या वेळची ही निवडणूक केवळ एक पक्ष जाऊन दुसरा पक्ष सत्तेवर आणण्याची निवडणूक नाही. आपल्या स्थैर्यावर आणि सुरक्षेवर भविष्यात अनंत प्रश्न निर्माण करणारी ही निवडणूक आहे. आपल्या अवतीभोवती काय चालू आहे, कोणता प्रचार चालू आहे, प्रचार करणारे लोक कोण आहेत, सोशल मीडियाचा ते कशा प्रकारे वापर करतात, हे प्रत्येक मतदाराने जाणणे आवश्यक आहे. कारण जागरूक मतदार हाच राज्याचा शिल्पकार असतो.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची तारीख 20 नोव्हेंबर ही आहे. या दिवशी अठरा वर्षांवरील सर्वांना मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आपला राजकीय हक्क बजावायचा आहे. लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत ‘सर्व सत्तेचा उगम प्रजा असते.’ हा आहे. या वाक्याचा अर्थ असा होतो की, राज्याचे सार्वभौमत्व प्रजेकडे असते. प्रजा ही राजा असते. राजेशाहीत वंशपरंपरेने राजगादी चालते, लोकशाहीत लोकांना आपल्या पसंतीचे राज्यकर्ते निवडायचे असतात, असे या अधिकाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
विधानसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. आपल्या भारतीय संविधानाचा तो नियम (कायदा) आहे आणि आपला देश ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेवर चालणारा असल्यामुळे दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. यापूर्वी 2019ला विधानसभेची निवडणूक झाली होती. तेव्हा मतदारांनी राज्य कुणी करायचे याचा कौल दिला. शिवसेना आणि भाजप युतीला पूर्ण बहुमत दिले; परंतु शिवसेना आणि भाजपचे राज्य काही आले नाही. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी मतदारांचा विश्वासघात केला. मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली, पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे.
राजाचा विश्वासघात हा राजद्रोह असतो आणि राजद्रोह हा भयानक गुन्हा समजला जातो. आपल्याकडे राजेशाही नसल्यामुळे आणि लोकशाही असल्यामुळे प्रजारूपी राजाचा विश्वासघात हा कायदेशीर गुन्हा ठरत नाही; तथापि नैतिकदृष्ट्या हा गुन्हा राजेशाहीतील राजद्रोहासारखाच आहे, त्याला क्षमा नाही. मतदारराजाने 20 तारखेला मतदान करीत असताना ही गोष्ट अजिबात विसरता कामा नये. भगवद्गीतेच्या एका श्लोकात असे म्हटले आहे की, आपणच आपले मित्र आणि शत्रू असतो. 20 नोव्हेंबर हा दिवस आपणच आपले मित्र होणे अथवा शत्रू होणे हे ठरविण्याचा दिवस आहे.
आता पुन्हा आपल्यासमोर शिवसेना आणि भाजप युती म्हणून उभी आहे. त्यात अजित पवारदेखील सामील झालेले आहेत. या वेळी विश्वासघात होणार नाही, असा विश्वास बाळगायला हरकत नाही. उद्धव यांना सोडून ज्यांनी असली शिवसेनेचे रक्षण केले ते आता भाजपबरोबर आहेत. मतदारराजा म्हणून त्याचा आपल्याला विचार करावा लागेल.
मतदान कशासाठी करायचे, हा लाखमोलाचा प्रश्न असतो. त्याचे पहिले उत्तर पहिल्याच परिच्छेदात दिलेले आहे. मतदान करणे हे आपले लोकशाहीतील पवित्र कर्तव्य आहे. प्रत्येक निवडणूक आपल्यासमोर काही पर्याय ठेवते आणि त्या पर्यायांचा विचार करून हे राजकीय कर्तव्य पार पाडायचे असते. मतदान करून आपल्याला आपल्या राज्याचे सरकार अधिकारावर आणायचे आहे. हे सरकार अधिकारावर आणत असताना पुढील काही कसोट्यांचा विचार जरूर केला पाहिजे.
आपली काळजी घेणारे सरकार, आपल्याला अधिकारावर आणायचे आहे. सामान्य माणसाच्या काळजीचे विषय कोणते असतात? त्याला सुरक्षा हवी असते, शांतता हवी असते, रोज लागणार्या वस्तूंचे भाव नियंत्रणात असावे लागतात, नोकरी-व्यवसायासाठी सतत प्रवास करावा लागतो- प्रवासाची साधने सहज आणि सुलभ उपलब्ध असावी लागतात. मुंबईचे जर उदाहरण घेतले तर मुंबईतील मेट्रोचे काम कधीच पूर्ण व्हायला हवे होते, ते रखडले, कोणामुळे... मतदारराजाने याचा विचार केला पाहिजे.
जे शासन आपण निवडून देऊ, त्या शासनाला विकासाची दृष्टी असली पाहिजे. कृषी, उद्योग, व्यापार, सेवा उद्योग, ही अर्थकारणातील चार महत्त्वाची क्षेत्रे आहेत. आज आहे त्यापेक्षा या क्षेत्रांचा दुप्पट विकास झाला तर तेवढ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होईल. ती पैशाच्या रूपाने आपल्याकडे येईल. रोजगाराच्या संधी वाढतील. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. विकासासाठी भांडवल, तंत्रज्ञान, कार्यकुशलता, ऊर्जा, उत्तम रस्ते लागतात, अशी समग्र विकासाची दृष्टी असल्याशिवाय विकास होत नाही. मला मुख्यमंत्री करा, मीच मुख्यमंत्री होणार, हा झाला ‘स्व’ विकासाचा विषय, त्यात मतदारांच्या विकासाला शून्य स्थान असते, हे मतदारांनी नीट समजून घ्यायला पाहिजे.
जे शासन आपण निवडून देणार आहोत, ते जातवाद, पाकिस्तानी मनोवृत्ती, अराजकवाद प्रवृत्ती, शहरी नक्षलवादी, खोटी कथानके पसरवणारे नसावे. या सर्व गोष्टी आपल्या सुरक्षेला आणि जीवनविकासाला लागलेल्या वाळवी आहेत. जेव्हा घराला वाळवी लागते तेव्हा ती लगेच लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येते, तेव्हा तिने प्रचंड नुकसान केलेले आहे हे जाणवते. ‘व्होट जिहाद’चा नवीन विषय सुरू झालेला आहे. जागरूक मतदार म्हणून गांभीर्याने विचार करावा लागेल. जातीपातींत विभागलो तर ‘बटेंगे तो कटेंगे’ हा इशारा आपल्याला दिला गेलेला आहे. वेगवेगळी खोटी कथानके पसरविणारे अनेक गट आहेत. ते कधी ईव्हीएम मशीनचे खोटे कथानक पसरवतील, निवडणूक आयोगावर शंका घेतील, निवडणूक निकाल अमान्य करतील.
या सर्वांचा अर्थ काय होतो? या सर्वांचा अर्थ शेख हसिना वाजेद यांच्याबद्दल बांगलादेशात जे घडले, तसे अराजक वातावरण आपल्याकडेही उत्पन्न व्हावे. त्यातून देशाच्या संस्कृतीला, देशाच्या परंपरेला आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षेला घातक असे लोक शासनात येऊ शकतात. म्हणून आपल्या अवतीभोवती काय चालू आहे, कोणता प्रचार चालू आहे, प्रचार करणारे लोक कोण आहेत, सोशल मीडियाचा ते कशा प्रकारे वापर करतात, हे प्रत्येक मतदाराने जाणणे आवश्यक आहे.
या वेळची ही निवडणूक केवळ एक पक्ष जाऊन दुसरा पक्ष सत्तेवर आणण्याची निवडणूक नाही. आपल्या स्थैर्यावर आणि सुरक्षेवर भविष्यात अनंत प्रश्न निर्माण करणारी ही निवडणूक आहे, म्हणून मतदाराने जागे राहिले पाहिजे. जागे राहिले पाहिजे म्हणजे काय केले पाहिजे? झोप न घेता जागे राहिले पाहिजे असा याचा अर्थ नाही. असा निद्रानाशाचा विकार लावून घेण्याचे कारण नाही. प्रत्येक मतदार हा किमान दहा मतदारांना जागा करू शकतो, नव्हे त्याने केले पाहिजे. मी स्वतः आहे, माझ्या परिवारातील मंडळी आहेत, माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, माझे गावबंधू आहेत, माझे व्यवसायबंधू आहेत, माझे रहिवासीबंधू आहेत, असं प्रत्येकाचं क्षेत्र खूप व्यापक बनतं.
त्या क्षेत्रात आपल्यापैकी प्रत्येकाला क्रियाशील बनावे लागेल. या अर्थाने आपल्याला जागे राहिले पाहिजे. एक माणूस आध्यात्मिकदृष्ट्या जागृत झाला तर तो लाखो लोकांना प्रभावित करतो आणि एक मतदार राजकीयदृष्ट्या शतप्रतिशत जागृत झाला तर तो राजक्रांतीचा दीप पेटवू शकतो.