स्वयमेव मृगेन्द्रता!

29 Nov 2024 17:08:52
 
devendra fadnavis
संकटांना, केवळ एक संधी न मानता, एक कर्तव्य मानून जी व्यक्ती संघर्ष करते, त्या व्यक्तीला इतिहास लक्षात ठेवतो. महाराष्ट्रात या यादीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमुळे पुन्हा एकदा ‘देवेंद्र-पर्व’ नव्या जोमाने सुरू होऊ पाहते आहे. हे पर्व महाराष्ट्राला अधिक समर्थ, बळकट आणि एकसंध करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही.
नाभिषेको न संस्कारः
सिंहस्य क्रियते वने
विक्रमार्जित सत्वस्य
स्वयमेव मृगेन्द्रता
 
जंगलामध्ये सिंहाला कुणी तो सिंह असल्याचा अभिषेक किंवा संस्कार करत नाही. सिंह स्वतःच्या अंगीभूत पराक्रमाच्या, कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःच मृगेन्द्र म्हणजे जंगलाचा राजा ठरत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा मृगेन्द्र कोण आहे, हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीने सिद्ध केले.
 
 
या निकालांमुळे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत, हे त्यांना गेली दहा वर्षे पाण्यात पाहत असलेल्या सर्व विरोधकांना एव्हाना कळून चुकले आहे. या निवडणुकीत भाजपने जेमतेम 150 जागा लढवल्या आणि त्यातल्या तब्बल 136 जागा जिंकल्या. म्हणजे लढलेल्या जागांपैकी जिंकण्याचा ’स्ट्राइक रेट’ पाहिला, तर तो जवळपास 90 टक्के इतका होतो. मागच्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजप सलगपणे राज्यातला सर्वांत मोठा पक्ष ठरला. सलग तीन वेळा पक्षाने शंभरी ओलांडली आणि या वेळेला भाजपने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी कामगिरी केली. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे यंदाच्या या निवडणुकीची जी काही पार्श्वभूमी होती, त्यात हे असे काही घडेल याची कुणी कल्पनाही केली नसावी. म्हणजे भाजप आणि महायुतीचे सरकार स्थापन होईल, तेवढ्या जागा महायुती जिंकते आहे, हे लक्षात येत होते; परंतु इतके धक्कादायक निकाल लागतील आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे पक्ष आणि काँग्रेससुद्धा अक्षरशः पाल्यापाचोळ्यासारखी उडून जाईल, असा विचारही कुणी केला नसेल; परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बहुधा तसा विचार केला होता, कारण ज्या प्रकारे मागचे एक-दोन महिने ते राज्यभरात फिरत होते, सभांचा-बैठकांचा सपाटा त्यांनी लावला होता आणि हे सर्व करत असताना त्यांचा चेहरा, देहबोली मात्र नेहमीप्रमाणे अत्यंत शांत होती, त्यातील आत्मविश्वास जाणवून येण्यासारखा होता. सर्वच विरोधक, राजकीय विश्लेषक, पत्रकार मंडळींना प्रश्न पडत होता की, ही व्यक्ती इतकी ठाम, ’कॉन्फिडन्ट’ कशी काय? कारण लोकसभेला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा महाराष्ट्रात महायुतीला मिळाल्या होत्या. राज्यात जातीय संघर्ष मागची वर्ष-दोन वर्षे पेटवला जात होता. स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याही राजकीय कारकीर्दीबाबतही माध्यमांतील अनेक स्वयंघोषित तज्ज्ञ वगैरे मंडळी आपापले पतंग उडवून मोकळे होत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि त्यांचे पक्ष यांनी अगदी टोकाच्या पातळीवर वैयक्तिक हल्ले करण्यापर्यंत भूमिका घेतली होती. जरांगे आणि इतर अनेकांनी फडणवीस यांना त्यांच्या जातीवरून अगदी खालच्या पातळीवरटार्गेट करून फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळे होत असूनही या विरोधाला पुरून उरत फडणवीस यशस्वी ठरले.
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी ‘अखंड भारत का आणि कसा?

 https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/
 मानवी जीवनातील ’पॅटर्न’ पाहता असे लक्षात येते की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नियती आपली काही ना काही परीक्षा पाहत असते. सर्व काही सुरळीत, मनासारखे होत असतानाच काही ना काही संकट समोर येऊन उभे राहते. या संकटाला संधी मानून त्यातून मार्ग काढण्यासाठी जो संघर्ष करतो तोच यशस्वी होतो. सृष्टीचा हा अलिखित नियम आहे. यातील खरी गंमत म्हणजे एखादी व्यक्ती मोठी, तितकी तिच्यासमोर येणारी संकटे मोठी. या अशा मोठ्यातील मोठ्या संकटांना, नियतीच्या परीक्षांना यशाकडे जाण्याची केवळ एक संधी न मानता, एक कर्तव्य मानून जी व्यक्ती संघर्ष करते, त्या व्यक्तीला इतिहास लक्षात ठेवतो. या नियमाच्या उदाहरणादाखल इतिहासात डोकावल्यास इतिहासाच्या प्रत्येक पानावर अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांची मांदियाळीच आपल्याला आढळेल. आज वर्तमानातही अशा व्यक्तिमत्त्वांची कमतरता नाही. या यादीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
 

devendra fadnavis 
 
याचे कारण समजून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची आजवरची वाटचाल समजून घेणे गरजेचे ठरते. देवेंद्र फडणवीस हे नाव माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष, बालपणापासूनचे संघ स्वयंसेवक, एक उच्चविद्याविभूषित नेता, नगरसेवकपदापासून काम करून पुढे आलेले कार्यकर्ता, व्हिजन व अभ्यास असलेले प्रशासक आणि अशा अनेक विशेषणांनी, उपाध्यांनी सार्‍या महाराष्ट्राला परिचित आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हाची परिस्थितीही फार काही अनुकूल आणि सर्वोत्तम होती अशातला भाग नाही. केंद्रात अभूतपूर्व सत्तापरिवर्तन होऊन स्पष्ट बहुमतात मोदींचे सरकार आले असले तरी पुढे काही दिवसांतच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र हादरला होता. महाराष्ट्रातील भाजपचे आणखी एक मोठे नेते अर्थात नितीन गडकरी हे आधी राष्ट्रीय अध्यक्ष आणि मग केंद्रीय मंत्री म्हणून राष्ट्रीय राजकारणात दाखल झाले होते. शिवाय महाराष्ट्रात भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमत नव्हते, शिवसेनेसोबतची युतीही तेव्हा तुटलेली होती. अशा नाजूक परिस्थितीत महाराष्ट्र भाजपमधील राज्यव्यापी नेतृत्वाची पोकळी भरून काढणे व कुशलपणे पाच वर्षे सरकार चालवणे, अशा दुहेरी आव्हानांची परीक्षा देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले. त्या वेळच्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रथी-महारथी असताना तुलनेने तरुण व नवखे मानले गेलेले फडणवीस काय टिकाव धरणार, हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर स्वतः फडणवीस यांनी आपल्या कामातून आणि कर्तृत्वातून दिले.
 
 
देवेंद्र फडणवीसांनीच वर्तवलेल्या भविष्यवाणीप्रमाणे असंख्य अंतर्विरोधांनी बजबजलेले ते सरकार कोसळले आणि राज्यात ऐतिहासिक ’पॉलिटिकल करेक्शन’ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या रूपाने झाले.
 
2014 मध्ये नवखे मानले गेलेले फडणवीस 2019 मध्ये राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले होते. पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होणार असे सर्वांनाच वाटत असताना नियतीने पुन्हा एकदा परीक्षा पाहण्याचे ठरवले. भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले असताना अचानक मोठा घात झाला आणि नवे राजकीय समीकरण जन्माला आले. हे समीकरण जन्माला येण्यामागेही फडणवीस यांचा आवरता न येणारा प्रभाव, वेग, वर्चस्व, त्यातून निर्माण झालेला मत्सर, असूया हेच कुठे तरी कारणीभूत होते, हे विशेष. जे व्हायचे ते झाले आणि सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजप विरोधी बाकांवर बसला. याही परिस्थितीत पक्षासाठी आणि राज्यासाठी फडणवीस पुढे जात राहिले. सत्ताधार्‍यांना केवळ भावनिक नाही, तर मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि तितक्याच आक्रमक मांडणीतून अक्षरशः रडकुंडीला आणणारा विरोधी पक्षनेता महाराष्ट्राने फडणवीसांच्या रूपाने पाहिला. कोविडकाळात राज्य सरकारचे नेतृत्व ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणून घरी बसलेले असताना जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न बाळगता राज्याच्या कानाकोपर्‍यात पायाला भिंगरी लावून फिरलेला लोकनेताही महाराष्ट्राने फडणवीस यांच्या रूपाने पाहिला. फडणवीसांनीच वर्तवलेल्या भविष्यवाणीप्रमाणे असंख्य अंतर्विरोधांनी बजबजलेले ते सरकार कोसळले आणि राज्यात ऐतिहासिक ’पॉलिटिकल करेक्शन’ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या रूपाने झाले.
 
 
या सत्तांतरानंतर सरकारमध्ये स्वतः पद न घेण्याचे ठरवलेले फडणवीस काही तासांतच पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले, हा आणखी एक अनपेक्षित धक्का होता; परंतु गेली दोन-अडीच वर्षे पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे कुशल प्रशासक असलेले नेतृत्व सरकारमध्ये का आवश्यक होते ते कळून येते. पालकमंत्री म्हणून एका गडचिरोलीसारख्या जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी तेथे करून दाखवलेले कामदेखील इथे उदाहरण म्हणून घेण्यासारखे आहे. नक्षलवाद्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, जोडीला विविध विकासात्मक कामे, प्रकल्प यामुळे आज गडचिरोलीचे चित्र झपाट्याने बदलत असल्याचे तेथील अनेक मंडळी सांगतात. शिवाय, फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पायाभरणी झालेले असंख्य प्रकल्प आज पूर्णत्वास जात आहेत, त्यांची लोकार्पणे होत आहेत आणि त्याची फळे महाराष्ट्रास मिळत आहेत. मग त्यात समृद्धी महामार्ग, अटल सेतू (ट्रान्सहार्बर लिंक), कोस्टल रोड, मुंबई-पुणे-नागपुरातील असंख्य मेट्रो प्रकल्प अशी किती तरी उदाहरणे देेता येतील. त्यामागे फडणवीसांचा सिंहाचा वाटा होता तसेच काही व्यापक व्हिजन होते.
 

devendra fadnavis 
 
चांदा ते बांदा पसरलेल्या, मुंबई-पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन संस्कृतीपासून नंदुरबार-गडचिरोलीसारख्या कमालीच्या दुर्गम भागांपर्यंतची विविधता असलेल्या, स्वतःचे असे काही ठोस, वेगळे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक ’नेचर’ असलेल्या महाराष्ट्र राज्याचा सर्वंकष आवाका असलेला, विकासाबाबत ठोस व्हिजन असलेला आणि सार्‍या राज्याची मान्यता-लोकप्रियता असलेला नेता म्हटल्यावर आज केवळ देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेता डोळ्यांपुढे येतात. लोकसभेचे महाराष्ट्रातील निकाल बरेचसे अनपेक्षित होते. यावरून विधानसभेत काय होणार याबाबतही वेगवेगळी राजकीय विश्लेषक मंडळी आपापले अंदाज बांधत होती. राजकारणात ’रेलेव्हंट’ राहावे लागते, असे फडणवीस अनेकदा म्हणाले आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणात ’रेलेव्हंट’ राहणे ही केवळ त्यांची गरज नाही, तर त्यांच्या पक्षाची आणि महाराष्ट्र राज्याचीही गरज होती आणि त्याकरिता आगामी विधानसभा निवडणूक सर्वार्थाने महत्त्वाची होती. फडणवीस हे आता राज्याच्या राजकारणात ’रेलेव्हंट’ राहिलेले नाहीत, असाही एक नॅरेटिव्ह पवारांचा गट किंवा उद्धव ठाकरेंचे सगळे प्रवक्ते वगैरे किंवा आणखी सगळ्या त्या इकोसिस्टीममधल्या लोकांनी चालवला होता.
 
 
आणि हे विधानसभेचे निकाल लागले... ज्यातून फडणवीस केवळ रेलेव्हंटच ठरले नाहीत, तर या सर्व विरोधकांना आणि त्यांच्या खोट्या नॅरेटिव्हना अक्षरशः जमीनदोस्त करत जिंकणारे ’योद्धा-राजनेता’ ठरले. त्यांची जी राज्याच्या राजकारणातील ’राइटफुल पोझिशन’ आहे ती त्यांनी स्वकर्तृत्वाने पुन्हा मिळवली, कारण त्यांनी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवला. ज्या विचारधारेत त्यांची जडणघडण झाली, त्या विचारांवर विश्वास ठेवला. फडणवीस हे एक संघ स्वयंसेवक आहेत. राष्ट्रीय विचारांशी त्यांची असलेली निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या विचार परिवारानेही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी कामगिरी फडणवीस यांनी पुन्हा एकदा घडवून दाखवली. आज या क्षणाला देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्राचे नायक ठरले आहेत. या निकालांमुळे पुन्हा एकदा ’देवेंद्र-पर्व’ नव्या जोमाने सुरू होऊ पाहते आहे. हे पर्व महाराष्ट्राला अधिक समर्थ, बळकट आणि एकसंध करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही.
 
Powered By Sangraha 9.0