गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा महाराष्ट्र राज्य आर्थिक ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यांच्या माध्यमातून 801 महिलांनी एकत्र येऊन 2018 साली ‘इकोवन सेल्फ रीलायंट वुमेन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्रा. लि.’ ची स्थापना केली आहे. या माध्यमातून महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. या महिला शेतमाल व गौण वनउपज खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून विक्रीचे कार्य करत आहेत.
गडचिरोली जिल्हा हा तसा जंगलांनी व्यापलेला आहे. निसर्गसंपन्न असलेल्या या जिल्ह्याला नक्षलवाद्यांची आणि कुपोषण समस्येची दृष्ट लागली आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला कुरखेडा तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे कार्य सुरू आहे. हा तालुका जंगल, डोंगरांनी व्यापलेला आहे. ना इथे मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत, ना उद्योग. त्यामुळे तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीतही इथली माणसं जगतात. अशा या परिस्थितीत इथल्या महिलांच्या स्वप्नांना नव्या उमेदीची पालवी दिली ती ‘इकोवन सेल्फ रीलायंट वुमेन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्रा. लि.‘ने.
कुरखेडा तालुक्यातील शेतमालाला योग्य/रास्त भाव मिळवून देणे, कंपनीशी जुळलेल्या महिलांची आर्थिक स्थिती उंचावणे, तालुक्यातील उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यापासून उपयुक्त उत्पादन तयार करणे, उपलब्ध असलेल्या उत्पादनांची मार्केटिंग करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या उपजीविकेत वृद्धी करण्याच्या उद्देशाने तालुक्यात प्रभागसंघ, ग्रामसंघ, स्वयं साहाय्यता समूह, उत्पादक गट, महिला, उत्पादक कंपनी अशी रचना करण्यात आलेली आहे. यानुसार प्रत्येक प्रभागसंघ, ग्रामसंघ, समूह, उत्पादक गट, महिला उत्पादक कंपनी हे विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. या विविध उत्पादक गटांतील 801 महिलांनी एकत्र येऊन त्यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे भागभांडवल गोळा करून 8 सप्टेंबर 2018 रोजी इकोवन सेल्फ रीलायंट वुमेन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी प्रा. लि.ची स्थापना करण्यात आली. कंपनीत 801 भागधारक आहेत. कौशल्या विनायक मारगाये या कंपनीच्या अध्यक्षा, तर कौसरबानू पठाण या सचिव आहेत. वंदना पंचभाई, सुरेखा पिंपळकर, दीपाली सहारे, छविन्द्रा सहारे, आरती उईके, वैशाली पाटणकर या महिला कंपनीच्या सदस्या आहेत.
स्थानिक फळपिकांना प्राधान्य
अध्यक्षा कौशल्या मारगाये सांगतात, “इकोवन सेल्फ रीलायंट वुमेन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही कुरखेडा तालुक्यातील स्थानिक शेतमाल व गौण वनउपज खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून त्याची पॅकिंग, ग्रेडिंग, लेबलिंग करून विक्रीचे कार्य करीत आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य सेंद्रिय खते, बी-बियाणे, जैविक औषधी शेतकर्यांना पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कंपनी करीत आहे. रामगड (ता. कुरखेडा) येथील सीताफळ प्रक्रिया केंद्रात तयार झालेला सीताफळ पल्प, जांभूळ पल्प, ड्राय जांभूळ, पुराडा (ता. कुरखेडा) येथील आवळा कँडी, आवळा सुपारी, जांभूळखेडा (ता. कुरखेडा) येथील चारोळी, मालदुगी (ता. कुरखेडा) येथील जंगली मध, कढोली, धमदीटोला, नवरगाव (ता. कुरखेडा) येथील गांडूळ खत, चांदोना, दादापूर येथील जैविक औषधी, बेलगाव येथील अंबाडी पावडर जॅम, जेली मुखवास, चिखली येथील शतावरी पावडर, पुराडा येथील मोहा लाडू असे संपूर्ण तालुक्यातील विविध प्रक्रिया केंद्रांतील उत्पादित मालांची बाजारजोडणी करीत आहे. मालाच्या विक्रीतून कंपनीस नफा प्राप्त होत आहे. कंपनीच्या माध्यमातून तालुक्यात 85 उत्पादक गट तयार करण्यात आलेले असून त्या उत्पादक गटांमार्फत विविध प्रक्रिया केंद्रे चालविली जात आहेत. यातून विविध गटांच्या अनेक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत.“
चारोळी संकलन व प्रक्रिया केंद्र
तळेगाव/वडेगाव (ता. कुरखेडा) या प्रभागसंघात जांभूळखेडा हे छोटेसे गाव आहे. या गावामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘झेप‘ या ग्रामसंघाची स्थापना झालेली आहे. 10 मार्च 2018 रोजी झेप ग्रामसंघाने चारोळी संकलन व प्रक्रिया केंद्र सुरू केले. या संघाने कुरखेडा, कोरची (ता. कुरखेडा) व एटापल्ली तालुक्यातील चारोळी खरेदी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळत आहे. सुरुवातीला त्यांनी ग्रामसंघातील एक लाख उखऋ निधी घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. नंतर उमेद अभियानांतर्गत चारोळी केंद्रासाठी तीन लाख रुपये निधी प्राप्त झाला. या व्यवसायात 46 महिला सहभागी आहेत. 240000 रु.ची चारोळी खरेदी केली. त्याची 290000 रुपये इतकी उलाढाल झाली. त्यात त्यांना 50000 रुपये इतका नफा झाला. चारोळी खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून लेबल, पॅकेजिंग करून विक्री करीत आहेत. खरेदी व प्रक्रिया केलेल्या चारोळीची अॅमेझानवर विक्री केली जात आहे. प्रथम चारोळी संकलन करून केंद्रामध्ये जमा केली जाते. नंतर ती चारोळी मशीनच्या साहाय्याने फोडली जाते. त्यानंतर त्यातील टरफल बाहेर काढले जाते. यानंतर पॅकिंग व लेबलिंग करून विक्री केली जाते.
मध संकलन व विक्री
गेवर्धा/गोठणगाव (ता. कुरखेडा) या प्रभागसंघात मालदुगी हे छोटेसे गाव आहे. येथील भरारी महिला उत्पादक गटाच्या माध्यमातून जंगलव्याप्त भागातून मधाचे संकलन व विक्री करण्यात आली. 2019 या वर्षात दोन लाख रुपये खर्च करून त्यांनी 256751 रुपयांची आर्थिक उलाढाल केली. 2020 या वर्षात त्यांनी मधाची 169050 रुपयांची खरेदी केली, तर 2023-24 वर्षात पाच लाखांची उलाढाल झाली आहे.
अंबाडीपासून खाद्यपदार्थ
बेलगाव (ता. कुरखेडा) एक जनजाती (आदिवासी) वस्ती असलेले गाव आहे. या गावात एकूण 18 समूह आहेत. क्रांती महिला ग्रामसंघ हे दोन गावे मिळून तयार झालेले आहे. या ग्रामसंघाला एकूण 31 समूह जुळलेले आहेत. 2019 सालापासून ग्रामसंघाने अंबाडीपासूनचे खाद्यपदार्थ तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. सध्या अंबाडीपासून अंबाडी जाम, जेली शरबत पावडर, चटणी मुखवास इत्यादी पदार्थ तयार केले जातात. शिवाय अंबाडी जाम, जेली, शरबत पावडर, चटणी, मुखवास, अंबाडी चहा इत्यादी पदार्थांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. मुंबई येथील सरस प्रदर्शनात अंबाडी शरबतला विशेष पसंती मिळाली. यामुळे महिलांचा आत्मविश्वास आणखीन वाढला. याशिवाय गटाकडून शतावरी वनस्पतीची लागवड केली जाते. या माध्यमातून शतावरीची पावडर करून विक्री करण्यात येत आहे. मोहापासून लाडुनिर्मिती
पुराडा येथील माँ संतोषी स्वयं साहाय्यता समूहाने जंगलातील मोहापासून मोहा लाडू व मोहा चिकी तयार करून पॅकिंग, ब्रँडिंग, लेबलिंग या प्रक्रिया करून विक्री केली जाते. मोहा लाडूचे 250 ग्रॅम व 100 ग्रॅमचे डबे उपलब्ध करून दिले आहेत. 250 ग्रॅमच्या डब्याची किंमत ही 120 रुपये आहे, तर 100 ग्रॅमच्या डब्याची किंमत 60 रुपये आहे.
उलाढाल
इकोवनने सन 1 एप्रिल 2020 पासून लाखो रुपयांची खते, बियाणे, बायो खत, कडधान्यांची विक्री केली आहे. या वर्षात इकोवन महिला कंपनीने लाखांची उलाढाल केली आहे. या 2023-24 वर्षात 25 लाखांची उलाढाल झाली आहे.
भविष्यातील नियोजन
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून इकोवन कंपनीला एक प्रकल्प मंजूर झाला आहे. पुराडा (ता. कुरखेडा) येथे प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून वनउपजाचे संकलन, प्रक्रिया व विक्री अशी साखळी तयार केली जाणार आहे. प्रत्येक महिला कशा प्रकारे आत्मनिर्भर व्हावी यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम नक्षली भागामध्ये अनेक अडचणींवर मात करत इकोवनच्या महिला दिमाखदारपणे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांना त्यांच्या कामाच्या वेगळेपणाने असंख्य संधी मिळणार आहेत आणि संधीचे सोने करण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे या महिलांची गाथा पुनःपुन्हा अभ्यासावी अशीच आदर्श आहे.