विमलजींसोबतचा संघकामाचा कालखंड माझ्या संघजीवनातील अत्युच्च आनंदाचा कालखंड आहे. आम्ही दोघांनी तेव्हा तिन्ही उपनगरांचे पायाला भिंगरी बांधून प्रवास केले. विमलजींसोबतच्या संघकामाचा सात्त्विक आनंद अशा कामांतून मिळत गेला. कालांतराने कार्यक्षेत्रे वेगळी झाली तरी आमच्या दोघांमधील संबंध मात्र तसेच परस्परांशी समरूप होण्याचे राहिले. विमलजी आता पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. ते शतायुषी झालेले बघण्याचे भाग्य मला प्राप्त होवो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
विमलजींशी माझ्या परिचयाचा पहिला दिवस माझ्या स्मरणात नाही; पण 1972 साली त्यांचा माझा पहिला परिचय पार्ल्यातील संघशाखेत झाला असावा. त्या वेळी पार्ले नगर अशी संघाची संघटनात्मक रचना होती. त्यात पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी अशी तीन उपनगरे येत. आमच्या नगराचे कार्यवाह होते महेंद्र शृंगी. तरुणांना संघाच्या कामाशी जोडण्याचा त्यांचा हातखंडा अतिशय जबरदस्त होता. विमलजींचा परिवार नुकताच ब्रह्मदेशातून भारतात आलेला होता. महेंद्र शृंगी यांना ते समजले. विमलजींचा शाखेशी संबंध ब्रह्मदेशापासून होता, त्यामुळे पार्ल्याच्या संघशाखेत रममाण व्हायला त्यांना वेळ लागला नाही.
आम्हा दोघांनाही संघकामाच्या वेगवेगळ्या जबाबदार्यांत गुंतवण्याचे काम महेंद्र शृंगी यांनी केले. अगदी तरुण वयात मी पार्ले नगराचा कार्यवाह झालो आणि विमलजी सहकार्यवाह झाले. वयाने मी विमलपेक्षा सहा-सात वर्षांनी मोठा होतो. येथून त्यांचा आणि माझा जो संबंध निर्माण झाला तो आजतगायत अभिन्न राहिलेला आहे. तसे पाहिले तर, विमलजी आणि मी अशी आमच्या दोघांत घनिष्ठ मित्रता व्हावी, असे लौकिक अर्थाने समान धागे नाहीत. त्या वेळी ते उच्च मध्यमवर्गीय श्रेणीत बसणारे होते. मी गरिबी रेषेच्या वर जगणारा होतो. इंग्रजीतील दोन शब्द आहेत, इन्ट्रोव्हर्ट आणि एक्स्ट्रोव्हर्ट. विमलजींचे व्यक्तिमत्त्व हे बहिर्मुख म्हणजे एक्स्ट्रोव्हर्ट आहे आणि माझे व्यक्तिमत्त्व हे अंतर्मुख आहे. माझा स्वभाव चिंतनशील, विमलजींचा स्वभाव कृतिशील. माणूस किती का मोठा असेना, विमलजी त्याला बेधडक जाऊन भेटत असत. माझ्या मनात संकोचाचं जाळं निर्माण होई.
डॉक्टर हेडगेवारांनी घालून दिलेल्या संघकार्यपद्धतीची महानता याच्यात आहे की, अतिशय भिन्न स्वभावाच्या व्यक्तींनादेखील ही कार्यपद्धती जवळ आणते आणि एकमेकांना घट्ट बांधून ठेवते. ‘एक आत्मा, दोन शरीरं’ याप्रमाणे आम्ही पार्ले नगराचे काम उभे केले. आमच्या दोघांत कधी दीर्घ संवाद झाले असे नाही. मतभेदाचा तर कधी प्रश्नच निर्माण झाला नाही. जे ठरले ते करायचे. यात शंभर टक्के एकवाक्यता राहिली. तेव्हा बाळासाहेब देवरस यांनी कार्यविस्ताराची एक योजना मांडली होती. 10 हजारांची एक वस्ती आणि प्रत्येक वस्तीत दोन शाखा. शाखांची सरासरी 50 असावी. शहरात याप्रमाणे संघकार्याचा विस्तार व्हावा, अशी ही योजना होती.
आम्ही दोघांनी मिळून पार्ले नगराच्या म्हणजे अंधेरी, पार्ले, जोगेश्वरी भागांत 50 वस्त्यांची योजना केली आणि प्रत्येक वस्तीत प्रथम एक शाखा सुरू करू या, अशी योजना आखली. आणीबाणी येईपर्यंत आम्ही जवळजवळ सर्व वस्त्यांत शाखा सुरू केल्या होत्या. एक शाखा सुरू करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. शाखा रोज आणि वेळेवर लावावी लागते. ती एक तासाची असावी लागते. शाखा भरवणं आणि एक तासाची शाखा चालवणं याचं प्रशिक्षण लागतं आणि तसे कार्यकर्ते उभे करावे लागतात. चांगल्या अर्थाने हे सर्व उपद्व्याप आम्ही केले. विमलजींसोबतचा हा संघकामाचा कालखंड माझ्या संघजीवनातील अत्युच्च आनंदाचा कालखंड आहे. आम्ही दोघांनी तेव्हा या तिन्ही उपनगरांचे पायाला भिंगरी बांधून प्रवास केले. विमलजींकडे स्कूटर होती, माझ्याकडे सायकल होती. या प्रवासाच्या कष्टाचे तेव्हा काही वाटत नसे. शेकडो स्वयंसेवकांच्या घरी प्रवेश झाला आणि तेवढ्याच जणांच्या घरी कधी दुपारचे, तर कधी रात्रीचे भोजनदेखील झाले. आपल्या नकळत एकात्म हिंदू समाज काय असतो, याचे दर्शन या काळात घडले. पार्ले पश्चिम हा गुजराती स्वयंसेवकांचा भाग. तिथे गुजराती गोड जेवण खावे लागे आणि जे.बी. नगर हा सिंधी आणि मारवाडी भाषिकांचा विभाग. तिथे कधी सिंधी पदार्थ, कधी मारवाडी पदार्थ आणि जोगेश्वरी हा श्रमिकांचा विभाग. कोकणी जेवणाचा स्वाद तिथे मिळत असे. विमलजींबरोबर एकात्मिक आणि एकरस हिंदू समाजाची अनुभूती घेण्याचा हा कालखंड आहे.
कल्पकता आणि प्रयोगशीलता हे विमलजींच्या कामाचे खास वैशिष्ट्य आहे. तेव्हा आम्ही असे ठरविले की, प्रत्येक सायंशाखेवर महिन्याला एक कथाकथनाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि मंडल स्तरावर तरुणांसाठी बौद्धिक वर्ग झाला पाहिजे. योजना करणं सोपं असतं; पण अंमलबजावणी करताना नाकीनऊ येतात. 50 सायंशाखांना 50 वक्ते द्यायचे, कथा सांगताना 50 वक्ते पुरवायचे, ते आणायचे कुठून? आणि 15-16 मंडलं आहेत, त्यांना वक्ते द्यायचे, ते आणायचे कुठून? या योजनेतून विमलजींनी अनेकांना वक्ता म्हणून घडविले. त्यातला मीदेखील एक आहे. त्यांची प्रयोगशीलता कशी होती? पार्लेश्वर सायंशाखेवर त्यांनी सौ. आपटे (विनय आपटेंच्या मातोश्री) यांचा कथाकथनाचा कार्यक्रम ठेवला. तेव्हा संघशाखेवर महिलांचा बौद्धिक वर्ग ही प्रथा संघात सुरू झालेली नव्हती आणि कदाचित महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असेल.
पार्ले हे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचे शहर होते. पार्ला पूर्व हा तसा मर्यादित विस्ताराचा भाग होता. पार्ले टिळक विद्यालय ही नावाजलेली शिक्षणसंस्था पार्ल्याचे भूषण होते. एकदा आम्ही असा विचार केला की, शाळेतील हुशार विद्यार्थी संघात यायला पाहिजेत. विमलजींनी त्याची अंमलबजावणी पार्ल्यात केली. टिळक विद्यालयातील अकरावी ‘अ’च्या तुकडीतील निम्म्याहून अधिक मुले शाखेत येऊ लागली. मिलिंद करमरकर, राजू पटवर्धन, गिरीश बोडस इत्यादी नावांचा त्यात समावेश करावा लागेल. पुढे हे सर्व अत्यंत कर्तृत्ववान कार्यकर्ते झाले.
पार्ले नगरामध्ये आम्ही एक उपक्रम तीन-चार वर्षे सातत्याने राबविलेला. स्वयंसेवक अकरावीत गेला की, त्याचा शाखेशी संपर्क फार कमी राहतो. त्याला संघकार्याशी जोडून ठेवण्याचा हा कसोटीचा कालखंड असतो. अशा अकरावीतील विद्यार्थ्यांशी आम्ही नित्य संपर्क ठेवत असू आणि परीक्षा संपल्यानंतर लगेच्याच आठवड्यात अशा सर्व विद्यार्थ्यांची दोन दिवसांची सहल काढीत असू. सहलीचे स्थान ठरलेले असे, ते म्हणजे डॉ. चतुर्वेदी यांचे वसई पूर्वेतील आरोग्यधाम. ते वसई स्थानकापासून दोन-अडीच किलोमीटर दूर होते. परीसर निसर्गरम्य होता. आणि दुसर्या दिवशी तुंगारेश्वरची सहल. खेळ, खाणं, दंगामस्ती आणि एखाद्या विषयाची मांडणी. एवढाच कार्यक्रम असे. या सहलीमुळे अकरावीनंतरदेखील विद्यार्थी संघकामाशी जोडलेला राहतो. अपेक्षित परिणाम पाहिजे असतील तर, उपक्रमात सातत्य ठेवावे लागते.
विमलजी हनुमान सायंशाखेचे कार्यवाह असतानाचा एक किस्सा आहे. त्यांच्या शाखेत तेव्हा विजय तेंडुलकर यांचा मुलगा राजू येत असे. तेव्हा तो शिशू होता. उत्तम प्रार्थना सांगत असे. मी त्या शाखेला भेट द्यायला गेलो असताना त्याचा परिचय झाला. प्रार्थनेच्या वेळी संख्या एकत्रित करण्याचे काम जो करतो, तोच प्रार्थना सांगतो. राजूने हे काम केले, संख्येची बेरीजही फटाफट केली, तेव्हा मला त्याचे खूप कौतुक वाटले. पुढे हनुमान शाखेचा वार्षिक उत्सव होता. विमलजी विजय तेंडुलकर यांना भेटायला गेले आणि प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे निमंत्रण दिले. विजय तेंडुलकरांनी विचारले, “संघ अधिकार्यांना विचारून तू माझ्याकडे आला आहेस ना?” विमलजी म्हणाले, “हो.” विजय तेंडुलकर शाखेवर आले आणि त्यांचे ‘भारतमाता’ या विषयावर उत्तम भाषण झाले.
राजू दुर्दैवाने अकाली गेला. सुरेशराव मोडक तेव्हा पार्ले नगराचे संघचालक होते. ते विजय तेंडुलकर यांच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा विजय तेंडुलकर म्हणाले, “तो तुमचा स्वयंसेवकच होता.”
विमलजींचे भाग्य असे की, ते दीर्घकाळ संघकामातच राहिले. माझ्यानंतर ते मुंबईचे सहकार्यवाह झाले आणि माझ्या मागे नंतर विविध कामांच्या जबाबदार्या आल्या. संघकामाचा एक भाग म्हणून त्या मी पार पाडत गेलो; परंतु विमलजींसोबतच्या संघकामाचा सात्त्विक आनंद अशा कामातून मला मिळाला. असे लिहायलादेखील लेखणी थरथरत असते. कार्यक्षेत्रे वेगळी झाली तरी आमच्या दोघांमधील संबंध मात्र तसेच परस्परांशी समरूप होण्याचे राहिले.
विमलजी आता पंचाहत्तरी पूर्ण करीत आहेत. ते शतायुषी झालेले बघण्याचे भाग्य मला प्राप्त होवो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.