देशहिताचा विचार करणारा पक्षच जनमानसात आपले स्थान टिकवून ठेवणार हे निश्चित. देशभक्तीच्या रंगात सर्व रंग एकजीव होऊन जातात. तोच आपला खरा रंग आहे. राजकारणाला ओंगळवाणा रंग देणार्या रंगांधळ्या पुढार्यांना तो रंग ओळखणे हे शक्य नाही, हेच खरे....
निवडणुकांच्या काळात प्रत्येक पक्ष दुसर्या पक्षावर टीकाटिप्पणी करीत असतो. निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यावर त्या टीकाटिप्पणीला काही अर्थ उरत नाही, हे सर्वसामान्य नागरिकांनाही माहीत झाले आहे. मात्र काही प्रकारची टीका ही हेतुपुरस्सर केलेली टीका असते आणि ती वरवरची गोष्ट म्हणून दुर्लक्षित करण्याजोगी नसते. सध्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी जहरी भाषा वापरून आपल्या अकलेचे तारे तोडले आहे ती गोष्टही ‘गंभीर’ या सदराखालीच मोडते. खरगे म्हणाले, काही लोक भगवी कफनी घालून राजकारण करतात आणि साधूपणाचा आव आणतात. खरगे यांचे विधान, ही त्यांची पातळी प्रवृत्ती दर्शविणारे आहे. प्रथमदर्शनी त्यांनी जो रंगाचा उल्लेख केला आहे तोच आक्षेपार्ह आहे. खरगे भगव्या रंगाची अशी खिल्ली उडवू शकतात; पण दुसर्या रंगाबाबत जर त्यांनी असे साहस केले असते तर त्यांना लगेच सारवासारव करावी लागली असती आणि आपले विधान मागे घ्यावे लागले असते. एवढी त्यांना जाण नसेल असे म्हणता येत नाही. त्यामुळे त्यांनी जाणूनबुजूनच हे विधान केलेले आहे, हे निश्चित.
दुसरा मुद्दा म्हणजे भगवा धारण केलेल्या व्यक्तीने राजकारण करण्यास त्यांनी जो आक्षेप घेतला आहे तो विषयसुद्धा गर्हणीय आहे. भगवे धारण करून विरक्त झालेल्या साधूंच्या कर्तव्याचे विवरण करताना संन्यासधर्माचे व वैराग्याचे प्रतीक असणारे समर्थ रामदासच सांगतात- मुख्य ते हरिकथा निरूपण। दुसरें तें राजकारण। तिसरें ते सावधपण। सर्व विषयी॥ (दा. 11.5.4). मुळात खरगे यांनी लक्षात घेतले पाहिजे की, विवेक आणि वैराग्य या दोन्हींच्या आधारावर केलेले राजकारण कधीच स्वार्थी, ढोंगी, भंपक आणि समाजविघातक होत नाही. राजकारणाचा मुख्य संबंध शासनाद्वारे देशाची सर्वांगीण प्रगती साधणे आणि देशाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणे याच्याशी असतो; परंतु दुर्दैवाने आजचे राजकारण म्हणजे गटबाजी, कटकारस्थाने, फसवणूक, भ्रष्टाचार यांच्या बुजबुजाटाने ग्रस्त झाले आहे. त्यात विवेकी माणसाने पडू नये, अशी खरगे यांची अविवेकी भूमिका आहे का? उलट विवेक गमाविल्यानेच ‘राजकारण’ या शब्दासह धर्म, संस्कृती, शिक्षण इत्यादी क्षेत्रे भ्रष्ट झाली आहेत. यामुळे राजकारणातही शुचितेचा आग्रह धरणे अगदी उचित मानले पाहिजे.
खरगे यांच्या विवेकहीन विधानाचा समाचार घेताना रामभद्राचार्य महाराज यांनी परखडपणे सुनावले आहे की, भगवाधारी व्यक्तीने राजकारण करू नये, असे कोठे लिहिले आहे? राजकारण हे काय गुंडांनीच करावे? लबाडांनीच राजकारण करावे काय?
भगवाधारींनीच राजकारण केले पाहिजे. गुंड आणि लबाडांचाच राजकारण हा प्रांत आहे, अशी ठाम समजूत असलेल्या खरगे यांना हे पटणार का? राजकारण ही आपलीच मक्तेदारी आहे, अशी त्यांची भूमिका आहे का? खरगे यांचे राजकारण कोणत्या रंगात रंगले आहे हे सुजाण जनता जाणत नाही का?
निवडणुका पार पडतील. चुकीची विधाने करणार्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. मात्र ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो’ ही म्हण आपण लक्षात घेतली पाहिजे. राजकारणातील मलई आपल्याच ताटात ओढण्यास सोकावलेल्या बोक्यांना देशाची संस्कृती आणि विचारधारा यांच्याशी काही सोयरसुतक नसते. आपण असे म्हणून कोणत्या प्रतीकांचा अपमान करीत आहोत, या गोष्टीशी त्यांचे घेणेदेणे नसते. बरे, खरगे असे रंग उधळत असताना त्यांचे स्टार प्रचारक राहुल गांधी मात्र संविधानाचा रंग लाल नाही का? असा वितंडवाद घालण्यात गुंगले आहेत. एकीकडे सर्वधर्मसमभावाचा डंका वाजवायचा आणि आपल्याला हवा तो आणि तोच रंग दुसर्यांवर थोपायचा, हा काँग्रेसी कावा आहे. आपल्या संविधानाचा रंग भारतीय जनतेला नक्कीच माहीत आहे, त्यांच्यात रंगांधळेपणा निर्माण करून गोंधळ माजविण्याचा डाव त्यामुळे सफल होणार नाही.
काँग्रेसी नेत्यांची अक्कलहुशारी वाखाणण्याजोगी आहे, कारण ज्या गोष्टी अन्य कोणी केल्या तर त्या आक्षेपार्ह वाटतात, मात्र त्याच गोष्टी आपण मात्र बिनबोभाटपणे ते सर्व करीत असतात. मुळात पक्षपाती धोरण आणि फूटपाडी नीती, हीच काँग्रेसची संजीवनी बुटी आहे. सेक्युलरवादाची झूल पांघरून मुस्लीम आणि ख्रिश्चनांच्या तुष्टीकरणाची अ-नीती चालवीत अनेक वर्षे सत्तासुख त्यांनी उपभोगले; पण ‘सर्व जणांना सर्व काळ मूर्ख बनविता येत नाही’ या उक्तीनुसार त्यांचे पापांचे रांजण भरल्यावर देशवासीयांनी काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचले. तरीही नव्या बाटलीत जुनीच दारू भरून जनतेला झिंगविण्याचे तंत्र ते चालवत आहेत. ते त्यांच्या अंगाशी नक्कीच येणार आहे.
त्यामुळे तिसरा मुद्दा म्हणजे सावधपणाचा, तो काँग्रेसने गंभीरपणे घेतला पाहिजे. आता सर्वच बाबतीत सावधपणे वागाल तर निदान विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता म्हणून तरी लोक तुम्हाला गांभीर्याने घेतील. पातळी सोडून टीका करीत निघाल तर तुमची घसरलेली पातळी सहानुभूतीदारांच्याही लक्षात येईल व तेसुद्धा तुम्हाला सोडून जातील आणि जनाधार गमावून बसाल. आता जनतेने जी जबाबदारी सोपविली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणे हेच त्यांच्याही हिताचे आहे. त्यामुळे देशहिताचा विचार करणारा पक्षच जनमानसात आपले स्थान टिकवून ठेवणार हे निश्चित. देशभक्तीच्या रंगात सर्व रंग एकजीव होऊन जातात. तोच आपला खरा रंग आहे. राजकारणाला ओंगळवाणा रंग देणार्या रंगांधळ्या पुढार्यांना तो रंग ओळखणे हे शक्य नाही, हेच खरे.