संघाची शाखा म्हणजे हिंदूपणाची जाणीव

25 Nov 2024 12:39:31
 
hindu
 
भगव्या ध्वजाच्या केवळ दर्शनाने हिंदूपणाची (Hinduness) जाणीव उत्पन्न होते, असा डॉ. हेडगेवारांना अनुभव येऊ लागला. भगवा ध्वज लावून चालणार्‍या शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. संघशाखेची ओळख भगव्या ध्वजावरून होऊ लागली. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही संघशाखा असो, तेथे भगवा ध्वज दिसेल. संघाची शाखा म्हणजे हिंदूपणाचा बोध घडवणारे स्थान.
  
केशवचा जन्म नागपूरच्या हेडगेवार कुटुंबात 1889 साली झाला. 1940 साली त्याची जीवनयात्रा संपली. अवघे पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. 1947 ला देश स्वतंत्र झाला. 1889 ते 1947 हा कालखंड स्वातंत्र्य चळवळींनी भरलेला होता.
 
 
केशव अभिजात स्वातंत्र्यसेनानी होता. अवघे आठ वर्षांचे वय असताना परकीय राणी एलिझाबेथ यांच्या राज्यरोहणाच्या वर्धापन दिनाच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेत वाटलेली मिठाई त्याने केराच्या टोपलीत फेकून दिली होती. बालवयामध्ये असे स्वाभिमानाचे संपूर्ण भारतातील हे एकमेव उदाहरण असेल.
 
'हिंदू समाजाचे संघटन' या सूत्राला धरून काम करणाऱ्या रा. स्व. संघाच्या प्रयत्नातून मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेक विषयांवर प्रभावी काम झाले आहे. हे जाणून घेण्यासाठी...

https://www.evivek.com/RaashTrotthaanvisheshgranth/
 
नागपूर शहरातील सीताबर्डी किल्ल्यावर फडकणारा परकीय युनियन जॅक काढून नागपूरकर भोसल्यांचा भगवा ध्वज लावावा, अशी आकांक्षा नववीत शिकत असताना केशवच्या मनात उभी राहिली. पुढे मॅट्रिकमध्ये शिकत असताना सरकारचे रिसले सर्क्युलर आले, ‘वंदे मातरम्’ म्हणायला बंदी घालण्यात आली.
 
 
केशवने बंदी मोडण्याचे ठरवले. सर्व विद्यार्थ्यांची सहमती मिळवली. शिक्षणाधिकारी शाळा तपासणीसाठी येणार तो दिवस ठरवला. आपल्या वर्गात आले की, ‘वंदे मातरम्’ घोषणेने त्यांचे स्वागत करायचे असे ठरले. झालेही तसेच. दोन महिने शाळा बंद पडली. पालक व शिक्षक यांच्यात चर्चा होऊन काही मध्यम मार्ग निघाला. सर्व विद्यार्थी शाळेत गेले. केशवला ते मान्य झाले नाही. त्याने शाळा सोडली.
 
 
केशव दुसर्‍याचे पाहून काही करणारा मुलगा नव्हता. स्वतंत्र विचार करणारा, निर्भय, परिणामाची चिंता न करणारा, विचारांना कृतीत उतरवणारा मुलगा होता.
 
hindu 
 
कलकत्त्याला वैद्यकीय शिक्षण घेत असताना क्रांतिकारकांच्या अनुशीलन समितीचे सदस्य होणे, क्रांतिकारक म्हणून सक्रिय राहणे, डॉक्टर होऊन नागपूरला परत आल्यावर व्यवसाय व लग्न न करण्याचे पक्के करणे, असहयोग आंदोलनात उडी घेणे, अशा सर्व निर्णयांवरून डॉक्टर हेडगेवारांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व उठून दिसते. स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांचे आगळेवेगळेपण दिसून येते. प्रारंभापासून संपूर्ण स्वातंत्र्याचा विचार ते मांडत असत. स्वातंत्र्य मिळवणे जसे महत्त्वाचे आहे तसेच स्वातंत्र्य का गेले, याचाही विचार करून त्यासाठी आतापासूनच काही प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांना वाटत असे. हिंदू-मुसलमान एकतेची चर्चा सर्वत्र सुरू झाली. ख्रिश्चन, ज्यू, पारशी यांचा उल्लेखही कधी होत नसे. डॉक्टरांना वाटे, केवळ हिंदू-मुसलमान एकता म्हटल्यामुळे मुसलमान समाजामध्ये अलगाववादाची भावना निर्माण होईल व ती देशाला घातक ठरेल. त्यांनी त्यांच्या मनातील ही शंका महात्मा गांधी यांच्याजवळ बोलून दाखवली. मला असे वाटत नाही, असे म्हणून महात्मा गांधी यांनी चर्चा थांबवली. हिंदू-मुस्लीम एकतेचा विषय स्वातंत्र्य चळवळीपेक्षा चर्चेमध्ये जास्त येऊ लागला.
 
पुन्हा अखंड भारत कसा निर्माण होईल? त्याची संकल्पना काय? अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या विचारधारेचा हा विषय समजून घेण्यासाठी...

 https://www.vivekprakashan.in/books/akhand-bharat/

 हिंदूंनी स्वतःला ‘हिंदू’ म्हणवून घेऊ नये म्हणजे मुसलमान ‘मुसलमान’ शब्द सोडून देतील. देशाला ‘हिंदुस्तान’ न म्हणता ‘हिंदस्तान’ म्हणावे. शिवाजी महाराजांना ‘छत्रपती’ न म्हणता ‘वाट चुकलेला देशभक्त’ समजावे. मुसलमान कौम ईश्वराला भिणारी पापभिरू जमात आहे. त्यांच्या धर्मश्रद्धेनुसार ते वागतात. एकतेसाठी कोणत्याही अटी घालू नयेत. हिंदू-मुसलमान एकतेची चाललेली चर्चा पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फार कडवट प्रतिक्रिया त्या वेळी व्यक्त केली आहे. डोके ठिकाणावर असलेला कोणताही मनुष्य हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी इतक्या थराला जाईल काय? मुसलमान एक कौम (जमात) तसेच हिंदू एक कौम असा अर्थ स्थापित झाला. सनातन सत्यावर दृढ विश्वास असलेली व्यक्ती म्हणजे हिंदू हा अर्थ झाकला गेलाच.
(1. सर्वंखलु इदं ब्रह्म
2. अखंड मंडलाकारम्व्याप्त सर्व चराचरम्
3. ईशावास्यंइदंसर्वं यत्किंच जगत्याम् जगत्
4. तत्त्वमसि 5. एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति.)
 
नेताजी सुभाषचंद्र बोस, योगी अरविंद यांच्या विचारांना काँग्रेसमध्ये काहीही महत्त्व उरले नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की, ‘भारतीय संस्कृति में ऐसा कुछ है जो विश्वमानव के लिए बहुत आवश्यक है और उसे ग्रहण किये बिना विश्व सभ्यता वास्तविक उन्नति नही पा सकती. इसलिये भारत को स्वतंत्र होना है.’
 
योगी अरविंद म्हणतात की,
"India alone can lead the world to peace and new world order.'
‘एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति’ हे सनातन सत्य जगाला शांततेकडे आणि नवीन विश्वरचनेकडे नेईल.
हिंसामुक्त व अहिंसायुक्त जग हवे असेल तर हे सत्य मानव समाजात स्थापित होणे आवश्यक आहे. हे हिंदू करू शकतील की मुसलमान? पण हिंदू भारतातच एक केवळ कौम म्हणून जगू लागला. नेहमी मुसलमानांचा संदर्भ देऊनच हिंदूंचा विचार होऊ लागला. अखिल भारतीय काँग्रेसने 1931 मध्ये ध्वज निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली. त्या समितीत सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, मास्टर तारासिंग, डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या, आचार्य काका कालेलकर, डॉ. ना. सु. हर्डीकर असे सात जण होते.
 
 
त्या समितीने हिंदुस्तानच्या परंपरेचा व संस्कृतीचा कानोसा घेऊन एकरंगी केसरी (भगवा) ध्वज असावा, असा निर्णय दिला. या निर्णयाची पुष्टी म्हणून त्यांनी खालील स्पष्टीकरण जोडले. सर्व हिंदी लोकांचा एकदम उल्लेख करावयाचा झाल्यास त्यांना सर्वाधिक मान्य होईल असा हा केशरी रंग आहे. इतर रंगांपेक्षा हा अधिक स्वतंत्र स्वरूपाचा रंग असून हा देशाला पूर्वपरंपरेने तो आपलासा वाटतो. हिंदू कौम व मुसलमान कौम असा विचार सुरू झाल्यामुळे भगवा केवळ हिंदूंचा असे मानले गेले.
 
 
ध्वज समितीने प्रस्तावित केलेला (केसरी ध्वज) देशाचा ध्वज म्हणून महात्मा गांधींनी मान्य केला असता, तर देशाचे हिंदू-मुसलमान विभाजन झाले नसते. ‘एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति’ हे त्रिकालाबाधित सत्य मुसलमानांनीही व्यवहारात स्वीकारले असते. भारत जगाला मार्गदर्शक ठरला असता. विभाजनानंतर बर्‍याचशा मुसलमानांनी पाकिस्तानात न जाता भारतात राहण्याचे ठरवले असले तरी मुस्लीम मानसिकता विभाजनकाळातच तयार झालेली आहे. भारत एका दृष्टीने पंगू झाला. ऐक्याचा संदेश छातीठोकपणे तो जगाला देऊ शकत नाही. केवळ हिंदू-मुस्लीम एकतेवर भर दिल्यामुळे मुसलमानांमध्ये आपण कोणी तरी विशेष आहोत, ही भावना उत्पन्न होईल व अलगाववादी मानसिकता तयार होईल, अशी शंका डॉक्टर हेडगेवारांनी महात्मा गांधी यांच्याजवळ बोलून दाखवली होती. स्वातंत्र्यापेक्षा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा विषय महत्त्वाचा झाला. कथा, कीर्तन, साहित्य, कविता इत्यादींमध्ये ‘हिंदू’ शब्द वापरणे म्हणजे आपण काही तरी पाप करतो आहोत असे वाटू लागले. मला फार तर गाढव म्हणा; पण हिंदू म्हणू नका, असे म्हणण्यात गौरव वाटू लागला. मी हिंदू नाही, मानव आहे, असे म्हणण्याची फॅशन वाढू लागली. ‘हिंदू’ शब्द जनमानसाच्या स्मृतिपटलावरून नष्ट झाला तर स्वतंत्र भारताची भयग्रस्त स्थिती उत्पन्न होईल, असे अभिजात स्वातंत्र्यसेनानी डॉक्टर हेडगेवार यांना वाटले. ‘स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यति’ या गीतावचनाप्रमाणे हिंदू समाजाची स्थिती होऊ नये याचे सखोल चिंतन त्यांनी केले असले पाहिजे. हिंदूपणाची (Hinduness) जाणीव टिकवणारे व वाढवणारे एक मौन पद्धतीने चालणारे काम त्यांनी प्रारंभ केले. यात त्यांचे स्वातंत्र्यसेनानी म्हणून असामान्यत्व दिसून येते. हे काम सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून ओळखले जाते.
 
 
संघ म्हणजे एक तासाची शाखा. भगवा ध्वज लावावा, ध्वजाला सर्वांनी वंदन करावे व नंतर शाखेचे कार्यक्रम करावे, अशी पद्धती पहिल्या दिवसापासून अवलंबिली गेली. भगव्या ध्वजाच्या केवळ दर्शनाने हिंदूपणाची (Hinduness) जाणीव उत्पन्न होते, असा अनुभव येऊ लागला. भगवा ध्वज लावून चालणार्‍या शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. समाजातील गणमान्य लोकांना निमंत्रित करून संघशाखा दाखवण्याचा सपाटा डॉक्टरांनी चालवला. देशामध्ये वर्तमानात 80 हजारांहून अधिक स्थानी भगवा ध्वज लावून शाखा चालतात. संघशाखेची ओळख भगव्या ध्वजावरून होते. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही संघशाखा असो, तेथे भगवा ध्वज दिसेल. हिंदूपणाची लाज नाही, तर हिंदूपणाचा गौरव वाटू लागला आहे. हिंदूपणाच्या गौरवाची भूमिका घेऊन काम करणार्‍या शेकडो संस्था आज कार्यरत आहेत. अशा संस्थांमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. हिंदूपणाचा बोध सर्व वर्गांत व्हावा, असा प्रयत्न संघाचा आहे. गिरिकंदरात राहणारे आदिवासी बंधू असोत, समुद्रकिनार्‍यावरचे मत्स्यकार असोत, ज्यांना घरदार नाही अशा भटक्या जमाती असोत, सर्वदूर संघशाखा पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदूपणाची जाणीव जसजशी होईल तसतसे हे विचारांचे साठलेले मळभ दूर होईल.
 
संघाची शाखा म्हणजे हिंदूपणाचा बोध घडवणारे स्थान
धन्य ती भारतमाता जिने केशव बळीराम हेडगेवारसारख्या नररत्नाला जन्म दिला.
Powered By Sangraha 9.0