बाणासुराची कथा अनुभवताना...

18 Nov 2024 17:19:15
 
@प्रा. सुहास द. बारटक्के 
तेजपूरला गेलात तर आजही जागोजागी ही कथा आपल्याला अनुभवायला मिळते. प्रथम आपण पोहोचतो ते गावात असलेल्या शिवमंदिरापाशी. शंकराची भव्य मूर्ती व त्यामागे असलेलं प्राचीन मंदिर हे तेजपूरमधलं पाहाण्याचं मुख्य ठिकाण! भगवान शंकराची प्राचीन भव्य पिंडी व अगदी वेगळ्या थाटाचं प्राचीन मंदिर हे मुख्य आकर्षण. मंदिराच्या प्रांगणात असलेली भगवान शंकराची मूर्ती अतिशय देखणी व कलात्मकरीत्या सजवलेली आहे. त्यामागचं मंदिरही बाहेरून अगदी वेगळ्या धाटणीचे असून आपण दक्षिणेत पाहत असलेल्या मंदिरांपेक्षा याची रचना व कलाकुसर अगदी वेगळी आहे.
 
 Dispur tourist places
 
वाहाटी विमानतळावर उतरलो तेव्हा डोक्यात होतं ते तिथलं सुप्रसिद्ध कामाख्या मंदिर! कामाख्या देवीचं मंदिर महाराष्ट्रात खर्‍या अर्थानं जास्त प्रसिद्ध झालं ते काही राजकारणी मंडळींना कामाख्या देवी नवसाला पावली त्यामुळे; परंतु आधीच उशीर झाल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रात्रीच्या मुक्कामाला तेजपूर गाठणं आवश्यक होतं. गुवाहाटी ते तेजपूर तब्बल पाच तासांचा प्रवास होता. वाटेत कामाख्या मंदिराचा फाटा (रस्ता) लागूनही तिकडे न वळता थेट तेजपूरकडे निघालो. पन्नासएक किलोमीटर जाऊन जेवणाचं हॉटेलही गाठायचं होतं. येताना कामाख्या देवीचं दर्शन घेऊ म्हणून चढाच्या रस्त्यानं तेजपूरकडे निघालो. ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या छोट्या छोट्या राज्यांपैकी हल्ली फक्त अरुणाचल, आसाम आणि मेघालय या तीन राज्यांतच पर्यटन हळूहळू विकसित होऊ लागलंय. तरीही तणावग्रस्त प्रदेश म्हणून सुरक्षा अगदी कडक असते. अगदी तेजपूरला जाताना वाटेत जेवणासाठी थांबलो त्या हॉटेलातही सुरक्षारक्षकांची धावपळ चालू होती. हॉटेलात पितळी वाट्यांनी सजवलेलं भलं मोठं पितळी ताट पुढ्यात आलं. अतिशय सुंदर चवीचं, पालेभाज्यांनी समृद्ध असलेलं ते आसामी जेवण मनसोक्त हादडलं. भाज्या तरी किती प्रकारच्या, तर तब्बल सात प्रकारच्या. आमटी भाजीत शेवग्याच्या शेंगा घातलेल्या. तेजपूरकडे जाताना प्रारंभीचा चढ संपल्यावर सपाट-नारळसुपारीचा प्रदेश लागतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी नक्षीदार पानांची झाडं दिसतात, ती शेवग्याची. इकडे शेवगा मुबलक. रस्त्याच्या कडेला शेवग्याची लागवड करण्याची कल्पना आवडली. डांबा किंवा शेवगा याला आसामी भाषेतही साधर्म्य असणारे स्थानिक नाव आहे व तो तिथल्या आसामी जेवणातला मुख्य पदार्थ आहे. तेजपूरला पोहोचेपर्यंत रात्र झालीच. सायंकाळी तिकडे वाळूचे वारे सुटतात. रस्त्यावरही वाळू पसरते म्हणून हॉटेल गाठून आराम करणेच पसंत केले.
 
 Dispur tourist places 
 
सकाळी लवकर तेजपूर पाहायला बाहेर पडलो. तेजपूरचं पूर्वीचं (प्राचीन काळातलं) नाव सोनीतपूर. असुरांचा राजा बाणासुर हा सोनीतपूरचा राजा. भागवत पुराणात वर्णन केलेलं ‘हरी-हर’ युद्ध इथे झालं. हरी म्हणजे श्रीकृष्ण आणि हर म्हणजे हर हर महादेव या दोघांमध्ये तुंबळ युद्ध होऊन सोनीतपुरात रक्ताचे पाट वाहिले आणि सोनीतपूरचं तेजपूर झालं. (तेज म्हणजे रक्त या अर्थी.)
यानिमित्ताने बाणासुराच्या कथेची उजळणी करणंही आवश्यक होतं. महाबलीचा पुत्र बाणासुर हा असुरांचा राजा. सोनीतपूर त्यानंच वसवलं. बाणासुर हा शिवभक्त होता. शिव-शंकराचे तांडवनृत्य सुरू असताना आपल्या हजार हातांनी दमछाक न होता वाद्य (मृदंग) वाजवून त्यानं शिव-शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. प्रसन्न होऊन शिव-शंकराने त्याला ‘काय देऊ?’ असं विचारलं तेव्हा बाणासुरानं सांगितलं की, ‘माझ्या या नगरीचं तू रक्षण कर. मला अभय दे.’ भगवान शंकराने ही विनंती मान्य केल्यावर बाणासुराला अधिक स्फुरण चढलं. तो क्रूर व उद्धट वागू लागला.
 
 
बाणासुराला एक सुंदर तरुण कन्या होती. तिचं नाव उषा. एकदा तिनं स्वप्नात एका सुंदर तरुणाला पाहिले. तिला तो तरुण इतका आवडला, की अशा वर्णनाचा कोण आहे, याची ती चौकशी करू लागली. चित्रलेखा नावाची तिची एक अतिशय हुशार आणि गुणी कलावंत असलेली मैत्रीण होती. तिच्याजवळ उषानं आपलं मन मोकळं करताच चित्रलेखानं उषानं केलेल्या वर्णनानुसार त्या तरुणाचं चित्र काढायला सुरुवात केली. तिच्या लक्षात आलं की, या वर्णनाचा एकच पुरुष सुप्रसिद्ध आहे तो म्हणजे अनिरुद्ध-भगवान श्रीकृष्णाचा नातू!
 
 
 Dispur tourist places
 
 
त्याच्या आठवणीनं उषा खंगू लागताच चित्रलेखानं तिला अनिरुद्ध मिळवून द्यायचं वचन दिलं. आपल्या यौगिक शक्तीच्या बळावर ती अनिरुद्धच्या द्वारकेमधल्या राजमहालात गेली. निद्रिस्त असलेल्या अनिरुद्धला तिनं पलंगासहित अलगद उचलले. त्याची झोप मोडायच्या आत तिने त्याला सोनीतपूरच्या उषाच्या महालात आणून पोहोचते केले व म्हणाली - “घे तुझा अनिरुद्ध!” चित्रलेखानं मैत्रिणीला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि अनिरुद्ध उषाच्या महाली राहू लागला. उषानं अगदी हारतुरे, सुगंधी उत्तरे, खाद्यपेये - पक्वान्ने अनिरुद्धला अर्पण करून त्याचं प्रेम जिंकलं. त्याच्यावरची प्रीती प्रकट केली. अनिरुद्धही खूश झाला व तिच्या प्रेमाचा त्यानं स्वीकार केला. उषानं आपल्या खास तिच्यासाठी असणार्‍या गुप्त कक्षात अनिरुद्धला लपवून ठेवलं. असेच काही दिवस गेल्यावर हळूहळू ही बातमी उषाच्या महालाबाहेर फुटलीच. बाणासुराच्या कानावर ही वार्ता जाताच रागाने क्रुद्ध होऊन बाणासुर उषाच्याअंतःपुरात पोहोचला. तिथं उषा आणि अनिरुद्ध सारीपाट खेळात मग्न होते. बाणासुरानं लगेचच अनिरुद्धला कैद केलं व उषाच्या महालाबाहेर नेलं. महिनाभर अनिरुद्धला बाणासुराने कैद करून ठेवलं. उषादुःखी झाली. इकडे नारदमुनींनी ही वार्ता थेट यदुकुळात पोहोचवली. श्रीकृष्ण बलरामासहित यदुकुलवासीयांनी अनिरुद्धला सोडवण्याच्या हेतूने बाणासुराच्या सोनीतपूरवर हल्ला केला. 12 अक्षौहिणी सैन्यासह यदू बाणासुरावर तुटून पडले. बाणासुरानेही निकराची लढाई सुरू केली. तुंबळ युद्ध झाले. बाणासुराला वचन दिल्याप्रमाणे खुद्द शिव-शंकरही नंदीवर बसून बाणासुराचं रक्षण करण्यास धावले. भगवान शंकर व भगवान श्रीकृष्ण यांनी एकमेकांवर अस्त्रे डागली. पर्वत, वायू, पर्जन्य, सर्व अस्त्रे वापरल्यावर शेवटी बाणासुराने श्रीकृष्णावरच शस्त्र उगारले. मग मात्र श्रीकृष्णाने बाणासुराच्या रथाच्या सारथ्याला प्रथम मारले. नंतर बाणासुराचे हात छाटले; परंतु भगवान विष्णू यांनीही महाबलीला वचन दिले होते की, तुझ्या वंशातील कुणाचाही विनाश होणार नाही, त्यामुळे कृष्णाने बाणासुराचा जीव घेतला नाही. याच वेळी ब्रह्मदेवांनी मध्यस्थी करून हे युद्ध थांबवले. कृष्णाने बाणासुराचे तोडलेले हात त्याला पुन्हा बहाल केले. हजार हातांप्रमाणे असणारे दोनच हात तोडले होते; परंतु चार हात बहाल केल्यामुळे बाणासुर खूश झाला. श्रीकृष्णापुढे नतमस्तक झाला. त्याने उषाचे व अनिरुद्धचे लग्न लावून उषाची द्वारकेला पाठवणी केली.
 
 Dispur tourist places 
 
ही कथा सांगायचं कारण तेजपूरला गेलात तर आजही जागोजागी ही कथा आपल्याला अनुभवायला मिळते. प्रथम आपण पोहोचतो ते गावात असलेल्या शिवमंदिरापाशी. शंकराची भव्य मूर्ती व त्यामागे असलेलं प्राचीन मंदिर हे तेजपूरमधलं पाहाण्याचं मुख्य ठिकाण! भगवान शंकराची प्राचीन भव्य पिंडी व अगदी वेगळ्या थाटाचं प्राचीन मंदिर हे मुख्य आकर्षण. मंदिराच्या प्रांगणात असलेली भगवान शंकराची मूर्ती अतिशय देखणी व कलात्मकरीत्या सजवलेली आहे. त्यामागचं मंदिरही बाहेरून अगदी वेगळ्या धाटणीचे असून आपण दक्षिणेत पाहत असलेल्या मंदिरांपेक्षा याची रचना व कलाकुसर अगदी वेगळी आहे.
 
 
नंतर आपण निघतो ते जवळच असलेला अग्निगडाकडे. ही एक छोटीशी टेकडी असून गोलाकार रस्त्यानं चढत आपण टेकडीच्या माथ्यावर पोहोचतो. वाटेत एका वळणापाशी ब्रह्मपुत्रा नदीचं विहंगम दर्शन होतं. नजरेत न मावणारं ब्रह्मपुत्रा नदीचं विशाल पात्र इतक्या उंचावरून पाहताना ब्रह्मपुत्रेला नदी न म्हणता नद का म्हणतात ते कळून येतं. वर गेल्यावर टेकडीच्या माथ्यावरून तर ब्रह्मपुत्रेचं अतिशय भव्य स्वरूप पाहायला मिळतं. इथं एक मनोराही बनवला आहे. त्यावरून ब्रह्मपुत्रेचं होणारं दर्शन हे केवळ अविस्मरणीय... आणि इथेच पाहायला मिळतात ती हरी-हर युद्धाची सुरेख देखणी दगडी शिल्पं. टेकडीला प्रदक्षिणा घालताना जागोजागी आढळणारी ही रंगीत शिल्पं (हिरवट निळसर रंगातली) आपल्या नजरेसमोर ती पौराणिक कथा उभी करतात. ही शिल्पं पाहताना ती कथा अनुभवणं हेच तेजपूरच्या भटकंतीचं मुख्य आकर्षण!
 
 
प्रारंभी आपलं स्वागत करतं ते उषा-चित्रलेखा गप्पा मारत असल्याचं शिल्प. इथेच बाणासुराचं मुख्य निवासस्थान होतं, असं म्हणतात. बाहेरच्या प्रांगणात तीन सिंहांच्या प्रतिकृती असलेला राजस्तंभ पाहायला मिळतो. खालच्या बाजूलाच भगवान शिव-शंकर पर्वतावर व्याघ्रचर्म अंथरून बसले आहेत व समोर बाणासुर हात जोडून विनवणी करतो आहे असं शिल्प आहे. त्यानंतर हरी-हर युद्धाची घमासान लढाई दाखवली असून सुदर्शनधारी कृष्ण व समोर त्रिशूलधारी शंकर एकमेकांवर अस्त्र डागताना दाखवले आहेत त्यांच्या सभोवार मृतदेहांचा खच दाखवला आहे. या वेळी साक्षात ब्रह्मदेव मध्यस्थी करण्यासाठी आले आहेत असे हुबेहूब युद्धचित्र इथे साकारले आहे.
 
 
अग्निगडाला प्रदक्षिणा घालीत आपण पुढे निघालो की, आपल्याला उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह सोहळा पाहायला मिळतो.
मात्र कथेच्या क्रमानुसार अनिरुद्धचे चित्रलेखानं केलेलं हरण म्हणजे तिनं पलंगासहित अनिरुद्धला उचलून आणलं तो प्रसंग अगदी शेवटी पाहायला मिळतो. ही दगडाची शिल्पं पाहात अग्निगडाची प्रदक्षिणा पूर्ण होते व आपण खाली उतरतो.
इथं आपलं स्वागत आसामच्या खास वस्त्रानं-गमछानं करण्याची प्रथा आहे.
गळ्याभोवती उपरणे (गमछा) आणि मनात अनिरुद्ध-उषाची कथा घोळवीत आपण अग्निगडावरून परततो तेव्हा साक्षात बाणासुराची कथा प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद झालेला असतो.
Powered By Sangraha 9.0