हिंदू समाज जिथे जिथे गेला, तिथे नव्याने रुजला. त्याने तिथे त्या देशाशी कृतज्ञता ठेवत चांगलेच काम केले आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला बहुमत मिळाले आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प यांची निवड झाल्यावर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळ/राष्ट्राध्यक्षीय व्यवस्थापन यामध्ये जी काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांची नावे जाहीर केली, त्यामध्ये भारतीय हिंदू असलेल्या तुलसी गॅबार्ड आणि विवेक रामस्वामी यांची निवड करणे तसेच कॅश पटेल आणि जय भट्टाचार्य यांचादेखील महत्त्वाच्या खाते प्रमुखपदासाठी विचार होणे, हे भारतीयांसाठी आनंदाचे आहे.
ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळ/राष्ट्राध्यक्षीय व्यवस्थापन यामध्ये ज्या काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशा निवडी जाहीर केल्या त्यातील 43 वर्षांच्या तुलसी गॅबार्ड आणि 39 वर्षांच्या विवेक रामस्वामी या दोघांवर टाकलेल्या महत्त्वाच्या जबाबदारीमुळे अमेरिकेतील भारतीय आणि विशेष करून अमेरिकन-हिंदू आणि भारतातील भारतीयांनी आनंद व्यक्त केला.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय पद्धतीत, राष्ट्राध्यक्ष नोव्हेंबरमध्ये निवडून येतो; पण त्या पदाची शपथ ही नवीन वर्षाच्या 20 जानेवारीला घेतली जाते. मधल्या काळात नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष त्याला योग्य वाटत असलेल्या व्यक्तींची विविध खात्यांचे प्रमुख (सेक्रेटरी) म्हणून जमवाजमव करू लागतो. ह्या व्यक्ती निवडणुकीतून निवडून आलेल्या नसतात. किंबहुना जर एखाद्या अमेरिकन काँग्रेसमधील अथवा सिनेटमधील लोकनियुक्त व्यक्तीस राष्ट्राध्यक्षाने सेक्रेटरी म्हणून निवड केली तर त्या व्यक्तीस त्यांच्या लोकनियुक्त पदाचा राजीनामा द्यावा लागतो. नंतर अमेरिकन सिनेटच्या विशेष समित्या या निवडीची छाननी करतात, त्यांच्या जाहीर मुलाखती घेतात आणि नंतर समितीत तसेच सिनेटमध्ये मतदान करून त्यांना निवडले जाते. कधी कधी ह्या सर्व प्रक्रियांतून जाताना काही निवडी नाकारल्यादेखील जाऊ शकतात. या वेळेसही तसे होऊ शकते. म्हणून अजून ह्या निवडी आहेत, नियुक्ती नाहीत.
तुलसी गॅबार्ड
तुलसी गॅबार्ड ह्या हवाई ह्या अमेरिकन बेटांचा प्रांत असलेल्या भागातील आहेत. आई युरोपियन आणि वडील हे अंशत: पॅसिफिक महासागरातील सामोआ बेटांच्या भागातील मूलनिवासी आहेत आणि अंशतः युरोपियन वंशीय आहेत. तुलसी लहान असताना त्यांच्या आईने हिंदू धर्म स्वीकारला. आईबरोबर त्या वेळी लहान असलेल्या तुलसीनेही हिंदू धर्म स्वीकारला. इस्कॉन संप्रदायातील शिकवणीतून तुलसी ह्या कृष्णभक्त झाल्या आणि मनापासून भगवद्गीतेच्या उपासक झाल्या. गीता हा त्यांचा अतिशय आवडीचा ग्रंथ आहे. पंतप्रधान मोदी आणि तुलसीजी यांची जेव्हा अमेरिकेत पहिल्यांदा भेट झाली तेव्हा तुलसीजी यांनी मोदीजींना स्वतःची भगवद्गीतेची प्रत भेट म्हणून दिली. तुलसीजी अमेरिकन सैन्यात आहेत आणि 2004 साली त्यांना इराक युद्धात पाठवले गेले होते. आत्तादेखील, लेफ्टनंट कर्नल असा त्यांचा हुद्दा आहे.
राजकारणात मूळच्या त्या डेमोक्रॅटिक पक्षातील होत्या. 2012 साली त्या अमेरिकन काँग्रेसमध्ये हवाई प्रांतातील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडल्या गेल्या. त्या अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या पहिल्या हिंदू प्रतिनिधी आहेत. त्या वेळेस आपल्या पदाची शपथ त्यांनी गीतेवर हात ठेवून घेतली. नंतर 2020 पर्यंत त्यांनी विविध समित्यांमध्ये कामे केलीच; पण पक्षाच्याही उपाध्यक्ष म्हणून राहिल्या. 2020 साली त्यांनी पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला; पण शेवटी पक्षांतर्गत प्राथमिक निवडणुकीतल्या मतदानामुळे त्या जो बायडन यांच्यासमोर हरल्या आणि त्यांनी माघार घेतली. मात्र त्यानंतर त्यांना पक्षात एकटे पाडले जाऊ लागले. त्यांच्यावर राष्ट्रद्रोही आहेत म्हणून अधिकृत नाही, पण राजकीय चिखलफेकीचे आरोप केले गेले. त्यामुळे आणि एकूणच ज्या पद्धतीने पार्टी ही वोकीजमपुढे नतमस्तक झाली ते न पटल्याने त्यांनी पक्ष सोडला आणि 2021 पासून काही काळ राजकारणाच्या बाहेर राहिल्या. नंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आणि राष्ट्राध्यक्ष शर्यतीतल्या ट्रम्प यांना पूर्ण समर्थन दिले, त्यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय काम केले. आता ट्रम्प यांनी तुलसी यांना नॅशनल इंटेलिजन्सचे डायरेक्टर म्हणून निवड केल्याचे अधिकृतपणे घोषित केले आहे. या पदाच्या अंतर्गत अमेरिकेतील सीआयएसहित साधारण 17 विविध इंटेलिजन्स एजन्सीज येतात. तुलसी यांच्या बाजूने जसे बोलणारे आहेत, तसेच त्यांच्या विरोधात बोलणारेही आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची सिनेटच्या समितीतून निवड किती अवघड जाईल अथवा सोपी जाईल हे बघावे लागेल.
विवेक रामस्वामी
विवेक रामस्वामी यांचे आई-वडील हे केरळमधून आलेले तमिळी भाषिक आहेत. विवेक हे जन्मापासून अमेरिकेतील ओहायो या प्रांतातील आहेत. शालेय शिक्षणानंतर हार्वर्ड विद्यापीठात जीवशास्त्राचे त्यांनी शिक्षण घेतले आणि येल विद्यापीठात वकिलीचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर सुरुवातीला केलेल्या उद्योगांमुळे विवेक कोट्यधीश झाले. नंतर ते राजकारणाकडे वळले. समाजात वाढलेल्या वोकीझममुळे अस्वस्थ झालेल्या विवेक यांनी त्याविरोधात प्रत्यक्ष आवाज उठवला. त्यावरून त्यांनी लिहिलेले ‘वोक इनकॉर्पोरेटेड‘ (Woke Inc.) हे पुस्तकही गाजले. वादविवाद करण्यात अत्यंत निष्णात असलेल्या विवेक यांनी वोकविरोधात आणि जेव्हा जेव्हा त्यांना त्यांच्या धर्मावरून आणि श्रद्धेवरून प्रश्न विचारले, तेव्हा हिंदू धर्माच्या समर्थनार्थ समोरच्या व्यक्तीस कुठेही कमी न लेखता, घालून पाडून अथवा आवाज चढवून न बोलता प्रत्युत्तर देत निरुत्तर केले. परिणामी त्यांची अनेक मते पटो अथवा ना पटोत, अनेक अमेरिकन्समध्ये ते खूप लोकप्रिय झाले. अर्थात ह्या लोकप्रियतेचा त्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारी मिळवण्याच्या लढतीसाठी रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणुकीत ट्रम्प यांच्यासमोर काही उपयोग झाला नाही. त्या प्राथमिक निवडणुकीतून माघार घेतल्यावर विवेक यांनी विनाशर्त ट्रम्प यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासाठी देशभरात अथक प्रचार केला.
विवेक हे पहिल्यापासूनच रिपब्लिकन आहेत. म्हणून पारंपरिकरीत्या खासगीकरणाचे समर्थक आणि कमीत कमी सरकारचा हस्तक्षेप आणि म्हणून कमीत कमी सरकारी विभाग अथवा सरकारी अधिकारी असावेत, या मताचे. वयाने लहान आणि राजकीय अनुभवाने शून्य असल्याने असेल कदाचित, पण ट्रम्प यांनी विवेक यांना प्रत्यक्षात कुठलेही कॅबिनेटचे खाते दिलेले नाही. त्याऐवजी जगातील सर्वात श्रीमंत आणि हुशार उद्योजक असलेल्या इलॉन मस्क यांच्याबरोबर Commissioner of the Department of Government Efficiency या नावाखाली सरकारमध्येे चाललेला अनेकरीत्या अतिरिक्त खर्च कमी अथवा काही सरकारी खातीच बंद करण्याचे काम दिले आहे. उद्देश हा की, सरकारी कारभार अधिक कार्यक्षम करायचा. Department of Government Efficiency हे काही अधिकृत खाते नाही. परिणामी विवेक यांना सिनेटमधून मते देऊन अधिकृतपणे निवडून येण्याचा नियम लागू नाही. त्याचबरोबर त्यांनी आणि मस्क यांनी काहीही सरकारी खर्चावर कपात केली तरी ते धोरण तसेच्या तसे वापरता येणार नाही हे नक्की. घटनेने दिलेले कुठलेही हक्क नसलेले खाते मिळून विवेक यांनी नक्की काय मिळवले, हा प्रश्न पडू शकतो. त्याचे थोडक्यात उत्तर असे असू शकते की, पुढील राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी जो काही सरकार चालवण्याचा अनुभव लागणार तो यातून त्यांना मिळेल आणि जरी काही निर्णय चुकीचे ठरले तरी त्याचा त्यांना राजकीय तोटा होण्याची शक्यता कमी राहील.
अजून काही हिंदू अमेरिकन्स
अजून दोन मोठ्या खात्यांसाठी हिंदू नावे चर्चेत आहेत. कश्यप ऊर्फ कॅश पटेल ह्यांचे नाव FBI Director च्या पदासाठी घेतले जात आहे. दुसरे नाव आहे ते डॉक्टर जय भट्टाचार्य. यांचे नाव हे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या प्रमुख पदासाठी चर्चेला आले आहे. ह्या दोघांना राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यापेक्षा, ह्या दोन खात्यांतील भ्रष्टाचार कमी करणे आणि कार्यक्षमता वाढवणे यामध्ये रस आहे.
डॉक्टर जय भट्टाचार्य.
निवडीमागील वैशिष्ट्य
ट्रम्प आणि त्यांचे प्रमुख सल्लागार, सहकारी आदी प्रामुख्याने ख्रिश्चन आहेत. त्यांच्या आणि एकूणच रिपब्लिकन conservative लोकांच्या दृष्टीने अमेरिका फक्त ख्रिस्ती लोकांचा देश आहे. तरीदेखील कसाबसा एखादा टक्का असलेल्या हिंदू समाजातील योग्य व्यक्तींना सत्तेच्या राजकारणात जबाबदारीचे पद देऊन जवळ केले गेले आहे. हे असे का केले असावे अथवा करावेसे वाटले असेल? याची कारणे शोधायची झाली तर सर्वात महत्त्वाचे कारण येते ते म्हणजे विश्वासार्हता.
कश्यप ऊर्फ कॅश पटेल
हिंदू हे पाठीत खंजीर खुपसण्याचे धंदे करत नाहीत. ज्या धर्मात तत्त्वज्ञान आणि रीलिजन या अर्थाने धार्मिक विचारांचे वैविध्य आहे, त्यांनी ही वेगळी भूमी गेल्या सव्वाशे वर्षांत हळूहळू स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करता आपलीशी केली. मूल्यांची देवाणघेवाण करताना, ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणणार्या हिंदूंनी, हिंदू तत्त्वज्ञानही इथे रुजवले. ते रुजवताना इतर श्रद्धांचा, धर्मांचा तिरस्कारही केला नाही, स्थानिकांना बाटवण्याची दुकाने उघडली नाहीत आणि ज्या देशाशी नाते जोडले आहे त्याच्याशी बेइमानी केली नाही. म्हणून इथल्या समाजाचा हिंदू समाजावरील विश्वास दृढ होत गेला.
परिणामी ह्या लहान समाजाकडून डॉक्टर्स, इंजिनीयर्स, अर्थतज्ज्ञ, टेक्नॉलॉजी उद्योजक, अनेक मोठ्या कंपन्यांचे CEOs,, कलाकार, पत्रकार, लेखक, प्राध्यापक आणि आता सढळ हाताने दान देणारे दातेदेखील दिले गेले, त्या समाजाने राजकारणी व्यक्ती दिल्या नसत्या तरच प्रश्न होता. 2012 साली अमेरिकेने काँग्रेसमध्ये तुलसी यांच्या रूपाने पहिली हिंदू लोकप्रतिनिधी पाहिली. या देशाचा लोकप्रियतेमुळे निवडून आलेला हिंदू राष्ट्राध्यक्ष हे जग नजीकच्या भविष्यात लवकरच बघेल याची खात्री आहे.
हिंदुत्वाचा रथोत्सव
सावरकरांनी विश्वनिर्मितीबद्दलचे आणि विश्वाच्या कारभाराचे ऋग्वेदापासून असलेले कुतूहल हे जगन्नाथाच्या रथोत्सवाचे रूपक घेऊन, अंदमानात जन्मठेप भोगताना काव्यरूपात लिहिले होते. ईश्वराला, हे सगळे ब्रह्मांडाचे ऐश्वर्य घेऊन नक्की कुठे निघाला आहेस, हे विचारताना, सावरकर उत्सुकतेने विचारतात की, नक्की कुणाच्या दारी चालले आहे, का परत येणार आहे...
ऐश्वर्ये भारी । या अशा ऐश्वर्ये भारी ।
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी ॥धृ॥
पुसूं नयेचि परी । पुसतसे पुसूं नयेचि परी ।
मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी
दुज्या कुण्या द्वारी । जावया दुजा कुण्या द्वारी
किंवा केवळ मिरवत येई परत निजागारी
- जगन्नाथाचा रथोत्सव, स्वातंत्र्यवीर सावरकर
आज ही कविता आठवण्याचे कारण वैश्विक नसले तरी जागतिक पटलावरील म्हणजे गेल्या आठवड्यापासून भारतात आणि अमेरिकेतील भारतीयांमध्ये बहुचर्चेचा झालेला विषय - अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय कार्यकारिणीत ठळकपणे होऊ घातलेला हिंदू-अमेरिकन्सचा सहभाग हा आहे.
जगन्नाथाच्या रथोत्सवाप्रमाणेच हा हिंदू समाजाचा रथोत्सव अनेकदा भारतात सोडून आलेल्या आप्तस्वकीयांना असेच प्रश्न विचारायला लावत असतो. या संदर्भात प्रश्न असतो, नक्की कशासाठी हा अमेरिकेत दुज्या द्वारी जाण्याचा अट्टहास, आटापिटा? तसा तो आटापिटा सगळ्यांनी करावा असे नसते, तो करणे म्हणजेच सगळे काही नसते. स्वदेशाच्या सीमा ओलांडून बाहेर जाणारी हिंदू व्यक्ती काही इतका विचार करून जात नाही. कधीकधी शिकायला, तर बर्याचदा नवीन संधी शोधत ती बाहेर जाते. तरीदेखील ‘स्वदेशो भुवनत्रयम्’ म्हणणार्या हिंदू मनात खोलवर रुजलेली हिंदुत्वाची मूल्ये ही व्यक्तीसाठी आणि समाजासाठी जागरूक होतात आणि समोरच्याला आपले म्हणायला लावतात.
या अहोरात्र चालू असलेल्या रथोत्सवातून हिंदू समाज जिथे जिथे गेला, नव्याने रुजला, तिथे त्याने त्या देशाशी कृतज्ञता ठेवत त्या देशाचे भलेच केले आहे आणि नकळत तिथल्या समाजाला आपलेसे केले आहे. तुलसी गॅबार्ड आणि विवेक रामस्वामी यांची निवड तसेच कॅश पटेल आणि डॉ. जय भट्टाचार्य यांचादेखील महत्त्वाच्या खाते प्रमुखपदासाठी विचार, हा ह्याच रथोत्सवाचा एक भाग आहे.