भव्य, नेत्रदीपक तरीही अदृश्य चौकटीतील!

(भाग 1)

विवेक मराठी    16-Nov-2024   
Total Views |
साऱ्या जगाला एक गूढ, कुतूहलजनक वाटत आलेल्या चीनचे अंतरंग कसे आहे, तेथील महानगरे व ग्रामीण भागांची वास्तव स्थिती काय आहे, तेथील समाजमानस कसे आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न सा. विवेकच्या निमेश वहाळकर यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्यात केला. हे अनुभव व अनेक महत्वपूर्ण निरीक्षणे मांडणाऱ्या या लेखमालिकेतील हा पहिला भाग..

china
 
एकाच वेळी असंख्य साम्यस्थळे आणि असंख्य विरोधाभास असलेली, एकमेकांचे सख्खे शेजारी असलेली तरीही तणावपूर्ण संबंध राहिलेली दोन राष्ट्रे म्हणजे भारत आणि चीन. या दोन्ही देशांची प्रत्येकी लोकसंख्या आज दीडशे कोटींच्या घरात आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल 35 टक्के लोकसंख्या आज याच दोन देशांमध्ये मिळून सामावलेली आहे. दोन्ही देश क्षेत्रफळानुसारही प्रचंड मोठे असून जगातील पहिल्या दहा सर्वांत मोठ्या देशांच्या यादीत समाविष्ट होतात. दोन्ही देशांमध्ये आज अस्तित्वात असलेली राज्यव्यवस्था साधारण एकाच कालखंडात निर्माण झाली. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळून 1950 साली प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली, तर चीनमध्ये 1949 साली कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली. दोन्ही देशांना विस्तीर्ण समुद्रकिनारे, बर्फाच्छादित पर्वतरांगा, पठारे, वाळवंटे, अनेक महाकाय नद्या, सरोवरे अशी भौगोलिक विविधता लाभलेली आहे. दोन्ही देश जागतिक पटलावर ’विकसनशील देश’ म्हणून ओळखले जातात आणि उद्याच्या जागतिक राजकारण-अर्थकारणाचे केंद्रबिंदू हेच दोन देश असतील, असेही म्हटले जाते. दोन्ही देश अण्वस्त्रधारी लष्करी महासत्ता आहेत आणि उद्योग-व्यापारातही अग्रेसर आहेत. दोन्ही देशांना प्राचीन संस्कृती लाभली आहे. प्राचीन काळापासून या दोन्ही समाजांनी भरभराटीचा काळ पाहिला आहे.
 
 
ही सारी साम्यस्थळे चकित करणारी असली तरी याहून अधिक संख्येने या दोन देशांमध्ये परस्पर विरोधाभास आढळतात आणि ते आणखी चकित करतात. भारताचा आत्मा हा येथील लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य या व अशा अनेक मूल्यांमध्ये आहे आणि प्राचीन काळापासून प्रवाहित झालेल्या हिंदू जीवनमूल्यांचा पाया या व्यवस्थेला लाभला आहे. भारतीय समाजात लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नसून तळागाळापर्यंत झिरपलेली, सर्वसामान्य व्यक्तीची स्वाभाविक अभिव्यक्ती आहे. म्हणूनच भारतात सलग तीन वेळा स्पष्ट बहुमतात निवडून येणार्‍या, लोकप्रिय असलेल्या पंतप्रधान मोदींवरही यथेच्छ टीका करण्याचा अधिकार येथील राज्यव्यवस्था आपल्या नागरिकांना देते. याउलट चीनची राज्यव्यवस्था ही कम्युनिस्ट नेतृत्वाच्या पोलादी चौकटीत बंदिस्त असलेली व्यवस्था आहे. प्रत्येक गोष्ट ’स्टेट-कंट्रोल्ड’ असणे चिनी नागरिकांच्या एव्हाना अंगवळणी पडलेले दिसते. बहुधा म्हणूनच 1989 सालच्या बीजिंगमधील तियानमेन चौकातील उठावाव्यतिरिक्त व्यवस्थेविरुद्ध बंड होण्याची मोठी घटना आधुनिक चीनच्या इतिहासात फारशी आढळत नाही. शासनव्यवस्था वा नेतृत्व यांवर टीका करणार्‍यांचे चीनमध्ये काय होते याच्या अनेक सुरस कथा आपल्याला ऐकायला-वाचायला मिळतात. एकविसाव्या शतकातील या दोन्ही देशांच्या विदेशनीतीमध्येही जमीन-आस्मानाचा फरक आढळतो. चीनचा इतर देशांप्रतिचा व्यवहार हा अधिक उपयुक्ततावादी आणि विस्तारवादी असल्याचे दिसते, तर भारताचा व्यवहार हा परस्परविश्वास, सन्मान आणि सहयोगावर आधारलेला दिसतो. भारतीय संस्कृतीतील भाषा, पोशाख, संगीत-साहित्य-कला, इतर प्रथा-परंपरा यामध्ये असलेले कमालीचे वैविध्य आणि समृद्धता भारतीय संस्कृती अभिमानाने मिरवते. याउलट असे वैविध्य चीनमध्ये असूनही मागील 70-75 वर्षांच्या त्यांच्या वाटचालीत शासनव्यवस्थेने केलेल्या विविध प्रयोगांमुळे आज चीनमध्ये कमालीचे सांस्कृतिक एकजिनसीपण येऊन सपाटीकरण झालेले दिसते.
 

china 
 
लेखास कारण की...
 
भारत आणि चीनमधील ही साम्यस्थळे आणि विरोधाभास यांची अशी आणखी बरीच मोठी यादी देता येईल; परंतु मुळात ही सर्व चर्चा इथे करण्याचे कारण काय, असा प्रश्न वाचकांना पडू शकेल. या चर्चेची पार्श्वभूमी अशी की, नुकत्याच होऊन गेलेल्या जागतिक शहर दिन (दि. 31 ऑक्टोबर) निमित्ताने चीनमधील शांघाय येथे संयुक्त राष्ट्रांच्या ह्युमन सेटलमेंट्स प्रोग्राम (यूएन-हॅबिटॅट) आणि चीन सरकारच्या नगरविकास विभागाद्वारा संयुक्तरीत्या एसडीजी सिटीज ग्लोबल कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेकरिता चीनच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या निमंत्रणावरून मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे आठ सदस्यीय शिष्टमंडळ चीन दौर्‍यावर गेले होते. या शिष्टमंडळात सदस्य म्हणून मीही सहभागी झालो होतो. आमच्या या शिष्टमंडळात मुंबईतील वास्तुरचना, नगर नियोजन, कृषी, ग्रामविकास, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा सहभाग होता. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघायमधील या जागतिक परिषदेस जपान, नेदरलँड्स, जर्मनी, फिनलँड, सिंगापूर अशाही अनेक देशांतील प्रतिनिधींची उपस्थिती होती. आम्ही या परिषदेतील उपस्थितीसह शांघाय, झिजियांग प्रांतातील हांगझू हे शहर तसेच आसपासच्या काही ग्रामीण भागांसही भेटी दिल्या. एक आठवड्याच्या या दौर्‍यात आम्ही तेथील पायाभूत सुविधा प्रकल्प, नगर नियोजनाशी संबंधित विविध उपक्रम, कृषी व कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रामविकास आदींशी संबंधित प्रकल्पांनाही भेटी दिल्या. काही सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहिलो. स्थानिक नागरिक, संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केल्या. या सार्‍या प्रवासातून नोंदवलेली चीनबद्दलची निरीक्षणे या लेखातून मांडत आहे. अनेकदा आपण विदेशात जाऊन आल्यावर तेथील गोष्टींची सरसकट तुलना आपल्याकडील गोष्टींशी करतो आणि ’त्यांचे सर्वच चांगले, आपले सर्वच वाईट’ अशा भ्रामक निष्कर्षात अडकतो. हा लेख कोणत्याही तुलनेसाठी नसून आज जागतिक पटलावर व्यापारी-आर्थिक व लष्करी सत्ता म्हणून उदयास आलेल्या चीनचे अंतरंग कसे आहे, चीनच्या या प्रथमदर्शनी रूपाचा अन्वयार्थ काय आणि एक भारतीय म्हणून आपण काय बोध घेतला पाहिजे, यावर वस्तुनिष्ठ विचार करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
 

china 
 
महानगरे - शांघाय, हांगझू
 
 
दौर्‍यातील पहिले तीन दिवस आम्ही शांघाय शहर पाहिले. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे अडीच कोटी आहे. चीनमधील हे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर. या विशाल महानगराच्या निर्मितीचा इतिहास हा गेल्या जेमतेम 40 वर्षांचाच आहे. 1990 साली शांघायमध्ये आर्थिक सुधारणांना प्रारंभ झाल्यानंतर या शहराचे रूपांतर एका जागतिक आर्थिक केंद्रामध्ये होण्यास सुरुवात झाली. एसडीजी सिटीज ग्लोबल कॉन्फरन्स ही परिषदही शांघायमध्येच वर्ल्ड एक्स्पो एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर या भव्य वास्तूमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही परिषद मुख्यतः नागरिककेंद्री आणि शाश्वत पद्धतीने शहरांचा विकास कसा करावा, याबाबत विचारमंथन करणारी असली तरी यजमान चीन असल्यामुळे सर्व मांडणीत चीनचाच वरचष्मा दिसून आला. बहुतेक वक्त्यांच्या सादरीकरणात आज चीन शाश्वत विकासावर कसा भर देतो आहे आणि भविष्यातील योजना काय आहेत यावरच त्यांचा भर होता. या परिषदेतील मित्रांच्या उपस्थितीसह आम्ही शांघायमधील जुन्या इमारतींची सुंदर रचना असलेला वुकांग रोड, हांगपू नदीकिनारी शांघायची भव्य स्कायलाइन दाखवणारा आणि मुंबईच्या मरिन ड्राइव्हशी साधर्म्य असलेला ’बंड’ भाग, तब्बल 350 मीटर्सच्या उंचीवरून शांघायचे दर्शन घडवणारे ओरिएंटल पर्ल टीव्ही टॉवर, आधुनिक वास्तुकलेचा जबरदस्त नमुना असणार्‍या अशाच काही भव्य इमारती, शांघायच्या नगररचनेचा इतिहास दाखवणारा शांघाय अर्बन प्लॅनिंग एक्झिबिशन हॉल अशा अनेक ठिकाणी भेटी दिल्या. शिवाय शांघायचा इतिहास नाट्य-नृत्य आणि दृक्-श्राव्य तंत्रज्ञानातील इतर अनेक अनोख्या प्रयोगांनी युक्त असा जवळपास 300 कलाकारांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रमदेखील शांघाय रोमान्स पार्क या नाट्य-चित्रपटगृहात पाहिला. त्यानंतर चीनची बुलेट ट्रेन अर्थात हायस्पीड रेल्वेने हांगझू येथे रवाना झालो. हांगझू हे झिजियांग प्रांताची राजधानी असलेले आणि जवळपास सव्वा कोटी लोकसंख्या असलेले शहर. शांघाय ते हांगझू अंतर जवळपास पावणेदोनशे किलोमीटर्स आहे.
 

china 
 
या दोन्ही शहरांतील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील कमालीची शिस्तबद्ध, नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था. पुरेसे रुंद, डांबरी, डांबराच्या थरामध्ये कुठेही एकाही इंचाचा फरक नसलेले, एकही खड्डा नसलेले, व्यवस्थित आखणी केलेले रस्ते हे या दोन्ही शहरांत आढळून आले. शिवाय भरपूर मोठे उड्डाणपूल, भुयारी रस्ते, पुरेसे रुंद पादचारी मार्ग, वाहतुकीचे मार्ग आणि नियमांविषयी पुरेसे मोठे आणि स्पष्ट फलक हेही आणखी एक वैशिष्ट्य. महामार्ग असो वा शहरांतील अंतर्गत छोटा रस्ता, प्रत्येक रस्त्याला समान उंचीचा थर असल्यामुळे प्रवास करताना पोटातील पाणीही हलणार नाही इतकी व्यवस्थित काळजी या सर्व बांधकामात घेतली गेली आहे. शिवाय नियमांचे काटेकोर पालन होत असल्याने सिग्नल तोडला जाणे, लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंग हेही आढळत नाही. पादचारी रस्ता ओलांडत असेल तर सर्व वाहने ग्रीन सिग्नल असूनही शांतपणे थांबतात. कुठेही आरडाओरडा, मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे आदी प्रकार होत नाहीत. यात आवर्जून सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे संपूर्ण आठवड्याभरात चीनमध्ये फिरताना आम्हाला गाड्यांचा हॉर्न जेमतेम दोन-तीनदाच ऐकायला मिळाला! येथील गाड्याही नव्याकोर्‍या गाड्यांसारख्या स्वच्छ दिसणार्‍या. त्यातही एसयूव्हीज् आणि सेडान कार्सचा भरणा अधिक. त्यातही टेस्ला कार्स शहरांपासून गावांपर्यंत सर्वत्र मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात. धूळ बसलेली, जुनीपुराणी, कर्कश आवाज करणारी गाडी वा टेम्पो वगैरे अभावानेच एखादी दिसली असेल.
 
 
या शहरांत, विशेषतः शांघायमध्ये मेट्रोचे मुबलक जाळे आहे. त्यामुळे शहराच्या जवळपास प्रत्येक भागात कोणत्याही भागातून जायला मेट्रोचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. शांघाय अर्बन प्लॅनिंग एक्झिबिशन हॉलजवळील एका छोट्या मेट्रो स्टेशनला सहज भेट दिली असता तेथे त्या स्टेशनला एकूण 18 प्रवेशद्वारे आहेत, अशी माहिती मिळाली. शिवाय येथे सर्वत्र इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रभावीपणे राबवण्यात आली आहे. त्यामुळे एकाच अ‍ॅपवरून आपल्याला मेट्रो, रेल्वे, सिटी बस, टॅक्सी अशा सर्वांचे बुकिंगही करता येते आणि अपडेट्सदेखील घेता येतात. शांघायमधील नगरविकास यंत्रणेच्या दाव्यानुसार शहराची उभारणी ही ’15 मिनिट्स कम्युनिटी लाइफ’ या तत्त्वावर करण्यात आली आहे. यानुसार शहरातील रहिवासी वस्त्या, सोसायट्या, घरातून पंधरा मिनिटांच्या आत नागरिकांना शाळा, हॉस्पिटल्स, उद्याने, मेडिकल वा ग्रोसरी स्टोअर्स, बस थांबा, मेट्रो स्टेशन आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध होतील. नगररचनेत इतका सूक्ष्म स्तरावरील विचार व त्यानुसार केलेले नियोजन या शहरांच्या भरभराटीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
 


china
 
 
चीनमधील बुलेट ट्रेन!
 
 
आधी उल्लेखिल्याप्रमाणे शांघायहून हांगझूपर्यंतचा प्रवास हा बुलेट ट्रेनने झाला. हे जवळपास पावणेदोनशे किलोमीटर्सचे अंतर या रेल्वेने केवळ एका तासात गाठले. या प्रवासात रेल्वेचा कमाल वेग हा 300 किमी प्रति तासपर्यंत होता आणि तिकीट होते केवळ 73 युआन म्हणजे साधारणपणे 850 भारतीय रुपये. शांघाय आणि हांगझू ही दोन शहरे, त्यांची रचना, त्यांचे महत्त्व आणि एकमेकांपासूनचे अंतर पाहिले तर मुंबई-पुणे वा मुंबई-नाशिक या अंतरांशी साधर्म्य आढळते. अशा महत्त्वाच्या शहरांना एका तासात जोडणारी ही हायस्पीड रेल्वे या भागाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि अशा सर्वच प्रकारच्या उन्नतीसाठी महत्त्वाची ठरली आहे. आम्ही शांघायहून ज्या ट्रेनने हांगझूला गेलो ती पुढे फुजियान प्रांतातील झियामेन या शहरापर्यंत जाते. शांघाय ते झियामेन हे अंतर 1085 किमी आहे. या दरम्यान या ट्रेनला 12 थांबे आहेत तरीही हे अंतर ती केवळ सहा तासांत गाठते. संपूर्ण चीनमध्ये आज अशा प्रकारच्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कचे सुमारे 45 हजार किमीचे जाळे आहे. जगभरातील एकूण हायस्पीड रेल्वेपैकी तब्बल दोन तृतीयांश ही एकट्या चीनमध्येच आहे. हेच जाळे पुढील 10 वर्षांत 70 हजार किमीपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट चीनने निर्धारित केले आहे.
 
 
विमानतळाइतकी मोठी, भव्य रेल्वे स्थानके, तेथे आत-बाहेर जाताना योग्य ती सुरक्षा पडताळणी, स्थानकांवर कॅफेज्, रेस्टॉरंट्स, दुकानांपासून स्वच्छ नीटनेटक्या स्वच्छतागृहांपर्यंत सर्व सोयीसुविधा आहेत. स्थानकांवरून फलाटांवर जायला किमान 8-10 हून अधिक गेट्स आहेत जिथे सर्वत्र स्वयंचलित जिने आहेत, अत्यंत रुंद फलाट आहेत. फलाट आणि प्रत्यक्ष रेल्वेचा दरवाजा यांच्या उंचीमध्ये जराही फरक नसल्याने मोठमोठ्या ट्रॉली बॅग्ज रेल्वेत नेताना कोणतीही अडचण येत नाही.
 
 
china
 
रेल्वेत पुढील स्थानक कोणते, ते किती वेळात येईल, रेल्वेचा सध्याचा वेग किती आहे अशा सर्व आवश्यक माहिती वा सूचना स्पष्टपणे स्क्रीनवर दिसतात आणि त्यांची घोषणाही होते. विमान प्रवासामध्ये विमानतळावर जाणारा वेळ, प्रवासी ने-आण करण्याची तुलनेने मर्यादित क्षमता आणि मुख्य म्हणजे तिकिटाचा खर्च या सर्व बाबी लक्षात घेता विमान प्रवासांना पर्याय म्हणून तितकाच दर्जेदार, स्वच्छ, सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त आणि विमानापेक्षा बराच स्वस्त असा हा हायस्पीड रेल्वेचा पर्याय महत्त्वाच्या शहरांमधील गतिमान संपर्कासाठी अतिशय उपयुक्त ठरताना दिसतो.
 
 
आजचा चीन समजून घेण्यासाठी अशा अनेक महानगरांच्या उभारणीचा प्रवास समजून घेणे गरजेचे आहे; परंतु त्याचसोबत चीनमधील ग्रामीण भागांत कृषी उत्पादनांतून ग्रामविकासाची मॉडेल्स, चीनचे स्वभाषाप्रेम, चीनमधील सोशल मीडिया वापराची वस्तुस्थिती, चीनी नागरिकांची मानसिकता अशा अनेक गोष्टी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याबाबत विस्तृत वर्णन वाचा लेखाच्या पुढील भागात.
 

निमेश वहाळकर

सा. विवेकमध्ये कार्यकारी संपादक (डिजिटल) म्हणून कार्यरत.  मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण.