्द्यावरून बहुसंख्य समाजात जागृती निर्माण होत होती, मौलानांचे व्हिडीओ आणि त्यांचा महाविकास आघाडीसोबतचा पत्रव्यवहार सोशल मीडियात व्हायरल होत होता, त्या वेळी महाविकास आघाडीकडे त्याचे उत्तर नव्हते. आम्ही मौलानांना तसे काही आश्वासन दिले नाही, असेही ते सांगू शकले नाहीत. प्रत्यक्ष निवडणूक प्रचारामध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा एकात्मतेचा संदेश दिला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असे सांगून समाजाला दुहीपासून सावध केले. भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादबाबत मतदारांना सावध केले. महाविकास आघाडीकडे याचे उत्तर नव्हते. ‘एक है तो सेफ है’, या घोषणेची सोशल मीडियावरून टिंगल करण्याखेरीज महाविकास आघाडी समर्थकांना काही करता आले नाही. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक ऐक्याचा नॅरेटिव्ह प्रस्थापित केला व महाविकास आघाडीला व त्यांच्या इको सिस्टीमला विभाजनकारी अजेंडा रेटणे अशक्य झाले. काँग्रेस आणि उद्धव सेना केवळ ‘अदानी अदानी’ करत राहिले.
 
झोपलेला जागा झाला...
 
महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 साली झालेल्या निवडणुकीत एकूण मतदान 5 कोटी 48 लाख म्हणजे 61 टक्के झाले होते, तर 2024 साली झालेल्या निवडणुकीत एकूण मतदान 6 कोटी 40 लाख म्हणजे 65 टक्के झाले. मतदान 92 लाख मतांनी वाढले. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात झालेल्या मतदानातही विधानसभा निवडणुकीत भरघोस वाढ झाली. येथेच निवडणूक फिरली. काँग्रेस किंवा मित्रपक्षांचा मतदार हमखास मतदान करतो आणि भाजप व मित्रपक्षांचे मतदार मतदान करतीलच याचा भरवसा नसतो. त्यामुळे मतदान वाढते त्या वेळी ते प्रामुख्याने भाजपचेच वाढलेले असते. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत मतदान भरघोस वाढले आणि भाजप-शिवसेना युती सत्तेवर आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान मोठ्या प्रमाणात वाढले आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण बहुमताचे सरकार देशात आले. काँग्रेस आघाडीला पराभूत करण्यासाठी भाजपच्या झोपी गेलेल्या मतदाराला जागे करून प्रत्यक्ष मतदानाला प्रोत्साहित करणे गरजेचे होते. याबाबतीत या निवडणुकीत विचार परिवाराने जे काम केले ते ऐतिहासिक आहे.
 
वक्फ बोर्ड आपली मंदिरे आणि जमिनी बळकावत असतानाही आपण झोपलेले राहिलो तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच, याची समाजाला जाणीव झाली. अल्पसंख्याकांचा अनुनय करून हिंदूंचा अपमान करणार्‍यांना धडा शिकविला पाहिजे याची जाणीव झाली. देव-देश-धर्मासाठी मतदान केले पाहिजे आणि हे मतदान करताना लहानसहान गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत, ही जाणीव समाजात सर्वत्र निर्माण झाली. परिवाराने केलेल्या अथक परिश्रमामुळे हे साध्य झाले. झोपलेला हिंदू मतदार जागा झाला आणि त्याने चमत्कार केला. विधानसभा निवडणुकीतील भाजप महायुतीचे यश हा राज्य सरकारची कामगिरी, लोककल्याणकारी योजनांचा परिणाम, भाजपचा संघटनात्मक प्रयत्न, विचार परिवाराने दिलेली साथ या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे; पण अखेरीस राष्ट्रीय विचारांचा मतदार उदासीनता झटकून मतदानाला बाहेर पडला म्हणून हे प्रयत्न यशस्वी झाले.
 
या निवडणुकीने देव-देश-धर्मासाठी आग्रही असलेल्या सर्वांना धडा मिळाला आहे. देव-देश-धर्म वाचवायचा असेल तर रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची गरज नाही, घोषणांची आवश्यकता नाही, हिंसाचारही नको. फक्त मतदान करा. मतदार यादीत आपले नाव असेल याची खात्री करा आणि पाच वर्षांतून एकदाच, पण हमखास मतदान करा. बाकी सर्व आपोआप होईल. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सडकून पराभव झाला, पाठोपाठ अनेक विधानसभा निवडणुकांत काँग्रेस पराभूत झाली. त्यानंतर राहुल गांधी यांनी मंदिरांना जाहीर भेटी देण्यास सुरुवात केली होती. मतदानाच्या वेळी जागे राहून हमखास मतदान केले, तर हिंदू समाजाचा अपमान करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, हा विधानसभा निवडणुकीचा धडा आहे.
Powered By Sangraha 9.0