शाश्वत शेती व स्थानिक परिस्थितीचे भान

विवेक मराठी    15-Nov-2024
Total Views |
@विजय सांबरे 9421329944
 
krushivivek 
शेती सुलभ करण्यासाठी नवनवीन पर्याय शेतकरी शोधत आहेत; पण पर्यावरणीय व आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेती पद्धत रूढ करण्याचे प्रयत्न गावगाड्यापासून ते सरकारदरबारी होताना दिसत नाही आणि म्हणून शेतकर्‍यांनीच यासाठी पुढाकार घ्यायला हवा व आपल्या पंचक्रोशीला साजेसे शाश्वत शेतीचे मॉडेल विकसित करायला हवे. यासाठी स्थानिक परिस्थितीचे म्हणजेच नैसर्गिक घटकांचे भान त्यांना येणे आवश्यक आहे.
 
आदिमानव भटक्या अवस्थेतून स्थिर झाला तो शेती ही जीवनशैली स्वीकारल्यामुळे. या उत्क्रांत झालेल्या मानवजातीच्या अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी शेती सोडून दुसरा पर्याय सध्या तरी अस्तित्वात नाही. एकूणच माणसाचे उदरभरण हे विविध धान्य-कडधान्य-भरड धान्य-भाजीपाला व पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून होत आहे. फक्त अन्नसुरक्षेसाठी शेती हा पारंपरिक दृष्टिकोन मागे पडला व चार पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे आर्थिक फायद्याकरिता शेती करणे सुरू झाले. त्यातूनही नैसर्गिक साधनांवर व लहरी वातावरणावर अवलंबून असणारी शेती कसण्यासाठी मोठा संघर्ष आज शेतकर्‍याला करावा लागत आहे. सभोवतालची परिसंस्था, पीक पद्धती, बाजारपेठ व त्याभोवती फिरणारे अर्थकारण यांची सांगड घालण्याची कसरत तो करत आहे. शेती सुलभ करण्यासाठी नवनवीन पर्याय तो शोधत आहे; पण पर्यावरणीय व आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेती पद्धत रूढ करण्याचे प्रयत्न गावगाड्यापासून ते सरकारदरबारी होताना दिसत नाही आणि म्हणून शेतकर्‍यांनीच यासाठी पुढाकार घ्यायला हवा व आपल्या पंचक्रोशीला साजेसे शाश्वत शेतीचे मॉडेल विकसित करायला हवे.
 
 
स्थानिक नैसर्गिक परिसंस्था
 
शेती करत असताना स्थानिक परिसंस्था व त्याच्याशी संबंधित जैवविविधता जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतीचा विचार केला तर मूळ जंगल व गवताळ प्रदेश या प्रकारातील परिसंस्थेत मोठ्या प्रमाणावर बागायती व जिरायती शेती केली जाते. महाराष्ट्रात साक्री (धुळे) ते शिराळा (सांगली) हा पट्टा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. विस्तीर्ण गवताळ प्रदेश हे येथील वैशिष्ट्य. भटक्या पशुपालकांच्या अनेक पिढ्या या प्रदेशात स्थलांतरित झाल्या व शेळ्यामेंढ्या पाळून त्यांनी आपली उपजीविका भागवली. नानाविध गवतांचे प्रकार असल्याने पशुपालन शक्य झाले व हजारो वर्षांच्या नैसर्गिक घडामोडींतून सुपीक झालेल्या मातीत बागायती व जिरायती शेती स्थिरावली.
 
 
सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांमध्ये ज्या लोकांनी वस्ती केली त्यांनी जंगलाचा काही भाग तोडून शेती करण्यास सुरुवात केली. त्याला दळी व पावट्याची शेती म्हणतात. त्यात नागली, वरई, सावा ही पर्वतीय तृणधान्यांची पिके घेण्याची कला विकसित केली. जंगलात पडलेला पालापाचोळा कुजून जे खत तयार होते, त्याला स्थानिक भाषेत ‘कोहनखत’ म्हणतात. यामुळे जंगलाच्या खालच्या भागातील दळीशेती असेल अथवा भातशेती, या केवळ जंगल परिसंस्थेवर अवलंबून आहेत.
 

krushivivek 
 
जमिनीची सुपीकता
 
 शाश्वत शेती पद्धत रूढ करायची असेल तर जमिनीची सुपीकता जपणे खूप महत्त्वाचे आहे. जागरूक शेतकरी जमिनीचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतच असतो; पण मजुरीत बचत करण्यासाठी व वेगाने काम आटोपण्यासाठी ट्रॅक्टरसारखी साधने आली. परदेशातील तंत्रज्ञान आंधळेपणाने स्वीकारले. त्याचा विपरीत परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. ट्रॅक्टरच्या खोल नांगटीमुळे (पलटी नांगर) जमिनीचा सुपीक भाग खाली जातो. त्यामुळे अनेकदा पेरलेले बियाणे उगवत नाही. जुन्या लाकडी किंवा लोखंडी नांगरामुळे गरजेइतकीच जमिनीची हालचाल होत असे. ट्रॅक्टरनेच मशागत करायची असेल तर कल्टिव्हेटरने रान फणले तर, दोन बैलांच्या नांगरणीइतकी मशागत होते. अशी पर्यायी मशागत पद्धती अनुभवातून विकसित केली पाहिजे. विज्ञान (Soil Science) व तंत्रज्ञान (Cultivation Technology) समजून न घेता वापरले तर कशी गल्लत होते, हे या आधुनिक जमीन मशागती पद्धतीने ध्यानी येईल.
 
 
पाळीव प्राणी
 
 
शेतकर्‍याच्या दृष्टीने पाळीव प्राणी (Livestock) हे महत्त्वपूर्ण आहेत. दुधासाठी गाय, शेळ्या, मेंढ्या; शेती उपयोगी कामासाठी बैलजोडी, शेत राखण्यासाठी कुत्री व घर राखण्यासाठी मांजर, कीड नियंत्रण व पर्यायी अन्नासाठी कोंबडी अशी नानाविध पाळीव प्राण्यांची शृंखला कृषी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांत निर्माण झाली आहे. स्थानिक वातावरणाला अनुकूल अशी अंगकाठी हे या प्राण्यांचे वैशिष्ट्य. जसे डोंगराळ पावसाळी प्रदेशासाठी डांगी गोवंश, पठारी प्रदेशासाठी संगमनेरी, उस्मानाबादीसारख्या शेळींच्या जाती, सातपुड्यातील कोंबडी, मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथ कोंबडी, मेंढपाळ-धनगरांना लागणारे चपळ मुधोळ हाऊंड कुत्री, तिबेटच्या पठारावरील थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून केसाळ कुत्र्यांची एक जात विकसित झाली. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पशुधन वैविध्याची चर्चा करण्याचा उद्देश इतकाच की, आपण ज्या प्रदेशात राहतो, तेथील सूक्ष्म हवामान, गरजा, सवयी व कौशल्य याला अनुसरून कोणत्या पाळीव प्राण्यांची निवड करायची हे विवेकाने ठरविले पाहिजे, तरच शाश्वत शेती पद्धत शक्य होईल.
 
 
पीक वैविध्य
 
भटक्या अवस्थेतून स्थिर झाल्यावर मानवाने शेती सुरू केली. मागील बारा हजार वर्षांत जंगली विविध प्रजातींपासून पिकाच्या असंख्य जाती विकसित केल्या. त्यातून एक शाश्वत पीक पद्धत उभी राहिली. त्यात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामानुसार एक पीक किंवा मिश्र पीक घेण्याची कला अवगत केली. पावसाच्या पाण्यावर कोणती पिके घ्यायची व विहीर बागायतीत कोणती पिके घ्यायची हेही ठरले. मात्र मागील काही वषार्र्ंत अन्नसुरक्षेपेक्षा बाजारपेठेतील मागणीनुसार पिके घेतली जाऊ लागल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांचे स्वरूप कृषी-हवामान विभागानुसार (Agro-climatic zone) वेगळे असेल; पण प्रश्न सर्वदूर दिसतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायब्रिड, बीटी, जीएम अशी विविध बियाणे विकसित होत आहेत. जुन्या वाणापेक्षा ते श्रेष्ठ कसे, अशी जाहिरातबाजी सुरू आहे. विद्वान मंडळींत दोन गट पडले आहेत, या पार्श्वभूमीवर शेतकरी गोंधळात पडला आहे. या चक्रव्यूहातून त्याला बाहेर पडावे लागेल. स्वत: प्रयोग करून खरेखोटेपणा पडताळून पाहावा लागेल. बीज स्वावलंबनाकडे लक्ष केंद्रित करावे लागेल.
 

krushivivek 
 
मधमाश्या
 
मधमाश्या नष्ट झाल्या तर पुढील चार वर्षांत अवघी सजीव सृष्टी नष्ट होऊ शकेल इतके महत्त्व मधमाश्यांना आहे. परागसिंचनाचे अनन्यसाधारण कार्य त्या करत असतात, म्हणून आपली शेती फुलते व फळते. शाश्वत पद्धतीने शेती करताना मधमाश्यांकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. आपल्या परिसरात किती प्रकारच्या मधमाश्या आहेत, त्या कोणत्या पिकांवर अथवा जंगली झाडे-झुडुपांवर अवलंबून आहेत, हे सर्व जाणून घेतले पाहिजे. रासायनिक खते व कीटकनाशक यांचा या मधमाश्यांवर होणारा परिणाम समजून घेतला व त्यानुरूप व्यवस्थापन झाले, तर शेती परिसंस्थेचे संगोपन शक्य होईल.
 
सूक्ष्म हवामान व पाऊसपाणी
 
शेती करत असताना हिवाळा, पावसाळा व उन्हाळा या तीनही ऋतूंचे आकलन होणे गरजेचे असते. जमिनीची मशागत, पेरणी, काढणी ते धान्य व बियाणे साठवणूक या सर्व बाबींवर स्थानिक हवामान व त्यातील बदल प्रभाव पाडतात. आजही ग्रामीण भागात पावसाचे अंदाज स्थानिक निरीक्षणातून काढले जातात. त्याच्याशी संबंधित पारंपरिक लोकज्ञान हे एक संचित आहे. ते शेतकर्‍यांच्या नव्या पिढीने समजावून घेणे आवश्यक आहे.
 
सारांश, जागतिक हवामान बदलाचा आपल्या स्थानिक वातावरणावर काय परिणाम होत आहे, अशी निरीक्षणे नोंदविणे व त्याचा भूतकाळातील परिस्थितीशी तुलना करून निष्कर्ष काढणे व शेती व्यवस्थापन प्रक्रियेत उपयोग करणे, ही काळाची गरज आहे. याशिवाय शेती व्यवसाय पर्यावरणीय व आर्थिकदृष्ट्या शाश्वत होण्यासाठी सातत्यपूर्ण अवलोकन करणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी पीक, पाळीव प्राणी वैविध्य व त्यांची सद्यःस्थिती, खते व कीड व्यवस्थापन, शेतीचे व शेतकर्‍यांचे अर्थकारण, बाजारपेठेचा अंदाज, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन व विपणन, त्यासाठी संघटित प्रयत्न (गटबांधणी, सहकारी संस्था, कृषी उत्पादक कंपन्यांची निर्मिती), विविध पिके घेण्याचे कौशल्य, पारंपरिक लोकज्ञान व आधुनिक विज्ञान, प्रशासकीय धोरण (राज्य, देश व जागतिक पातळी) व पत धोरण या सर्व घटकांचा विचार करून शाश्वत शेती करता येईल.
 
लेखक पर्यावरण व शाश्वत विकास विषयातील
अभ्यासक आहेत.