दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानणार्‍या प्रवृत्तीचा पराभव

विवेक मराठी    28-Nov-2024
Total Views |
@आबा माळकर

shivsena 
उद्धव ठाकरे यांच्या पराभवाची कारणमीमांसा त्यांच्या पक्षाला झालेले मतदान, उमेदवार, मुस्लीम मते, त्यांची विचारसरणी याआधारेही करता येईल. किंबहुना ते अनेकांनी केलेही असेल; पण ही तत्कालीन कारणे आहे. मूळ कारण हे उद्धव ठाकरे या व्यक्तीची वृत्ती आहे. म्हणूनच त्याचा आढावा मी या लेखात घेतला आहे. तत्कालीन कारणे, चुका दुरुस्त करता येतात; पण वृत्ती काही बदलता येत नाही किंवा ती बदलण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानण्याच्या, मग तो शत्रू का असेना, या वृत्तीतून बाहेर पडले तरच उद्धव ठाकरे यांना राजकारणात भवितव्य आहे. अन्यथा अशा लोकांना राज्यातील जनता चार हात लांबच ठेवते.
2009 सालात चौदाव्या लोकसभेची निवडणूक झाली होती आणि त्यात शिवसेना-भाजपला मुंबई परिसरात जबरदस्त मार खावा लागला होता. त्यात काँग्रेसचा मोठा विजय झाला होता. तरीही त्याचे खरे श्रेय त्या पक्षाला अजिबात नव्हते. खरा मानकरी एकही लोकसभेची जागा जिंकू शकला नव्हता. मात्र आपण त्या निकालाचे खरे मानकरी आहोत, हे सांगायला तोच पराभूत पक्षाचा नेता हिरिरीने पुढे आला होता. एकही खासदार निवडून आला नसताना, निकालानंतरची पहिली पत्रकार परिषद तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. आज त्यांनाही त्याचे स्मरण उरलेले नसेल, कारण आज त्यांचा पक्ष राजकीय खिजगणतीत राहिलेला नाही. तेव्हा लोकसभा निकालाचा अर्थ स्पष्ट करताना, आपण काय केले ते अतिशय खोचक भाषेत राज ठाकरे यांनी सांगितले होते. अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या अँथनी गोन्सालविस भूमिकेचा डायलॉग राज यांनी पत्रकारांना ऐकवला आणि समोरचे पत्रकारही खिदळले होते. ‘तुमने हमको बहूत मारा. हमने तुमको एकही मारा. लेकीन सॉलिड मारा, है के नही?’ असे राज यांचे शब्द होते. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद वा खुशी लपून राहिलेली नव्हती, कारण मनसेने जी मते फ़ोडली, त्याचा फ़टका शिवसेना व भाजप युतीला बसला होता आणि त्यातले खोचक शब्द शिवसेनेला बोचावेत, म्हणूनच राज यांनी उच्चारलेले होते. आपल्या यशापेक्षा दुसर्‍याच्या अपयश वा दु:खामध्ये जेव्हा आनंद शोधला जातो, तेव्हा असेच होते. सतत बोलत राहिले आणि दुसर्‍याच्या अपयशाला आपले यश समजण्याचा आततायीपणा केला; मग यापेक्षा दुसरे काही होत नाही. दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानणे हेच उद्धव ठाकरे यांच्या पराभवाचे कारण ठरले आहे. ही त्यांची नीतीच त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील दुकान बंद करणार आहे. उद्धव ठाकरे यांचे 2014 सालापासूनचे राजकारण आपण पाहिले, तर ते याच तत्त्वावर सुरू होते, हे निश्चित समजते. दुसर्‍याच्या दु:खात सुख मानताना उद्धव ठाकरे यांना आपले सुख कशात आहे हे गवसले नाही. त्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झाली आहे.
 
 
2014 साली उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही युतीत होती. 2014 साली स्थापन झालेल्या फडणवीस सरकारमध्ये ते सहभागीही झाले होते. मात्र त्यांनी युतीचा धर्म किती निभावला? सातत्याने भाजपच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यातच त्यांनी समाधान मानले. ‘दै. सामना’मधून भाजपच्या नरेंद्र मोदी, अमित शहा या ज्येष्ठ नेतृत्वावर उद्धव ठाकरे टीका करत राहिले. भाजपसोबत सत्तेत असतानाही सातत्याने भाजपला टोमणे मारत राहिले. त्यातून होणार्‍या आसुरी आनंदात ते इतके मश्गूल होते की, त्यामुळे आपले नुकसान होतेय हे त्यांना उमजलेदेेखील नाही. भाजपवर टीका करता, मग सत्तेतून बाहेर पडा, खिशातले राजीनामे देऊन टाका, असे महाराष्ट्रातील जनता सातत्याने सांगत होती; पण सत्ता सोडवत नव्हती. तेव्हाच उद्धव ठाकरे यांना तत्त्व, विचार, पक्ष संघटना याचे काही पडलेले नाही, त्यांना सत्ता हवीय, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर रुजले गेले.
 

shivsena

उद्धव ठाकरे यांच्या पराभवाची मीमांसा करताना संजय राऊत यांचा उल्लेख करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राऊत हे शिंदे, भाजप, फडणवीस यांना शिव्या घालताहेत यातच उद्धव ठाकरे यांना आनंद मिळत होता. त्यासाठी पक्ष संघटनेचा बळी द्यायलाही उद्धव ठाकरे तयार होते.
 
2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे निवडणूक निकालानंतर युतीतून बाहेर पडले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले, तेव्हा त्यांच्या या कृत्याचे जनतेला फार वाईट वाटले नाही. उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करू शकतात, हे जनतेने मनात पक्के केले होते, तेच घडत होते. मात्र सत्ता मिळाली, मुख्यमंत्रीपद मिळाले तेव्हा तरी दुसर्‍याच्या दु:खातील आनंद शोधणे उद्धव ठाकरे यांनी टाळायला हवे होते. सत्तेचा लाभ पक्ष संघटनेसाठी, जनतेची कामे करून लोकांचा आपल्यावरील विश्वास वाढवण्यासाठी करायला हवा होता. मात्र तेथेही उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपला डिवचण्यात समाधान मानले. 105 जणांना घरी पाठवले, असा टोमणा उद्धव ठाकरे जेव्हा मारत होते तेव्हा ते भाजपला डिवचत नव्हते, तर अप्रत्यक्षरीत्या त्या 105 जणांना निवडून देणार्‍यांना ऐकवत होते, त्यांना दुखावत होते. आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, अशी टीका भाजपवर करताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. तेथून उद्धव ठाकरे यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली; भाजपला दुखावताना उद्धव ठाकरे चुकांवर चुका करत राहिले. आपले 46 आमदार निघून जाताहेत याची भनकही त्यांना लागली नाही. कारण पक्ष संघटना म्हणजे मी आणि माझे कुटुंब यापुरतेच उद्धव ठाकरे मर्यादित राहिले होते.
 
उद्धव ठाकरे यांनी केवळ भाजपला डिवचण्यात समाधान मानले. 105 जणांना घरी पाठवले, असा टोमणा उद्धव ठाकरे जेव्हा मारत होते तेव्हा ते भाजपला डिवचत नव्हते, तर अप्रत्यक्षरीत्या त्या 105 जणांना निवडून देणार्‍यांना ऐकवत होते, त्यांना दुखावत होते. आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, अशी टीका भाजपवर करताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदुत्ववाद्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले होते. तेथून उद्धव ठाकरे यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली; भाजपला दुखावताना उद्धव ठाकरे चुकांवर चुका करत राहिले.
 
शिवसेना फुटल्यावर दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अजून एक पर्याय मिळाला- एकनाथ शिंदे. खोके, खंजीर, गद्दार अशी शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या लहान नातवावरही घसरले. महाराष्ट्रातील जनतेला हे आवडले नाही. पापाचा अजून एक घडा भरलेला होता. लोकसभा निवडणुकीत आपल्याला हिंदुत्ववादी मते मिळणार नाहीत, हे उद्धव ठाकरे यांना पक्के माहीत झाले होते. त्यामुळे मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याची रणनीती त्यांनी आखली. मुस्लीम त्यांच्यासोबत आले; पण ते उद्धव ठाकरे यांना जिंकून देण्यासाठी नाही, तर भाजप, नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी एकत्र आले होते. उद्धव ठाकरे यांना हे माहीत नव्हते का? निश्चित माहीत होते; पण भाजप, मोदींना वेदना होताय ना, तर आपल्याला ती फुंकर आहे, यात उद्धव ठाकरे मश्गूल राहिले. लोकसभा निवडणुकीच्या अल्प यशानंतर उद्धव ठाकरे यांची भाषा बघा, मोदी सत्तेतून जाणार, भाजप नावालाही उरणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणत होते. आपण निवडून आलो तर एक विरोधी पक्ष म्हणून काय देशासाठी योगदान देणार, याचा कुठेही लवलेश त्यांच्या भाषणांमध्ये नव्हता. मात्र भाजपला हरवले याचा आनंदच त्यांच्या शिवराळ, गलिच्छ भाषेतून झळकत होता. लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल किंवा इतर काही प्रयोजन, ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाषण केले त्यात कुठेही विकास, देशहित, राज्यहित यांचा साधा उल्लेख सापडणार नाही. इतकेच काय, त्यांच्या भाषणात सकारात्मकता शोधूनही सापडणार नाही. कोणत्याही नकारात्मकतेला तात्पुरता लाभ मिळतो; पण दीर्घकाळ तो टिकत नाही. विधानसभा निवडणुकीत नेमके उद्धव ठाकरे यांचे तेच झाले. या निवडणुकीत सर्वात मोठा फटका बसला तो मुस्लीम मतांचा. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांवर तारलेले उद्धव ठाकरे, या निवडणुकीत मुस्लीम वस्त्या मतदारसंघनिहाय विभागल्या गेल्यामुळे एकगठ्ठा मतदानाचा लाभ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देऊ शकत नव्हत्या. त्यातच हिंदूंना दुखावल्यामुळे ही विधानसभा हिंदूंना एक संधी होती, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून देण्याची. अर्थात त्यांनी ती साधली. दुसर्‍याचे अहित बघत आपले उखळ पांढरे करून घ्यायची, ही उद्धवनीती एव्हाना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या चांगलीच लक्षात होती. त्यामुळे या वेळी उद्धव ठाकरे यांची मनमानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चालू दिली नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, आम्हाला इतक्याच जागा पाहिजे, अशा उद्धव ठाकरे यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.
 

sena 
 
एका बाजूला महाविकास आघाडीतील जागावाटपाची रस्सीखेच, तर दुसर्‍या बाजूला निवडणूक प्रचार, या द्विधा मनःस्थितीत उद्धव ठाकरे अडकून पडले. मुस्लीम मतांची बेगमी करताना हिंदूंना आपण लाथाडतोय, याची कल्पनाही उद्धव ठाकरे यांना आली नाही. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या, त्यांच्या पत्नीवर झालेले आरोप, यामुळे आपण सांस्कृतिकदृष्ट्याही महाराष्ट्राच्या राजकारणात खलनायक ठरतोय, हेही उद्धव ठाकरे यांना उमगले नाही. अर्थात महाराष्ट्राची जनता हे सर्व पाहत होती. अशा व्यक्तीला त्याची जागा दाखवताना विधानसभा निवडणुकीची संधी या जनतेच्या हाती होती. ती संधी जनतेने साधली. उद्धव ठाकरे यांच्या पराभवाची मीमांसा करताना संजय राऊत यांचा उल्लेख करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मित्रामुळे यश, कीर्ती, संपत्ती मिळाल्याची देश आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उदाहरणे देता येतील; पण मित्रामुळे देशोधडीला लागण्याची उदाहरणे विरळ आहेत, त्यात एक संजय राऊत यांचे उदाहरण आहे. त्या दृष्टीने राऊत यांनी ‘मित्र कसा नसावा’ याचे सुयोग्य वैचारिक दालन प्रस्तुत केले आहे. सकाळी 9चा भोंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजय राऊत यांनी राज्याच्या जनतेच्या मनात उद्धव ठाकरे, त्यांची शिवसेना याच्याबद्दल वीट निर्माण केला. संजय राऊत टीव्हीवर दिसले तर टीव्ही बंद करण्यापर्यंत राज्यातील जनता थेट कृती आणि प्रतिक्रिया देत होती; पण हे उद्धव ठाकरे यांना कळत नव्हते का? नक्कीच कळत होते; पण राऊत हे शिंदे, भाजप, फडणवीस यांना शिव्या घालताहेत यातच उद्धव ठाकरे यांना आनंद मिळत होता. त्यासाठी पक्ष संघटनेचा बळी द्यायलाही उद्धव ठाकरे तयार होते. नेमके तेच झाले. उद्धव ठाकरे यांच्या पराभवाची कारणमीमांसा त्यांच्या पक्षाला झालेले मतदान, उमेदवार, मुस्लीम मते, त्यांची विचारसरणी याआधारेही करता येईल. किंबहुना ते अनेकांनी केलेही असेल; पण ही तत्कालीन कारणे आहे. मूळ कारण हे उद्धव ठाकरे या व्यक्तीची वृत्ती आहे. म्हणूनच त्याचा आढावा मी या लेखात घेतला आहे. तत्कालीन कारणे, चुका दुरुस्त करता येतात; पण वृत्ती काही बदलता येत नाही किंवा ती बदलण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. दुसर्‍याच्या दु:खात आनंद मानण्याच्या, मग तो शत्रू का असेना, या वृत्तीतून बाहेर पडले तरच उद्धव ठाकरे यांना राजकारणात भवितव्य आहे. अन्यथा अशा लोकांना राज्यातील जनता चार हात लांबच ठेवते.