सामर्थ्य संघमंत्रांचे

विवेक मराठी    09-Oct-2024   
Total Views |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीकडे वाटचाल करत आहे. संघ हा विचार आहे. या विचाराची स्पष्टता, व्यापकता विजयादशमीच्या बौद्धिकातून होत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभिलेखागाराकडे 1930 पासूनची बौद्धिके संग्रहित करण्यात आलेली आहेत. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी सरसंघचालक म्हणून विजयादशमीच्या बौद्धिकातून जे मूलभूत स्वरूपाचे विचार मांडले, त्याची ही साररूप मांडणी.
 

rss 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल शताब्दीच्या दिशेने चालू आहे. 1925च्या विजयादशमीला आपल्या निवडक सहकार्‍यांना सोबत घेऊन डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी एक बैठक केली आणि त्या बैठकीत डॉ. हेडगेवारांनी सांगितले, “आज आपण संघ सुरू करत आहोत.” हाच तो संघाचा प्रारंभबिंदू. 1925च्या विजयादशमीपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकाकडे होणारी वाटचाल समजून घेतानाच डॉ. हेडगेवारांना संघाची सुरुवात का करावीशी वाटली, हे समजून घेणेही आवश्यक आहे.
 
 
डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे क्रांतिकारक होते, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. देश पारतंत्र्यात होता. हिंदू समाजाचे शतखंड झाले होते. एकात्मभावाचा अभाव होता. आपल्या संस्कृतीचे व संस्कारांचे अवमूल्यन करणे काही मंडळींना भूषणावह वाटत होते. हिंदू समाज हा समाज म्हणून एकत्र उभे राहण्याची मानसिकता हरवून बसलेला होता. याउलट मुस्लीम लांगूलचालन चालू होते. हिंदुहिताचा मात्र विचार केला जात नव्हता. अशा पार्श्वभूमीवर डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली आहे. संघ सुरू करण्यामागची कारणमीमांसा करताना डॉ. हेडगेवार सांगतात, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना इ.स. 1925 साली जरी झाली असली, तरी त्याच्या पूर्वपीठिकेचा काळ किती तरी मागे नेता येईल, कारण 1914 साली मी विद्यार्थिदशेत होतो व त्याच वर्षी मी डॉक्टरीची परीक्षा पास झालो; पण त्यापूर्वी किती तरी वर्षांपासून हे विचार मला त्रास देत होते. मला इतिहासाचा फार नाद होता व त्यामुळेच मला संघाची कल्पना आली. हिंदुस्थानाच्या इतिहासावरून, हिंदुस्थान हिंदूंचा देश आहे हे कोणाच्याही लक्षात आल्यावाचून राहणार नाही. हिंदुस्थानात हिंदू हे केव्हापासून मालकीच्या नात्याने नांदत आहेत? मुसलमान व ख्रिश्चन या देशात केव्हा व कसे आले? सध्या ख्रिश्चन व मुसलमान इत्यादिकांची संख्या किती? त्यांची भरभराट का व कशी झाली? हिंदुस्थानची राज्यपद्धती पूर्वी व आता कशी आहे? इत्यादी प्रश्नांची माहिती कुणालाही आपल्या इतिहासावरून करता येईल.” मुसलमानांनी हिंदूंवर राज्य केले. इंग्रजही या देशावर सत्ता गाजवू लागले. हे कशामुळे झाले? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. हेडगेवार म्हणतात, “राष्ट्रीयत्वाचे दौर्बल्य व संघटनेचा अभाव या दोन गोष्टी इंग्रजांनी हेरल्या आणि दुकानदारी सोडून ते हिंदुस्थान पादाक्रांत करू लागले.”
 
 
गुरुजी गोळवलकर जीवनचरित्र
@रंगा हरी
गोळवलकर कुलवृत्तांतापासून त्यांच्या पूर्णाहुतीपर्यंत विस्तृत माहिती या जीवनचरित्रात वाचायला मिळते.

https://www.vivekprakashan.in/books/shri-guruji-golwalkar-biography/
 
 
 
समाजाचे संघटन आणि राष्ट्रीयत्वाचा अंगीकार या दोन मूलभूत गोष्टींसाठी डॉ. हेडगेवारांनी संघ सुरू केला. हिंदू समाजाचे संघटन हा संघकामाचा आत्मा आहे. हिंदू समाजाचे संघटन करताना पूर्वसुरींनी जो विचार मांडला, त्याचा सखोल अभ्यास डॉ. हेडगेवारांनी केला होता. 19व्या शतकामध्ये हिंदू समाज आणि हिंदू धर्म सुदृढ करण्यासाठी, त्याला संघटित करण्यासाठी काही प्रयत्न झाले होते; परंतु हे प्रयत्न सामाजिक, सांस्कृतिक सुधारणांवर अवलंबून होते. राजा राममोहन राय यांचा ब्राह्मो समाज (1828), स्वामी दयानंद सरस्वती यांचा आर्य समाज (1875) आणि स्वामी विवेकानंदांचे रामकृष्ण मिशन हे अशा डझनभर संघटनांपैकी काही होते. या सर्वच संघटना मूलत: हिंदू समाजसुधारणेच्या प्रक्रियेशी जोडल्या गेलेल्या असल्याने या संघटनांनी आणि त्या चालवणार्‍या (स्थापन करणार्‍या) धर्मसुधारकांनी वसाहतवादी ब्रिटिशांच्या शासनाच्या काळात तत्कालीन राजकीय वातावरणावर आपला स्वतंत्र ठसा प्रस्थापित केला होता. ‘हिंदू’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या ऐतिहासिक राष्ट्रीय समुदायाचा संबंध आधुनिक राष्ट्र-राज्य संकल्पनेशी केवळ एक नागरिक या रूपात येत नाही, तर भारतीय राष्ट्र ज्या संस्कृतीवर, परंपरांवर आधारलेले आहे, इतिहासाच्या ज्या पायावर उभे आहे आणि सांस्कृतिक व वैश्विक चेतनेचा ज्याने बौद्धिक रूपाने स्वीकार केला आहे, असा सर्वांच्या विकासप्रक्रियेशी या समुदायाचा संबंध पोहोचतो आहे, त्यामुळेच हिंदूंशी संबंधित कुठलेही आंदोलन, कुठलीही चळवळ एकांगी राहणे सर्वथैव अशक्य आहे. भारतीय राष्ट्राचे अन्य राष्ट्रापासून असणारे वेगळेपणही याच रूपातले आहे. भारतीय राष्ट्र कुठल्याही अन्य परंपरेचे वा सांस्कृतिक चेतनेचे अंग न बनता, आपल्याच संस्कृतीशी आणि परंपरेशी एकात्म रूपाने जोडले गेले आहे. भारतीय परंपरा आणि भारतीय राष्ट्र या परस्परांवर अवलंबित गोष्टी आहेत, त्यामुळे या राष्ट्रावर होणारा कोणताही प्रहार हा या परंपरेवरचा प्रहार मानायला हवा आणि या परंपरेविषयी उपस्थित केले जाणारे प्रश्न हे भारताच्या राष्ट्रीयतेच्या अस्तित्वाविषयीच प्रश्न उपस्थित करावेत अशा प्रकारचे आहेत. त्यामुळेच आर्य समाजाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवाद आणि लोकशाही याविषयीची तीव्र भावना दिसून येते. हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्र या संकल्पना सार्‍या धार्मिक, सांप्रदायिक, जातीय, भाषिक आणि क्षेत्रीय भावना पलीकडच्या असल्याचे मत स्वामी विवेकानंद, लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, महर्षी अरविंद, बिपिनचंद्र पाल, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आदी चिंतकांनी वेळोवेळी मांडले आहे. या सार्‍या चिंतकांच्या, तत्त्वज्ञानाच्या मांडणीमध्ये एक गोष्ट समान दिसते, ती अशी की, भारतवर्षाची मूळ प्रकृती आध्यात्मिक आहे, राष्ट्राला देवीच्या रूपात स्वीकारले गेले आहे आणि सर्व धर्मांमध्ये राष्ट्रधर्म हा सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. व्यक्तिगत धर्म आणि राष्ट्रधर्म यात विरोधाभास मानलेलाच नाही. भारतीय धर्म, भारतीय समाज आणि भारतीय संस्कृती यांच्या पुनर्जागृतीचा काळ हा हिंदू पुनर्जागृतीचा काळ मानला गेला आहे, कारण धर्मसुधारणेसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव हिंदूंवरच पडलेला होता. अन्य संप्रदायांमध्ये त्या सुमारास तरी धर्मसुधारणेची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती किंवा सुरू झाली असल्यास तिची प्रक्रिया तरी अतिशय मंद होती. त्यामुळेच हिंदू समाजातील आणि धर्मातील सुधारणांसाठी ज्याने आपले सर्वस्व वेचले होते आणि हिंदू समाजाकडेच धर्मसुधारणांची प्रयोगशाळा म्हणून पाहिले होते, अशा राजा राममोहन राय यांना भारतीय पुनर्जागृतीचे ‘भीष्म पितामह’ असे म्हटले जात होते.
 
 
 
डॉक्टरांचे हे स्पष्ट मत होते की, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. या राष्ट्रीयत्वासाठी कुठलाही धर्माचा वा संप्रदायाचा त्याग अभिप्रेत नसून सनातन सांस्कृतिक चेतनेच्या आधारावर सकारात्मक रूपाने राष्ट्रीयत्वाची परिभाषा करणे अभिप्रेत आहे. संघस्थापनेचा उद्देश स्पष्ट करताना डॉक्टर हेडगेवार यांनी म्हटले होते, “स्वयंप्रेरणेने आणि स्वयंस्फूर्तीने राष्ट्रसेवेचा विडा उचलणार्‍या व्यक्तींनी केवळ राष्ट्रकार्यासाठी निर्मिलेली संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय. जगाच्या पाठीवरील कोणत्याही राष्ट्रात, त्या त्या राष्ट्राचे नागरिक आपापल्या देशाची सेवा करण्यासाठी अशाच प्रकारच्या संघटनेची निर्मिती करीत असतात. आमचे प्राणप्रिय हिंदू राष्ट्र अर्थात हा हिंदुस्थान देश, हेच आमचे कार्यक्षेत्र असल्याने त्याच्या हितांच्या रक्षणासाठी आज या देशात संघाची स्थापना केली आहे आणि याच संघाच्या माध्यमातून राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्पही आम्ही सोडला आहे.”
 

rss 
डॉ. हेडगेवारांनी हिंदू समाजाला, संस्कृतीला आणि धर्माला हिंदू परंपरेच्याच अक्षुण्ण प्रवाहाचा एक अंगभूत घटक मानले. भारतीय परंपरा आणि भारतीय राष्ट्राचा वारसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे त्यांचे मत होते. राष्ट्राची निर्मिती ही परंपरेच्या उदरातून होते आणि परंपरेचा प्रवाह राष्ट्राला पाथेय स्वरूपात ठरतो, असे ते म्हणत. हिंदू तत्त्वलाभ, साहित्य, संस्कृती आणि इतिहास एकतेचा संदेश देताना परंपरांच्या आधारे राष्ट्रीयत्वाला स्थायी, गतिमान आणि ठोस पाया देण्याचे काम हिंदू संघटनांचे आहे, असे डॉक्टर मानत. हिंदू संघटन हे एक राष्ट्रीय कार्य आहे. “त्यामुळे संघकार्य आणि त्याचे तत्त्वज्ञान हा काही कोणता नवा शोध नाही. आमचा सनातन हिंदू धर्म, आमची प्राचीन संस्कृती, आमचे स्वयंसिद्ध हिंदू राष्ट्र आणि अनादिकाळापासून चालत आलेला आमचा परमपवित्र भगवा ध्वज याच या सर्व गोष्टी संघाने विचारपूर्वक समाजासमोर मांडल्या आहेत,” असे ते म्हणत. या सर्व पैलूंना परिस्थितीनुसार नवरूप देण्यासाठी जी नवी कार्यप्रणाली आवश्यक वाटेल, ती संघ अंगीकारेल, असे ते म्हणत.
 
 
डॉ. हेडगेवारांचा भर दोन गोष्टींवर होता. हिंदू समाजाच्या सामाजिक आणि राजकीय स्तरावरील दुर्बल स्थितीसाठी बाह्य कारणांना आणि कारकांना दोष देणे म्हणजे सत्यापासून तोंड लपवणे आहे, असे त्यांचे एक मत होते आणि दुसरे कोणत्याही समाजाचे प्रभुत्व स्थापित होण्यासाठी आंतरिक शक्ती आणि इच्छाशक्ती समाजांतर्गत स्थापन होते. यासाठी मुख्य गरज होती हिंदू समाजामध्ये राष्ट्रीयत्वाचा भाव जागृत करण्याची. हिंदू समाज दुर्बळ, शक्तिहीन बनला होता तो अंतर्गत मतभेदांमुळे आणि क्षुद्र भावनांमुळे. त्यामुळे संघाने आपल्यासमोर पहिले उद्दिष्ट ठेवले होते ते राष्ट्रीयत्वाच्या चैतन्यदायक आधारावर हिंदूंच्या मनामध्ये ’समाज’ म्हणून त्याची ’ऐतिहासिक जबाबदारी’ खोलवर रुजविण्याची. ही समाजभावना खोलवर मनात दडलेली होतीच, पण ती जागीही करणे आवश्यक होते. डॉक्टरांना व्यापक दृष्टी आणि सर्वसंग्राही वृत्ती लाभलेली होती. मोपल्यांच्या बंडाची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी संघाची स्थापना केलेली नव्हती. राष्ट्रधर्माचा सकारात्मक-विधायक आविष्कार त्यांनी स्वरूपाने समाजाला घडवला होता. ते म्हणत असत, “आज हिंदुस्थानात 25 कोटी हिंदू आहेत; पण या देशाची एकूण लोकसंख्या पस्तीस कोटी असल्याचे सांगितले जाते. हे दहा कोटी आले कुठून? कधी एके काळी हे दहा कोटी आपल्यापैकीच होते ना?” आपल्या स्थितप्रज्ञतेचे आणि व्यापक वैचारिक अधिष्ठानाचे अप्रत्यक्ष दर्शन घडवीत ते पुढे म्हणत असत, “हे दहा कोटी आपल्यातून गेले कसे? आपण गाढ झोपलो होतो, हेच त्याचे खरे कारण होते. ते आमच्यातून गेले ते खरे पाहता त्यामुळेच.” डॉक्टराचे हे चिंतन संघाची भूमिका स्पष्ट करणारे आहे.
 
 
संघ सुरू झाला. नागपूर शहरातील राष्ट्रप्रेमी व्यक्तींना सोबत घेऊन संघाचे काम सुरू झाले. 1926 साली संघाची शाखा सुरू झाली. संघाचे कार्यक्रम, उत्सव साजरे होऊ लागले. संघविचारविश्वातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे विजयादशमी होय. या उत्सवात शस्त्रपूजन आणि प्रबोधन केले जाते. डॉ. हेडगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विजयादशमी उत्सवातील बौद्धिकांचा अभ्यास केला, तर असे लक्षात येते की, आपला संघ कशासाठी आहे, तिचा जीवनोद्देश काय आहे आणि आपण संघाच्या माध्यमातून काय साध्य करू इच्छितो, हे स्पष्ट होते.
 
 
1933 सालच्या विजयादशमी उत्सवात मार्गदर्शन करताना डॉ. हेडगेवार म्हणतात, “आजचा हा संघाचा आठवा वार्षिकोत्सव आहे. संघ स्थापन झाल्यापासून प्रतिवर्षी हा उत्सव करण्याची आमची प्रथा आहे. आज संघाच्या सुदैवाने नागपूरच्या राजघराण्यातील ज्येष्ठ राजपुत्र श्रीमंत कुंवर फत्तेसिंगराव भोंसले हे अध्यक्ष लाभले आहेत. संघाचा जन्म झाल्यापासून हे राजकुल संघाला पितृस्थानी आहे. कै. वा. राजे लक्ष्मणरावसाहेबांनी या संघाचे आजन्म वात्सल्याने संगोपन केले असून आज राजे फत्तेसिंगरावांनी हे स्थान स्वीकारून हेच राजकुल यापुढेही संघाचे पितृस्थानी राहील, असे जाहीर केले आहे, म्हणून आपणही सर्वांनी त्यांचेच अनुकरण करून त्याच आत्मीयतेने संघावर निरंतन प्रेम असू द्यावे. नागपूरस्थ जनतेलाच काय, पण कोणाही हिंदूला संघासंबंधीची माहिती अगर त्याचे तत्त्वज्ञान नव्याने सांगितले पाहिजे असे मला वाटत नाही. संघ ही एक हिंदू संघटना आहे. जगातील सर्व धर्मांमध्ये सात्त्विक गुण प्रदान व सर्व प्राणिमात्रांशी ‘आत्मवत् सर्व भूतेषु’ ही भावना ठेवून त्यांच्याशी प्रेमाने वागण्यास शिकविणारा हिंदू धर्म हाच एक धर्म आहे. जगात चालू असलेली हिंसा व अन्याय या धर्माला पसंत नाही, म्हणून असल्या प्रकारांना आळा घालावा, अशी प्रत्येक हिंदूची इच्छा असणे साहजिक आहे; पण निव्वळ उपदेशाने जगाची वृत्ती बदलणार नाही. तर ज्या वेळी हिंदू समाज सुसंघटित व समर्थ बनलेला आहे असे जगाला दिसून येईल, त्या वेळी आपले संबंधाने हल्ली सर्वत्र दिसून येत असलेला अनादर नाहीसा होऊन जगाची मान आपण सांगू तशी झुकेल. हिंदू धर्म पूर्वीपासून हेच कार्य करीत आलेला आहे व अशा पवित्र धर्माचे व संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठीच हा संघ स्थापन झाला आहे. हल्ली हिंदू समाज अत्यंत विस्कळीत स्थितीत आहे. तरी तो संघटित करून हिंदूंना हिंदुस्थानात हिंदू म्हणून अभिमानाने राहता यावे व हिंदू जाती ही मृत्युपंथाला लागलेली जाती नाही, हे जगाला पटवून द्यावे, हाच संघाचा उद्देश आहे. संघाला सात्त्विक गुणाचा पगडा जगावर बसवावयाचा आहे. मनुष्यजातीची राक्षसी वृत्ती काढून त्यांना माणुसकी शिकविणे, हे संघाचे ध्येय आहे. संघ कोणाचाही द्वेष किंवा उच्छेद करण्यासाठी उत्पन्न झाला नाही. गेल्या आठ वर्षांच्या संघाच्या इतिहासात संघाच्या शत्रुस्थानी असणार्‍यालाही संघावर तसा आरोप करता येणार नाही. आपल्या हिंदू राष्ट्राला संघटित व सामर्थ्यवान बनविण्याचा एकच पवित्र हेतू संघाने आपल्यासमोर ठेवलेला आहे.
 
rss 

आज संघाच्या 125पर्यंत शाखा असून सभासदांची संख्या 12000च्या वर गेलेली आहे. खुद्द नागपुरातच संघाच्या सोळा शाखा चालू आहेत. हे कार्य सर्व हिंदू समाजाचे असल्यामुळे प्रत्येक माणसाने हा हिंदू समाज संघटित करण्याची काळजी घेतली पाहिजे. आजची हिंदूंची दीनवाणी स्थिती नाहीशी करून त्यांचे श्रेष्ठत्व जगाला मान्य करावयास लावणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. संघाच्या कार्यांत पक्षभेद संभवत नाहीत. हिंदू संस्कृतीच्या रक्षणाचे ध्येय मान्य असलेल्या प्रत्येक हिंदूला संघाच्या कार्यांत तनमनधनाने भाग घेता येईल. याकरिता संघाची विचारसरणी समजून घेऊन हा संघ आपलाच आहे, अशा जाणिवेने प्रत्येक हिंदू वागेल, तर हिंदुस्थानची ऊर्जितावस्था होऊन तो वैभवाच्या अत्युच्च शिखरावर बसण्याचा सोन्याचा दिवस लवकरच उगवल्याखेरीज राहणार नाही.
 
 
संघ कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर डॉ. हेडगेवार यांनी दिले आहे. हिंदुस्थानाचे परमवैभव हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघ काम करेल. 1933 सालच्या वार्षिकोत्सवात डॉ. हेडगेवारांनी संघाची वाढती शक्ती अधोरेखित केली आहे. संघाचे काम काय? तर हिंदू संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे आहे. मानवी जीवनातील राक्षसी वृत्ती नाहीशी करून हिंदू समाजाने माणुसकीचा अंगीकार करावा, यासाठी संघ आहे. थोडक्यात काय, तर हिंदूंना हिंदूपणाची जाणीव करून देत हिंदूचे संघटन करण्यासाठी संघ आहे.
 
 
संघाची सुरुवात होऊन दहा वर्षांचा कालावधी लोटला असताना हिंदू समाजाला संघटनेची काय गरज आहे, यावर डॉ. हेडगेवारांनी भर दिला होता. 1935 सालच्या वार्षिकोत्सवातून डॉ. हेडगेवारांनी हिंदू संघटनेची आवश्यकता सांगताना पुढील विचार मांडले होते. “आजचा हा विजयादशमीचा दहावा वार्षिकोत्सव आहे. आम्ही करीत असलेले कार्य नागपूरची जनता आज दहा वर्षे दररोज पाहात असल्यामुळे त्यांना संघाबद्दल काही विशेष माहिती सांगावी असे नाही. डोळे उघडे ठेवून जगात व्यवहार करणे व जग कोणीकडे चालले आहे याचा विचार करणे हे मानवाचे लक्षण आहे. ह्या दृष्टीने पाहाता आपण हिंदू लोक डोळे उघडे ठेवून जगात वावरतो असे दिसत नाही. तसे असते, तर जग कोणीकडे चालले आहे हे आपणाला दिसून येऊन आपणही त्या दृष्टीने आपला व्यवहार बसविला असता. आपणा हिंदू लोकांना परमेश्वर पूर्णपणे ओळखतो आणि कदाचित समुद्र पर्यटन वगैरेसारख्या गोष्टी आपल्या धर्मनिष्ठेच्या योगाने आपणाला करता न आल्यामुळे जगाचा प्रवास करून आपल्याला जगाचे निरीक्षण करता येणार नाही, म्हणून आज आपल्या संघटनेमुळे जगातील राज्यकर्त्यांत अग्रेसरत्व पावलेल्या इंग्रज लोकांना त्याने हिंदुस्थानात पाठवून दिले आहे. हेतू हा की, आता ह्या आपल्या घरात आलेल्या लोकांच्या कृतीचा अभ्यास करून तरी त्यांच्या यशाची गुरुकिल्ली कशात आहे हे आपण पाहावे. डोळे उघडे ठेवून पाहिले तर ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येईल की, आपल्या राज्यावर सूर्य केव्हाही मावळत नाही, असे अभिमानाचे वाक्य इंग्रजी ज्याच्यामुळे उच्चारता येते आणि जर्मनीसारख्या अत्यंत प्रबल शत्रूलाही ज्याच्यामुळे ते नामोहरम करू शकतात, अशी जर कोणती एक गोष्ट असेल, तर ती म्हणजे त्यांची संघटनाच होय.
 
https://www.vivekprakashan.in/books/shri-guruji-golwalkar-biography/
 
  इंग्रजांपासून तरी संघटना शिका. हो, त्यांची संघटना नमुनेदार आहे आणि त्यांचे सारे वैभव व सामर्थ्य ह्या संघटनेवरच अवलंबून आहे. एवढी साधी गोष्ट तरी आपणाला त्यांच्यापासून शिकता आली पाहिजे. हिंदू समाजाने स्वत: संघटित झाल्याशिवाय आजच्या जगात त्याला जगता येणे शक्य नाही, ही गोष्ट आम्ही बर्‍याच काळापासून सांगत आलो आहोत आणि त्या दिशेने केलेले हे आमचे कार्य जनतेसमोर आहे. आपण सर्वांनी दसर्‍याच्या महत्त्वाच्या व गडबडीच्या दिवशीसुद्धा येथे येऊन संघाविषयी आपले प्रेम व्यक्त केले, याबद्दल आम्ही आपले फार आभारी आहोत. आपण आमची मनापासून प्रशंसा करीत असता, हेही आम्हाला माहीत आहे; पण आता नुसत्या प्रशंसेचा काळ उरला नाही. प्रशंसा सर्वानाच आवडते; पण नुसत्या प्रशंसेने काम कसे होणार? संघ ही अखिल हिंदू समाजाला समर्थ बनविण्याकरिता कार्य करणारी संस्था आहे. ह्या कार्यात आपण सर्वांनी प्रत्यक्ष पाऊल टाकून भाग घ्यावा, हे आपले प्रेम कायम ठेवावे, हीच आमची आग्रहाची विनंती आहे.
 
 
संघ हिंदू समाजाला संघटित करेल; पण या संघटनातून साध्य काय करायचे आहे, हेही डॉ. हेडगेवारांनी स्पष्ट केले आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे शुद्ध राष्ट्रीयतेची मानसिकता तयार करावी लागेल. आपण या देशाचे मालक आहोत, याचा आपल्याला विसर पडला आणि आपण पारतंत्र्यात गेलो. आपले संरक्षण आपणच करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे आणि त्यासाठी हिंदू समाजात एकत्वाची भावना खोलवर रुजली पाहिजे. 1936 सालच्या वार्षिकोत्सवातून मार्गदर्शन करताना डॉ. हेडगेवार म्हणतात, “आज आपण विजयादशमीचा महोत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. या पवित्र दिवसाचा इतिहास हिंदुमात्राला सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. आजच्या विजयादशमीच्या महोत्सवापैकी ध्वज व शस्त्रपूजनाचा महत्त्वाचा प्रसंग आहे. हा आजचा प्रसंग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. हिंदू जातीला भूषणभूत असलेले व सर्वांच्या आदरास पात्र झालेले आपले राजेबहादूर रघुजीराव भोसले या ठिकाणी जातीने हजर आहेत. त्याचप्रमाणे सर्व जगतात बुद्धिमत्तेच्या दृष्टीने श्रेष्ठ ठरलेले व नागपूर विद्यापीठाचे व्हाइस चॅन्सेलर विद्वन्मुकुटमणी डॉ. सर हरिसिंग गौर आजच्या समारंभाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. खरोखरच हा अवर्णनीय असा योग आहे. परमेश्वरी कृपेचा वरदहस्तच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर असल्याचे हे प्रतीक आहे, असे मी समजतो. अखिल राष्ट्रात जिकडे पाहावे तिकडे निराशा पसरलेली. कार्याच्या मार्गात आपत्तीचे डोंगर विखुरलेले. अशा प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाऊल पुढेच पडत आहे. हाती माती धरून पाहावी, तो तिचे रूपांतर सोन्यात झालेले दिसावे, इतका विस्मयजनक अनुभव संघाला येत आहे. यावरून संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे, हीच निष्ठा आमच्या अंत:करणात उत्पन्न झाली तर नवल काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी महोत्सव वार्षिकोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. आजचा प्रसंग म्हणजे अकरावा वार्षिकोत्सव आहे. गेल्या अकरा वर्षांत संघाने केलेल्या कार्याचे स्वरूप नागपूरच्या हिंदुमात्राला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फारच लहानसे कार्य करू इच्छितो. संघाला मोठ्याने बोलण्याची इच्छा नाही. संघाला प्रसिद्धीची हाव नाही. लहान तोंडी मोठा घास घेण्याची संघाला सवय नाही. संघ तेच कार्य करू इच्छितो, की जे प्रत्येक मानवाने कर्तव्य म्हणून करणे अवश्य आहे. आपला समाज, आपला धर्म, आपली संस्कृती व आपले राष्ट्र या पृथ्वीवर जिवंत राहावे - स्वाभिमानाने जिवंत राहावे - हीच इच्छा व महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे आणि तीच इच्छा व महत्त्वाकांक्षा संघाची आहे. हिंदुस्थान हे हिंदूंचे एकमेव घर आहे. या घरात हिंदुजातीला सुखाने राहाता यावे, सुरक्षितता वाटावी व या घरावर कोणत्याही काळी संकट येऊ नयेत, हीच प्रामाणिक इच्छा मनात धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करीत आहे. हिंदुस्थान हे माझे मालकीचे घर आहे व त्याच्या संरक्षणाची सर्वस्व जबाबदारी माझ्यावर आहे, ही शुद्ध राष्ट्रीयत्वाची भावना हिंदुमात्रांत उत्पन्न करण्याचे कार्य संघ करू इच्छितो.
 
 
पण वस्तुस्थिती अशी आहे की, हिंदूंना आपल्याच घरात सुखाने नांदता येत नाही. हिंदुस्थान हिंदूंचे घर असूनही ते नसल्यासारखेच वाटते. त्यांना सुरक्षितता वाटत नाही, स्वाभिमानाने जिवंत राहता येत नाही. ‘नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा’ अशातलाच प्रकार आहे! आपण हिंदू लोक आपल्याच घरात सुरक्षितपणे नांदू शकत नाही. याला कारण काय? या सर्वांच्या मुळाशी जर कोणते महत्त्वाचे कारण असेल तर ते आपले दौर्बल्य हे होय. जगातील इतर राष्ट्रांकडे दृष्टी फेकल्यास आपणांस असे दिसून येईल की, प्रत्येक समाज समर्थ व सुसंघटित असून मोठ्या अभिमानपूर्वक जिवंत आहे. याच्या अगदी उलट दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिण्याचा शोचनीय प्रसंग आपल्यावर आपल्याच दौर्बल्यामुळे आलेला आहे. या राष्ट्रीय आपत्तीला आपले आपणच कारणीभूत आहोत. अशाही आपत्तींतून डोळे वटारून पाहू नये, आक्रमक बुद्धी अंत:करणात ठेवून हिंदुजातीच्या नाशासाठी प्रयत्न करण्यास कोणीही धजू नये असे वाटत असल्यास आपण स्वत: समर्थ व सुसंघटित बनले पाहिजे.
 
  हिंदू समाज कितीही जातीत विभागला गेला असला, तरी संघ हिंदू ही एकच जात ओळखतो. ब्राह्मण-अब्राह्मण, स्पृश्यास्पृश्य, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित हे भेद संघ जाणत नाही. संघाला हिंदुत्वाशिवाय काहीच महत्त्वाचे वाटत नाही. इतकेच नव्हे, तर हिंदुत्व संरक्षणासाठीच संघाची निर्मिती आहे, हे प्रत्येकाने अवश्य ध्यानात असू द्यावे. या पवित्र भगव्या ध्वजाखाली अखिल हिंदूंची संघटना करणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे.
 
आपला समाज व आपले राष्ट्र स्वसंरक्षणक्षम बनविणे हे पापाचरण नव्हे. अन्यथा तर नव्हेच नव्हे. उलट स्वसमाज व स्वराष्ट्र यांच्या संरक्षणार्थ कर्तव्यबुद्धीने सतत निष्ठेने प्रयत्न करीत राहणे हेच न्याय्य व पुण्याचरण आहे. हिंदुस्थानात हिंदुमात्रांची प्रभावशाली संघटना घडवून आणणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक विश्वविद्यालय आहे. आजच्या ह्या प्रसंगी नागपूर विद्यापीठाचे व्हाइस चॅन्सेलर डॉ. सर हरिसिंग गौर हे आपणांस अध्यक्ष लाभले आहेत हा एक योगायोगच आहे.
 
 
संघाला एकच भावना उत्पन्न करावयाची आहे आणि ती म्हणजे हिंदुत्वाची. हिंदू समाज कितीही जातीत विभागला गेला असला, तरी संघ हिंदू ही एकच जात ओळखतो. ब्राह्मण-अब्राह्मण, स्पृश्यास्पृश्य, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित हे भेद संघ जाणत नाही. संघाला हिंदुत्वाशिवाय काहीच महत्त्वाचे वाटत नाही. इतकेच नव्हे, तर हिंदुत्व संरक्षणासाठीच संघाची निर्मिती आहे, हे प्रत्येकाने अवश्य ध्यानात असू द्यावे. या पवित्र भगव्या ध्वजाखाली अखिल हिंदूंची संघटना करणे हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय आहे. यापेक्षा अधिक उदात्त, अधिक उच्च व तेजस्वी ध्येय असू शकेल असे मला वाटत नाही.
 
ज्याला राष्ट्रकार्य करावयाचे आहे, त्याने आपल्यासमोर इंग्रजांचा आदर्श नेहमी ठेवावा, असे मी प्रतिपादन करीत असतो; पण माझे हे म्हणणे काही लोकांना चमत्कारिक वाटते. इंग्रजांच्या ठिकाणी जो जळजळीत देशाभिमान आहे, त्याचे अनुकरण करण्यात काही कमीपणा आहे असे मला वाटत नाही. सद्गुणांचे अनुकरण करण्यात राष्ट्राची प्रगती आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.
 
 
 
इंग्रजांचे हे देशोद्धारक गुण प्रत्यही अनुभवाला येतात. शहाजहान बादशहाची मुलगी आजारी असताना एका इंग्रज डॉक्टराने तिला औषधोपचार करून दुरुस्त केल्याबद्दल बादशहाने डॉक्टर महाशयाला पाहिजे ती मागणी माग म्हणून सांगितले. हिंदुस्थानातील एखाद्या गृहस्थाला असा प्रसंग आला असता, तर स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थांधतेनेच त्याने मागणी मागितली असती; परंतु या इंग्रज डॉक्टराने ब्रिटिश कंपनीला व्यापार करण्याची परवानगी मागितली. हे कशाचे द्योतक आहे? राष्ट्रकल्याणाची अहर्निश चिंता बाळगून त्यासाठी सर्वस्वाचे बलिदान व व्यक्तित्वाचा होम करण्याची इंग्रजांची देशाभिमानी वृत्ती खरोखरच आदर्शवत् आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.“ डॉ. गौरसाहेबांना युरोपच्या दौर्‍यात इंग्रजांच्या राष्ट्राभिमानाचा अनुभव आलाच असेल. आपल्या हिंदू समाजाला सांप्रतच्या गर्तेतून वर काढून त्याला सामर्थ्यसंपन्न करणे हे पवित्र ध्येय अहर्निश डोळ्यासमोर ठेवून संघ कार्य करीत आहे. आपल्या या पुरातन हिंदुराष्ट्राच्या पुनरुद्धारासाठी तनमनधनपूर्वक कार्य करण्याचा आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे. हेच पवित्र कार्य कर्तव्यबुद्धीने करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे. अनेक शतकांपासून पारतंत्र्याच्या बेड्यांनी जखडून पडलेल्या या देशाला स्वत:च्या उद्धारासाठी सामाजिक पातळीवर पुढाकार घ्यावा लागेल, तरच सर्वांर्थाने आपण आपल्या इतिहास आणि वारशाचे हक्कदार ठरू. संघाचा हाच उद्देश आहे, असे डॉ. हेडगेवार म्हणत असत. “आपण कोण आहोत याचा विसर पडला, आपण आत्मविस्मृतीत गेलो. परिणामी आपण पारतंत्र्यात गेलो. पारतंत्र्याला केवळ आक्रमक जबाबदार नाहीत. आपला समाज अधिक जबाबदार आहे, कारण आपण दुर्बल झालो, असंघटित झालो. याचा परिणाम म्हणून आपण आपल्या संस्कृतीपासून दूर झालो.“
 
डॉ. हेडगेवारांनी आत्मशोध आणि भविष्याची दिशा यावर भर दिला असे लक्षात येते. 1937 सालच्या वार्षिकोत्सवात ते म्हणतात, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ आपल्या स्वोद्धाराकरिताच काढण्यात आलेला आहे. संघाचा दुसरातिसरा कोणताही हेतू नसून केवळ स्वत:चा उद्धार करावा एवढीच त्याची इच्छा आहे; पण स्वत:चा उद्धार कसा होणार याचा आपण प्रथम विचार केला पाहिजे. स्वत:चा उद्धार करण्याकरिता जिवंत राहावे लागते. जो समाज जिवंत राहील, तोच समाज स्वत:चा व इतरांचाही उद्धार करू शकतो आणि संघाची स्थापना याचकरिता आहे. हिंदू समाज जिवंत राहावा अगर "Survival of the fittest' या तत्त्वाप्रमाणे जिवंत राहाण्यास लायक असावा याच उद्देशाने संघाचा जन्म झाला आहे.“
 
 
“हिंदुराष्ट्रावर अनेक आक्रमणे भूतकालात झालीत, वर्तमानकालात होत आहेत व भविष्यकालीही कदाचित होत राहतील, हे संघ जाणतो. संघाला हेही माहीत आहे की, दुसर्‍या समाजावर जे समाज आक्रमण करतात, त्यांना त्रयस्थ लोक दोष देतात व ज्यांच्यावर आक्रमणे होतात त्यांची कीव करितात; पण हे तिर्‍हाईतांच्या दृष्टीने ठीक झाले. आता ज्यांच्यावर आक्रमणे होतात, त्या समाजाने आक्रमकांना दोष देत बसण्यापेक्षा ही आक्रमणे का होतात ह्याची कारणे शोधून काढून ती दूर केली पाहिजेत. ती दृष्टीसमोर ठेवून आपल्या हिंदू समाजाकडे पाहिले असता हे अत्याचार व आक्रमणे होण्याचे कारण आमचे दौर्बल्य व नादानपणा हेच सर्वस्वी आहे. आज हिंदू समाज इतका नादान झाला आहे की, कोणीही यावे व आपल्या लहरीखातर हिंदू समाजावर मन मानेल ते अत्याचार करावेत; पण अजूनही आपणास त्याची काही फिकीर वाटत नाही व आपल्यातील विस्कळीतपणा व असंघटितपणा दूर करण्यास जसा व्हावयास पाहिजे तसा प्रयत्न अजूनही होत नाही, याबद्दल संघास वाईट वाटते. आम्हाला राग येतो तो हिंदू लोकांच्या या तिरस्करणीय मनोवृत्तीचा, हिंदू लोकांचा नव्हे. कारण ते तर आपलेच आहेत व त्यांच्याच उद्धारार्थ आपला जन्म आहे; पण ही तिरस्करणीय मनोवृत्ती - स्वत:चे रक्षण न करण्याची वृत्ती - कायम असल्यामुळे हिंदू समाजावर होणारी आक्रमणेही कायम आहेत व जोपर्यंत या वृत्तीचा समूळ नाश होत नाही, तोपर्यंत ही आक्रमणेही नाहीशी होणे शक्य नाही. संघाला ही हिंदूंची कमकुवत वृत्ती काढून टाकून हे पाप धुऊन काढावयाचे आहे व म्हणूनच या आसेतुहिमाचल हिंदुस्थानातील प्रत्येक कानाकोपर्‍यात संघशाखांचे दाट जाळे पसरवून संपूर्ण हिंदू समाज संघटित, प्रबळ व स्वसंरक्षणक्षम करणे एवढीच संघाची इच्छा आहे.“
 
संघाची कार्यकक्षा निश्चित करताना संघाच्या भूमिकेची दिशा निश्चित करण्याचे कामही डॉ. हेडगेवारांनी केले होते. आपल्या राष्ट्रीय उत्थानाचा आराखडा त्यांनी मांडला होता आणि तो हिंदुहितैषी मंडळींच्या मदतीने प्रत्यक्षात आणण्यासाठी संघ प्रयत्न करेल, असा विश्वासही प्रकट केला होता. 1938 सालच्या वार्षिकोत्सवात बोलताना डॉ. हेडगेवार म्हणतात, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सार्‍या राष्ट्राला एका सूत्रात बांधणारे संघटन आहे. ज्याच्या अस्तित्वामुळे राष्ट्राची दुर्बलता नष्ट होईल. काही लोक शंका उपस्थित करतात, की जर संघ केवळ हिंदूंसाठी आहे आणि हिंदूंचे संघटन करत असेल, तर त्याला राष्ट्रीय का म्हणावे. मला विश्वास आहे की, बुद्धिमान लोक असे म्हणणार नाहीत. हिंदुस्थान हिंदूंचे राष्ट्र आहे. त्यामुळे देशात केवळ तीच संस्था राष्ट्रीय असल्याचा दावा करू शकते, जी हिंदुहिताचे काम करते. जर कोणी हिंदुत्वाला पायदळी तुडवून नवीन राष्ट्रीयता निर्माण करत असतील, तर ती त्यांची चूक ठरेल. असे कधीही होणार नाही. हिंदुस्थान यावच्चंद्रदिवाकरौ हिंदुस्थानच राहील. संघ या परमपवित्र आणि प्रिय हिंदुराष्ट्राच्या उत्थानासाठी आवश्यक असणारी शक्ती निर्माण करून पुढे चालला आहे आणि आमचा विश्वास आहे की, पूर्वजांचा आशीर्वाद व आपल्या प्रेम आणि सहकार्यामुळे संघ लवकरच राष्ट्रव्यापी होईल.
 
शताब्दीकडे वाटचाल करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून डॉ. हेडगेवारांनी हिंदू संघटनेचा बीजमंत्र दिला. हिंदू समाजाचे संघटन आणि राष्ट्रीयत्वाची पुनर्जागृती या दोन सूत्रांच्या आधारे संघकाम चालू आहे. साधारणपणे पंधरा वर्षे डॉ. हेडगेवारांनी संघाचे सरसंघचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या हयातीत संघ नागपूरबाहेर गेला. अन्य प्रांतांत संघाच्या शाखा सुरू झाल्या आणि 1940 सालच्या संघ शिक्षा वर्गात त्यांनी अखंड भारताचे लघुरूप अनुभवले. संघमंत्राने भारित झालेला हिंदू समाज त्यांना अनुभवता आला.
 
डॉ. हेडगेवारांची हिंदुराष्ट्राची अनुभूती ही अनुभवसिद्ध होती. त्यामुळे डॉ. हेडगेवारांच्या शब्दांना मंत्रसामर्थ्य लाभले होते. गहन तपाचरण करून आपल्या ऋषिमुनींनी जसे शब्दांना सामर्थ्य प्राप्त करून दिले होते, अगदी तसेच डॉ. हेडगेवारांनी ‘हिंदू’ या शब्दात मंत्रतत्त्व भरले आणि हिंदू, हिंदू समाज आणि हिंदुराष्ट्र या तीन शब्दांच्या आधारे हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला. ज्याप्रमाणे शालिवाहनाने मातीच्या बाहुल्यांमध्ये प्राण फुंकले आणि परकीय आक्रमणाचा पाडाव केला त्याचप्रमाणे गलितगात्र झालेल्या हिंदू समाजाला पुन:जागृत करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी संघमंत्र विकसित केला. या सार्‍याचा परिणाम पुढीलप्रमाणे झाला -
 
1) हिंदू समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली. 2) आपली संस्कृती, संस्कार, परंपरा यांचे समाज संघटन करण्यासाठी काय योगदान आहे, यांचा शोध सुरू झाला. एका अर्थाने आपल्या मुळाचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. 3) आपले सांस्कृतिक संचित काय आहे आणि ते कालातीत कसे आहे, याची जाणीव होऊ लागली. 4) आपण भारतमातेचे पुत्र आहोत, परस्परांचे बंधू आहोत, हा बोध उत्पन्न झाला.
 
डॉ. हेडगेवारांनी सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलेल्या संघमंत्रांनी भारावून गेलेल्या अनेक पिढ्या कार्यरत झाल्या. आपण हिंदू समाजाचे संघटन करत आहोत, या छोट्या वाक्यात सामावलेली प्रचंड कृतिशीलता प्रत्यक्षात आणण्यासाठी तनमनधनपूर्वक काम करणारे हजारो कार्यकर्ते निर्माण झाले, हे डॉ. हेडगेवारांच्या संघमंत्रांचे सामर्थ्य होय.

‘हिंदुराष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या ग्रंथातून साभार.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001