देवदुर्लभ - मधुसूदन व्हटकर

विवेक मराठी    16-Nov-2024
Total Views |
 @गिरीश प्रभुणे
 

vivek 
 
समरसतेच्या कामात नुसतं वाहून घेतलं नाही तर समरसता खर्‍या अर्थाने जगणारे
कार्यकर्ते म्हणजे मधुसूदन व्हटकर. भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न हे सर्वार्थाने वेगळे आणि ती सोडविण्याची कार्यपद्धतीही वेगळी. अशा या भटके-विमुक्तांच्या व्यथा स्वकष्टाने दूर करणार्‍या मधुकररावांसारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांमुळे ते साध्य झाले.
 
 
’मधुसूदन व्हटकर गेले’- रवी गोळेंनी दूरभाषवर सांगितले आणि मी स्तब्ध झालो. चार-पाच महिने मागे दूरभाषवर खूप बोलणं झालं होतं. ‘एकदा यमगरवाडीत जुन्या सर्वांना एकत्र करू या,’ असं हळवेपणानं ते म्हणाले; पण ते तेवढंच. तसंच राहून गेलं.
 
 
‘संदेश यात्रा’ एक मोठा अनुभव देणारी यात्रा. महात्मा फुले आणि पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देणारी यात्रा. संयोजक सामाजिक समरसता मंच, अ.भा.वि.प. म्हणजेच संघ. एक वेगळा विचारमंच. समन्वय, सम्यक विचार साधणारा मंच. या यात्रेच्या बरोबर पूर्णवेळ जाणारे-राहणारे दोघे प्रमुख. एक तरुण आणि एक मध्यमवयीन. तरुण होता मिलिंद कांबळे, विद्यार्थी परिषदेचा मुद्देसूद बोलणारा कार्यकर्ता. (डीआयसीसीआयचे पद्मश्रीप्राप्त प्रमुख). दुसरे मध्यमवयीन मधुसूदन धर्माजी व्हटकर. मी एका खेड्यात बौद्ध-मातंग-पारधी अशा घटकांत रमलेला; पण एकाच वर्षात मी समरसतेच्या प्रवाहात उडी घेतली. नाना नवले यांनी त्याआधी निमगावला अनेक वेळा भेट दिली होती. नाना नवले यांनी या सर्वांना एका माळेत ओवले.
 
'हिंदू समाजाचे संघटन' या सूत्राला धरून काम करणाऱ्या रा. स्व. संघाच्या प्रयत्नातून मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेक विषयांवर प्रभावी काम झाले आहे. हे जाणून घेण्यासाठी...

https://www.evivek.com/RaashTrotthaanvisheshgranth/
 
 
सोलापूरच्या पहिल्या बैठकीत पंधरा-वीस कार्यकर्ते, त्यात व्हटकर आणि गडेकर-गायकवाड या जोडीचा परिचय झाला आणि पुढे पंधरा-सोळा वर्षे एक झपाटलेलं-भारून टाकणारं व्यक्तिमत्त्व उलगडत गेलं. व्हटकर एसटीत कामाला. त्यामुळे गाडीतून उतरलं की ते हजर असत. मग ते पूर्णवेळ बरोबर राहत. भटके-विमुक्तांची अनेक आंदोलनं, त्यांची तयारी, व्हटकर यांचं घर कार्यकर्त्यांनी भरून जात असे. सर्वांचं चहापाणी-भोजन सारं काही त्यांच्या घरी. बरं हे कार्यकर्ते म्हणजे कसे? पारधी समाजातले. आले की पाच-दहा जण येत. जास्त बायाच असत. कपडे- मळलेल्या साड्या, सतत भांडणार्‍या. सारी गल्ली पाहायला जमायची; पण व्हटकरांनी सर्वांना आपलं म्हटलं. त्यांच्या शोधात अन्याय, अत्याचार झालाय असं कळलं की, व्हटकरांचा दूरभाष येई. पुढचे सात-आठ दिवस व्हटकर-गडेकर आणि मी त्या घटनेचा मागोवा घेत सोलापूर, धाराशिवच्या डोंगरदर्‍यांतून हिंडत असू; मिळेल ते वाहन, मिळेल ती भेळ खाऊन. त्यांना भीती नावाची चीजच माहीत नसे. उत्तम व्यक्तिमत्त्व, जरब बसेल असं. पोलीस खात्यात शोभतील असं बोलणं. अनेकदा त्यांच्या या दिसण्यामुळे अनेक अडचणींवर मात करता आली. शासकीय कार्यालयात ते बरोबर असले की कामं चटाचटा होत. ते सीआयडीतले वाटत.
 
 
सोलापूरचा पहिला पारधी मेळावा. 6 डिसेंबरला बाबरी ढाचा पडलेला. मी त्या काळात अयोध्येत होतो ‘विवेक’चा प्रतिनिधी म्हणून आणि जानेवारीत मेळावा ठरलेला. जागा मिळेनात. अनेक कार्यालयांनी आधी होकार देऊन नंतर नकार दिलेला. मधुकरराव म्हणाले, “चला, आपण हरिभाई देवकरण’मध्ये जाऊ. पाटणकर म्हणून मुख्याध्यापक होते. खूप प्रयत्नांनंतर त्यांनी होकार मिळवलाच. नुकसान झाल्यास भरपाई देऊ, असे लिहून दिले त्यांनी. माझ्या दृष्टीने तो मेळावा अनुभवाच्या दृष्टीने अभूतपूर्व होता. ऐन भाषणाच्या भरात हजारभर पारधी महिला-पुरुषांत भांडणे सुरू झाली. कुणालाच काय करावं सुचेना. पोलीस अधिकारी या संधीची वाटच पाहत होते. एवढ्यात व्हटकरांनी व्यासपीठावरून खाली उडी घेतली. पाठोपाठ गडेकर आणि मीही गेलो. पारध्यांच्या हातातील तलवारी त्यांनी काढून घेतल्या आणि दहा मिनिटांत सर्वांना शांत करून तलवारींचा बिंडा व्यासपीठावर आणून परत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांच्यातल्या या धैर्यानेच भटके-विमुक्त विकास परिषदेचं कार्य सहजतेनं वाढत गेलं.
 
 
बेबी साहिब्या पवार हिच्यावर तुळजापूर पोलीस चौकीत अत्याचार झाला. खूप प्रयत्न करून काहीच होईना. मग आम्ही रमेश पतंगे यांना सांगितलं. त्यांनी विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे आणि प्रकाश जावडेकरांना सांगून मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांची भेट ठरवली.
 
 
या पारध्यांना आणायच्या वेळचा प्रसंग. व्हटकरांच्या शैलीमुळे सर्वत्र घबराट पसरली. ठरवूनही कुणी येईनात. अनेक अफवा पसरल्या. ‘पोलीस घिरून गोळ्या घालून मारत्याल. मुंबैला ठिवून विकून टाकत्याल.’ अशातून व्हटकर, गडेकर पालापालांतून हिंडून सर्वांना घेऊन मुंबईला येऊ लागले. तर रेल्वेत मोठाच तमाशा. पोलिसांना पाहून महिला, पुरुष पळायचे. व्हटकरांची सर्वांना समजावतानाची धावपळ पाहण्यासारखी होती. मुंबईतसी.एस.एम.टी.पासून मंत्रालयापर्यंत यांची यात्रा म्हणजे दिव्यच होतं. रस्ता क्रॉस करताना पारधी एकदम पळायचे. गाड्यांचे ब्रेक लागायचे. अंगावर शहारे आणणारा प्रसंग. अखेर रस्त्याच्या मधोमध उभे राहून व्हटकर यांनी वाहतूक नियंत्रण करून सर्वांना मंत्रालयात आणले.
 
 
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.

 https://www.vivekprakashan.in/books/life-in-bhatke-community/
 
एक प्रसंग तर खूपच गंभीर. मा. मोरोपंतांचा यमगरवाडीचा प्रवास संपवून आम्ही सोलापूरला कार्यक्रमात पोहोचलो. नुकतीच डुलकी लागलेली. तर मध्यरात्री व्हटकर गाडी घेऊन हजर. ‘चला, गाडीत सांगतो.’ गाडीत बसल्यावर कळलं, एका मुलाचा विंचुदंशामुळे मृत्यू झालाय. महादेव गोरे हा कार्यकर्ता त्याला घेऊन वाचविण्यासाठी खूप हिंडला; पण तो वाचला नाही. सकाळी-सकाळी त्याचं शव-निष्प्राण शरीर घेऊन आम्ही ‘काठी’ या त्याच्या गावी पोहोचलो. घरच्यांना काहीच कल्पना नाही. कैकाडी समाजातला मुलगा; महादेवराव गायकवाड, पोपट जाधव यांच्या नात्यातला. त्यांची तर कठीण परिस्थिती. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगी व्हटकर गावकर्‍यांना सामोरे गेले. कौशल्याने त्यांनी सर्वांना शांत केलं. मुलांच्या आई-वडिलांची परिस्थिती खूपच गंभीर. त्यांना समजावत अखेर अंत्यविधी पार पडला. मधुकररावांचं वागणं, बोलणं खूप अदबीचं असे. समजावताना ते इतके हळवे होत, की समोरच्यावर प्रभाव पडत असे. अंत्यविधी पार पडल्यावर सोलापूरला न जाता ते यमगरवाडीत माझ्याबरोबर आले. कार्यकर्ते-शिक्षकांना धीर दिला आणि सर्व मुलांना घेऊन, सार्‍या शिवारातले-माळरानातले विंचू मुलांकरवी ठेचून काढले. ते त्यांचं रौद्र रूप... बापरे! मुलांनी काही क्षणातच शे-दोनशे विंचू पकडून मारले.
 
 
 
डॉ. जगन्नाथ वाणी यांनी या कामासाठी कॅनडातून खूप मोठी मदत मिळवून दिली. त्यातून मगरसांगवी (काठी)च्या माळरानावर मोठी वसाहत ‘मुक्ती नगर’ उभी राहिली. बेकरी उभी राहिली. एका झपाटलेपणानं सर्व जण काम करीत होेते. व्हटकर, अरुण दाते, बाळासाहेब जोशी असे या प्रकल्पाच्या उभारणीत पुढे होते. प्रकल्प उभा राहिला. सोलापूर जनता सह. बँक अध्यक्ष अरुण दाते, तर उपाध्यक्ष व्हटकर. एक दिवस दिल्लीहून एक अधिकार्‍यांची तुकडी बँकेवर धडकली. धाडच ती चौकशीची. त्या तीन दिवस-रात्री सर्वांना त्या अधिकार्‍याने सळो की पळो करून सोडले. व्हटकर, दाते आणि मी रात्रंदिवस त्यांच्या शोधमोहिमेत प्रश्नोत्तरांच्या भडिमारात हैराण झालो होतो. दोन दिवसांत सर्व रेकॉर्ड तपासून झाल्यावर गाड्या भरभरून सर्व अधिकारी मगरसांगवी पाहायला गेले. तिथलं बेकरी उत्पादने, भांडणे, मारामार्‍या हे सर्व पाहून ते निःस्तब्ध झाले.
 
 
अधिकारी मिश्रा म्हणाले, “आपका काम देखकर हम हैरान हो गये है. आप इन लोगो में कैसे काम करते है? यह निधी है एफसीआरए के अंतर्गत और आपकी संस्था को वो पैसा स्वीकारने की संमती नहीं है. इस कानून का उल्लंघन करनेवालों को कम से कम छह साल की सक्तमजुरी की सजा मिलती है. आप लोग जिस वृत्ती से काम कर रहे हो वो देखकर ऐसा लगा, ऐसे भी लोग आज की दुनिया में है.”
 
 
व्हटकर पूर्णवेळ या तुकडीबरोबर होते. त्यांचे बोलणे-वागणे सारे त्यांनी निमूटपणे सहन केले आणि मोठ्या संकटातून संस्था बँक वाचली. ‘ही सर्व संघसंस्काराची कृपा’ असे व्हटकरांचे उद्गार होते.
 
 
अनेक संकटे - अनेक आंदोलने, रात्रंदिवस भटकंती, हाती पैसा नाही. वाहनं करावी लागायची. मी त्यांच्या दारात उभा राहायचो. पहाटे पहाटे आंघोळ, नास्ता करून जे आम्ही निघायचो, काही दिवस दिवस जायचा. मंगळवेढ्याचं आंदोलन, पोलिसांचे अत्याचार, मृत्यू, अंत्यविधी, पारध्यांची पळापळ, त्यांची केविलवाणी अवस्था, या सार्‍या प्रसंगांत धीरोदात्तपणे मधुकरराव सतत बरोबर असायचे. किती पदरमोड झाली असेल... किती वेळ गेला असेल... किती अपमानाचे कढ गिळले असतील... किती चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले असतील... कशाचीच तमा न बाळगता मधुकररावांनी संघटन बांधलं संघदृष्ट्या. अत्यंत ओसाड माळावरची जमीन वळतीखाली आणली. नवी वाट, नवा मार्ग धुंडाळला. सारं घर या कार्यकर्त्यांच्या मागे उभं केलं.
 
 
घरातल्या आठ-दहा जणांचं करता करता त्यांच्या पत्नीनं या कार्यातही रोज पाच-सात जणांना जेवू-खाऊ घातलं. हे सर्व बळ, ही सहनशीलता यांच्यात कुठून आली? थोड्याशा कामाच्या हळकुंडानं, अहंकारानं पिवळेजर्द होण्याच्या काळात, व्हटकरांच्यात हा निरलसपणा कुठून आला? ‘ढोर’ जातीचं नावही ‘ढोर’ जनावर असा उल्लेख केला जाणार्‍या समाजात ही मानवी सद्गुणांची खाण निर्माण झाली, समरसतेचा प्रवाह वाहू लागला. भटके-विमुक्तांच्या व्यथा स्वकष्टाने दूर करणार्‍या मधुसूदन यांच्या सारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांमुळे हे साध्य झाले.
 
 
‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील...’
हा भाव जागविणार्‍या मधुसूदन व्हटकर यांना ही श्रद्धांजली.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
आदर्श व्यक्तिमत्त्व
 
मनुष्य कर्माने मोठा होतो, असे म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीत संतुलित मनाने कार्य करत राहणे, हा मधुसूदन व्हटकरांचा स्वभाव होता. मैत्री अशी असावी ज्यात अहंभाव नाही, मोठेपणा आणि कमीपणा नाही. ज्यांच्या विचारांत व कृतीमध्ये अंतर नाही, ती खरी मैत्री. त्या आधारावरच सामाजिक कार्य करू शकतो. अण्णांबरोबर काम करताना हाच अनुभव असे. अनेक प्रसंग/घटना यातून त्यांच्याबद्दलचा आदरभाव वाढत गेला.
 
 
संघ शिक्षा वर्गात गणवेश परीक्षणात प्रथम क्रमांक मिळाला, हे त्यांच्या स्वच्छता व टापटीपीचे उदाहरण. त्याचप्रमाणे दिवसभरात नोकरी व संघकामात मेहनत केल्यानंतरही दिसणारा हसतमुख व प्रसन्न चेहरा हे त्यांच्या मनःस्थितीचे द्योतक. वेळोवेळी बैठकांत, कार्यक्रमांत विवादाचे प्रसंग येतात, तेव्हा कटुता न आणता ’चला, चहा घेऊ’ असे म्हणून विषय संपवायचा, ही त्यांची हातोटी.
सामाजिक समरसता संघकामात रुजू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. समरसता म्हणजे ’व्हटकर-गडेकर’ हे सोलापुरात व प्रांतात सर्वांच्या तोंडी असे.
 
 
सोलापुरात त्यांचे घर वस्तीमध्ये होते व शेवटपर्यंत तेथेच राहत. विद्यार्थिकाळात दयानंद महाविद्यालयात प्रा. सदाशिवराव देवधर यांचे त्यांचे घरी येणे-जाणे, आपुलकीने चौकशी करणे असे. त्या संपर्कातून अण्णा विद्यार्थी परिषद, संघकामात सहभागी झाले. अशीच आपुलकी आणि आत्मीयता त्यांच्या वागण्यात दिसे. संघाच्या कामात जबाबदारी म्हणजे अधिक व योजून काम करणे. व्यक्तीशी बोलताना लहान-मोठी असो, आपल्या कामाची माहिती देणे व तुम्ही करा नव्हे, तर आपण करू, असे सांगणे असे.
 
 
समरसता विषयात आणि फुले-आंबेडकर संपर्क अभियानात गोवा ते नागपूर असा महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास झाला. हे कार्यक्रमापुरते काम न राहता भेटलेल्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा पुढे चांगला संपर्क राहिला. काही वेळेला जातीवरून चौकशी व्हायची, तेव्हा कटुता न आणता आपल्या कामातून त्या व्यक्तीचे ते मतपरिवर्तन करीत. कार्यक्रमातून आपले नाव व्हावे, असा विचारही त्यांनी केला नाही.
 
 
सोलापुरात भटके-विमुक्त समाजाची मोठी वस्ती आहे म्हणून आग्रहपूर्वक समरसता मंचाच्या कामाची उभारणी करण्याचे ठरले. बसवंती मंगल कार्यालयात समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एक अनपेक्षित प्रसंग घडला. त्या आलेल्या तरुण मंडळींना शांत करून पुढे त्यांच्याबरोबर आत्मीयतेने संबंध ठेवून त्यांचे मतपरिवर्तन घडवून आणले.
 
 
’भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ या संस्थेचे केंद्र सोलापुरात राहण्याचे निश्चित झाले व एकमताने अण्णांची अध्यक्षपदी निवड झाली; परंतु सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे आपल्या घरी रात्री-अपरात्री पारधी व भटक्या समाजातील येणार्‍यांची जेवणाखाण्याची व्यवस्था करणे हे नेहमीचेच असे.
 
 
यमगरवाडीला वसतिगृह सुरू करण्याचे ठरले. सुरुवातीपासून तेथे सर्व व्यवस्था लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. पुढे काही वर्षांनी तेथे झालेल्या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात आपण बेदखल झालो, अशी त्यांची भावना झाली.
 
सोलापूर जनता सहकारी बँकेत संचालकपदी ते निवडून आले. पुढे व्हाइस चेअरमन, चेअरमनपदी त्यांची निवड झाली. बँकेत कर्ज मिळण्यासाठी संचालकांची ओळख लागते. महापालिकेतील सफाई सेवेतील महिलांच्या सोयीसाठी पहाटे त्यांच्या हजेरी देण्याच्या ठिकाणी जाऊन गरजेप्रमाणे त्यांना चिठ्ठी देणे तसेच त्यांना आवश्यक मार्गदर्शन करीत. तसेच कर्जवसुलीसाठी प्रयत्न करत होते.
 
कर्जदारांपर्यंत पोहोचण्याची ही अनोखी पद्धत
 
एका नवीन साखर कारखान्याची बँकेकडून कर्जमंजुरीसाठी एक प्रतिष्ठित व्यक्ती व्हाइस चेअरमन या नात्याने त्यांना भेटण्यास एस.टी. ऑफिसमध्ये आली. विभाग नियंत्रकांच्या ऑफिसमध्ये त्यांनी अण्णांना बोलावून घेतले. एक नोकरदार बँकेचे व्हाइस चेअरमन आहेत याचा त्या व्यक्तीस आनंद झाला.
 
 
आपण जबाबदारीच्या पदावर असताना बँकेच्या व्यवहारांची त्यांनी माहिती करून घेतली. अडचणीसाठी तसेच कामासाठी अनेक व्यक्ती भेटत. माहिती घेऊन धोरणात्मक चर्चा होई. बँक अधिकारी व कर्मचार्‍यांशी त्यांचे प्रेमपूर्वक संबंध होते.
सोलापुरात समरसता साहित्य संमेलन घेण्याचे ठरले. मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे होती. बँकेतील अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी आपले संमेलन समजून आत्मीयतेने सर्व प्रकारे मदत केली.
 
 
एस.टी.मधील सेवेतून निवृत्त झाल्यावर मुलगा धर्मराज याच्याकडे खारघर येथे राहण्यास आले. वहिनींच्या प्रकृतीची काळजी घेण्यात वेळ जाई. पेन्शन वाढवून न मिळाल्याचे वैषम्य वाटे. खारघरमध्येही समवयस्क ज्येष्ठ नागरिकांबरोबर भेटी-गप्पा होत, त्यातून समरसतेचा विषय बोलला जाई. सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता.
 
 
संघकार्यात झोकून देऊन प्रसिद्धीपराङ्मुख राहून कार्य करणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांपैकी एक- ’अण्णा व्हटकर’.
त्यांना भावपूर्ण आदरांजली.
 

- विनायक (अरुण) सदाशिव दाते
सोलापूर येथे व्यवसाय, चार्टर्ड अकौंटंट आहेत, संघाचे सोलापूर जिल्हा सहकार्यवाह म्हणून काम पाहिले, तसेच संपर्क विभागाचे काम केले होते. सोलापूर जनता सहकारी बँकेमध्ये १८ वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. सध्या गोरेगाव (पश्चिम) येथे ५ वर्षे वास्तव्य, ३ वर्षे ओशिवरा भाग संघचालक दायित्व होते. सध्या प्रभात शाखा स्वयंसेवक.