@प्रमोद वसंत बापट
9821979871
विमलजींनी प्रत्यक्ष संघकार्यात पुरेपूर लक्ष घातलंच; पण त्याचबरोबर समाजजीवनात संघसंस्कारांचा, विचारांचा प्रभाव निर्माण होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, प्रयोग केले. संघप्रकाश सर्वव्यापी, सर्वस्पर्शी व्हावा ह्यासाठी अनेकांच्या मनातील अंगणात विमलजी नावाचा दिवा प्रकाश देत राहिला. विमल नावाची ही संघप्रकाशाची पणती दीर्घकाळ, निष्कंपपणे तेवत राहो, आसमंत उजळत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
गोष्ट जुनी, पण लक्षात राहिलेली...
एक गुरुकुल होतं ज्यात अनेक कुमार शिक्षण घेत होते. गुरुदेव सर्वांना विविध कला, विद्यांचं शिक्षण देत होते. त्या गुणांच्या बळावर त्यांनी अवघं विश्व उजळून टाकावं, अशी अपेक्षा होती.
दिवाळी नव्हती; पण दिव्यांचा उत्सव होता. त्या आश्रमीय जगालाही उजेडाचा लखलखता स्पर्श झाला होता. कुमारांनी निवासी कक्ष, पाठशाळा, यज्ञमंडप, पाकगृह, गोशाळा असा आश्रमाचा सारा परिसर स्वच्छ आणि सुशोभित केला होता. गुरुदेवांची कुटी तर विशेषच. वस्तीपासून दूर असलेलं ते गुरुकुल आकाशातून पाहिलं असतं तर भोवतीच्या अंधारतळ्यातून उमललेल्या प्रकाशकमळासारखं दिसलं असतं.
गुरुदेव पाहणीच्या फेरीवर निघाले होते. गुरुकुलाच्या वर्तुळाकार रचनेत परिघावर कुमारांची निवासी कुटिरे होती. आतून एकेका कुमारांच्या कुटीचे निरीक्षण करीत गुरुदेव पुढे पुढे जात होते. प्रत्येक कुमाराने आपल्या वाट्याला आलेल्या मोजक्याच पणत्यांनी आपापली कुटिरे आतून उजळून टाकली होती.
बघता बघता एका कुटिरापाशी गुरुदेव थबकले. कारणच तसं होतं. एका कुमाराची कुटी आत आणि बाहेरही मंद उजेडात न्हाली होती. गुरुदेव मुग्ध होऊन पाहात राहिले. त्या कुटिरात राहणारा कुमार पुढे झाला. त्याला वाटलं की, आपलं काही चुकलं का? गुरुदेवांनी त्याला जवळ ओढलं आणि विचारलं, तुझ्या कुटिरात आत असा मंद उजेड का? दिवे कमी मिळाले का?
कोठारप्रमुखांनी त्वरेने खुलासा केला... नाही... नाही. सर्वांना सारख्याच पणत्या दिल्या आहेत. याने तेल सांडलं असेल नाही तर पणती फुटली असेल... गुरुदेवांनी त्यांना अर्ध्यावरच रोखून उत्तराच्या अपेक्षेने कुमाराकडे पाहिलं. कुमाराने आत्मविश्वासाने सांगितलं, मी सार्या पणत्या उंबरठ्यावर लावल्या, पुढच्या आणि परसदारीसुद्धा. त्यामुळे आतला उजेड बाहेरही मिळाला. माझ्या कुटिराबरोबर अंगण आणि कुंपणही थोडं थोडं उजळलं.
इथे त्या कथेचा हात सोडू या; पण प्रसंगाचा धागा पुढे नेला तर असं म्हणता येईल, त्या कुमाराचा वंशज आपल्या परिचयाचा आहे. त्याचं नाव विमल रामगोपाल केडिया. आपल्या सर्वांचे विमलजी...!
विमलजींशी झालेल्या पहिला परिचयाचा नेमका प्रसंग आठवत नाही. तसा तो कुणालाही आठवणे अवघड आहे, कारण विमलजी पहिल्या भेटीआधीही परिचित असल्यासारखं मोकळं वागतात... करतात. माहिम-बोरिवली-मीरा रोड अशा स्थलांतरात माझं बाल-किशोर-विद्यार्थी-तरुण अशा स्वरूपांत शाखेत जाणं होत होतं. दिवाळी वर्ग, नैपुण्य वर्ग, शिबिरं ह्यात सहभाग होता. मीरा रोडला नगर कार्यवाह असं दायित्व आल्यावर वरिष्ठ प्रवासी कार्यकर्त्यांचे प्रवास, त्याचं नियोजन अशी कामं लागल्यावर झालेली विमलजींची भेट आठवते; पण तीच पहिली म्हणवत नाही, कारण त्या भेटीत नवखेपण नव्हतं, दडपण नव्हतं, संकोच नव्हता आणि त्याचं सर्व श्रेय विमलजींच्या सहजसुंदर, पण गतिमान संवादपद्धतीला जातं.
एकूणच विमलजींच्या कार्यपद्धतीचा लसावि वा सारांश सहजता आणि गती ह्या अवघ्या दोन शब्दांत सांगता येईल.
विमलजींशी व्यक्तिगत भेट, संघप्रवासातील कार्यक्रम वा बैठक, काहीही असो, विमल-अस्तित्वाचे दोन प्रत्यय असतात... सहजता आणि गती. जणू विमल-संगीताचे ते वादी-संवादीच.
पूर्वनियोजन हा कोणत्याही कामाच्या यशाचा मुख्य घटक असतो; पण सारं काही पूर्वनियोजित असेल तर त्यात काही करायला वावच नाही असं वाटून ते काम निरस वाटू शकतं. वाटेवरून चालताना अवचितपणे एखादं मंदिर, गोपुर पुढे यावं तशी अनपेक्षितता आवश्यक असते. वस्तुत: ते मंदिर, गोपुर तिथेच असतात, ती वाट त्या मंदिराकडेच जात असते; पण तरीही त्याचं तसं सामोरं येणं आनंददायी असतं किंवा गाण्याच्या मैफिलीत गायक चपळ तान घेत अचानक समेवर येतो त्यातील अनियोजित प्रस्तुतीच सौंदर्य निर्माण करते; पण त्या गायकाने त्याचं नियोजन केलेलं नसतं, असं म्हणणं अवघड आहे. तो ते अशा कौशल्याने करतो की, जणू ते त्यालाही माहिती नव्हतं.
जीवनात आणि संघकामातही अनेकांनी असं कौशल्य यत्नपूर्वक मिळवलेलं असतं; पण विमलजींचा तो स्वभाव आहे, असं म्हटलं तरी त्यात थोडं उणं राहील इतकं ते त्यांच्यासंदर्भात अंगभूत आहे. त्यामुळेच त्यांच्या नियोजनात राहून काम करणार्याला त्या नियोजनाची चौकट खुपत नाही, टोचत नाही, तर ते नियोजन त्याला आपलंही आहे असं वाटू लागतं किंवा हे सारं नियोजित नसून आत्ताच आकार घेतंय असं वाटतं.
म्हणजे असं... विमलजींचा आठ-साडेआठच्या सुमारास फोन येई. आजचा प्रवास, बैठक, एखादा आगामी कार्यक्रम असा काही विषय सुरू असे आणि अवघ्या दीड-पावणेदोन मिनिटांत फोनसंवाद पूर्णही होई. म्हटलं तर त्यात सर्व काही असे... घरची चौकशी, कामकाज स्थितिगती, सूचना, सुचविण्यासाठी विचारणा, काही निश्चिती वगैरे वगैरे... अगदी नेमक्या वेळात सर्व काही.
संध्याकाळी विमलजींचा शाखाप्रवास असे. शेवटची दहा-पंधरा मिनिटं शाखेवर ते काही विषय मांडत, तो शाखेत आलेल्या प्रत्येकासाठी... नव्हे प्रत्येकाशी संवाद असे. नंतर एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जाणं. सोबत शाखा वा नगर टोळीतील कार्यकर्ते. त्यांच्याशी गप्पा, हास्यविनोद. त्याच घरी भोजन आणि परतणं. सामान्यत: सर्वच प्रवासी कार्यकर्ते हे करतात. हेच सारं असतं, पण असं नसतं.
एखादी बैठक असते. खूप विषय असतात, काही चर्चेचे तर काही निर्णयाचे. उलटसुलट चर्चा होते; पण बैठकभर चर्चेचं पाणी पसरत नाही. ते योग्य बांधाशी अडतं... थांबतं. निर्णयासाठीही अगदी दोन दिशांच्या सूचना येतात; पण बैठक निर्णायक होते. पुढे बघू, अशी अनिश्चिततेची बाधा तिला होत नाही.
खूप वर्षांच्या सातत्याने थोडं थोडं रहस्य उकलायला लागतं. थोडं तर्काने... थोडं अनुभवाने.
विमलजी सकाळी फोन करतात तेव्हा त्यांच्यासमोर दोन गोष्टी असतील. त्या दिवसाच्या कामाची, संबंधित कार्यकर्त्यांच्या नावांची सूची आणि न्याहारी. न्याहारीच्या पदार्थाच्या मात्रेवर वा सूचीच्या लांबीवर संवादाची लांबी ठरत असेल; पण दोन्ही परिपूर्ण...स्वतःसाठी न्याहारी आणि समोरच्यासाठी काम.
बैठकीतील विषयांची चर्चा कुणाकडून, किती हेही विमलजी ठरवूनच येत असावेत, कारण काही वेळानंतर, हां, आयी बात समझ में, हां, वो हो गया... अशी काही वाक्यं त्यांच्याकडून अशी येत, की बोलणार्याला वाटावं, की खरंच तसंच आहे, पुरेसं झालं आहे.
विमलजींचा व्यक्तिगत प्रवास मोठा रोचक, रंजक आहे. त्याचा प्रारंभ ब्रह्मदेशापासून होतो. आपल्याला ब्रह्मदेश मंडालेपुरताच माहिती असतो. लोकमान्य टिळकांना तिथे भोगावा लागलेला कारावास हाच एकमेव संदर्भ असतो; पण विमलजींच्या परिचयातील माणसांना रंगूनही माहिती होतं. तसं सिनेमाप्रेमी मंडळींना ’पिया गये रंगून..’ माहिती असतं; पण रंगूनहून कुणी आलेलंही असतं... ते आपल्यालाच माहिती असतं आणि ते असतात विमलजी.
पुढे संभाजीनगरला संघ कार्यालयात राहून केलेलं अभियांत्रिकीचं शिक्षण आणि कर्मभूमी मुंबई... ते मुंबईच्या जनजीवनात आणि अर्थातच संघजीवनात समरसून गेलेले दिसतात. आणीबाणीच्या विरोधात आणि ती उठल्यावर उसळून आलेल्या जनभावनेला नित्य संघकामात बसविण्याच्या त्या कालावधीत विमलजी मुंबईत, मुख्यत: पार्ल्यात सक्रिय झाले. विविध दायित्वांचं परिश्रमपूर्वक आणि कल्पकतेने वहन त्यांनी केलं. वसंतराव मराठ्यांनंतर वसंतराव तांबे, पद्मश्री रमेशजी पतंगे ह्यांच्याबरोबर विमलजी मुंबईच्या कामातील एक महत्त्वाचा भाग बनले. पुढे महानगर प्रचारक मुकुंदराव पणशीकरांनी अनेक नव्या प्रयोगांना, प्रकल्पांना दिशा दिली, बळ दिलं. उदाहरणासाठी केशवसृष्टी हे एकच नाव पुरेसं आहे, ज्यात मुकुंदराव आणि विमलजी दोघांचे परिश्रम आहेत, प्रतिभा आहे.
मुंबईतील काम अनेक दृष्टीने महत्त्वाचं होतं. उद्योग, अर्थव्यवस्था, राजकीय केंद्र, बहुभाषकांची दाटीवाटीची सर्व स्तरांतील वस्ती, आरोग्यसुविधा, शिक्षणकेंद्र आणि देशभरातून जगण्यासाठी येणार्या प्रत्येकाला आपल्यात सामावून घेणारी स्वप्ननगरी, असं अनेक कारणांनी, अंगांनी अमाप वाढणारं एक महानगर ही मुंबईची देशभरातील ओळख होती. त्यामुळे इथल्या संघकामाविषयी अपेक्षाही होत्या. विमलजी अनेकदा सांगत की, मा. बाळासाहेब देवरस जेव्हा जेव्हा मुंबईत येत तेव्हा तेव्हा मुंबईतील शाखासंख्या आवर्जून विचारीत असत आणि कधी वाढणार, असंही काळजीने, अपेक्षेने विचारीत असत.
विमलजींच्या कार्यकर्ता म्हणून व्यक्तित्वावर मा. बाळासाहेब देवरस आणि मा. रज्जुभैया ह्या दोन श्रद्धेय अधिकार्यांचा विशेष प्रभाव आहे. ते विमलजींच्या विचारप्रक्रियेतून, बोलण्यातून नित्य जाणवतं.
आरंभीच्या कथेतील उंबरठ्यावर पणत्या ठेवणार्या कुमाराचा संदर्भ इथे आहे. विमलजींनी प्रत्यक्ष संघकार्यात पुरेपूर लक्ष घातलंच; पण त्याचबरोबर समाजजीवनात संघसंस्कारांचा, विचारांचा प्रभाव निर्माण होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, प्रयोग केले. संघप्रकाश सर्वव्यापी, सर्वस्पर्शी व्हावा ह्यासाठी त्यांच्या मनात नित्य खळबळ सुरू असते. त्यातूनच त्यांचे माणसांवरील प्रयोग सुरू असतात. एखाद्या माणसाची भेट झाली असता त्याची गुणवत्ता ओळखून त्याला कुठे, कशात जोडायचं ह्याचा विमलजी विचार करू लागतात. शिवरामपंत जोगळेकर मुंबईत प्रचारक असताना म्हणायचे, समोर भेटलेल्या प्रत्येकासाठी आपल्या खिशात चणेफुटाणे असायला हवेत. तसेच विमलजींच्या खिशात प्रत्येकासाठी साखळीची एकेक कडी असावी. त्याच्याच आधारे ते अनेकांना जोडत जातात.
त्यातूनच मुंबईच्या प्रत्यक्ष शाखाकामाबरोबरच समाजोन्मुख विशाल व्यापक संघकामाची उभारणी होत गेली. दिलीपजी पै, नंदाजी शेडगे, रामभाऊ गायकवाड असे ध्यासाने काम करणारे अनेक कार्यकर्ते मुंबई महानगरातील कामाचे शिल्प साकार करीत होते.
विमलजींचे काही व्यक्तिगत प्रयोगही लक्षणीय आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या व्यावसायिक जीवनात त्यांची मोलाची भूमिका आहे. अनेक स्वयंसेवक आपल्या व्यावसायिक समस्या त्यांना सहजपणे सांगतात; साहाय्य व सल्ला घेतात. आणखी एका प्रयोगात उषावहिनींचा महत्त्वाचा वाटा असे. मुंबई महानगरातील त्या त्या वर्षात विवाह झालेल्या तरुण कार्यकर्त्यांना विमलजी आपल्या घरी वर्षात एकदा पत्नीसह जेवायला बोलावीत असत. सहज गप्पा होत असत. त्याच्या सहचरीला आपल्या सहजीवनातील संघाचं स्थान समजे, अनुकूलता निर्माण होई. वहिनीही मोठ्या बहिणीसारखी सलगी देत असत, प्रपंचासाठी चार हिताच्या गोष्टी सांगत.
कार्यकर्त्याला अशा आत्मीयतेची, सलगीची अत्यंत आवश्यकता असते. आज तर अधिकच. एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या विवाहात विमलजींचं हे आप्तपण अगदी जवळून पाहायला मिळालं. शहरापासून थोड्या अंतरावर झालेल्या त्या दिमाखदार विवाहसोहळ्याला खूप निमंत्रित होते, उपस्थितीही मोठी होती. थोडं दूर असल्यामुळे सगळ्या व्यवस्था तिथे उभ्या केल्या होत्या. आलेली मंडळी परत दूर जायचं असल्याने सोहळ्याचा आनंद घेऊन निघत होती. अशा वेळी मुलीचं लग्न आहे, तिच्या पित्याची... आपल्या कार्यकर्त्याची मनःस्थिती नाजूक झालेली असते, हे सर्व ध्यानात घेऊन विमलजी अगदी अखेरपर्यंत तिथे उपस्थित होते, एका अर्थी मांडव उतरवेपर्यंत. असे आत्मीयतेचे अनुभव आता दुर्लभ झालेले असताना विमलजी आपलं वेगळेपण... खरं तर वेगळं नसलेपण व्यक्त करतात.
विमलजींनी जवळपास दोन दशके मुंबईच्या संघकामात आपली ऊर्जा दिली, प्रतिभा दिली. आता गेली काही वर्षे ते वाडा ह्या वनवासी क्षेत्रात ग्रामविकासाचं काम करताहेत. त्याविषयी ऐकलं तेव्हा मोठं कुतूहल वाटलं होतं. आयुष्यातील उमेदीची सारी वर्षे ज्याने महानगरीय क्षेत्रात व्यतीत केली तो कार्यकर्ता ग्रामजीवनात कसा रमावा? ज्या ग्रामीण जीवनाची सवय नाही, ओळख नाही, त्याच्या विकासाची संकल्पना तरी कशी उभी राहील? पण विमलजी तिथे गेले, काही दिवस राहू लागले आणि आताच्या एका भेटीत म्हणाले, अरे, आता महिन्यातून दहा-पंधरा दिवस इथे राहिल्यावाचून मला चैन पडत नाही.
विमलजी आपल्या अमृतवर्षात आहेत. त्यांना विनयपूर्वक वंदन. त्यांनी आपल्या अनुभवाच्या अमृताची वाटी आणि संघप्रकाशाची पणती उंबर्यावरून आता अंगणाबाहेर नेली आहे. ती दीर्घकाळ, निष्कंपपणे तेवत राहो, आसमंत उजळत राहो.