मिलिंद आणि माझे स्वभाव तसे विरुद्ध तरीदेखील आमची मैत्री अभंग राहिली. कॉलेजजीवनात असल्यापासूनच जेव्हा जेव्हा आम्ही भेटत असू, पूर्ण कपभर चहा न पिता अर्धा कप चहा घेत असू.
दीप्तीचा फोन होता. ती म्हणाली, “काका, शनिवारी बाबा गेले.” नंतर तिने बाबांना निरनिराळे कॉम्प्लिकेशन्स कसे होत गेले हे सांगितले. शारीरिक वेदना त्यांना खूप होत असाव्यात. बाबा गेल्याचे दुःख तिच्या बोलण्यातून प्रकट होत होते, त्याच वेळी शारीरिक वेदनांतून बाबांची सुटका झाली, हेही तिला जाणवत होते.
तिचे बाबा म्हणजे माझे परममित्र मिलिंद घागरे. त्यामुळे दीप्तीने दिलेली बातमी ऐकून मला प्रचंड धक्का बसला असे काही झाले नाही, कारण माझ्या मित्राचे वय झाले होते. त्याला विविध व्याधींनी ग्रासले होते. म्हणून आज न् उद्या ही बातमी ऐकायला येणार, अशी मी माझ्या मनाची तयारी करून ठेवली होती.
पण तरीदेखील त्या क्षणी मला प्रकर्षाने जाणीव झाली की, आपल्या भावनिक जीवनातील एक खांब कोसळलेला आहे आणि त्याची जागा तशीच राहणार आहे, ती कुणालाही भरून काढता येणार नाही. पार्ले कॉलेजात आम्ही चार वर्षे एकमेकांच्या सावलीप्रमाणे एकत्र काढली. नंतर एम.ए. करताना फोर्टमधील मुंबई विद्यापीठातदेखील आम्ही दोघं एकत्रच होतो. एकत्र बसून अभ्यास केला. एकत्र बसून वेगवेगळ्या विषयांच्या नोट्स काढल्या. आपल्याला काय समजलं, ते एकमेकांना समजावून सांगितलं.
आमची एकत्रित अभ्यास करण्याची स्थानेदेखील ठरलेली होती. पार्ले कॉलेजचे ग्रंथालय परीक्षेच्या कालावधीत 12 वाजेपर्यंत खुले असे आणि ते खूप प्रशस्तही होते. मिलिंद आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी आमच्या राहण्याच्या खोल्या दहा बाय बाराच्या होत्या. आम्ही दोघेही तसे झोपडपट्टीवासीय होतो. समान आर्थिक स्तराचे होतो. पदवी परीक्षेत उत्तम गुण मिळवायचे, किमान हायर सेकंड क्लास तरी मिळवायचा, हे आमचे समान ध्येय, कारण त्याशिवाय जीवनाची पुढची वाट सोपी होणारी नव्हती. इतर वेळी आम्ही दोघे जण अंधेरीला सहार रस्त्यावर वडिलांचे छोटे शिवणकामाचे दुकान होते, तिथे रात्री बसून अभ्यास करीत असू.
महाविद्यालयीन जीवनामध्ये जीवनाचा जो आनंद असतो, तो आम्ही आमच्या परिने उपभोगला. दिवसातून दोनदा किंवा तीनदा तरी कॅन्टीनमध्ये जात असू. एक कप चहा घ्यायचा आणि तो अर्धा-अर्धा करून प्यायचा. आमची ऐपतही तेवढीच होती. या अर्ध्या कपाची सवय जीवनभर राहिली. आजही पूर्ण कपभर चहा मी कधी पीत नाही. अर्धा कप चहा झाला की, पुढचा चहा घशाखाली उतरत नाही. मिलिंद म्हणजे या अर्ध्या कप चहाची गोडी होती.
अत्यंत आनंदी असा त्याचा स्वभाव आणि कुणाशीही त्याची चटकन मैत्री होत असे. कोकणातला असूनही अत्यंत गोरापान. व्यक्तिमत्त्व एकदम आकर्षक. याच्या उलट मी. कॉलेजजीवनापासूनच गंभीर प्रवृत्ती. फार कमी जणांशी मैत्री करणारा. सिनेमा आणि इतर कॉलेजजीवनातील आकर्षणे यापासून कटाक्षाने दूर राहणारा. तरीदेखील आमची मैत्री अभंग राहिली. एकाच बेंचवर आम्ही शेजारी-शेजारी बसत असू. सहा वर्षांत कधी भांडण झाले नाही, की कधी मतभेद झाले नाहीत. माझ्या आईनेही त्याला आपल्या मुलासारखाच स्वीकारला होता. होळीला पुरणपोळी झाली की, आईचा आदेश असे- मिलिंदला घरी येऊन ये, पुरणपोळी खायला. मला पद्मश्री मिळाल्यानंतर माझ्या मुलींनी घरगुती कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमाला मिलिंदला बोलावले होते. आईची ही आठवण काढून त्याला भावनावेग आवरता आला नाही.
शिक्षणानंतर आमचे मार्ग वेगळे झाले. इंडियन ओव्हरसीज बँकेत त्याला नोकरी लागली. कालांतराने तो बँकेचा मोठा अधिकारी झाला. विवाह, मुलंबाळं, घर असे चाकोरीबद्ध जीवन त्याचे सुरू झाले. मी संघकामात दिवसेंदिवस गढत गेलो, जबाबदार्या वाढत गेल्या. बँकेत नोकरी मिळविण्याचा मी प्रयत्न केला; पण नियतीने माझ्या कपाळावर कोणतीही नोकरी लिहिली नसल्यामुळे मला कुठेच यश आले नाही. माझ्या संघकामाची मिलिंद आस्थेने चौकशी करीत राहिला आणि त्याला जितके शक्य होईल तेवढा सहभागही त्याने दिला. त्याचे वडीलबंधू गिरणी कामगार होते. लाल बावटा चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. कम्युनिस्ट विचारांचे संस्कार त्याच्या घरात होते; पण मिलिंद काही कम्युनिस्ट झाला नाही. तसा तो संघाचा कुणी अधिकारी झाला नसला तरी मनाने पूर्ण संघमय झाला. कधी कधी मी त्याला म्हणत असे की, तू नको तितका मोदीभक्त झाला आहेस.
त्याला अनुरूप अशीच पत्नी लाभली. तिचे नाव होते विजया. आणीबाणीत भूमिगत असताना बोरिवली येथील त्याच्या घरी मी गेलो. वेशभूषा बदललेली होती. मी घरची बेल वाजवली आणि माझे नाव सांगितले. वहिनींनी मला आनंदाने घरात घेतले. त्या रात्री तिथेच मुक्काम करायचा होता. सर्व व्यवस्था त्यांनी चोख केली होती. माझ्याविषयी कसलीही चौकशी केली नाही, कारण मिलिंद. मी घरी येण्यापूर्वीच माझी कीर्ती घरात पोहोचली होती. विजया वहिनींचे तसे अकाली निधन झाले. मिलिंदला हा मोठा भावनिक धक्का होता. त्यातून त्याला सावरायला वर्ष-दोन वर्षे गेली. जेव्हा जेव्हा त्याची भेट होई तेव्हा सहजपणे विजया वहिनींची आठवण झाल्याशिवाय राहत नसे आणि आता ज्योतीत ज्योत मिसळून गेली आहे. आता उरल्या आहेत त्या आठवणी. रोजचा चहा घेताना मिलिंदचा चेहरा डोळ्यापुढे येत राहणार. बटाटावडा, मिसळ, समोसा हे त्या वेळेचे आमच्या आवडीचे पदार्थ होते. आता वयोमानाप्रमाणे मी ते खाऊ शकत नाही; पण त्यांचा सुगंध हा मला नेहमीच मिलिंद सुगंध जाणवत राहणार आहे.
या अर्ध्या कपाची सवय जीवनभर राहिली. मिलिंद म्हणजे या अर्ध्या कप चहाची गोडी होती. वयोमानाप्रमाणे शरीर थकल्यावर मृत्यू येतो. त्याच्या निधनाची बातमी अनपेक्षित नव्हती; पण प्रकर्षाने एक जाणीव झाली की, आपल्या भावनिक जीवनातील एक खांब कोसळलेला आहे आणि त्याची जागा तशीच राहणार, ती कुणालाही भरून काढता येणार नाही.