ट्रम्प यांचे पुनरागमन

विवेक मराठी    14-Nov-2024   
Total Views |
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वतःच्या चुका, राजकीय विरोधक, माध्यमांची चिखलफेक, त्या सर्वांतून तयार झालेले खटले, बुडालेले कोट्यवधी डॉलर्स या सर्वाला तोंड देत असताना ट्रम्प हे परत एकदा 2023 साली जिद्दीने निवडणुकीच्या रिंगणात आले. पन्नास राज्यांत झालेल्या या निवडणुकांमध्ये सात राज्ये ही निर्णायक राज्ये समजली जात होती. या सातही राज्यांत ट्रम्प हे कमला हॅरिस यांच्या विरोधात जिंकून आले. अजून एक गोष्ट निरीक्षणात आली, ती म्हणजे कमला हॅरिस ह्यांना 2020 साली बायडन यांना मिळालेल्या मतांपेक्षा साधारण 94 लाख मते कमी मिळाली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर 2024 च्या या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे विश्लेषण करावे लागते.
 
america
 
People use politics not just to advance their interests but also to define their identity. We know who we are only when we know who we are not and often only when we know whom we are against.
लोक राजकारणाचा उपयोग फक्त त्यांच्या हितसंबंधांसाठीच करत नाहीत, तर त्यांच्या ओळखीला आकार देण्यासाठीही करतात. आम्हाला आमची ओळख फक्त तेव्हाच उमगते, जेव्हा आम्हाला समजते की, आम्ही कोण नाही आणि अनेकदा तेव्हाच जेव्हा आम्हाला समजते की, आम्ही कोणाच्या विरोधात आहोत.
 
 
Samuel P. Huntington, The Clash of Civilizations and the Remaking of World Order सॅम्युअल The Clash of Civilizations and the Remaking of World Order हे सप्टेंबर 11, 2001 च्या न्यूयॉर्क-वॉशिंग्टनवरील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेले पुस्तक हे जरी विशेष करून राष्ट्राराष्ट्रांच्या धर्माधारित सांस्कृतिक संघर्षावर लिहिलेले असले तरी राष्ट्रांतर्गतदेखील वैचारिक संघर्षाचा भाग म्हणून ते लागू होते. किंबहुना सध्या जगभर विशेष करून लोकशाही जगतात असा अंतर्गत वैचारिक संघर्ष अधिकच दिसून येत आहे. 5 नोव्हेंबर 2024 ला पूर्ण झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या निकालातून हा आधीपासूनच चालू झालेला डावा विरुद्ध उजवा असा वैचारिक संघर्ष अधिकच स्पष्ट झाला.
 
 
राजकारणाचा काहीही अनुभव नसताना, ट्रम्प यांनी केवळ जिद्दीने आणि ईर्षेने उडी मारून आधी लहान राजकीय यश वगैरे मिळवण्याच्या भानगडीत न पडता एकदम राष्ट्राध्यक्षपद 2016 साली मिळवले खरे; पण उद्योगधंदा चालवणे आणि राष्ट्र चालवणे ह्यातील फरक लक्षात न आल्याने 2020 ला पुढच्या निवडणुकीत ते पद हरवून बसले. ह्या निर्णयानंतर एक अनपेक्षित गोष्ट अमेरिकन लोकशाहीमध्ये घडली. ट्रम्प यांनी हा निर्णय मान्य करण्यास नुसता नकार दिला नाही, तर 6 जानेवारीस जेव्हा हे निकाल अधिकृतपणे अमेरिकन काँग्रेस संमत करत होती, त्या वेळेस तेव्हा राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळे त्यांच्या समर्थकांनी प्रत्यक्ष Capitol Hill वर- अमेरिकन कॉँग्रेसवर हल्ला केला आणि हा संमतीदर्शक ठराव रोखण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींपासून ते जगभरातील अनेक प्रमुख राष्ट्रांनी या गोष्टीचा निषेध केला. अमेरिकेत तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षासदेखील ह्याचा कडक शब्दांत निषेध करायला लागला.
 
 
स्वतःच्या चुका, राजकीय विरोधक, माध्यमांची चिखलफेक, त्या सर्वांतून तयार झालेले खटले, बुडालेले कोट्यवधी डॉलर्स या सर्वाला तोंड देत असताना ट्रम्प हे परत एकदा 2023 साली जिद्दीने निवडणुकीच्या रिंगणात आले. नंतर नुसती रिपब्लिकन प्रायमरी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळवली नाही, तर राष्ट्रीय निवडणूकदेखील निर्णायक पद्धतीने जिंकली. पन्नास राज्यांत झालेल्या या निवडणुकांमध्ये सात राज्ये ही निर्णायक राज्ये समजली जात होती. या सातही राज्यांत ट्रम्प हे कमला हॅरिस यांच्या विरोधात जिंकून आले. अजून एक गोष्ट निरीक्षणात आली, ती म्हणजे कमला हॅरिस ह्यांना 2020 साली जो बायडन यांना मिळालेल्या मतांपेक्षा साधारण 94 लाख मते कमी मिळाली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर 2024 च्या या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे विश्लेषण करावे लागते.
 

america 
 
असे कायम म्हटले जाते की, यशाचे पितृत्व अनेकांकडे जाते; पण अपयश मात्र पोरके असते. मात्र ह्या निवडणूक निकालासंदर्भात अधिक विचार केल्यास याच्या उलट म्हणावेसे वाटते, की कमला हॅरिस यांच्या आणि एकूणच डेमोक्रॅटिक पक्षाच्या निवडणूक निकालातील अपयशाचे तसेच ट्रम्प आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या यशाचे पितृत्व एकच आहे- ते म्हणजे गेल्या दशकात हळूहळू तयार होत गेलेला आणि बघता बघता टोकाचा झालेला डावा विचार आणि त्यातून तयार झालेली सामाजिक अस्वस्थता.
 
 
ह्या टोकाच्या डाव्या विचारसरणीचा ऊहापोह करायचा झाला तर बरेच मागे जाता येत असले तरी त्याचे दृश्य स्वरूप हे अधिकाधिक गेल्या दहा वर्षांत दिसू लागले. वोक हा शब्द मुळात आफ्रिकन अमेरिकन्स जागृत (awake) होणे या संदर्भात वापरत होते; पण त्याचा संदर्भ ओबामा राष्ट्राध्यक्ष असतानाच्या काळात बदलू लागला. कृष्णवर्णीयांच्या पोलिसांकडून झालेल्या न्यायबाह्य (extra judicial) हत्यांमुळे केवळ कृष्णवर्णीय समाजाचे नाही तर कुठल्याही संवेदनशील सामान्याचे मन जागे झाले. त्यातून Black Lives Matter (BLM) चळवळ चालू केली ज्यामुळे नकळत संपूर्ण गौरवर्णीय समाजाला दोषी धरण्यात आले. त्याचाच पुढचा भाग म्हणजे शहरी भागात दंगली, तोडफोडी झाल्या ज्यामध्ये अर्थातच फक्त काही जण गुन्हेगार होते; पण नकळत सगळेच कृष्णवर्णीय दोषी आहेत असा अर्थ निघू लागला. थोडक्यात, सामाजिक दुही हकनाक तयार होऊ लागली.
 
 
दुसरी गंभीर गोष्ट ह्याच सुमारास होऊ लागली आणि नंतर वाढू लागली, ती म्हणजे Gay, Lesbian, Bisexual, Trans, Qeer आदी प्रकारांत स्त्री-पुरुषांची विभागणी होऊ लागली. शाळांमध्ये हे शिक्षण देण्यास सुरुवात झाल्याने, 13-14 वर्षांच्या मुली-मुलांच्या डोक्यात स्वतःच्या लिंगपरिचयाबद्दल गोंधळ तयार होऊ लागला. त्यामुळे अनेकदा कुटुंबेही दुभंगली. पुढे याच चळवळींनी इस्लामोफोबिया (इस्लामबद्दल द्वेषकारक बोलणे) हा विषय अचानक मोठा करून त्यावरूनही आवाज चालू केला. इस्रायल-हमास युद्धामुळे तर हा विषय अजून मुस्लीम समाजाच्या व्हिक्टिमहूडकडे वळला. मग तरुण विद्यार्थ्यांना जवळ करून हार्वर्डपासून अनेक मोठ्या विद्यापीठांत धरणे धरून इस्रायलविरोधी आंदोलने करत विद्यापीठांचे कामकाज बंद पाडले. अमेरिकन डावे आणि उजवे यांच्यात धार्मिक कारणाने एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे तो गर्भपाताचा. उजव्या ख्रिस्ती विचारांना गर्भपातावर बंदी घालायची आहे, तर डाव्यांच्या मते ज्यात ख्रिस्तीदेखील आहेत, तो स्त्रियांचा हक्क आहे. हा वाद गेली पन्नास वर्षे चालला आहे. गेल्या चार वर्षांत बायडन-हॅरिस सरकारने दक्षिण अमेरिकेतून आणि अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरून लाखो निर्वासितांना येऊ दिले. त्याचा अतिरिक्त भार अर्थातच अमेरिकन समाजावर पडत आहे. तेदेखील अजून एक महत्त्वाचे नाराजीचे कारण आहे.
 

america 
 
सर्वसाधारण विचार करायचा झाला तर वर उल्लेखलेले डावे विचार हे पूर्ण त्याज्य नव्हते, नाहीत; पण त्यासाठी केल्या गेलेल्या राजकारणकेंद्रित चळवळी आणि त्यातून तयार होणारी सामाजिक दुही ही अनेकांच्या दृष्टीने छुपे आणि गैर हेतू दाखवत होते. त्यात भर म्हणून चलन फुगवट्यामुळे अमेरिकेत सध्या खूप महागाई झाली आहे, ज्यामुळे सामान्य माणसांना जगणे अवघड होऊ लागले आहे; पण डेमोक्रॅट्सचे राजकारण आणि निवडणूक प्रचार हा अधिक करून ट्रम्प निवडले गेल्यास स्त्रीस्वातंत्र्य कसे कमी होईल ह्यावर अधिक लक्ष वेधीत होता. परिणामी जनतेने आपला त्रागा मतपेटीतून काढला; पण वर हंटिंग्टन यांच्या वाक्याप्रमाणे, उजवे म्हणजे आपण ज्यांच्या विरोधात आहोत म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यातून रद्द (कॅन्सल) करायचे हेच अजूनदेखील चालू आहे. अर्थात अजून डावे शिकायला तयार नाहीत.
 
 
दुसरीकडे उजव्यांचे नेतृत्व करत आलेले ट्रम्प हे आता स्वतःचे मंत्रिमंडळ (कॅबिनेट) तयार करण्यात व्यस्त आहेत. आत्तापर्यंत जी काही नावे पुढे आली आहेत त्यातील मार्को रुबियो हे परराष्ट्रमंत्री होत आहेत जे चीन आणि पाकिस्तान या देशांच्या समस्या जाणून आहेत. नॅशनल सिक्युरिटी सल्लागार म्हणून माईक वॉल्ट्झ यांना घेतले आहे, जे भारताशी जवळीक साधणार्‍या अमेरिकन काँग्रेसच्या द्विपक्षीय इंडिया कॉकसचे अध्यक्ष आहेत. भारतीय वंशाच्या विवेक रामस्वामीस ट्विटर-टेस्ला-स्टारलिंक आदी मोठ्या उद्योगांचे मालक असलेल्या इलॉन मस्कबरोबर सरकारी खात्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि प्रसंगी सरकारी कारभार कमी करण्याचे अधिकार दिले आहेत. सन 1861 ते 1862 ह्या काळात अमेरिकेत नागरी युद्ध झाले. त्यात कृष्णवर्णीयांना बांधून ठेवणारी गुलामी ठेवावी, असे म्हणणारे दक्षिणेतील डेमोक्रॅट्सविरुद्ध गुलामी नामशेष करावी म्हणणारे उत्तरेतील रिपब्लिकन्स यांच्यात हे युद्ध झाले, वैचारिक संघर्ष झाला. लिंकनच्या नेतृत्वाखाली गुलामी नामशेष केली गेली. डेमोक्रॅट्स हे युद्ध हरले; पण लिंकनने त्यानंतर शत्रुता डोक्यात न ठेवता देश एकत्र कसा होईल या दृष्टीने पावले उचलली. त्या काळात जगाचे नेतृत्व करणारी अमेरिका नव्हती; पण कदाचित संघर्षोत्तर समरसता आणण्याचे प्रयत्न करणारे नेतृत्व आणि त्याला साथ देणार्‍या विरोधकांमुळे नंतरच्या काळातली जागतिक नेतृत्वाची बीजे रोवली गेली असतील. ट्रम्प यांना त्यांच्या दुसर्‍या आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटच्या टर्मच्या अखेरीस देशाला एकत्र आणायची आणि तसा एक सोनेरी वारसा ठेवण्याची संधी मिळाली आहे. 2024 च्या या निवडणुकीतून जर डेमोक्रॅट्स शिकले तर त्यांच्यासाठी हे तात्कालिक अपयश ठरेल. ट्रम्प यांनादेखील त्यांचे आधीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळातील सर्व अपराध आणि त्यातून आलेली नामुष्की नष्ट करण्याची सुवर्णसंधी आली आहे. आता ह्या संधीचा वापर करत, ट्रम्प आधी झालेल्या मातीचे सोने करतात, की देशाचा-जनतेसाठीचा योग्य विचार न करता मिळालेल्या सोन्याची माती करतात ह्यावर त्यांचे अमेरिकन राजकीय इतिहासातील स्थान ठरणार आहे. भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर कमला हॅरिस यांच्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट्सपेक्षा रिपब्लिकन्स हे अधिक वास्तववादी मैत्री करू शकतील असे असू शकतात. अर्थात जुन्या वाक्प्रचाराप्रमाणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात कोणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो अथवा शत्रूदेखील नसतो. असतात ते फक्त स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ सांभाळणारे राजनैतिक संबंध. संस्कृतमध्ये एक याला समर्पक श्लोक आहे:
 
वनानि दहतो वह्नेः सखा भवति मारुतः ।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ॥
 
अर्थात, जेव्हा आगीचा वणवा सारे वन जाळून टाकत असतो तेव्हा वारा त्याला सर्वत्र पसरण्यात मदत करतो; पण तोच वारा हा एका लहानशा तेलाच्या वातीमधील दिवा शांत करतो, कारण दुर्बलाला कोणी मित्र नसतो. हे वास्तव माहिती असलेले नेतृत्व जोपर्यंत भारतात आहे, जोपर्यंत अमेरिकास्थित अनिवासी भारतीय हे अमेरिकेत आपल्या बुद्धीने, कष्टाने मिळवलेल्या संपत्तीने, अमेरिकेस मोठे होण्यास मदत करत राहतील, तोपर्यंत अमेरिका-भारत संबंध हे अधूनमधून खटके उडत, निगोशिएशन करत, वृद्धिंगत होण्याची शक्यता आहे.