पस्तीसला पासिंग

16 Nov 2024 15:16:04
@गौरी साळवेकर
माणसाला पस्तीसला पास करायचं म्हणजे काय करायचं? तर त्याच्याकडून जे अपेक्षित आहे (आपल्याला नव्हे, एकूणच) त्यात जर तो पास होत असेल तर बाकी गोष्टींना फार महत्त्व द्यायचं नाही. सर्वोत्कृष्टतेचा आग्रह हा काही वेळा हटवादीपणाकडे झुकलेला असतो. एखाद्या व्यक्तीकडून ज्या किमान गोष्टी अपेक्षित आहेत, त्यांची पूर्तता होत असेल तर माझ्या लेखी तो माणूस पस्तीसला पास होण्यासाठी पात्र आहे आणि दुसरी गोष्ट, आपणही कुणाच्या लेखी पस्तीसला पास असू याची जाणीव सदैव ठेवली आणि लोक मलाही सहन करत असतील, सांभाळून घेत असतील, त्यांनाही माझा त्रास होत असेल याची जाणीव ठेवल्याने मीदेखील जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करते.

thirty-five
 
एक फार छान वाक्य वाचण्यात आलं. Without a little neglegance world would be an intolerable place! अगदी मनापासून पटलं! आपल्याकडेसुद्धा एक गमतीदार म्हण आहेच की, फार बारकाईने बघितलं तर आत्याबाईच्यासुद्धा मिश्या दिसतात!
 
 
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. त्यातली एक गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात असणारे लोक. जन्मतः आपण पालक, भावंडं निवडू शकत नाही. त्यातल्या त्यात मित्रमंडळी निवडता येत असली तरी समाजात वावरताना, काम करताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला हवी तशी लोकच भेटतील याची कोणतीही शाश्वती नसते. भेटलेले लोक आपल्याला हवं तसं वागतील याची शाश्वती तर त्याहून नसते. प्रत्येक व्यक्ती आपलं भवताल, बालपण, आनुवंशिक गुणदोष आणि आपलं स्वतःचं एक सत्त्व यांच्यासह जगत असते आणि तिची प्रत्येक व्यक्तीशी ’केमिस्ट्री’ जुळेलच असं कधी घडत नाही. या सगळ्या गोंधळात आपण माणसांची पारख नेमकी करायची तरी कशी? याबद्दलची भरपूर माहिती आज उपलब्ध असली तरीही प्रत्येक जीवनानुभव, प्रसंग वा त्या व्यक्तीची आणि आपलीही जडणघडण अशी कोणत्याही निश्चित ठोकताळ्यामध्ये बसवता येत नाही हेही तितकंच खरं! अशा वेळी आपण आपला पिंड ओळखून स्वतःसाठी काही निकष घालून घेतले तर गोष्टी थोड्या सोप्या होतात इतकंच.
 
 
साधारण 20 व्या वर्षापासून म्हणजे कमवायला लागल्यापासून बाहेरचं जग काय असतं हे कळायला लागलं. खरं तर मानसशास्त्र शिकण्यासाठी समाज हे सगळ्यात मोठं विद्यापीठ असतं; पण हे आपण डोळ्याआड करतो. अनेक वर्षे धक्के खाल्ल्यावर कधी यश तर कधी अपयश यांचा सामना केल्यावर, कधी लोकांनी स्वार्थासाठी जवळ केल्यावर, तर कधी दूर लोटल्यावर, अनेक ठिकाणी काम करताना मानवी स्वभावाचे वेगवेगळे नमुने बघायला मिळाले. तसे ते घरात, कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्येही असतातच. या सगळ्यांसोबत राहताना, काम करताना, कधी माझ्या, तर कधी त्यांच्या स्वार्थासाठी काही तडजोडी कराव्या लागल्या. त्याग नव्हे तडजोडीच, कारण त्या करण्यामागे कोणताही उदात्त, सामाजिक हेतू नसून केवळ वैयक्तिक कारणं होती. कधी मला त्रास झाला, कधी माझ्यामुळे समोरच्याला.
 
 
कितीही एकांतप्रिय असलो तरीही समाजाशिवाय आपलं पान हलूच शकत नाही हेच वास्तव आहे. ‘मला कुणाची गरज नाही’ हे वाक्य सिनेमा, कथाकादंबरीमध्ये शोभून दिसतं. वास्तवात या वाक्याला कचराकुंडीत जागा मिळावी इतकीही किंमत नसते. काम करताना, घरात राहताना, समाजात वावरताना तुम्हाला एकत्र राहावंच लागतं आणि ही अपरिहार्यता बदलता येत नाही. या सगळ्यात adaptability म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला इतरांशी किंवा परिस्थितीशी जुळवून घेण्याचा गुण सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो, हे समजण्यासाठी काही रॉकेट सायन्स शिकण्याची गरज नाही.
 
 
आता हे जुळवून घेणं शिकताना प्रत्येकाचे वेगवेगळे निकष असू शकतील; पण मी माझ्यापुरतं एक तत्त्व गेली काही वर्षे वापरते आहे- पस्तीसला पास. माणसाला पस्तीसला पास करायचं म्हणजे काय करायचं? तर त्याच्याकडून जे अपेक्षित आहे (आपल्याला नव्हे, एकूणच) त्यात जर तो पास होत असेल तर बाकी गोष्टींना फार महत्त्व द्यायचं नाही.
 
 
सर्वोत्कृष्टतेचा आग्रह हा काही वेळा हटवादीपणाकडे झुकलेला असतो. सर्वोत्कृष्ट एम्प्लॉयी, एम्प्लॉयर, पालक, मित्र, जोडीदार, प्रियकर, शेजारी, भावंडं असं काही अस्तित्वात नसतंच.
 
 
एखाद्या व्यक्तीकडून ज्या किमान गोष्टी अपेक्षित आहेत, त्यांची पूर्तता होत असेल तर माझ्या लेखी तो माणूस पस्तीसला पास होण्यासाठी पात्र आहे. मी पुन्हा सांगते, हा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे, आग्रह नाही. अर्थात व्यक्तीत काही गंभीर, अत्यंत त्रासदायक असे दोष असतील तर त्या व्यक्ती केव्हाही बादच.
 
 
गंमत अशी की, मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला पस्तीसला पास म्हणून बाद केलं नाही तेव्हा अनेकदा त्या व्यक्ती कालांतराने 50-60-70% पर्यंत स्वतःच (माझ्यामुळे नाही) पोहोचल्या! आणि आपण या व्यक्तीबद्दल काळ्या दगडावरची रेघ म्हणून काही खूणगाठ बांधली नाही हे बरं झालं असं मला वाटलं.
 
 
काही जण मात्र तिथेच, काही त्याखाली येऊन बाददेखील झाले. मात्र यासाठी एकाच प्रसंगाची फुटपट्टी त्या माणसासाठी वापरायची नाही हे शिकता आलं. अर्थात जर एखादा प्रसंग त्या माणसाला जोखणारा असेल आणि अशा अजून एक-दोन समान प्रसंगांतून त्या माणसांची परीक्षा करता आली तर मात्र हे पस्तीस गुण वाया घालवायचे नाहीत हे पक्कं समजलं.
 
 
शिवाय जी व्यक्ती अशी आहे तिच्यासाठी आपणदेखील 100 मार्कांचा प्रयत्न करायचा नाही हेही समजलं. अगदी ही व्यक्ती घरातली असली तरीही. एखाद्याची क्षमता जितकी आहे आणि त्याला ती तितकीच ठेवण्याची इच्छा आहे, त्या व्यक्तीसाठी आपला वेळ, ऊर्जा, भावना काहीही पस्तीसपेक्षा जास्त खर्च करायचं नाही, कारण इथे समोरच्याची बदलण्याची किंवा न बदलण्याची इच्छा हा निर्णायक घटक आहे.
 
 
माझ्या या पस्तीस मार्कांमध्ये सगळ्यात जास्त गुण integrity किंवा प्रामाणिकपणासाठी आहेत. हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकेल. कुणाला बुद्धिमत्ता महत्त्वाची वाटेल, कुणाला भावनाशीलता, तर कुणाला यश आणि पैसा. हे ज्याची त्याची जीवनमूल्ये काय आहेत यावर ठरेल आणि त्यात आपण न्यायाधीशांच्या भूमिकेत जाण्याचं काही कारण नाही.
 
 
माझ्या मते स्किल शिकता येतं; पण काही गुण उपजत असावे तरी लागतात किंवा कष्टाने कमवावे लागतात. त्यामुळे जीवनाच्या इतर कोणत्याही क्षेत्रात 80-90% मिळवणारी व्यक्ती integrity कमिटमेंट विषयात भोपळा मिळवत असेल तर माझ्या लेखी बादच! अर्थात, ही माझी वैयक्तिक निवड आहे. अशा व्यक्ती माझ्याअंतःस्थ वर्तुळात कधीही नसतात.
 
 
आणि दुसरी गोष्ट, आपणही कुणाच्या लेखी पस्तीसला पास असू याची जाणीव सदैव ठेवली आणि लोक मलाही सहन करत असतील, सांभाळून घेत असतील, त्यांनाही माझा त्रास होत असेल याची जाणीव ठेवल्याने मीदेखील जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करते. शंभर मार्कांच्या अट्टहासापोटी ऊर फुटेस्तोवर धावून, प्रत्येकावर सरसकट फुली मारून स्वतःला कधी इतरांपेक्षा वेगळं, श्रेष्ठ समजायला लागतो हे आपलं आपल्यालाही समजत नाही. काय गंमत असते पाहा, आपण इतरांकडून सर्वोत्कृष्टतेचा आग्रह धरताना स्वतःला मात्र त्या तराजूत तोलत नाही. आपण यात नेमकं कुठे बसतो याचं आत्मपरीक्षण करावं असं आपल्याला वाटत नाही. वर उल्लेख केलेला थोडासा neglegance लोकांनी आपल्या बाबतीत दाखवावा असं आपल्याला वाटत असतं. हे दुर्लक्ष करणं म्हणजे गंभीर चुका नजरेआड करणं नव्हे. हे दुर्लक्ष एक प्रकारच्या समतोलकाचं काम करत असतं. आपले दैनंदिन व्यवहार, नातेसंबंध, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य तोलून धरणारा समतोलक. याचा काटा कुठे, किती झुकू द्यायचा हे आपल्या हातात आहे. हा समतोल साधताना आपण कुणावर अन्याय करू नये आणि स्वतःवरही अन्याय होऊ देऊ नये हे साधण्यात या मिठासारख्या ’लिटल निग्लिजन्सच’ यश आहे.
Powered By Sangraha 9.0