स्वच्छ दूध उत्पादनाची आवश्यकता

विवेक मराठी    15-Nov-2024
Total Views |
डॉ. व्यंकटराव घोरपडे
9325227033
krushivivek 
स्वच्छ दूध उत्पादनामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये दुभत्या जनावरांची योग्य स्वच्छता व आरोग्याची काळजी फार महत्त्वाची आहे. अनेक जनावरांत दगडी, सुप्त अवस्थेतील स्तनदाह, क्षय यामुळे उत्पादित बाधित दूध हे इतर चांगल्या दुधात न मिसळता बाहेर विल्हेवाट लावण्यासोबत नियमित लसीकरण, पशुवैद्यकाकडून तपासणी, आजारी जनावरांची स्वतंत्र व्यवस्था, गोठ्यातील जैव सुरक्षा हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. सोबत गोठ्यातील स्वच्छतादेखील महत्त्वाची आहे.
दूध’ हा असा घटक आहे, की जो पोषणमूल्यासह अनेकांच्या उपजीविकेचे साधन असून कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देतो. भारतामध्ये कृषी क्षेत्रातील कृषी उत्पादन म्हणून याचा सर्वात मोठा वाटा आहे. तो वाटा जवळजवळ पाच टक्के आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा दुग्ध व्यवसाय देशातील आठ कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार पुरवतो. त्याच्या श्रमातूनच आज जागतिक पातळीवर आपण दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहोत, हे वास्तव आहे. जवळजवळ जगाच्या तुलनेत 23 ते 24 टक्के दूध उत्पादन हे आपल्या देशात घेतले जाते. सन 2018-19 मधील 187.30 दशलक्ष टन दूध उत्पादन हे सन 2023-24 मध्ये 236.35 दशलक्ष टनांवर गेले आहे. हा दूध उत्पादनवाढीचा दर दोन ते तीन टक्के आहे. परिणामस्वरूप आज देशातील सरासरी दरडोई दुधाची उपलब्धता ही 459 ग्रॅम प्रतिदिन प्रति व्यक्ती आहे. या माध्यमातून देशातील लोकांच्या पोषण गरजा पूर्ण करण्याबरोबरच डेअरी उद्योगाच्या माध्यमातून करोडोंना रोजगारदेखील उपलब्ध होत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर सन 2022-23 मध्ये 15042 दशलक्ष मेट्रिक टन दूध उत्पादन होते आणि दुधाची उपलब्धता प्रति दिन प्रति व्यक्ती 329 ग्रॅम आहे जी देशात शेवटच्या क्रमांकावर आहे. अर्थात त्याची कारणे अनेक आहेत.
 
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अन्न व खाद्यपुरवठा आणि निर्यात यामध्ये अन्नसुरक्षा हा एक महत्त्वाचा घटक ठरताना दिसतो. अलीकडे दूध उत्पादनासोबत मोठ्या प्रमाणात प्रक्रिया उद्योगदेखील वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय दळणवळण सुविधा वाढत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी अपेक्षित आहे. आपल्या देशातून सन 2023-24 मध्ये 63778 मेट्रिक टन दूध व दूध उत्पादने निर्यात केली गेली आहेत. मुख्यत्वे करून युनायटेड अरब, सौदी अरेबिया, सिंगापूर, भूतान या देशांमध्ये निर्यात होते. साधारण हे सगळे अर्थशास्त्र आणि पालनपोषण या दुधाभोवती फिरत आहे. हे सर्व अजून मोठ्या प्रमाणात योग्य मार्गावर आणायचे असेल तर आज उत्पादित होणारे दूध अजून कसे स्वच्छ उत्पादित करता येईल, त्यामध्ये कमीत कमी रोगजंतूंची संख्या कशी ठेवता येईल व सोबत आपल्याकडील उत्पादित दुधाची विशेष चव कशी टिकवता येईल व त्या माध्यमातून पशुपालकांना चार पैसे जादाचे कसे मिळतील याकडे सर्व संबंधितांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
 
देशातील जवळजवळ 90 टक्के दूध उत्पादन हे खेडोपाड्यांतील अल्प, अत्यल्प भूधारक पशुपालक घेत आहेत. एकूणच त्यांची आर्थिक परिस्थिती, माहितीचा अभाव, निष्काळजी व ‘चलता है’ या भूमिकेमुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. दूध हा नाशवंत पदार्थ आहे. दूध कासेतून बाहेर पडल्यानंतर दूध सोसायटी ते परत मुख्य दूध डेअरीपर्यंत पोहोचेपर्यंत जर योग्य काळजी घेतली नाही, दरम्यानच्या काळात हाताळणी व वाहतूक योग्य झाली नाही तर त्याची साठवण क्षमता कमी होते, दुग्धजन्य पदार्थाची गुणवत्ता ढासळते व मोठे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी एकूण ‘स्वच्छ दूध उत्पादन’ ही काळाची गरज आहे. सोबत आरोग्याच्या दृष्टीनेदेखील त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. म्हणून राज्यात ‘स्वच्छ दूध उत्पादन’ ही चळवळ उभी करणे अपेक्षित आहे. काही भागांत याकडे लक्ष दिले जाते; तथापि मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून एक चळवळ उभी राहिली तर हे सहज शक्य आहे. त्यासाठी फार मोठ्या गुंतवणुकीचीदेखील गरज नाही. स्वच्छ दूध उत्पादनामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये दुभत्या जनावरांची योग्य स्वच्छता व आरोग्याची काळजी फार महत्त्वाची आहे. अनेक जनावरांत दगडी, सुप्त अवस्थेतील स्तनदाह, क्षय यामुळे उत्पादित बाधित दूध हे इतर चांगल्या दुधात न मिसळता बाहेर विल्हेवाट लावण्यासोबत नियमित लसीकरण, पशुवैद्यकाकडून तपासणी, आजारी जनावरांची स्वतंत्र व्यवस्था, गोठ्यातील जैव सुरक्षा हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. सोबत गोठ्यातील स्वच्छतादेखील महत्त्वाची आहे.
 
दूध काढण्याची पद्धत - दूध काढत असताना आपल्याकडे हाताच्या मुठीचा वापर करतात. त्याऐवजी अंगठा न दुमडता पूर्ण हाताचा वापर करून धार काढणे आवश्यक आहे. अंगठा दुमडून धार काढल्यामुळे सडावर नियमित पडणार्‍या दाबामुळे गाठी तयार होऊन स्तनदाह होण्याची शक्यता असते. दूध काढताना पान्हा घातल्यानंतर सात ते आठ मिनिटांत दूध काढले गेले पाहिजे. दूध काढण्यापूर्वी सुरुवातीच्या चार चिळा दूध इतर दुसर्‍या भांड्यात काढून दूर टाकून द्यावे, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोगजंतू असतात. धारा काढल्यानंतर गाय-म्हैस खाली बसू नये यासाठी दावणीत वैरण टाकल्यास जनावर उभे राहते. सडाची तोंडे बंद होण्यास वेळ मिळतो. प्रत्येक वेळी दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ करून घ्यावी. कास व सड कोरडे करून घ्यावेत. दुधाचे भांडेदेखील मोठ्या तोंडाचे असणे व त्याला खाचा नसणे फार महत्त्वाचे आहे. दूध काढल्यानंतर तात्काळ ते दूध सोसायटीत गेले पाहिजे. सुरुवातीला दुधाला स्वतःची प्रतिकारशक्ती असते. त्यामुळे जंतूविरहित दूध डेरीत पोहोचले तर निश्चितच सर्वांना त्याचा फायदा होईल. जनावरांचा गोठा व परिसर नेहमी स्वच्छ असावा. कंपोस्ट खड्डा गोठ्यापासून कमीत कमी 60 मीटर अंतरावर असावा. गोठ्यात डास, माशा, गोमाश्या, चिलटे, गोचीड यांचा प्रादुर्भाव असता कामा नये. मुरघास, पशुखाद्य, वैरण यांची योग्य साठवणूक करावी. त्याचा वास दुधाला लागता कामा नये याची काळजी घ्यावी. पाणीदेखील योग्य पद्धतीने साठवणे आवश्यक आहे.
 
दूध काढणारी व्यक्ती - त्याचेदेखील आरोग्य व्यवस्थित असावे. नखे काढलेली असावीत. स्वच्छ कपडे, टोपी घालूनच दूध काढावे. महिलांनीदेखील दूध काढताना डोक्यावर घट्ट साडीचा पदर बांधावा. प्रत्येक वेळी गाय आणि म्हशीचे दूध काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. दूध काढणार्‍या व्यक्तीला कोणतेही व्यसन असता कामा नये. साधारण आठ-नऊ लिटरपेक्षा जादा दूध देणार्‍या गाई-म्हशीचे दूध काढण्यासाठी दोघांनी बसावे. धार काढत असताना शेपूट व पाय इंग्रजी आठप्रमाणे बांधून घ्यावेत.
 
 
अशा लहानसहान गोष्टींतून स्वच्छ दूध उत्पादन हे उत्पादक पातळीवर घेणे पशुपालकांच्या हातात आहे. बाकी दूध सोसायटी, दूध प्रक्रिया केंद्र यांनीदेखील योग्य ती काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्या उत्पादकांना न्याय देता येईल.
स्वच्छ दुधनिर्मितीसाठी कासेची काळजी आणि दूध वाहतुकीतील शीतसाखळी फार महत्त्वाची आहे. दूध काढण्यासाठी लागणार्‍या यंत्राचा (मिल्किंग मशीन) वापर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. जर राज्यातील दूध संघांनी, शासनाने मोठ्या प्रमाणात अनुदानाची सोय केली, तर प्रगतिशील दूध उत्पादक त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतील. या मशीनच्या वापरामुळे सड व कासेला इजा होत नाही. सोबत जलद दूध काढता येते. त्यामुळे सध्या असणार्‍या मनुष्यबळाची टंचाई कमी करता येते. तसेच जनावराची उत्पादकता समजते. सध्या या मिल्किंग मशीनवर 18% जीएसटी आकारली जाते, तीदेखील कमी होणे आवश्यक आहे. सुप्त अवस्थेतील स्तनदाह हा वेळीच ओळखला गेल्यास स्वच्छ दूध उत्पादन घेणे फार सोपे होते. त्यासाठी लागणारे रिएजंट, किट, साधनसामुग्रीचादेखील योग्य किमतीत पुरवठा झाल्यास अनेक बाबी साध्य होऊ शकतात. शीतसाखळी राखण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणामध्ये मिल्क बल्ब कुलर्सचा पुरवठा शासनामार्फत अथवा दूध संघामार्फत संस्था पातळीवर किंवा मोठ्या दूध उत्पादक पशुपालकांना जर करण्यात आला तर निश्चितपणे उत्पादित झालेले दूध तात्काळ थंड केल्यामुळे रोगजंतूंची वाढ रोखता येईल. त्यातून स्वच्छ दुधाचा पुरवठा ग्राहकाला करणे सहज शक्य होईल.
 
सोबत पशुपालकांना नियमित प्रशिक्षणदेखील देणे आवश्यक आहे. एकंदर राज्यात लोकसहभागातून राबवलेल्या इतर अनेक योजनांप्रमाणे स्वच्छ दूध उत्पादनासाठी एखादी योजना निश्चित केली तर मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृतीसह एक चळवळ उभी राहून पशुपालकापर्यंत त्याचे महत्त्व अजून पोहोचवता येईल यात शंका नाही.